मातीचा किल्ला : भाग तीन

Submitted by अंकुरादित्य on 5 November, 2013 - 00:02

अभिव्यक्ती म्हणजे काय ? अभिजात म्हणजे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी असतील त्यांनी मातीचा किल्ला पहावा . किल्ला हे माणसाला समृद्ध करणारे , त्याच्या निरीक्षण आणि आकलन शक्तीला वास्तवात उतरवणारे , , वास्तवाहून चार पावले पुढे जाऊन विचार करणारे ,कल्पनेला सत्यतेच्या कोंदणात बसवणारे , येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे , खर्ची पडलेल्या अनेक पिढ्यांच्या कर्तुत्वाची गाथा सांगणारे शिल्प असते . मग तो सह्याद्रीच्या निबिड अरण्यात ,घनदाट जंगलात वर आलेल्या कातळावर घडवलेला अभेद्य गड असो किंवा परसात केलेला काही फुटी मातीचा किल्ला असो , आकार बदलला तरी भाव बदलत नाही . मातीचा किल्ला करणे म्हणजे आपलंच असं स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते . राजेपण जरी शिवाजीचे असले तरी त्यास ते मिळवण्यास सहाय्य कण्याची एक समृद्ध धडपड असते . हि धडपड गेली साडे तीनशे चारशे वर्ष अखंड सुरु आहे . सह्याद्रीच्या कातळात आणि शहराच्या सिमेंटात अजूनही शिवरायांचे स्मरण होते . . पूजा होते . . साधना होते . . राजेंनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून प्रार्थना होते . ही 'परंपरा ' अनेक पिढ्यांपासून सुरु आहे . याच परंपरेतला एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळीत घडवला जाणारा 'मातीचा किल्ला ' . . .

केवळ दगडांचे दगडावर थर रचून आणि त्यावर माती लाऊन किल्ला तयार होत नाही . काहीतरी आकार निश्चित तयार होतो पण तो सार्थकी लागत नाही . हे सार्थकी लागणं किल्ल्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचे असते . कधी रायगडला जा , पावनखिंडीत जा , गेला बाजार शानिवारावर जा . . आयुष्याचे सार्थक झाल्या सारखे वाटते . तिकडील प्रत्येक भिंत , माती , राहिलेले अवशेष एक वेगळाच इतिहास सांगतात . आपण 'योग्य ' गोष्टीसाठी वापरले गेल्याने आयुष्याचे 'सार्थक ' झाल्याचा अभिमान बाळगतात . मिरवतात . आपणही मग मुठभर माती हातात घेऊन कपाळाला लाऊन घेतो . आपल्यासाठी आपल्याच लोकांनी आपल्याच परक्या सारख्या लोकांचे सांडलेले रक्त त्या मातीत हुडकायचा प्रयत्न करतो . हिंदवी स्वराज्य डोळ्यात सामाऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो . असा वारसा असलेला किल्ला ' करून टाकला ' या सदरात कधीही मोडत नाही . किल्ला रचण्या सोबत तो घडवायचा सुद्धा असतो . प्रतिकृती बनवण्याचे काम तुलनेने सोपे असते . विविध कोनातून काढलेले फोटो डोळ्यासमोर ठेवले आणि त्यास कष्टाची जोड दिली की प्रती किल्ला बनून जातो . कल्पनेतल्या किल्ल्याला आकृती देणे हे मात्र श्रमाचे काम असते . कारण इथे समोर केवळ दगडे ,विटा ,माती असते अन त्यातून आपल्याला काय घडवायचे आहे त्याचे मनात चित्र तयार असते . . मातीत अंकुरु पाहणाऱ्या अभिव्यक्तीचे , अभिजाततेचे , सर्जनशीलतेचे ते बीज असते . . राजेंनी जरी साडे तीनशे किल्ले बनवले असले तरी त्यांच्या बाळगोपाळ मावळ्यांनी लाखो किल्ले घडवले आहेत . . इटुकले पिटुकले , सहज भेदता येतील असे , अनुकूल भौगोलिक जागेवर अन परिस्थितीत बनवलेले त्यास साडे तीनशे किल्ल्यांचे महत्व एका दृष्टीने नाही . पण . . . . रस्त्या रस्त्यावर , गल्लो गल्लीत , घरा घरात , गावा गावात , मना मनात शिवशाही रुजवण्याचे सामर्थ्य मात्र निश्चितच आहे . . .

या किल्ला करायच्या पद्धतीत आता बराचसा फरक पडला आहे . मी एकदम लहान असताना उभी दगडे रचून , आडव्या फरशा घालून त्यावर चिखलाचे थर चढवून किल्ला बनवायचो . मी थोडा मोठा झाल्यावर दगड रचून त्यात आडव्या काठ्या घालायच्या आणि वरून मातीत भिजवलेले पोते घालायचे म्हणजे हवा तसा आकार मिळवता येतो , माती कमी लागते अन वेळ वाचतो . या दोन पद्धतीने मी किल्ला केला . आता तो कसा करतात मला माहीत नाही . येता जाता मी करत असलेल्या किल्ल्यांच्या निरीक्षणातून एक गोष्ट जाणवते , किल्ले बनवायची पद्धत जरी बदलली असली तरी किल्ला अजून तसाच आहे . हिरकणी बुरुज , पायथ्याशी रामदास स्वामी यांची दोन उभ्या विटा वर एक आडवी वीट या पद्धतीने केलेले मंदिर , गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज अफजल खान यांच्यातील युद्धाचा एक पुतळा , दोन बुरुज करून त्यावर ठेवलेल्या तोफा असे स्वरूप कितेक वर्षे कायम आहे . त्यात काळानुरूप नाविन्य येत नाही . व्यायसायिक किल्ला निर्माते काहींबाही करतात पण ती मूळ किल्ल्याची नक्कल असल्याने त्याची नकळत मूळ किल्ल्याच्या भव्यतेशी तुलना होते अन समोरील मातीचा किल्ला खुजा वाटायला लागतो . अर्थात हवा तसा इतिहास बदलून पाहिजे तसा किल्ला बदला असे माझे म्हणणे नाही . . .

शिवरायांचे आयुष्य केवळ किल्ले उभे करणे आणि जिंकणे यापुरते मर्यादित नवते . तो केवळ स्वराज्य निर्मितीतीला एक भाग होता . अर्थात या किल्ल्यांवरच स्वराज्य मजबूत उभे राहिले हा युक्तिवाद सुद्धा मान्य . शिवरायांचे आयुष्य म्हणजे एक अभेद्य ,चिरेबंदी किल्ला होता . त्यातील सर्व प्रसंग हे त्यांच्या संस्कारी पण कणखर मनाचे प्रतिक होते . हेच प्रसंग निवडून त्यावर आधारित किल्ले आता व्हायला हवेत . अगदी स्वराज्याची रोहीडेश्वर मंदिरात शपथ घेतल्या पासून ते आगरायेथून सुटका होई पर्यंत . तो प्रसंग सामरिक असो वा मुत्सदिक त्यांचे सादरीकरण झाले पाहिजे . नवीन कल्पना आणि संकल्पना रुजल्या , रुळल्या आणि स्वीकारल्या पाहिजेत . . परंपरा जपत असताना कुठेतरी नवीन पायंडे पाडले पाहिजेत . . शिवाजी आपल्याला केवळ माझ्या किल्ल्यान्पुर्ते मर्यादित रहा असे सांगत नाही तर त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घ्यायला सांगतो . . तेच प्रेरणादायक प्रसंग आपण मांडले पाहिजेत . . . ते किल्ल्या इतके भव्य दिव्य नसतील , पसरलेले नसतील पण कधीतरी आकार आणि विस्तारा पेक्षा आशयाला आणि खोलीला महत्व दिलेच पाहिजे . . बरोबर न ?

रवींद्रनाथ टागोर म्हणतातच ,
.
त्या अनोळखी प्रदेशात केव्हातरी
तुझा संदेश आजही दऱ्या खोऱ्यात गुंजतो आहे
तुझे नेत्र आजही अनागातला न्याहाळत आहेत
ते स्वप्न काय असेल ?
हे मानवी देहधारी साधुपुरूषा
तुझी तपस्या ,ध्येय ,कार्य
जणू चिरंतनाला आव्हान देत आहे !! ""
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ला बनवायचं भाग्य कधी लाभलच नाही म्हणावं लागेल. कधी बघितला पण नाही. हा, मातीत खेळलो, लोळलो... वगैरे मजा केली.

ते तेव्हढं "ती मजा नाही" हे खरं नाही. मजा तीच आहे, आपण मोठे झालोय. Sad