भयकथा - STY

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

चाफ्याने गडावर काल एका भयकथा STY ची सुरुवात करुन दिली होती... गडकर्‍यांनी आपापल्या पोस्टचा रतीब घालून आज दिवसअखेर इथपर्यंत कथा आली आहे. ... आता वाहून जायला नको म्हणून इकडे लिहू यात..

कथेचं नाव - काळरात्र.. Happy
_____________________________________

सुटीचा पुरेपुर आनंद घ्यायचा' इतकाच त्याचा आजचा कार्यक्रम ठरलेला. दिवसभर चॅटींग करावे, कुठेतरी उनाडक्या कराव्यात, हॉटेलात एखादी डीश घ्यावी नुस्तं एन्जॉय बस्स ! आणि काही नाही.
पण बहुतेक त्याचा कार्यक्रम नियतीला मान्य नसावा. उशीरा उठून त्याने पी.सी. ऑन केला आणि लाईट्सने दडी मारली. आता.......? एकट्याला दिवस घालवायचा आणि लाईट्स नाहीत म्हणजे बोंबच की.
मग त्याने आपल्या दुसर्‍या छंदाकडे लक्ष वळवले. आपल्या स्टडीतल्या पुस्तकांकडे मोर्चा वळवला. कैक पुस्तके कधीतरी वाचु म्हणुन धुळ खात पडली होती. आजच्या सन्नाट्याला शोभेल असे भयकथांचे पुस्तक त्याने उचलले.

पुस्तक छोटसंच होतं असंच कधीतरी प्रवासात एखाद्या स्टेशनवर दिसलं आणि घेतलं झालं. पण वाचायचा योग आज आला. पुस्तकावरची धुळ झटकताच पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव स्पष्ट दिसायला लागलं... "काळरात्र - ले. मल्हारराव मोहिते."

त्याने क्षणभर पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे पाहिले आणि तो दचकलाच. त्याला चांगलेच आठवत होते की मुखपृष्ठावर पिंपळाच्या झाडाचे रेखाटन होते. आता मात्र ते कोरे होते... साफ कोरे. फक्त काळ्या पार्श्वभूमीवर 'काळरात्र - ले. मल्हारराव मोहिते' ही अक्षरे सोनेरी रंगात चमकत होती.
आतमधले पान त्याने पाहिले आणि त्याच्या डोळ्यांत प्रचंड भीती तरळली. अर्पणपत्रिकेत त्याचेच नाव त्याला दिसत होते. आणि खाली अक्षरे होती...
'वीस वर्षांनंतर... तू हे वाचशील. आठवेल का तुला सारे, जे होते घडले तेव्हा?'
कुठूनसे घड्याळाने बाराचे ठोके दिले.

तो दचकला पण क्षणभरच. तसा तो काही पहिल्यांदा भयकथा वाचत नव्हता. ह्या पद्धतीची अर्पणपत्रिका त्याने पहिल्यांदाच पाहिली होती इतकंच... हॅट यात काय घाबरायचं असा धीटपणे विचार करुन त्याने पान उलटले. 'धाड..SSSSSSS' अचानक झालेल्या आवाजाने त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले.

तिकडे एक काळीकुट्ट मांजर त्याच्याकडे बघत उभी असलेली त्याला दिसली.. जसा जसा तो तिच्याकडे सरकू लागला तशी तशी ती मोठी होत आहे की काय असा त्याला भास होत होत.. पण तो भास नव्हता ते खरेच होते. हळू हळू त्या मांजरीचे रुपांतर एका काळ्या चित्त्यामध्ये झाले होते..

त्याला एक कळत नव्हते की ते जनावर एवढे शांतपणे कसे काय उभे होते.. म्हणून त्यानी त्या पुस्तकाच्या पानवर नजर टाकली तर.....

पुस्तकातलं पहिलंच वाक्य होतं. आता असंच होत रहाणार. मांजरीचा चित्ता होणार. दिवसाची रात्र आणि पौर्णिमेची अमावस्या... चमकुन त्याने बहेर पाहिले तर चक्क काळोख आणि चंद्र ही नाही. अरे बापरे टेबलावर ही मेणबत्ती कोठुन आली?? त्याने इकडे तिकडे पाहिले आणि.....

आणि...... आपल्या आजुबाजुच्या जागेकडे पहील्यांदाच त्याचे लक्ष गेले.......... देवा ! ही कोळीष्टकांनी भरलेली खोपटासारखी जागा आपली ? मग आपण बसलो होतो ती वेलफर्नीश्ड स्टडी रूम कुठे गेली? आणि आजुबाजुला झगमगणारे लाईटस?
त्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळुन पाहीले पण आजुबाजुचा देखावा तसाच राहीला. म्हणजे हा भास नव्हता तर ! मग हे असं कसं घडलं ? त्याला अचानक मघाशी ऐकलेल्या घड्याळ्याच्या टोल्यांची आठवण झाली, .. त्याच्या घरात असे जुने टोले देणारे घड्याळ नव्हतेच मग ते टोले.......?
छे SS आत्ता या क्षणि एखादी सिगारेट ओढल्या शिवाय मन ताळ्यावर यायचे नाही ! त्याने सवयीनेच टेबलाचा पहीला ड्रॉवर खेचला...... हे काय ? त्याच्या हातात लाकडाच्या वाळवी लागलेल्या तुकड्याखेरीज काहीच आले नाही....... ! आपण नक्की कुठे आहोत? मनात उठून बाहेर जाण्याची प्रबळ इच्छा झाली पण समोर त्याच्यावर नजर ठेउन असलेली ती मांजर नव्हे चित्ता, मनात विचारांचे नुसते वादळ उठलेले होते. तो नक्की कुठे होता ? उत्तर मिळालेच तर त्या पुस्तकात मिळणार होते त्याने पुस्तकाचे पुढचे पान उलटले .......... !

आता मात्र काही विचित्र प्रकार न होता गोष्ट सुरु झाली..
विक्रम जाम कंटाळला होता एकटा घरात बसून. हे घर, ही जागा सगळंच नविन होतं त्याच्यासाठी. फॉरेस्ट ऑफीसर म्हणून किरकटवाडीसारख्या आडगावी यायला खरं तर कुणीच तयार नव्हतं. विक्रमला मात्र त्यात काहीच अवघड वाटलं नाही. उलट त्याला आवडायच्या अशा शांत जागा. पडक्या हवेल्या आणि जुन्या इमारतीत फिरणे हा तर त्याचा आवडता छंद होता. त्याला नेहेमी अशा इमारतींकडे / हवेल्यांकडे बघुन प्रश्न पडायचा.. कधी काळी ही हवेली संपन्न असेल का? कुणाचं तरी नांदतं घर असेल हे.? कुणाचं असेल? आता कुठे गेले या घरातले सगळे. त्यापैकी कुणी एखादा तरी वारस असेल का कुठे असेल? कशी रचना असेल या घराची.... असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात रुंजी घालत.

इतकं वाचलं आणि त्याला एकदम ते पत्र आठवलं काय बरं नाव होतं पाठवणार्‍याचं.. तो विचार करु लागला पण त्याला नाव आठवेना. तू हवेलीचा वारस आहेस असंच लिहिलं होतं आणि गावाचं नाव कोणती तरी वाडी असं होतं बहुदा. कोणीतरी चेष्टा केली म्हणुन सोडुन दिलं त्याने. ते पत्र मग कुठे गेलं कोण जाणे. त्याचं लक्ष मेणबत्तीकडे गेलं तर त्याच्या खाली एक कागद होता. कुतुहलाने त्याने तो उचलला तर ते आंतर्देशिय पत्र होतं. वर त्याचंच नाव होतं. पत्र उघडलेलंच होतं.. हेच ते पत्र तर नाही असा विचार करीत त्याने आतलं पान पाहिलं तर तिथे एकच ओळ - आधीचं पत्र मिळूनही आला नाहीस शेवटी मलाच यावं लागलं. खाली सही होती - विक्रम.

त्याने सभोवार पाहिले. फिक्या-धुरक्या रंग उडालेल्या भिंती .. एका भिंतीमध्ये डोळे गच्च मिटून घेतलेली दोन भिंतीतली कपाटं .. त्यांच्यामधोमध एक खुंटी. छतही जुन्या धाटणीचं. लाकडी पटयांना तोलून धरणार्‍या कमरेत वाकलेल्या वाश्यांनी पेललेलं. खूपच जुनं घर असावं!
समोरच्या जुन्या पद्धतीचे उभे गज असलेल्या खिडकीच्या तावदानं फुटलेल्या फळ्या भकासपणे सताड उघडल्या होत्या. त्यातून झिरपून खोलीच्या एका कोपर्‍यात सांडलेल्या मंद चांदण्यावर बाहेर माजलेल्या वेली-जाळ्यांच्या सावल्यांचे फराटे चुकार झुळकेसरशी मधूनच शहारत होते.

विषय: 
प्रकार: 

सरी आणि मंडळी
चला चालू करा Happy