मातीचा किल्ला : भाग दोन

Submitted by अंकुरादित्य on 1 November, 2013 - 06:00

माणूस सदनातून सदनिकेत रहायला गेल्यापासून सहजीवनातील मजा मर्यादित झाली . चाळ किंवा वाडा हे जरी सदनिकेचे प्रकार असले तरी त्यांच्या वास्तूत सहजीवन कोठेतरी खोलवर मुरले रुजले होते . एखाद्या खोलीतील जन्माचा आनंद आणि एखाद्या खोलीतील मरणाचे सुतक संपूर्ण चाळ साजरे करत होती ,पाळत होती . प्रत्येक घर दुसऱ्या घराचा पार्ट होता . . सदनिकेच्या उंच्या जशा वाढत गेल्या तशा घराच्या लांब्या आणि मनाच्या खोल्या आकसत गेल्या . किलबीलणारे अंगण , कुजबुजणारे स्वयंपाकघर ,समृद्ध परसबाग हे प्रकार नामशेष झाले . माती परकी आणि पोरकी झाली . जागेच्या आणि वेळेच्या युद्धात कुटुंबाचा विस्तार सुकत गेला . .पीओपी चा किल्ला त्याच सुकलेल्या कुटुंबात , हरवलेल्या बालपणात , मोठ्यांच्या 'आमच्या वेळी असं नवतं ' या स्वगतात , सोसायटीच्या 'बरं झालं . . चिखल आणि स्वच्छता वाचली ' या स्वार्थात कुठेतरी 'कल्पतरू ' सारखा वावरत आहे .. . हा काळाने स्वीकारलेला बदल आहे . बदललेल्या संस्कृतीचा चेहेरा आहे . तो आपल्याला स्वीकारायलाच हवा . . . .

सदनिकेत राहणाऱ्या लोकांचे जीवन ,जीवनशैली आणि गरजा या वेगळ्या असतात . घर जरी आपले असले तरी त्याला घरपण नसते . संस्कृतीजरी आपली असली तरी ती जपायचे स्वातंत्र्य असतेच असे नाही . घराच्या कर्त्या पुरुषालाही /स्त्रीलाही आपली इच्छा सोसायटीच्या नियमात बसते का पाहावे लागते . परवानगी काढावी लागते . सगळीकडेच असे असते असे माझे म्हणणे नाही पण बहुतांशी ठिकाणी असे असावे . सोसायटीत 'किल्ला ' मी अजून पाहिला नाही . कदाचित माझे फिरणे कमी असेल त्यामुळे असेल . पण सोसायटीत किल्ला होणार कसा ? पहिला मुद्दा म्हणजे , आताशी सोसायट्या जागा मिळेल तिथे उभ्या राहतात . नदीच्या पात्रात अतिक्रमण करून काहीबाही बांधकाम होते . त्यामुळे भरलेले नदीचे पात्र आणि शेजारी साचलेले मातीचे डोंगर असे चित्र महानगरात पाहायला मिळत नाही .पोहायला आता 'स्विमिंग टेंक ' लागतो तो घरापेक्षा अधिक स्वच्छ असतो . त्यामुळे गेलो नदीत पोहायला ,येताना आणली दोन पोती वाळू सायकल वर टाकून असे होत नाही . सोसायटीत सर्वत्र 'पेविंग राज्य ' असल्याने मातीसाठी डबरा पाडायचा कोठे हा प्रश्न नरकासुरा सारखा उभा राहतो . त्यामुळे एखाद्याला किल्ला करायचा आहे असे कितीही वाटले तरी दगड ,माती या मुलभूत नैसर्गिक साधन संपत्तीच्या अनुपलब्धतेमुळे किल्ला घडवणे आणि घडवता घडवता स्वतः घडणे घडतच नाही . . . आता 'वड ' कुठे हुडकायचा म्हणून विकत आणलेल्या वडाच्या काडीला दोरा गुंडाळून वटपौर्णीमा साजरी होते तसेच पीओपी च्या किल्ल्याने दिवाळी साजरी होते . . यात दोष कोणाचा ? . . . . . परिस्थितीचा . . . नियतीचा !

परवाच एका सदगृहस्थाशी गप्पा मारत असताना दिवाळीचा विषय निघाला . ' राहिली नाही हो मजा दिवाळीची . . . आमच्यावेळी . . . " म्हणून जी रेल्वे सुटली ती महाराष्ट्र भ्रमंती करून स्टेशनावर आली . त्यांच्यातले आणि माझ्यातले ३ पिढ्यातले अंतर त्यांची दिवाळी अन आमची दिवाळी यात अंतर पडण्यास पुरेसे होते . अंती आमचे एका मुद्द्यावर एकमत झाले की आता दिवाळीचे 'अप्रूप ' राहिले नाही ती 'रुटीन ' झाली आहे . काही लोकांसाठी तो रुटीन मधला 'चेंज ' झाला आहे . मन मानायला तयार नवते पण 'दिवाळीतील चार दिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने अमुक अमुक शहराकडे जाणारा मार्ग तमुक मार्गे वळवण्यात आला आहे ' अशा आशयाची बातमी वाचून दिल मान गया . बॉस अब मान मोडके फराळ बनानेका और खांदा मोडे पर्यंत फराळ पोह्चानेका जमाना गया . . अब सिर्फ ड्राय फ्रुट डिब्बा ड्राय दिलसे देनेका और किस्सा खतम करनेका . . काही वर्षापूर्वी सुका मेवा देणारे घेणारे लोक ' हाय क्लास ' समजले जायचे . आता कोणीही येतं अन हातावर डबा टेकवून जातं . . काळासोबत गोष्टी बदलल्या आहेत हे खरे . मला अजून आठवते किल्ला करून दिल्यावर तू लाडू वळायला मदत करायची या तत्वावर आई -बहिणी माझ्यासोबत किल्ला करायला यायच्या . अवेळी धुळवड खेळून फराळ करायला लागायच्या . मोठाली दगडे उचलून , विटा रचून ,चिखल मळून दमलो की स्वयंपाक घरात लाडू खायला एक चक्कर व्हायची . चिखलाच्या हाताने रव्याचा लाडू उचलून तोंडात टाकताना जी चव आणि आनंद व्हायचा , तीच चव आणि तोच आनंद मी आजही हुडकतोय . सापडत नाही . कारण किल्ला आता बनवत नाही अन बनवलेले लाडू वर्षभर उपलब्ध असल्याने दिवाळीच्या लाडवाचे अप्रूप वाटत नाही . . . दिवाळी साजरा करणारा मी आता दिवाळखोरीत गेलो आहे . .

सांगलीत बापट बाल शाळे समोर मावळ्यांची दुकाने भरतात . . आजही मी त्या दुकानात आणि दुकानासमोर रमतो . आजही तसाच तानाजी ,बाजीप्रभू आहे का चेक करतो . बऱ्याच ठिकाणाहून गायब होत असलेल्या रामदासाचा पुतळा 'स्टोक ' मध्ये आहे ना ,ते घाबरत घाबरत बघतो . ओळीने रचून ठेवलेल्या तोफा , वाघ , कोल्हे , लहान मोठे मावळे , पीओपी चे बुरुज इत्यादी 'हिंदवी स्वराज्याचा ' ठेवा डोळे भरून पाहतो . घरात बागेची कामे करताना मातीत हात गेला की हात शिवशिवतात , दगड उचलून टाकताना भावना उचंबळून येतात . . लगोलग एखादा किल्ला बनवूनच टाकावा असे वाटते . पण सदनात राहूनही मी सदनिकेची मानसिकता स्वीकारली आहे . केलेला किल्ला 'मेंटेन ' कोण करणार ? या चिंतेने भावना दाबून ठेवाव्या लागतात , मन मारावे लागते . . मोठे झाल्याची किंमत कधीतरी मोजावीच लागते . .

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!! हा भाग ही सुरेख आहे..

आत्ता गडबडीत असल्याने पुन्हा नीट वाचेन ,तोपर्यन्त माझा रुमाल..