आली दिवाळी बनवा किल्ले

Submitted by ferfatka on 30 October, 2013 - 07:14

दिवाळी म्हटले की किल्ले तयार करण्याची लगबग बच्चे कंपनीत सुरू होते. परवा सोसायटीत हिंडताना लक्षात आले की, एकाही मुलाने किल्ला तयार केलेला नाही. न राहून मुलाला मदतीला घेऊन माती, दगड गोळा करून थोड्याच वेळात मातीचा किल्ला बनवला. माती शोधण्याची वेळ आली नाही. एमजीएनल (गॅस कंपनी) ने खोदकाम करून ठेवल्याने हा प्रश्न मिटला. मातीचीच तटबंदी, विहिर, शेती, गुहा तयार करून किल्याखाली शेतीसाठी जमिन तयार करून ठेवली. त्यावर आळीव टाकले झाला तयार किल्ला. दोन तासात गड सर झाला.

DSCN4866.JPG

सध्याच्या बिल्डिंगच्या संस्कृतीत दिवाळी किल्ले लोप पावत असल्याचे लक्षात येते. मी किल्ला तयार करत असल्याचे पाहून काका चिखलात काय हात घाण करतात? असे प्रश्न लहान मुले विचारू लागली. आम्ही तर कालच नवीन किल्ला विकत आणलाय असेही काहींनी सांगितले. खरे तर दिवाळीला मातीचे किल्ले तयार करायला हवेत. जागेची उपलब्धता व पालकांना नसलेला वेळ यामुळे हळूहळू किल्ले तयार करण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे.
सहामाईची परीक्षा संपली की मला वेध लागायचे ते किल्ला तयार करण्याचे. यासाठी लागणारे साहित्य पूर्वी सहज उपलब्ध होत असे. माती, दगड, विटा, बाटल्या, पोती असे साहित्य सहज उपलब्ध होत असे. दरवर्षी किल्ला तयार करताना त्यात वेगळेपण ठेवायचो. कधी जिंजरा, राजगड, रायगड तर कधी शनिवारवाडा अशा प्रतिकृती तयार करायचो. किल्ला तयार करण्यासाठी काही प्राथमिक तयारी करावी लागते. जसे की दगड, लाल माती, पाणी, पुरेशी माती नसल्यास घरातील मोठी बादली उलटी टाकून आजूबाजूला दगड रचूनही काम चालते. मात्र जागेअभावी सध्या तयार किल्ले विकत घेण्याकडे कल सध्या वाढायला लागला आहे. अशा तयार केलेल्या किल्यासमोर रांगोळी, पणती लावून वरती आकाशकंदील लावण्याची मजा काही निराळीच. दिवाळीत पहाटे उठून किल्याभोवती आई रांगोळी काढायची, मी किल्यावर पाणी शिंपडून किल्यावर शिवाजीमहाराज, मावळे व इतर छोटी खेळणी मांडायचो. मी दिवसभर किल्याची राखण करण्यात व आजूबाजूच्या मुलांनी तयार केलेले किल्ले पाहण्यात मस्त वेळ जायचा. एकदा दुपारी शिवाजीमहाराज पाळविण्यात आल्याचे शेजारच्या मित्रांनी सांगितले. शोधाशोध करून घरापासून काही अंतरावर शिवाजीमहाराजांना पळवून घेऊन जात असलेल्या आमच्या वयाच्या मुलांना आम्ही पकडून महाराजांना सोडवून आणण्याचे कामही केले. शंकराच्या मागे सलाईनची नळी लावून वरती बाटलीतून पाणी ओतून गंगावतरणाचा देखावा ही करण्यात मजा यायची.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
पुण्यातील संभाजी उद्यानात अनेक वर्ष किल्ले तयार करण्याची स्पर्धा ही घेतली जाते. अनेक मंडळेही स्पर्धा भरवत आहेत. शिवाजीमहाराजांनी बांधलेल्या गडकिल्यांचा खरा इतिहास मुलांना समजवायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनवणे हा पर्याय आहे. जेणे करून पुढील पिढीला आपली संस्कृती काय याची जाणीव नक्कीच होईल.

सोबत सध्या केलेल्या किल्याचा ताजा फोटो जोडला आहे. अजून मावळ्यांना माळ्यावरून काढायचे आहे. तोपर्यंत एवढेच. ताजा अपडेट काहीच दिवसात. तो पर्यंत सर्वांना दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा दुपारी शिवाजीमहाराज पाळविण्यात आल्याचे शेजारच्या मित्रांनी सांगितले. शोधाशोध करून घरापासून काही अंतरावर शिवाजीमहाराजांना पळवून घेऊन जात असलेल्या आमच्या वयाच्या मुलांना आम्ही पकडून महाराजांना सोडवून आणण्याचे कामही केले.
>>
हे मात्र भारी आहे. Rofl

ताजा अपडेट काहीच दिवसात. >>> नक्की, नक्की - मावळे, महाराज - सगळे पहायचे आहेत या हिरव्यागार किल्ल्यावर ....

छान आठवणी Happy
आम्ही गेल्या वर्षी किल्ला केला होता. याही वर्षी करतोय. किल्ल्यावर ठेवण्यासाठी शिवाजी महाराज आणि दोन तोफा गेल्या वर्षी ऑनलाइन मागवल्या होत्या. अजून मावळ्यांची वगैरे चित्रं हवी आहेत. यावर्षी दिसत नाहीयेत फ्लिपकार्ट किंवा Amazon वर. इथे बंगलोरला बाहेर दुकानात वगैरे नाही मिळणार. गेल्या वर्षी चौकशी केली होती. इतर काही सोय आहे का जिथून मागवता येतील?

Online माहीत नाही पण आमच्या इथे पुठ्ठ्याच्या तुकड्यावर मावळ्यांना चिकटवून मागून टेकू दिला होता. त्या निमित्ताने मावळे आणि घोडे वगैरे चित्र काढण्यात मुलांना गुंतवून ठेवलं होतं. :स्मित :शिवाय व्हरायटी मिळाली.

ह्या वर्षी भाच्यांसोबत किल्ला बनवायचा प्लॅन आहे.. बनवला की इथेच फोटो टाकेन.. माबोवर किल्ला मेकिंग स्पर्धा नसते का? असेल तर भाग घेण्यास उत्सुक आहे Happy

छान आहे धागा. प्रत्येक दिवाळीला लेकीचा हट्ट असतो किल्ला बनवुया म्हणुन. मी पण तोंडभरुन आश्वासन देतो की दिवाळीला गावाकडे गेल्यावर बनवुया.
पण गावी गेल्यावर नातलगांच्या, मित्रांच्या भेटीगाठी, दिवाळीची तयारी यात चार दिवस कसे जातात कळतंच नाही. किल्ला बनवायचा राहुनच जातो. परत येतो तेव्हा लेकीने किल्ल्याच्या सजावटीसाठी नेलेल्या वस्तु केविलवाणेपणे कोपऱ्यात पडलेल्या असतात. पुढच्या दिवाळीची वाट बघत..

किल्ले विकत घेण्याकडे कल सध्या वाढायला लागला >> किल्ले बाजारात विकत मिळतात हे माहीत नव्हतं.

प्रत्येक दिवाळीला लेकीचा हट्ट असतो किल्ला बनवुया म्हणुन>> ह्या वर्षी बनवाच.. मलाही दिवाळीत मातीचा किल्ला बनवून सात वर्षे झाली.. ह्या दिवाळीत बच्चा पार्टी बरीच मूड मधे आहेत म्हणून मी किल्ला नक्की बनवणार Happy