एका मित्राने मला परवा सांगितलं की त्याच्या मुलाला (म्हणजे त्याला स्वतःलाच) शाळेने दिवाळीसाठी एक `प्रोजेक्ट' दिलंय `प्रोजेक्ट'. ज्यात दिवाळीचे `गुड इफेक्ट्स आणि बॅड इफेक्ट्स' (मुळात हे आधी मला काय ते समजलं नाही) लिहून द्यायचे होते. बॅड इफेक्ट्स म्हणाला मी गूगल वरून काढले. (:D बर... म्हटलं मी) गुड साठी काही बघ ना जमतं का लिहायला, एखादी लिस्ट, एखादं ग्राफिक किंवा एखादी कविता.
तेंव्हा सहज सुचली ही कविता काम करता करता. सांगा कशी वाटते.
दिवाळीचे चार दिवस
मजा येते भारी
दिव्यांनी रांगोळ्यांनी
घरे उजळती सारी ||धृ||
काम नसे अभ्यास नसे
सुट्टी मिळे सगळ्यांना
नवीन कपडे नवी खेळणी
आणि फटाके मुलांना
लाडू चिवडा करंज्यांची
लज्जत असते न्यारी ||१||
दिव्यांची लखलख चहुकडे
दरवळणारे सुवास
रांगोळ्यांच्या नक्षीमध्ये
समृद्धीचा वास
मंगल अशा या समयाला
लक्ष्मी येते दारी ||२||
मिटती चिंता दु:खे सारी
आनंदाला ये भरती
सारे येती एकत्र मग
नाती जुळती अन फुलती
आनंदाचे वाहत राहती
वारे दारोदारी ||३||
ही दिवाळी तुम्हाला सुख-समृद्धी आणि आरोग्याची ठरो ही सदिच्छा !