प्रवाहपतित.......

Submitted by अलका गांधी-असेरकर on 26 October, 2013 - 14:12

किती भराभर चाललेत ना दिवस.२०१३ आता कालपरवा तर सुरू झालं न् संपतही आलं एवढ्यात..?
फांदिवरून पिकलेलं एकेक पान गळत राहावं तसा कॅलेंडरमधून गळत राहतो एकेक दिवस..उजाडताच जगण्याच्या चहुदिशांनी भिरभिरत राहतो दिवस...आणि जगण्यालाच संपवत राहतो...रात्रीच्या कुठल्यातरी प्रहरी, गर्द कुहरात विरत राहतो ...

कधी डायरीत जाऊन बसतो दिवस. ...पिरॅमिडमधल्या ममीसारखा राहतो तिथं जपून..आपली ओळख नाव नंबरासह राखून..
पानं फुटत राहतात ...झाडाला ...तशीच कॅलेंडरलाही...झाडाला माहीत नसतं नेमकं कुठल्या पानानंतर सुरू होतं वठणं..जगण्याला तरी कुठं ठाऊक असतं कॅलेंडरच्या नेमक्या कोणत्या पानात असतंय त्याचं संपणं..

भल्याथोरल्या वृक्षासारखी वाटणारी, त्यांच्यासारखीच आपल्या आयुष्यावर सावली धरणारी, समाजात त्यांच्या नुसत्या असण्यानेही आधार वाटावा, आपल्या सर्वसामान्य जगण्यात आनंद निर्माण व्हावा अशी, जवळची-लांबची, घरातली- बाहेरची थोरथोर, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध माणसं, ही अश्शी..या काळाच्या गतीमान प्रवाहात लुप्त होत जाताना दिसतात..अगदी आपल्या डोळ्यासमोर..आणि आपल्या हातात काही असतंच काय.....अगतिकपणे बघत राहण्याशिवाय...

आणि आपणही कुठं काठावर असतो तेव्हा..याच प्रवाहाचा एक भाग बनून वाहतच असतो..अधुनमधून येणा-या भोव-यांमध्ये गरगरत राहतो. भिरभिरत राहतो..पण थांबू कुठं शकतो..

हा आपलाच प्रवाह काठावरून पाहता यायला हवा मात्र...दूर उभं राहून तटस्थ न्याहाळायला जमायला हवा..तरच कळेल की या प्रवाहपतित अवस्थेतही किती राग,लोभ, द्वेष, मत्सर मुठीत धरून ठेवलेले असतात आपण, वाहता वाहताही..
या प्रवाहातले किती बरे-वाईट धागे अकारण-सकारण गुरफटले गेलेत आपल्या भवती...किती गाठी बसत गेल्यात त्यांच्या ..

हे पाहता आलं..आपलं आपल्याला समजता आलं, तरच याच्यातून मुक्त होता येईल. हे असं दूरवरून आपलीच अवस्था न्याहळणं कठीण असेल पण अशक्य नसेल..ते जमलं तर मुठी आपोआपच सुटत जातील..धागे दूर सारता येतील..गाठी सोडवता येतील...आणि प्रवाहाला, त्यात सोबत वाहणा-या आपल्यासारख्याच प्रवाहपतितांनाही समजून घेता येईल.......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते जमलं तर मुठी आपोआपच सुटत जातील..धागे दूर सारता येतील..गाठी सोडवता येतील...आणि प्रवाहाला, त्यात सोबत वाहणा-या आपल्यासारख्याच प्रवाहपतितांनाही समजून घेता येईल......

वा...छान लिहिले आहे.