"आपण चुकून भेटलो नसतो तर ???"

Submitted by सुशांत खुरसाले on 25 October, 2013 - 09:20

दररोज कशी गं आपली 'चुकून' भेट होते ??

....मग अचानक समोरासमोर आलेल्या आपल्या अर्धपरिचित नजरा ...उगाच इकडे तिकडे बघू लागतात !

काही कारण नसता तू दुसरीकडे बघतेस..
"नेमका हाच कसा समोर येतो?" मनाला विचारतेस..

"ओळखलं की नाही तिनं?" मला वाटत राहतं..
माझ्यापेक्षा तिने मला जास्त ओळखलेलं असतं !!

मित्रांमध्ये बेमालूम मी मिसळल्याचं नाटक करतो ..
वळून-पुन्हा बघतो तिला विसरल्याचं नाटक करतो ..!!

दुसर्यादिवशी सुध्दा आपली अशीच भेट होते ...
दररोज कशी गं आपली चुकून भेट होते??

दोघंही दाखवतो जसं काहीच कळत नाही
घनदाट झालं नातं तरी मान्य करत नाही !!

आपलंच त्रोटक वागणं आपल्याला पाहावत नाही ..
सांगुन टाकावं वाटतं की आता राहावत नाही !!

आणि मग नंतर ..
आपण एक भेट ठरवतो ..
'जाणुनबुजून !!'
सगळ्या 'चुकून' झालेल्या भेटींची
बेरीज करण्यासाठी !

त्या भेटीत खरंतर..

आपल्याला एकमेकांशिवाय कोणीच दिसत नसतो..
तरी आपण दुनियेवर गप्पा मारत बसतो !

बोलत असतो काय अन् मनात काय असते...
निघायच्या वेळी मग दिलास धडक बसते !

पाय होतात जड, ह्रदयावर दगड..
पाणावतात डोळे ,कंपावतात स्वर !
शेवटी डोळ्यात पाहून आपण हसून म्हणतो..
"आपण 'चुकून' भेटलो नसतो तर ???" ..
"आपण 'चुकून' भेटलो नसतो तर...???"

-(एक बरीच जुनी कविता )

--सुशांत

Group content visibility: 
Public - accessible to all site users