प्रिय माझी होणारी........

Submitted by विकास दादा पवार on 23 October, 2013 - 08:02

प्रिय,
माझी होणारी तु.........

मी पहिल्यांदाच जेव्हा तुला पाहीलं. माझी स्पंदनं. मी तुला बहाल केली . तेव्हाच जीवनाची माझी खरी ओळख झाली. गारठलेल्या पावसात भिजलेल्या तनुवर काटा फुलुन यावा अशी तु हदयावर रोमांच फुलवून आलीस. आता..........
तु डोळ्यांसमोर असलीस म्हणजे तुझे अबोल डोळे माझ्याशी बोलत राहतात. तु डोळयासमोर नसलीस तरीही ते स्मृतीच्या हिंदोळ्यावर झुलत राहतात. डोळ्यात हे सूख आता मावेनाशे झाले आहे. तुझ्याशिवाय आकाश खुलेनाशे झाले आहे. डोळयातलं टिपुर चांदणं स्वप्नाळलेल्या पापणीतून थेंबताना तुझ्या डोळ्यातही पोर्णिमेचा स्निग्ध चंद्र थबकलेला असतो. त्यावेळी माझा श्वास तुझ्या डोळयात भिजलेला असतो. खरं सांगतो, काहूरलेला एकांत रक्तात मिसळताना खुप-खुप आठवण येते तुझी.................................
सकाळी पानांवरचं दव पापणीनं चुंबताना तु पदर सावरत उभी असते. व्याकुळ विरहाच्या रेशमी बेटांवरं.
मला माहित आहे ही कागदी नाव आहे. मनापासून बनवलेली. डोळ्यातून अव्याहत वाहणा-या आसवांच्या प्रवाहात सोडलेली. त्या नावेचं बुडणं मला मान्य आहे. पण तुला डोळेभरुन पाहिल्याशिवाय जगणं अमान्य आहे. तुझ्या डोळ्यांच्या ज्योतीत आयुष्य उजळत नसेल तर थडग्यातल्या अंधारात विलिन होण्यास काय हरकत आहे ? तुझ्या नजरेच टोक हदयात रुतत नसेल तर टोकावरचं आयुष्य जगण्यात काय मतलब आहे ? पापणीतलं पाणी इतकं आरसपाणी असावं की, त्या पाण्यातून तु मला मी तुला कळावं. एकमेंकाच्या आसवांत एकमेंकानी हसावं. ती हसरी थेंब साकळत कधी दोघांनिही रुसावं आयुष्य मिठ्ठीत घेत मिठ्ठीतच निजावं.
सखे, दु:ख आभाळालाही होतं म्हणून का त्यानं पृथ्वीवर प्रेम करणं सोडून दिलं आहे. विरहाचे थेंब थेंबताना आभाळाचा हळवेपणा कोणाला कळला आहे ? या हळव्या ओढीतले सप्तरंगी इंद्रधनुषी रंग जगाला कधी कळली आहेत ? त्याच्या आसवांनी लोकांची तृष्णा शांत होते, क्षुधा तृप्त होते. ही तृप्तीची ढेकर देणा-या लोकांनी कधी क्षितिजाच्या काठावर बसून आभाळाच्या हदयाचही स्पंदनं ऐकली आहेत ? त्याच्या जास्वंदी विरहानं व्यथीत होऊन दोन आसवं गाळली आहेत ? लोक हे असेच असतात दुस-याच्या अतृप्तीतून ते तृप्त होत जातात. तरीही शेवटपर्यंत अतृप्तच राहतात.
सखे, आता डोळ्यांना गवसलेय तुझ्या डोळ्यांतील महासागराचे गहिरेपण. चांदराती श्वासांना येणा-या भरतीच्या लाटांवर तरंगतानाही मी आकंठ बुडालेला असतो तुझ्या डोळ्यातील या अथांग महासागरात. त्या महासागरातून वेचून काढलेल्या शब्दरत्नानी मी आज इतका संपन्न झालो आहे की, प्रत्यक्ष रत्नाकरानेही माझ्यासमोर झोळी पसरावी.
सखे, तु पदरात बांधून घे माझ्या डोळ्यात हेलकावणा-या संवेदनाच्या लाटा. ओल्याचिंब होतील तुझया धमन्यातून वाहणा-या गुढ हुंदक्याच्या वाटा. ऋतुंची पालखी उद्या तुझ्या दारापुढुन जाताना लाज-या पदराचं टोक बोटावर लपेटून सोळा शृंगार करून तु माझ्याकडे एकदाच पाहा. घनभार केसांच्या आडोश्याला नजरेच्या कमानीत वसलेलं तुझ्या स्वप्नांचं गांव तुला दिसेल. त्या गावांपर्यंत पोचण्यासाठी माझ्या बुबुंळांची नाव तिथे असेल.
आता जन्मोजन्मी तू मला अशीच सांभाळून घे. वाटल्यास सप्तपदी घेण्याआधी पुन्हा-पुन्हा न्याहाळून घे.

तुझाच.............

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users