संहिता बद्दल काय वाटलं?

Submitted by मीन्वा on 20 October, 2013 - 09:53

संहिताची विचारात पाडणारी संहिता हेच खरं तर संहितेचं सार आहे. अतिशय गुंतागुंतीची आणि बुद्धीला आव्हान देणारी कथा, चित्रपट लांबीला जास्त असला तरी, आपल्याला त्यात बांधून ठेवते.

काही प्रश्न, असं वाटतं की, या जगापुढे युगानुयुगे पडत आलेत, वेगवेगळ्या देशात, संस्कृतीत आणि कदाचित वेगवेगळ्या भाषेत .. पण प्रश्न तोच. खरी गम्मत तर पुढेच आहे. अशा प्रश्नांची आपण काही पठडीतली, भिन्न संस्कृतींना आणि भिन्न समाजांना मान्य होणारी, उत्तरं शोधून ठेवली आहेत. यात परिस्थिती, घडणार्‍या घटना, माणसं सगळं काही वेगळं असलं तरी आपलं योग्य उत्तर एकच !

संहिता हा अशा अनेक प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रामाणिक आणि धीट प्रयत्न आहे. हो 'धीट'च म्ह्णावं लागेल. समाजाला मान्य असलेली उत्तर सोडून वेगळं उत्तर शोधणं, पुढे जाऊन ते स्विकारणं या दोन्ही गोष्टींसाठी 'दुर्दैवाने' खूप धाडसाची गरज आहे.

प्रेमाच्या त्रिकोणाचा प्रश्न, त्यातल्या सगळ्या खाचाखोचांसकट सर्व बाजूंनी समर्थपणे, नेटक्या आणि मोजक्या संवादातून उलगडत जातो. काळाप्रमाणे प्रश्नाच्या स्वरुपात, परीस्थितीत झालेले बदल तितक्याच समर्थपणे समोर येत जातात.

अशा कोड्यांचं सर्वांना मान्य असलेलं आणि सर्वांना सुखी करणारं असं उत्तर शोधणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखंच...

अशा प्रश्नांची खरी, प्रामाणिक, सर्वसमावेशक आणि सर्वसमाधानकारक उत्तरं शोधण्याची सुरूवात कधी तरी होईलही , कुणी सांगावं . अनेक वर्षांनी आपल्यात, आपल्या प्रश्नांची अशी उत्तरं शोधण्याचं आणि स्विकारायचं धाडस आलंच तर त्यात या चित्रपटाचं योगदान नक्कीच असेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users