'माझी शाळा'

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

एमकेसीएल प्रस्तुत आणि सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'माझी शाळा' ही नवी मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर २० ऑक्टोबरपासून दर रविवारी दाखवली जाणार आहे.

आजच्या काळात वैश्विकरणामुळे जगण्याचे संदर्भ बदलत आहेत, पूर्वीपेक्षा आजच्या काळातील जगण्याचे निकष वेगळे आहेत. आजच्या पिढीच्या मनात एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालाय. जग जवळ आल्यामुळे वेगवेगळया संस्कृतींची सरमिसळ झाली आहे आणि कशातून काय घ्यावं, काय आपलं आहे, काय सोडावं हे कळत नाहीये. पश्चिमेचा प्रमाणीकरणावर असलेला भर आणि आपल्याकडची विविधता, यांची जोडी कशी जमवायची हे कोडं अजून उलगडलेलं नाही. यश-अपयशाच्या व्याख्या बदलत आहेत. त्यात रोज नवनवीन संशोधन समोर येतंय. आपल्याकडचं जुनं उकरून बघितलं तर अनेक गोष्टी सापडतील, पण त्यांबद्दल फारसा अभ्यास झाला नसल्यानं काही तरी नवं सापडल्याचादेखील भाव येतोय. यात नवीन पिढीला येणार्‍या काळासाठी घडवणं हे एक मोठं आव्हान आहे.

मेंदूच्या नव्या संशोधनाचे निष्कर्ष, हातानं काम करत होणारं शिक्षण, मुलाची निर्णय क्षमता विकसित करणं, विचार करण्याची प्रक्रिया अंगिकारणारं हे येणार्‍या पिढीसाठी खूप आवश्यक आहे. नुसत्या घोकंपट्टीवर, गुण-आधारित परीक्षापद्धतीच्या मूल्यमापनावर, शिस्त, शिक्षा यांसारख्या वर्तनवादी संकल्पनांवर आधारलेल्या शिक्षणापेक्षा, कृतीतून, स्वनिर्णयावर आधारलेलं शिक्षण हेच खरं शिक्षण आहे, या तत्त्वावर पुढचं सर्व शिक्षण आधारलेलं हवं. शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्याने ‘शिकणं’ महत्त्वाचं, हे तत्त्व अंगीकारून शिक्षकाने ‘सुलभकाची’ भूमिका सहज स्वीकारणं हे ज्ञानसंरचनावाद रुजण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

शाळा, शिक्षण, पालकत्व, विद्यार्थी, ज्ञान, माहिती, काम, शिक्षक, तंत्रज्ञान आणि असेच अनेक शब्द सतत बोलण्यात येत असतात. हे फक्तं शब्द नसून महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना आणि संस्थांना माहीत असतं आणि त्याबद्दल अनेक पातळ्यांवर कामदेखील सुरू आहे. शिक्षण हे सर्वांना समान मिळावं, सार्वत्रिक असावं, ज्ञान मिळवण्यासाठी असावं, काम आणि बुद्धीची सांगड असलेलं असावं, आनंद देणारं, शारीरिक – मानसिकदृष्ट्या सुदृढ करणारं असावं, बालविकासकेंद्री असावं याबद्दल सर्वांचं एकमत आहे, फक्त कामाची पद्धत आणि माध्यम हाच काय तो फरक असू शकतो.

एमकेसीएल ही शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणारी संस्था आणि विचित्र निर्मिती हे दृकश्राव्य माध्यमातून समाजापर्यंत पोचण्याचं काम करणारं, सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीचं कलानिर्मिती क्षेत्र, दोघांच्या एकत्र कामातून तयार होतेय ‘माझी शाळा’.

‘माझी शाळा’ ही दूरदर्शन – सह्याद्री वाहिनीसाठी निर्मित ४० भागांची मालिका आहे, जी येत्या २० ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी ९.३० वा. दाखवली जाईल आणि त्याच भागाचं पुन:प्रसारण पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता होईल.

'माझी शाळा' या मालिकेचे सर्व चाळीस भाग कथानकाच्या स्वरूपाचे असतील. ज्ञानसंरचनावाद या संकल्पनेवर रचलेले आणि शाळा, शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, पालक, स्वच्छता, विज्ञान, इतिहास, भूगोल, भाषा, संगणक, पर्यावरण, गणित या विषयांशी संबंधित तत्त्वं गोष्टींच्या स्वरूपात मांडली जातील. सर्व कथा सुमित्रा भावे यांनी लिहिल्या आहेत आणि मालिकेचं शीर्षक गीत आणि इतर गीते सुनील सुकथनकरांनी रचली आहेत. दिग्दर्शन सुमित्रा भावे – सुनील सुकथनकर यांचं आहे. मालिकेच्या विविध भागांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात करण्यात येईल, ज्यामुळे महाराष्ट्राची भौगोलिक आणि सामाजिक विविधता दिसत राहील.

एका ‘मुक्त शिक्षण संशोधन केंद्रात’ शिक्षणावर सहभागी पद्धतीनं संशोधन करणारे चार शिक्षक आणि त्यांचे प्रकल्प प्रमुख, या एका धाग्यानं सर्व भाग बांधले असतील. या पाच पात्रांमध्ये घडणार्‍या चर्चेमुळे शिक्षणातील तात्त्विक मुद्दे पुढे येतील आणि त्यावर अधिक चर्चा घडवून आणली जाईल. काही वेळा घडणारी कथा हा त्यांचा स्वतःचा अनुभव असेल किंवा त्यांनी ऐकलेली, वाचलेली घटना जिच्या माध्यमातून ज्ञानसंरचनावाद समजून घेता येईल.

दूरदर्शन (सह्याद्री) हे खेडोपाडी पोचलेलं माध्यम आहे. त्यामुळे गावोगावी, निमशहरी भागात आणि शहरातदेखील काम करणारे शिक्षक, शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या संस्था, प्रसारमाध्यमं, सामाजिक संस्था यांनादेखील या मालिकेचा आपापल्या कामात उपयोग करून घेता येईल.

आजच्या शिक्षणपद्धतीत बदल घडावेत म्हणून अनेक लोक विविध पातळ्यांवर झटत आहेत. अनेक संस्था, व्यक्ती तळागाळातील लोकांच्या शिक्षणाचे हक्क, धोरणात्मक बदल, कायदे, शासन यंत्रणेत परिवर्तन, शासन यंत्रणेबाहेर शिक्षणाचे प्रयोग करत आपल्या देशात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एमकेसीएल आणि विचित्र निर्मितीतर्फे ही मालिका बनवण्यामागची भूमिका याच बदलाच्या प्रक्रीयेमध्ये शामिल होण्याची आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

हा धागा आधी कसा नाही दिसला मला? आजचा भाग हुकला की.
धन्यवाद चिनूक्स फार महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीबद्दल.

सुंदर उपक्रम! ह्याचे सर्व एपिसोड्स युट्युब वर देखील अपलोड करावेत म्हणजे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. नुकताच नितळ चित्रपट पाहीला. तेव्हापासून ह्या दिग्दर्शकद्वयी विषयी आत्मीयता निर्माण झाली आहे. त्यांच्या ह्या प्रकल्पाला मनःपूर्वक शुभेच्छा!

इथे सांगितल्याबद्दल आभार. याचे भाग युट्युबवर लोड करायला हवेत. सह्याद्रीचे ऑफिशियल चॅनल असेल ना युट्युबवर तिथे हे भाग काही कालावधीनंतर लोड केले तर भारताबाहेरच्या लोकांनापण बघता येतील.

चिन्मय, ही माहिती "उपग्रह वाहिनी' या ग्रूप मध्ये पण देऊन ठेव. माझ्यासारखे जे लोक "मायबोलीवर नवीन" पेक्षा "माझ्यासाठी नवीन" ही सुविधा अधिक वापरतात त्यांच्या नजरेतून सुटला असेल हा बा.फ.

कालचा बुडलेला भाग शनिवारी नक्की बघणार. इंटरेस्टींग वाटतेय मालिका.

जिव्हाळ्याचा विषय, नक्की बघणार ही मालीका, (घरी रिमोट्च्या बाबतीत व्हेटो वापरावा लागला तरी चालेल ;))

आज मालिकेचा शेवटचा भाग होता का? पहिला किंवा दुसरा भाग सोडला तर सगळे भाग आठवणीने पाहिले. अतिशय उद्बोधक. तितकेच प्रश्न निर्माण करणारी : अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या आणि पटसंख्येच्या (किमान शहरांत तरी) ओझ्याखाली रचनावाद कसा आणता येणार? काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य वाटले.

दोन खटकलेल्या गोष्टी : गिटार वाजवणार्‍या मुलाच्या भागात शाळेतले त्याचे शिक्षक 'वैगरे' म्हणाले.
'मुक्या जीवांचे दु:ख' या भागात शिक्षिका (देविका दफ्तरदार) यांच्या तोंडी 'तुझी मदत करणे' अशा प्रकारचा प्रयोग होता.

हा आणि क्षेत्रभेट (जन्मदाखल्याचा) हे दोन्ही भाग टडोपा होते.

उत्तम मालिकेबद्दल निर्मिती व्यवस्थापक चिन्मय दामले आणि टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद.
आताच पाहिले तर युट्युबवर काही भाग दिसले. ते अधिकृतरीत्या तिथे आलेत का हे कळत नाही.

आजचा भाग मस्तच होता Happy

उत्तम मालिकेबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. जालावर याचे भाग उपलब्ध झाले तर बरे होईल.>>>>अगदी अगदी. माझे काही भाग पहायचे राहिले. Sad

धन्यवाद भरत Happy

गेल्या रविवारचा भाग हा शेवटचा नव्हता. ठरावीक कालावधीनंतर एका भागात आढावा घेतला जाईल. तसा त्या भागात आढावा होता. मालिका एकूण चाळीस भागांची आहे.

येत्या शनिवारी, १७ जानेवारीला पुण्याच्या एस. एम. जोशी सभागृहात 'माझी शाळा' या मालिकेवर एक परिसंवाद अयोजित केला आहे. डॉ. अनिल अवचट, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, डॉ. विवेक सावंत, विविध शाळांमधले शिक्षक, पालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित असतील. प्रेक्षकांतर्फे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया इथे लिहा, परिसंवादात तुमच्या नावाने हे प्रश्न तिथे विचारून इथे उत्तर लिहीन.

धन्यवाद! युट्युबवर पहिले ८ एपिसोड्स आहेत ते पाहून झाले. इथे पुढच्या भागांबद्दल विचारणारच होते. आता वेळ मिळेल तसे पुढचे भाग पाहीन Happy

MKCL चांगलं काम करतय, हे बघुन आनंद झाला. मला फक्त त्यांची MH-CITच माहिती होती. बघतो आता एक-एक भाग.

माझे पण अधलेमधले काही भाग चुकले आहेत. दुव्यांबद्दल धन्यवाद.

मालिकेच्या विविध भागांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागात करण्यात येईल, ज्यामुळे महाराष्ट्राची भौगोलिक आणि सामाजिक विविधता दिसत राहील.>>> या मालिकेबद्दल हे सर्वात जास्त आवडलेलं आहे.

११ व्या भागातली चर्चा थोडी एकांगी वाटली. म्हणजे जुन्या शिक्षणपद्धतीत काहीच ठेवण्यासारखे नाही असा सूर वाटला (जो बहुदा अभिप्रेत नसावा). ह्या एपिसोडमध्ये पाठांतर निरुपयोगी आहे असाही एक विचार दिसला जो फारसा पटला नाही. पाठांतर वाईट नाही मात्र केवळ अर्थ समजून न घेता पाठ करणे ही घोकंपट्टी आहे जी अत्यंत चूक आहे. पण हे कुठेच नीट explain केले गेले नाही (की नव्या शिक्षणपद्धतीत पाठांतराला काहीच स्थान नाहीये?)

जर समजून घेतली आणि आवडली तर कोणतीही गोष्ट आपोपाप पाठ होते! त्यासाठी विशेष काहीच प्रयत्न करायला लागत नाहीत! आमच्या शाळेच्या पहिल्या दिवशी (पाचवीत) एका खूप सिनियर व्यक्तीने आमचा वर्ग घेतला होता. त्यांनी एक सुभाषित शिकवले, पाठ करवून घेतले आणि मग फळ्यावरून पुसून टाकले. आणि म्हणाले की ह्या सुभाषिताचा अर्थ कळला असेल तर ते आपोआप लक्षात राहील आणि जर तुमच्या ते लक्षात राहिलं तर याचाच अर्थ तुम्हाला ते कळलं Happy ते सुभाषित आजही पाठ आहे! ते होतं: पुस्तकस्था तू या विद्या, परहस्तगतं धनम्| कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनम्|| (पुस्तकातली विद्या आणि दुसऱ्याच्या हाती असलेले धन ह्यांचा कार्यसमयी काहीच उपयोग नसतो.)

पाठांतर केल्याने विचारशक्ती खुंटते हेही फार पटत नाही. उलट लहान मुलांच्या मेंदूला repetition ची गरज असते. Malcolm Gladwell च्या Tipping point मध्ये त्याने लहान मुलांच्या TV channel साठी कार्यक्रम कसे तयार केले ह्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्यात असे म्हटले आहे की लहान मुले तीच गोष्ट परत परत आवडीने बघतात (हा नेहमीचा अनुभव आहे की मुलांना एकदा पाहिलेले कार्टून पुन्हा पुन्हा पाहायला आवडते) ह्याचे कारण असे की दरवेळी तो कार्यक्रम पाहताना मुलांचा मेंदू नवीन आधी न पाहिलेल्या बाबी note करत असतो! प्रत्येक वेळी मुलं त्याच कार्टून मधून नवीन काहीतरी शिकत असतात. कदाचित तसंच पुन्हा पुन्हा कविता/श्लोक/पाढे म्हणताना मुलांना त्याचा नवीन अर्थ समजत असेल!

हा माझा स्वतःचा अनुभव आहे की शाळेत शिकलेल्या एका अभंगाचा एक संपूर्ण नवीन पैलू मला गेल्यावर्षी (जवळपास १६-१७ वर्षांनी ) कळला! "सुखालागी करिसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाचि सुखरूप होशी|| ह्यामध्ये "सुखरूप" ह्या शब्दाची जेव्हा "सुख-रूप" अशी फोड मला लक्षात आली तो क्षण फार आनंदाचा होता! आता हा अभंग जेव्हा पाठ झाला तेव्हाही तो समजला होताच पण पाठ असल्याने त्या समजण्याची/अनुभवण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहिली आणि अर्थ माझ्या अनुभवाच्या वकुबानुसार अधिकाधिक उलगडत गेला. हा पाठांतराचा फायदा नाही का?

हे इतके विचारमंथन करावसे वाटले ह्यात मालिकेचे फार मोठे यश आहे असे वाटते! Really looking forward to all the upcoming episodes! Kudos to the entire team for giving us such a meaningful entertainment!

जिज्ञासा, काही अंशी पटतय, पण जसं मालिकेतही बहुदा हा मुद्दा आलाय की घोकंपट्टी नको. नुस्तच पाठांतर करण्यापेक्षा अर्थ समजुन घेउन पाठ करणे (जे आपोआप होते, असं लेखकाचं म्हणणं) पटते.
बरेचदा, मला वाटते की उदा. विज्ञान शिकवण्याची सुरुवात एखाद्या उपयोजनाने (Application) केली तर विद्यार्थी त्या पाठाकडे अधिक आकर्षित होतात. तसच, त्यांना असलेली एखाद्या यंत्राबद्दलची उत्सुकता, त्यात भर घालु शकते.

मालिकेत बरेचदा पात्र (विशेषतः गायकवाड) प्रमाणित भाषेतील बोजड शब्द वापरतात, तेंव्हा ते प्रसंग कंटाळवाणे होतील की काय, अशी शंका येते.

अवांतर :- प्रत्येक शाळेत कंप्युटर/ टॅब पोहचले आहेत का? त्याचा सुरुवातीला संदर्भ आलाय, पण पुढे अजुन (ग्रामिण भागात) टॅब वापरताना विद्यार्थी दिसले नाही.