धर्म हवा की नको?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

लहानपणी आमच्या घरी दरवर्ष आजोबांचं श्राद्ध व पक्ष होत असे. आई एक लहानसं केळीचं पान वाढत असे. ते पान आम्ही बाहेर कावळ्यासाठी ठेवत असू. आजोबा कावळ्याच्या रुपाने येऊन ते पान खातात अशी आमची ठाम समजूत होती. थोडंसं मोठं झाल्यावर माझ्या मनात एक विचार यायचा - मुस्लिम व ख्रिश्चन लोकांत श्राद्ध वगैरे पद्धती नसतात, मग त्यांची पितरं काय करत असतील? हिंदूचीच पितरं श्राद्धाच्या दिवशी कावळ्याच्या रुपाने कशी येतात? म्हणजे एकंदरीत माणसे मेल्यावरही धर्म सोडत नाहीत तर! माझी ती समजूत अगदिच चुकीची नव्हती असं आजची परीस्थिती पाहिल्यावर वाटतं. आजकाल आपल्याला माणसं धर्मासाठी मरताना/मारताना दिसतात. अशी माणसे मेल्यावरही धर्म कसा सोडतील?

धर्म हवा की नको या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी धर्म या संकल्पनेचा थोडा खोलात विचार करणं आवश्यक आहे. प्राचीन काळी जेव्हा आधुनिक विज्ञान जन्मालाही आलं नव्हतं, तेव्हा माणसाने आपल्या बुद्धिनुसार निसर्गातील अचाट करामतींच्या स्पष्टीकरणाचा केलेला प्रयत्न हा धर्म आणि देव या संकल्पनाच्या मुळाशी असावा. उदाहरणार्थ, पाऊस कसा पडतो हे आपल्याला आज शास्त्रीय दृष्ट्या माहित आहे. पण प्राचीन काळी जेव्हा पाऊस प्रथम अनुभवला असेल तेव्हा त्याला तो एखाद्या अमानवी शक्तीचा चमत्कार वाटल्यास नवल नाही. चंद्र सूर्याचे उगवणे मावळणे, समुद्राची भरती अोहोटी, अग्नी अशा अनेक गोष्टींचं आपल्याला वेगवेगळ्या धर्म व संस्कृतीमध्ये वेगवेगळं स्पष्टीकरण आढळेल. बहुतेक सर्व पुरातन संस्कृतींमध्ये या गोष्टींचं दैवीकरण झालेलं आढळेल. अर्तक्य असणाऱ्या अशा गोष्टी घडविणारा तो देव अशी संकल्पना त्यातूनच निर्मण झाली असणार.

संस्कृतीची अशी घडण होत असताना समाजातील काही हुशार मंडळींनी देव या संकल्पनेचा फायदा घेऊन आपले प्रस्थ वाढवले. हिंदुस्थानात ब्राम्हणांनी आणि मध्य पूर्वेतील व युरोपातील धर्मगुरूंनी आपले वर्चस्व राजसत्तेपेक्षाही वाढवले. असे लोक समाजाला जाचक ठरल्यावर त्यातून लोकांची सुटका करून प्रेमाचा संदेश देणाऱ्याला मग लोकांनी ठरवले. या प्रेषिताच्या अनुयायांनी एकत्र येऊन आपली अोळख वाढवली आणि त्यातूनच पुढे इस्लाम, ख्रिस्ती, बुद्ध अशा आधुनिक धर्मांचा जन्म झाला. हिंदुस्थानात असे प्रेषित जन्माला येऊनही पुरातन संस्कृतीचा पगडा मात्र कायम राहिला आणि पुढे त्या संस्कृतीलाच आजच्या युगात "हिंदुधर्म" असे नाव पडले.

धर्म या संकल्पनेचा विकास होण्याचं दुसरं कारण म्हणजे मानवाचा विकास पावलेला मेंदू आणि त्यातून उत्पन्न झालेला गर्व. माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि त्याचा जन्म आणि मृत्यू हे इतर प्राण्याच्या जन्म आणि मृत्यूपेक्षा वेगळे आहे हि त्याची गर्विष्ठ भावना. माणूस मेल्यावर स्वर्ग किंवा नरकात जातो पण हत्ती, घोडे वगैरे प्राणी मात्र नुसतेच मरतात! आपलं प्राणित्व झिडकारण्याची एवढी धडपड मानवाशिवाय इतर कुठलाही प्राणी करत नसेल!

धर्म म्हणजे नक्की काय? साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर धर्म म्हणजे एक विचारसरणी होय. ह्या विचारसरणीच्या केंद्रस्थानी एक वा अनेक देव असतात. ह्या देवांकडे पोचण्याचा मार्गही या विचारसरणीत आचारसंहीतेच्या रुपाने आखून दिलेला असतो. ह्या आचारसंहितेत काही बरीवाईट तत्वे असतात - उदाहरणार्थ संध्याकाळी देवापुढे दिवा लावावा यात अंधार दूर करण्याचा विचार असला पाहीजे. रात्री नखे कापू नयेत या नियमामागे वीज नसलेल्या काळात लोकांची बोटे कापली जाऊ नयेत अशी प्रेरणा असली पाहिजे. आचारसंहितेत जशा वरीलपैकी चांगल्या गोष्टी होत्या तशा वाईट किंवा आज आपल्याला अमानुष वाटतील अशाही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ सतीची प्रथा, बळीची प्रथा वगैरे. अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी मिळून प्रत्येक धर्माची एक आचारसंहिता तयार झाली व ती प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या वाटेने उत्क्रांत झाली. अशा आचारसंहितेत त्या त्या प्रदेशाचे हवामान, खाणे पिणे, अर्थव्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींचा प्रभाव पडला. अनेक धर्मतील लोकांनी ह्या आचारसंहिता लिहून काढल्या. काही धर्मतील काही लोक आजही ते आचार मूळ स्वरुपात अंमलात आणण्याचा अट्टाहास करताना दिसतात. एकंदरीत मानवाच्या चांगल्या वाईट्याच्या कल्पना बदलल्याने व आधुनिक विज्ञानाचा प्रसार झाल्याने बऱ्याचशा वाईट प्रथांचे उच्चाटन झाले. जस जसे विज्ञान प्रगत होत गेले, तस तसे हे नियम लोकं विज्ञानाच्या निकषावर तपासून पाहू लागले आणि त्यातूनच आजचे बुद्धिजीवी निधर्मपण जन्माला आले.

धर्म या संकल्पनेचा समाजाशिवाय विचार करता येत नाही. वेगवेगळ्या समाजात धर्मची वेगवेगळी घडण दिसून येते. शहरी सुशिक्षित लोक धार्मिक नियमांना विज्ञान नावाच्या दगडावर घासून घेऊन जे चांगलं असेल ते उचलताना व जे वाईट असेल ते टाकताना दिसतील. अज्ञानी, खेडवळ समाज आजही जुन्या जाचक चालीरीतींचे पालन करताना दिसतील. प्रत्येक माणसाची धार्मिकता हि त्याचं शिक्षण, त्याच्या आजूबाजूचा समाज, त्याची आर्थिक परीस्थिती अशा असंख्य गोष्टींवर अवलंबून असते आणि यामुळेच धर्म हवा कि नको याचं सरळ सोपं उत्तर देता येत नाही. मी धर्म या संकल्पनेचं माझ्या कुवतीप्रमाणे विश्लेषण करुन, धर्माची मला गरज नाही या निष्कर्षाप्रत आलो आहे. परंतु अशी अनेक लोकं या जगात आहेत ज्यांच्या जगण्यासाठी धर्म हा एक महत्वाचा मानसशास्त्रीय आधार आहे. दुर्दवाने आजकाल धर्म मानवी मनाला आधार न राहता राजकारणासाठी किंवा प्रादेशिक, आर्थिक, सामाजिक वा सांस्कृतिक वर्चस्वासाचं साधन बनला आहे. धार्मिक वादांना आलेलं आजचं हिंसक स्वरुप पाहून मात्र धर्म हवा कि नको याचं उत्तर मात्र ठामपणे नको असं वाटतं.

प्रकार: 

वा, चांगले लिहीले आहे. मला पटले.
परंतु अशी अनेक लोकं या जगात आहेत ज्यांच्या जगण्यासाठी धर्म हा एक महत्वाचा मानसशास्त्रीय आधार आहे.

हे माझ्या बाबतीत खरे आहे. म्हणून मी फक्त वैयक्तिक रीत्या जे काय करायचे, ते करत असतो. अधून मधून देवळात जाणे, तिथे पैसे देणे, घरी वर्षातून एकदा श्रीसत्यनारायणाची पूजा करणे, जे जे मला स्वेच्छेने करावेसे वाटते ते मी करतो. मला किंवा इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतो. सार्वजनिक रीत्या, श्रीगणेश पूजन, आरती इ. समारंभांत उत्साहाने भाग घेतो. कारण हे केल्याने माझ्या मनाला शांति मिळते.
तसे दारूपण आनंदाने पितो नि मांसभक्षणहि आनंदाने करतो, पण त्याचा मला धर्माशी काही संबंध असेल असे वाटत नाही. अर्थात् त्यातून मिळालेला आनंद मला अल्पकालीन वाटतो, या उलट 'धार्मिक' गोष्टी केल्यावर पुष्कळ काळ मन समाधानी असते. हे एकदा कळल्यावर, अनुभवल्यावर काय बरोबर नि काय नाही ह्याबद्दल काही गोंधळ होत नाही.
'धर्म' म्हणजे काय नि तो 'असावा' का याचे उत्तर कुणि काही का देईना?

पुराणिक,

धर्म हवा की नको याच ठामपणे उत्तर देताना, मला हे विचारायच आहे की तुम्ही धर्म म्हणजे कोणत्या दृष्टीनी बघताय? ज्याला अभारतिय संकल्पनेत Religion म्हणतात त्याबद्दल म्हणायचे आहे की भारतिय संस्कृतीला अभिप्रेत धर्म (धारण करणे) याबद्दल म्हणायचे आहे? तसा धर्माला ईंग्रजीत समानांतर शब्दच अस्तेत्वात नसल्यामुळे हा सगळा गोंधळ होतो.
दुसरा गोंधळ सामाजिक चाली रिती, समजुती आणि मुळ धर्म यांची गफलत केल्यामुळे होत आहे असे वाटते, त्यामुळे ह्या विषयावर तुम्हाला उत्तरे मिळाली नसावित.

अनुमोदन...
पुरणिक, तुमचा हेतु शुद्ध आहे पण तर्क पटत नाही. धर्माची निर्मिती आदिमानवाच्या रितीरिवाजांमधून झाली नाही तर ऋषी-तपस्व्यांच्या आत्मज्ञानातून झाली आहे. जिथे विज्ञानाला मर्यादा पडते तिथे आत्मज्ञानाची सुरुवात होते. भगवान बुध्द, महावीर यांच्यासारख्या प्रेषितांनी आत्मबोधातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा आधार धर्माला दिला आहे. तुम्ही केलेले विश्लेषण सामजिक प्रथांना लागू पडू शकेल कदाचित. धर्माचा आवाका त्यापेक्षा बराच मोठा आहे. राजकारण्यांच्या धार्मिक कल्पनांवर जाऊ नका...त्यात कसलंच तथ्य नाहिये! धर्म या संकल्पनेचं खर्‍या अर्थांनं आकलन व्हावे अशी इच्छा असेल तर विवेकानंदांसारखा आधुनिक ऋषी अभ्यासावा लागेल!

च्यायला - धर्माला इथे मी आजकालच्या संकुचित व्याख्येने (रीलीजन) बघितलं आहे. आपल्या संस्कृतीत धर्माला वेगळा व्यापक अर्थ आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.

dharm is just a protocol set by community of people. It has nothing to do with god.
धर्म म्हणजे नक्की काय? साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर धर्म म्हणजे एक विचारसरणी होय. >>>
होय धर्म म्हणजे चांगली विचारसरणी . अधर्म म्हणजे वाईट विचारसरणी . तेव्हा धर्म हवाच.

..

हा नाना नेना झक्कींचा डु आय आहे >> ज्यांच्या अंगी वात्रटपणाचं धार्ष्ट्य नसतं ते नहेमीच्या आयडीने लिहीत नाहीत. हुक्कींना का बरं ड्युआयची गरज पडावी ?

लेख आवडलाय . धर्माचे भूत जे समाजाच्या मानगुटीवर बसले आहे ते उतरायलाच हवे तरच मानवाला भविष्य आहे. परखड लेखाबद्दल धन्यवाद . ज्यान धर्माचा फायदा आहे त्यापासून लाभ होतोय त्यांना धर्म हा पाहिजेच असतो नि तो हि स्वताला हवा तसा ..

हा नाना नेना झक्कींचा डु आय आहे.
ज्यांच्या अंगी वात्रटपणाचं धार्ष्ट्य नसतं ते नहेमीच्या आयडीने लिहीत नाहीत. हुक्कींना का बरं ड्युआयची गरज पडावी ?

याचा नि "धर्म हवा की नको" याचा काय संबंध? उगीच नको तिथे नको ते करायचे.

जगातले सर्व धर्म एकत्र करून नवा धर्म बनवायचा.

यात दोन पंथ असतील.

१. जगातल्या सर्व धर्मातलं सनातन ते निवडून एक नवा कट्टरपंथी धर्म बनवायचा
२. जगातल्या सर्व धर्मातील सहीष्णु आणि पुरोगामी तत्वांना निवडून नवा विज्ञाननिष्ठ धर्म बनवायचा.

त्यानंतर जगातले सर्व धर्म बंद करायचे.

"ज्यावेळी मनुष्याची उत्पती झाली तो अश्व्युगातील काळ होता , तीतून जवळपास १०० ते १५० वर्ष मनुष्य जगत होता पण त्यावेळी तर ना कुठला धर्म होता ना कोणती जात , मग प्रत्येकाने अप आपल्या सोयीनुसार धर्म आणि त्यातील प्रथांचा इतका प्रचार केला आणि त्यातून फक्त स्वार्थ साधला गेला "

मनुष्य प्राण्याला जगण्यासाठी अवशक्य असणाऱ्या गरजांमध्ये धर्म हा कधीच त्याचे जगण्याचे साधन होऊ शकत नाही . धर्म आहे तर मानावा पण इतरावर लादु नये .

कोणतेही नैसर्गिक आपत्ती एकाद्या ठराविक धर्म पाहून येत नाही ती आली तर सर सकट सर्वांनाच समांतर लेखून आपली किमया पार पाडते , किंवा एकदा अपघात हि धर्म पाहून होत नाही , अगदी जन्म आणि मृत्यू या पण धर्मावर आधारित नसतात , ते हि निसर्ग चक्रच आहे .

>>> होय धर्म म्हणजे चांगली विचारसरणी . अधर्म म्हणजे वाईट विचारसरणी . तेव्हा धर्म हवाच. <<<
तथ्याच्या बरेच जवळ पोहोचलात. अभिनंदन.
पण एक पाठभेद सांगतो....
धर्म याचा अर्थ निव्वल विचारसरणि नसते, तर विशिष्ट कालात विशिष्ट मानव समुहाने केलेले जगण्याचे नियम/रुढी इत्यादिकही त्यात असते.
होय, अगदी "चोरांचा" देखिल स्वतःचा "एक धर्म" असतो व त्यातिल नितिनियमांनुसारच ते वागत असतात. अगदी मटक्याच्या आकड्याच्या निव्वळ चिठ्ठीवरही हजारों रुपड्यांची उलाढाल होऊ शकते ती "विशिष्ट अशा नितिनियमांच्या" विश्वासार्हतेवरच.
तेव्हा "धर्म " हवाच. तो प्रत्येकाबरोबर नैसर्गिकरित्या जन्मतःच असतो, नि त्याद्वारेच व्यक्ति "मी कसा/का/कशाकरता/काय वागेन/बोलेन/चालेन" या कृति ठरवित असते. त्यात अधिक तपशील भरीण्याचे काम सध्याचे धर्म करतात. त्यातिल काही तत्त्वे-शिकवणी समान असतात, तर काही परस्पर विरुद्धार्थी असतात, इतकेच नव्हे तर परस्परांचा घातही करणारी असू शकतात.
"मी निधर्मी आहे" हे एकट्याने म्हणले काय किंवा काही समुहाने एकत्रित येऊन म्हणले काय, ज्याक्षणी ते तसे म्हणतील, त्याक्षणी "धर्म न मानणार्‍यांचा" एक "निधर्मी" धर्म तयार होईल/होतो.
अगदी जगातील यच्चयावत देवधर्मांना "अफुची गोळी" मानणार्‍या कम्युनिस्टांचा देखिल त्यांच्या स्वतंत्र तत्वे/नियम यासहित "कम्युनिझम" असा एक धर्मच बनलेला असतो हे निखळ वास्तव आहे. Proud

पण बहुतांशवेळेस, असलेले नियम व त्याद्वारे आलेली कृतिविषयक बंधने न पाळण्याचा कल माणसास "निधर्मी" बनवितो असे आपले माझे फुटकळ निरीक्षण आहे. असो. ही चर्चा या विषयावर अनंत काळापासून चालू आहे, चालत राहील.
रस्त्यावर ट्रॅफिकचे "नियम " असावेत वा नसावेत या विषया इतकेच महत्व "धर्म (अर्थात त्याचे नितिनियमांसहित)" असावा वा नसावा या विषयाला आहे असे माझे मत.

>>> जगातले सर्व धर्म एकत्र करून नवा धर्म बनवायचा. <<<<
>>> त्यानंतर जगातले सर्व धर्म बंद करायचे. <<<<<

बाळकोबा, दिवसा ढवळ्या स्वप्ने पाहू लागलात की क्कॉय?
का कुणी कम्युनिस्ट/नक्षली मेंदूला चावल्यामुळे ऑलरेडी लालेलाल कम्युनिस्ट बनला आहात? Proud

कोणतेही नैसर्गिक आपत्ती एकाद्या ठराविक धर्म पाहून येत नाही ती आली तर सर सकट सर्वांनाच समांतर लेखून आपली किमया पार पाडते , किंवा एकदा अपघात हि धर्म पाहून होत नाही , अगदी जन्म आणि मृत्यू या पण धर्मावर आधारित नसतात , ते हि निसर्ग चक्रच आहे .>>>>हे निसर्ग चक्रच आहे आणि निसर्ग जर भेद भाव करत नसेल तर
मानव भेद भाव का करतो?

आदरणिय एलटी (टीई) जी

यांचे सेवेशी बालके बाळासाहेब पॅराजंपे यांचा सादर प्रणाम वि.वि.

पोष्टीस कारण की आपला संदेश वाचला. नक्षली आणि लालभाई यांचेपासून आम्हांस भय वाटत नाही. काळजी नसावी. सर्व क्षेम !

भय वाटते आहे ते भगव्या अतिरेक्यांचे. आणि नेटभगव्या प्रतिसादकांचे सुद्धा. कधी मुद्दा सोडून भरकटतील याचा नेम नाही. आपण कसे आहात ? पत्रिकेतील रूसलेले ग्रह पुन्हा गोजीरे झाले की नाही ? वक्री ग्रहांमुळे अर्थाच्या अनर्थ करणा-या पोष्टींचे प्रमाण कमी झाले अथवा नाही ? गावी याल तेव्हां बोलूच

कळावे
आपला आज्ञाधारी

बाप्या

कोणता Lol

भय वाटते आहे ते भगव्या अतिरेक्यांचे >>>
तुम्ही हिरवे अतिरेकी वाटतं Biggrin
भगवे डू आयडी काढून स्वतःची हिरव्या अतिरेक्याची ओळख लपवणारे अनेक जन मा बो वर दिसतायेत

जगातल्या सर्व धर्मातलं सनातन ते निवडून एक नवा कट्टरपंथी धर्म बनवायचा
तसा एक धर्म आहे - त्याचे अंतिम ध्येय- जस्तीत जास्त पैसे मिळवणे. त्यापुढे कुठलेहि धर्म आड येत नाहीत. त्या धर्माला इतर धर्मांचे, देशाचे, राजकारणाचे, समाजाचे नियम लागू पडत नाहीत.
उदा. मला नाही वाटत कुठल्याहि धर्मात निरपराध लोकांची हत्या करावी असे लिहीले असेल पण निरपराध लोक मरतील हे माहित असूनहि अन्नात, औषधात, भेसळ करणे, गरीबांवर अन्याय अश्या गोष्टी सर्वच जगात चालू असतात. कुठे कमी, कुठे जास्त.
अमेरिकन लोकांवर अतिरेकी हल्ले करणार्‍या लोकांना सौदी अरेबिया कडून पैसे मिळतात हे माहित असूनहि अमेरिका सौदी अरेबियाविरुद्ध काही करत नाही, कारण तेल नि पर्यायाने पैसा यासाठी ते सौदी अरेबियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अमेरिकेत या धर्माचे जास्तीत जास्त लोक रहातात. नावाला ते स्वतःला ख्रिश्चन, ज्यू वगैरे म्हणवतात पण ते आपले उगाच. एकूण हा नवीन कट्टरपंथी धर्मच ते पाळतात.