संहिता - प्रत्येकाची

Submitted by भारती.. on 17 October, 2013 - 02:25

संहिता

एकात्म एकरस कथा अस्तित्वात असते का?
प्रत्येकाची जीवनगाथा वेगळी , म्हणून जाणून घेण्याची रीत वेगळी.
कथा सांगणारा आपला दृष्टीकोन तिच्यात अटळपणे मिसळतो.
कथा ऐकणारा ती आत्म-गत करत रिचवतो. तोच तर कथेच्या कडीतला पुढचा निवेदक असतो .
चित्रपटाच्या संदर्भात दिग्दर्शक,पटकथालेखक, निर्माता हे कथेच्या तिसऱ्या मितीचे अदृष्य सूत्रधार.
कथेला पडद्यावर सजीव करताना या सर्वांची जाणीवविश्वे कमीअधिक प्रमाणात कथेत पाझरतात.
आणि चौथी मिती, तुम्ही आम्ही, एक विशाल बहुशीर्ष प्रेक्षकवर्ग . ही चित्रकथा सर्वांची होते तेव्हा सार्वत्रिक आणि व्यक्तिगत अशा दोन ध्रुवांमध्ये तिचं विश्व हेलकावत रहातं .

आधुनिक साहित्यातले निरनिराळे नवमतवाद जणू पचवून घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रीच्या मायेने सुमित्राजी ‘संहिता‘ची कथा मराठी प्रेक्षकांसमोर, खरे तर अर्थपूर्ण सिनेमाच्या चाहत्यांसमोर आणतात. संहिता ही अशी कथेची कथा , सिनेमा घडण्याचा सिनेमा आहे.

सुमित्राजी व सुनीलजी यांनी पेललेले, सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट अन अशोक मूव्हिज प्रा.लि. ने निर्मिलेले हे आव्हान पहाण्याची उत्सुकता होती अन मुंबईत काल झालेल्या प्रीमियर शो मध्ये प्रत्यक्ष त्यांच्या, निर्मात्यांच्या ( मायबोली मीडीया पार्टनर असल्याने एक आपलाही सहभाग त्यात ) अन प्रमुख भूमिकेतील तारे-तारकांच्या उपस्थितीत हा योग आला. एका संध्याकाळ गडद अर्थमयतेत न्हाऊन निघाली.

एक प्रेमकथा पूर्वकालीन राजघराण्याच्या शाही पार्श्वभूमीवर चितारली जाते आहे.
प्रेमकथाच का ? तर तिचे अपील कालातीत आहे.

राजघराणेच का ? तर राजाराणीची गोष्ट आपल्या नेणिवेचा एक अविभाज्य भाग आहे.

तर ही कथा चित्रित होताना त्याच वेळी समकालीन बहु-वर्गीय बहुसांस्कृतिक अनुभवविश्वे त्यात गुंफली जात आहेत.त्यात सुमित्राजींमुळे एक विशाल स्त्रीवादी परिप्रेक्ष्य आला आहे जो लोभस आहे. जो प्रेमातल्या शोषणाचाही उच्चार अन विचार करतो.

प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा तिढा या कथेच्या आरशात पहातो आहे, त्याचे उत्तर त्यात शोधतो आहे म्हणून या पडद्यावर आपल्यासमोर आकारास येणाऱ्या सिनेमातल्या सिनेमाचं नाव ‘ दर्पण ‘ आहे . चित्रपटात एक नक्षीदार प्राचीन आरसाही आहे जो प्रतीकात्म रीतीने हाताळला जातो, हस्तांतरित केला जातो, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका संस्कृतीकडून भिन्न संस्कृतीकडे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.

कथेचा शेवट अत्यंत कलात्मक , ज्यात एक रहस्यही दडले आहे , शेवटची कडी पहिल्या कडीशी जोडून घेणारे. ते लक्षपूर्वक पडद्यावरच पहायचे .

चित्रपटाची निर्मितीमूल्ये अभिजात , चित्रपटाच्या फ्रेम्स खरेच खानदानी सौंदर्य जपणाऱ्या म्हणून मनात ठसणाऱ्या आहेत. संगीत या कथेचा अविभाज्य भाग आहे, सुनील सुकथनकरांची गझल ठुमरी अंगाने लिहिलेली हिंदी -उर्दू गीते जितकी अर्थमधुर तितकेच शैलेश बर्वेंचे जिव्हाळ संगीत अन आरती अंकलीकरांची अनुपम पेशकश. कथेत विरघळून जाणारे संगीत .

कथेत व्यक्तींची, दृष्टीकोनांची बहुविधता आहे म्हणून तपशील नेमकेच घेणे हे पटकथेसमोरचे आव्हान तर त्यात अभिनयाचे रंग भरणे हे अभिनयासमोरचे आव्हान . या दोन्ही पातळ्यांवर किंचित तुटकता अधूनमधून जाणवते. मिलिंद सोमण यांचा राजा देखणा आहे, पण त्यापेक्षा त्यांनी रणवीरचे पुरुषी मानसिकतेतून आलेले ,जखमा करून व झेलून प्रगल्भ झालेले वास्तवातले प्रेम खूप उत्कटतेने रंगवले आहे. देविका दप्तरदार यांची रेवती अन राणी अत्यंत सहज ! राजेश्वरी सचदेव दरबारी गायिकेच्या,प्रेमिकेच्या अन अभिनेत्रीच्या अशा सर्वच रुपात त्याच तोडीचा अभिनय करतात. दोघींची खरेच जुगलबंदी आहे. सिनियर अभिनेत्री उत्तरा बावकर , ज्योती सुभाष तर कमाल करतात.
इतरही प्रत्येकाने आपली छोटीमोठी भूमिका अगदी समरसून केलीय. अगदी बालकलाकार अन पौगंडवयीन नवकलाकारेनेही.

मराठी सिनेमाकडे भारताला, जगाला देण्यासारखे खूप आहे..एकाच वेळी अर्थपूर्ण अन रंजक सिनेमाची निर्मिती हे काम कठीण आहेच पण त्या तोलाच्या प्रतिभांची आपल्याकडे वानवा नाही. वानवा लोकाश्रयाची आहे. आपण स्वत;ची ओळख विसरू नये म्हणून प्रत्येकाने अवश्य पहावा असा हा चित्रपट, ‘ संहिता’.

अभिनंदन मायबोली, या निर्मितीप्रक्रीयेचा एक भाग झाल्याबद्दल, आभार हा सुंदर अनुभव आम्हाला दिल्याबद्दल (व्यक्तिश: चिनूक्स ज्याने ढकलूनच मला पाठवलं , धन्स चिनूक्स, मी मिस केलं असतं तर काहीतली मोलाचं गमावलं असतं ) अन शुभेच्छा की अशा दर्जेदार निर्मिती यापुढेही जन्माला येत रहाव्यात, व्यावसायिक यश मिळवत रहाव्यात !

भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, संगीत अविस्मरणीय. बर्वे अन अंकलीकर दोघांनाही पुरस्कारही मिळालेत. कथानकाचा एक भाग म्हणून अपरिहार्य असे दरबारी बैठकीचे खानदानी संगीत आहे.
आभार चनस , मुग्धानंद

मिलिंद सोमण यांचा राजा देखणा आहे, पण त्यापेक्षा त्यांनी रणवीरचे पुरुषी मानसिकतेतून आलेले ,जखमा करून व झेलून प्रगल्भ झालेले वास्तवातले प्रेम खूप उत्कटतेने रंगवले आहे. >>> +१

संगीत भारी आहे. ७-८ वर्षांनंतरच्या मेहफिलीतलं गाणं तर खासच. Happy

छान लिहीलेस ग

संगीत भारी आहे. ७-८
वर्षांनंतरच्या मेहफिलीतलं गाणं तर
खासच.>>>>+11

शेवटच गान मस्त आहे

जाओ ना सैया अस काहीस

मिलिंद सोमण यांचा राजा देखणा आहे,
पण त्यापेक्षा त्यांनी रणवीरचे
पुरुषी मानसिकतेतून आलेले ,जखमा करून व
झेलून प्रगल्भ झालेले वास्तवातले प्रेम खूप
उत्कटतेने रंगवले आहे. >>> +१

भारती....

आपली थोडी चर्चा झाली होतीच या चित्रपटाच्या निमित्ताने आणि तुम्ही व जाई ज्यावेळी प्रीमिअरला जाणार होता त्या दिवशीच मी समजून चुकलो होतो की "संहिता" संदर्भात प्रायोजकांतर्फे कुणीही लिहो पण तुम्ही स्वतंत्ररित्याही चित्रपटावर लिहिणे जरूरीचे होते....आणि अगदी माझ्या मनासारखेच झाले अन् जे झाले ते काय दर्जाचे आहे ते वाचताना ओळीओळीतून प्रत्ययास आले.

"संहिता" ची सारी कहाणी इथे उलगडणे योग्य नाही हे मी जाणतो पण जितके वाचले तितके पुरेसे आहे. प्रेमाच्या नित्याच्या 'त्रिकोणा' चा भास होतोय मला....अगदी वि.स.खांडेकरांच्या 'अमृतवेल' सम...पण प्रत्यक्षात कलाकृतीला स्वतंत्र आणि आगळे सौंदर्य प्राप्त झाल्याची प्रचिती येईल.

मराठी सिनेमाकडे जगाला देण्याची खूप क्षमता आहे पण वानवा जरी लोकाश्रयांची असली तरी वितरणव्यवस्था हा फार कळीचा मुद्दा आहे...ज्याच्यापुढे निर्माते हतबल आहे. 'वास्तुपुरुष' समयी कोल्हापूरात हाच मुद्दा टीमसमोर मांडला होता.... तेच प्रश्न आजही तितकेच जिवंत आहे.

असो....चित्रपट पाहिलाच पाहिजे असेच तुमचे परीक्षण सांगते.

आभार हर्पेन. नक्की बघा .

केश्विनी, जाई, इंद्रा, मंजूडी(दोघेही ) ,घारुअण्णा ,जिप्सी , तुम्हा सर्वांबरोबर हा सिनेमा बघणे हा एक स्वतंत्र आनंद होता जो या परीक्षणात आला नाही . खूप मजा आली लोक्स , नकळत आपण मायबोली परिवारात कसे सामावून गेलो आहोत हे जाणवत राहिले. लाईट्स गेल्याने प्रीमियर रेंगाळणे असा एक मस्त प्रकार झाला जोही आम्ही एन्जॉय केला .मध्यन्तरात तर धमाल केली Happy

अशोकजी, वितरणाचा मुद्दा कळीचा आहे. लेखात राहिला होता तो पृष्ठस्तरावर आणल्या बद्दल आभार.चित्रपटाबद्दल अजून खूप लिहिण्याबोलण्यासारखे आहे. आता तुम्ही पाहिल्यावर त्यावर चर्चा करण्यात अजून गम्मत येईल. काही चित्रपट, पुस्तके, गाणी मनात रेंगाळत मुरू द्यायची असतात .
हा चित्रपट मूलत: एका दिग्दर्शिकेच्या भावविश्वात उमटून आलेली कमाल आहे. एकोहम बहुस्याम म्हणत येथे सुमित्राजी अनेक रुपात विस्तारल्या आहेत.

त्यांना Hats off!!

वेल...भारती.... वरील प्रतिसादावरुन ’संहिता’ संध्याकाळ तुम्हाला किती आनंदीत करून गेली आहे हे स्पष्टपणे प्रतीत होत असल्याचे जाणवत आहे.... मला तर तोच भाव जास्त भावला.

समाजजीवनातील सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील असा प्रत्यक्ष सहभात किती महत्वाचा असू शकतो हे तर स्पष्टच होते या उदाहरणावरून.

Happy खरेच आहे अशोकजी , म्हणून तर चिनूक्सचे विशेष आभार , ज्याने आग्रहपूर्वक निमंत्रण केले.वरवरचे नाही. हेही मायबोली परिवारातल्या जिव्हाळ्याचे एक रूप. तो असाच कायम राहो !
केश्विनी >>संगीत भारी आहे. ७-८ वर्षांनंतरच्या मेहफिलीतलं गाणं तर खासच >> प्रचंड सहमत .

धन्स वत्सला, अरुंधती , सुमित्राजींनी खूप प्रगल्भ अन त्याचवेळी प्रेमळ, सकारात्म अशा पद्धतीने हाताळलाय विषय.
त्यांची एक व्यक्तिरेखा म्हणते, 'God is a bad scriptwriter .' वाक्य भन्नाट आहे.
मात्र थोडा बदल मला करावासा वाटतो.
God is a crazy scriptwriter.आयुष्याचं खरं कथानक कल्पितापेक्षा विचित्र असतं अन तेच सारखं प्रेरित करतं नवीन नवीन कथांना .
आज पुण्यात मस्त एन्जॉय करा ! वत्सला, तुला मिळेल तेव्हा तू पहा Happy

आज कुठे आणि किती वाजता आहे पुण्यात प्रिमियर? इथे आजुबाजूला असतील तपशील, पण माझ्या वाचनात नाही आले म्हणुन इथे विचारतेय.

...

सुंदर लिहिलं आहे, भारती Happy

पुण्यात आज कोथरूड सिटीप्राईडला सायं. साडेसहाला आहे संहिता चा प्रिमियर.

ंमी मिसला प्रिमिअर शो! या क्लायंटस च काहीतरी केलं पाहिजे...
सगळ्यांसोबत पहायला खरंच मजा आली असेल... Happy

चिनूक्साचे आभार. अगदी आठवणीनं त्यानी मेसेज केलेला, पण हाय हाय!!!

भारती मस्त लिहिलंय. आवडलं. नक्की पहाणार सिनेमा... Happy

सुरेख लिहिलेत भारतीताई. इतक्यात बघायला मिळणार नाही तरीही हे वाचून उत्सुकता नक्कीच वाढली आहे. सर्व माबोकरांसोबत पाहताना आणखीनच मजा आली असेल.

Pages