व्यवस्थित चालते दुनिया

Submitted by रसप on 10 October, 2013 - 23:54

बनवते कायदे जितके स्वत: ते तोडते दुनिया
कसे ते ठाव नाही पण व्यवस्थित चालते दुनिया

चुका केल्या, गुन्हे केले, तरी निर्दोष सुटलो मी
स्वत:च्या कार्यक्षमतेची बढाई सांगते दुनिया

कशाला वृत्त वाचू मी कशाला कान मी देऊ ?
अशी मी बातमी जी आवडीने ऐकते दुनिया

कधी जर थांबलो थोडे सुरू होते तिथे फरफट
मला धावायचे असते तिथे रेंगाळते दुनिया

भिडा बिनधास्त किंवा प्रेमही उधळा मनापासुन
जराशी पाठ फिरल्यावर निशाणा साधते दुनिया

तुला तो भेटल्यानंतर कुणाला भेटला नाही
'जितू'चा चेहरा आहे, 'जितू'ला शोधते दुनिया

....रसप....
९ ऑक्टोबर २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/10/blog-post_11.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशी मी बातमी जी आवडीने ऐकते दुनिया <<< वा वा

मतलाही मस्त!

कार्यक्षमतेची - या शब्दात 'क्ष' चा अर्धा भार 'य' वर येतो.

(अवांतर - अधिक सफाईदार होऊ शकली असते असे वाटून गेले, चुभुद्याघ्या)

कधी जर थांबलो थोडे सुरू होते तिथे फरफट
मला धावायचे असते तिथे रेंगाळते दुनिया

मस्त शेर.

क्लीन वियदगंगेकरीता बेफिकीर ह्यांच्या गझला वाचाव्यात असा मैत्रीपूर्ण सल्ला.