एक अंकी नाटक "तेरी मेरी यारी तो....."

Submitted by jayant.phatak on 9 October, 2013 - 02:35

प्रवेश : पहिला

ठिकाण : सर्व सामान्य घर

वार शनिवार, वेळ रात्रीचे ८, सव्वा ८

नायक आपला स्वस्थ पणे संगणकावर काम करत आहे.म्हणजे काम करायचे नाटक वठवत आहे.ऑफीसमध्ये पण असेच करत असल्याने त्याचे हे नाटक उत्तमपणे वठत पण आहे.(नाटकात अजून एक नाटक.लेखक इंग्रजी सिनेमे जास्त बघतो, त्याचा हा परीणाम आहे.)...एव्हढ्यात मोबाइलची घंटी वाजली..

(हो हो घंटीच... नायकाच्या मोबाईलची रिंग टोन आहे ती....."नायकाचे अज्जुन पण भूत काळाची घट्ट नाते आहे" असे नाटककार इथे सांगत आहे,.... हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आले असेलच.)

नायक : (आधी नांव बघून) अबे साले तु है किधर. आज याद आली का रे गड्या.

आता थोडा पॉझ घेत घेत..

हो ऐकत आहे....ती ना स्वैपाकघरांत आहे...बोल बिंधास्त..आज काही त्रास नाही...अरे एकदम शांतच करून टाकलय तिला...आता निदान २ दिवस तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिचा... हं ऐकतोय..... कधी?...आत्ता... मग..अर्ध्या तासाने.. चालेल ...कुठे... तिथे नको... अरे तिथे फार गोंधळ असतो.. गप्पा नाही मारता येणार.. मग तिथे ठीक आहे.. पण त्यांची मछ्छी करी बोंबललेली असते... अरे अजून तब्येत ठीक आहे माझी.. आणि त्या कार्यक्रमानंतर तर जेवण मस्त हवेच आणि मी काही मुद्दाम जेवायला म्हणून दुसरीकडे जाणार नाही.जेवण पण शक्यतो तिथेच घेतलेले उत्तम.... मग ठीक आहे मीच सांगतो.. हे अमुक तमूक हॉटेल मस्त आहे.. शांत जागा आणि खायला-प्यायला एकदम योग्य जागा.... हो मी निघतो लगेच.. अरे डोंट वरी... हम है तो क्या गम है...

नायक मोबाईल बंद करतो आणि बायकोला हाक मारतो. बायको पदराला हात पुसत-पुसत येते.

बायको : बोला.. आता कुठे जाणार.

नायक : अगं तुला तो जोश्या नाहित आहे ना? अगं त्याला ना कसला तरी प्रॉब्लेम आहे.आता फोन वर काही सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत आणि कुठे तरी निवांत बोलायला पाहिजे म्हणून जरा जावून येतो.

बायको : कोण जोशी?तुम्हाला जोशी नावाचे १७६० मित्र आणि एकाला पण तुम्ही घरांत आणले नाहीत.बरे ते जावू दे, आत्ता जाताय,मग बाहेरच जेवणार असाल?

नायक : मी तरी काय करू.जोश्यांची आणि माझी पत्रिका जुळते,हा काही माझा दोष नाही.हा जोश्या माझ्याबरोबर कॉलेजला होता.बर्‍याच गप्पा टप्पा होतील त्यामुळे आता रात्री किती वाजता परत येईन काही सांगता येणार नाही,शिवाय मी आल्यानंतर परत मग वाढायचे आणि आवरा आवरी करायचे तुला पण कष्ट नकोत.

बायको : तुम्हाला माझी किती काळजी वाटते , हे मला चांगले ठावूक आहे.उद्या रविवार आहे आणि मला एके ठि़काणी जायचे आहे,घर तुम्हालाच सांभाळायचे आहे.त्या प्रमाणे मजा करा आणि या.लॅच ची चावी घेवून जा.मी अजिबात दार उघडायला येणार नाही.आधीच बजावून ठेवते.तुमच्या विसरभोळेपणाची शिक्षा मला नको.
======================================================================

नायक निघतो...

प्रवेश : दुसरा

ठि़काण : हॉटेल मधले एखादे टेबल.

नायक आणि नायकाचे मित्र येतात आणि बसतात.

नायक : कसा आहेस? आज एकदम कसे काय ठरवलेस?

जोश्या : सांगतो..जरा दम धर..आधी ऑर्डर तर देवू.

जोश्या वेटरला बोलावतो.वेटरला बोलवायचा आणि ऑर्डर द्यायचा यजमानांचा अधिकार असल्याने नायक गप्प...

वेटर : बोलीये सर

जोश्या : मराठी येते का?

वेटर : साहेब मी मराठीच आहे. बोला काय आणू? ह्या साहेबांचे मला माहित आहे.तुमचे सांगा.

जोश्या ऑर्डर देतो.

नायक : हं..बोल आता घडाघडा.

जोश्या : अरे बाबा काय करू? सध्या आमची ही जाम त्रासली आहे.आता नक्की कशामुळे ते माहीत नाही.पण आता त्रासलीच आहे तर तिला शांत तर करायलाच पाहिजे ना?

म्हणून मग तिला घेवून हॉटेलात गेलो,पुण्याला हिच्या सासरी गेलो,त्या लक्ष्मी बाजारांत १६/१७ तांस हिच्याबरोबर फिरून चांगल्या ४ साड्या घेवून दिल्या शिवाय माहेरून २/३ साड्या मिळाल्या त्या वेगळ्याच.आता माझी बायको रोज पंजाबी ड्रेस घालते तरी पण तिला साड्या ह्या हव्यातच.परवा सहज हिचे कपाट उघडे होते म्हणून बघीतले तर हज्जारो साड्या.बहूदा रिटायर झाली की ही साड्यांचे दुकान टाकणार बघ.एव्हढ्या साड्यांचे ह्या बायका काय करतात कुणास ठावूक?मागच्या आठवड्यांत कुठेतरी जायचे होते.. कशाला बरे .. हां ते मंगळागौरीला.. म्हणून एकाच्या जागी २ नववारी साड्या घेवून आली....काही कारणामुळे ते जायचे रहीत झाले.त्या नववारी साड्या अजून तशाच पडून आहेत. बरे इतक्या साड्या आहेत पण ऐनवेळी एक पण नेसत नाही.कधी मॅचिंग परकर नसतो तर कधी मॅचिंग ब्लावूजच नसतो आणि हे दोन्ही मिळाले तर नेमकी साडीला इस्त्री नसते.आमची इस्त्री म्हणजे एक अजब नमूना आहे बघ.साली ऐन वेळी मिळाली आणि ती पण ठीकठाक अवस्थेत हा दिवस कधी आलाच नाही बघ.पहिल्या दिवशी आणली तेंव्हा ठीक होती.पण दुसर्‍या दिवसापासून जी बिघडली ती बिघडलीच.

नायक : (पहिले वाक्य ऐकल्यानंतर,नायकाने मोबाईल मध्ये तोंड घातलेले..आता एकदम जोश्या बोलायचा थांबल्यामुळे, नायकाच्या लक्षांत फक्त शेवटचीच २/३ वाक्ये राहिली होती.त्यामुळे त्याने फक्त त्या वाक्यांचाच विचार करून बोलला) हो ना माझ्या घरी पण सेम प्रॉब्लेम आहे.शेवटी मी माझे कपडे भय्या कडूनच इस्त्री करून घेतो.

जोश्या : अरे..मी इस्त्री बद्दल नाही तर बायकोबद्दल बोलत आहे..

नायक : असे होय?मग ठीक आहे. बाकी बायको काय आणि इस्त्री काय? दोन्ही सारख्याच.(इथे नायक जोश्याच्या कानांत काहीतरी सांगतो आणि दोघेही मनमुराद हसतात)

जोश्या : अरे ते इस्त्रीचे नाही रे... तर मी माझी बायको नाराज आहे...हे सांगत होतो.

नायक : अरे मग त्यांत काय एव्हढे.बायकोने नाराज होणे हा तिचा गूण आहे आणि पुरुषाने तिची मनधरणी करणे हा आपला गूण आहे.तू तिची मनधरणी कशी केलीस ते सांग.

जोश्या : अरे परवा मी कुठेतरी संसारदेवाची कहाणी वाचली होती. ते सगळे उपाय करून झाले. अगदी गजरा पण देवून झाला.आता त्यात पण थोडा घोटाळा झाला म्हणा.साली ती पण एक गंमतच झाली.त्या भटाला दुसर्‍या दिवशी सांगीतली तर त्याने जाड्याला आणि म्हश्याला पण सांगीतली. आता रोज मला भेटले तर खुदुखुदु हसतात आणि मला "गजरा जोश्या" म्हणून बोलावतात.हां तर सांगत काय होतो...तुला तर माहीतच आहे माझा स्वभाव.एक तर आपल्याला ह्या असल्या गोष्टी काय शाळेत शिकवत नाहीत आणि बहिणी वगैरे नसल्याने हे नक्की गजरा प्रकरण आहे तरी काय ते ही माहीत नाही.परवा असेच स्टेशन वरून उतरलो तर भट भेटला. हां तोच तो..पुजारी...माझा चेहरा बघून मला म्हणाला ठीक आहे.. चल मी येतो... मग काय ह्या भटाच्या नादी लागून चांगला ५ फुटी आणि ५०० रुपयांचा गजरा घेतला.काहीतरी २ ते अडीच किलो वजन असेल बघ त्या गजर्‍याचे....तू आत्ता कसा नवलाने बघत आहेस ना? तसेच काही तरी मला पण जाणवत होतेच.पण ह्या भटाने सांगीतले की बायकोच्या मापाप्रमाणे बरोबर आहे.. मी घरी गेलो आणि बघीतले तर आमची ही जरा बर्‍या मूड मध्ये होती.

म्हणजे काय झाले त्या दिवशी की नाही, हिच्या मंडळात सुरळीच्या वड्यांची स्पर्धा होती आणि तिच्या सुरळीच्या वड्यांना कुणीही तोंड न लावल्याने त्या तशाच परत आल्या होत्या.आता रात्रीचा स्वैपाक टळला म्हणून आमची बायको फारच खुषीत होती.आजकाल आम्ही हिचे डायट सुरु असल्याने सुरळीच्या वड्या,बाकरवड्या,पाटवड्या किंवा थालीपीठे असेच जेवत असतो.

नायक : अरे व्वा!!! हे तर फारच उत्तम.सुंठीवचून खोकला गेला होता की..मग अशा वेळी तू गप्प बसायला हवे होतेस.तू परत काही तरी घोटाळा केला असशील.

जोश्या : हो ना.. मला पण असेच वाटले.पण म्हणालो अजून एकदा खुंटी हलवून बळकट करू या.म्हणून मग तिच्या हातात अगदी सांग्रसंगीत गजरा दिला.तो सीन मला अजून आठवत आहे.

काय ते तिचे मिटलेले डोळे आणि मी स्वतः तिच्या हातात दिलेला गजरा.पण त्या गजर्‍याचे वजन काही तिच्या कोमल हातांना पेलवेना, म्हणून तिने हळूच उघडलेले डोळे आणि नंतर त्या डोळ्यांतील बदलत-बदलत जाणारे भाव.. प्रथम कुतुहल...नंतर आश्चर्य आणि नंतर रागाने झालेले ते खदिरांसारखे डोळे मी आजन्म विसरणार नाही.

ह्या भटाने मला गजरा म्हणून, हार विकत घ्यायला लावला आणि तो पण लग्नांत घालतात ना तसा.हिने मग तो हार माझ्याच गळ्यांत घातला आणि माझी रवानगी थेट गॅलरीत केली.ह्या भटाने केसाने नाही पण हाराने माझा गळा कापला बघ..

नायक : बरे मग मी काय करू? त्या भटाचे गुण त्याच्या बायकोला सांगू का?

जोश्या : अरे नको रे.ते काम मी आधीच केले आहे.त्या आपल्या पिकनिकचे फोटो टाकले आहेत फेसबूकात.हो तेच ते माधूरीचे आणि भटाचे एकत्र डुंबतांनाचे. ते शेयर केले आहेत भटाच्या बायकोबरोबर.आज केलेत.उद्या बघ आता भटाची गंमत. ते जावू दे... हां तर आपण कुठे होतो.

नायक : ते इस्त्री पाशी.

जोश्या : हां तर मी सांगत होतो की माझी बायको अद्याप नाराज असुन मला तिला ताळ्यावर आणायचे आहे. तुझ्याकडे काही जालीम उपाय असेल तर सांग.

नायक : तु त्या संसारदेवाची कहाणी वाचलीस ना? मग त्यांतलाच एखादा कर ना?

जोश्या : ते सगळे करून झाले.सगळी अर्धवट माहीती दिली आहे.नुसता गजरा विकत घ्या, असे सांगून काही होते का?

गजरा म्हणजे काय? तो कसा दिसतो?कुठल्या फुलांपासून बनतो?साधारण भाव काय?ताजा गजरा कसा ओळखायचा? सुर्यफुलांचा गजरा असतो का? आणि तसेच कमळ आणि झेंडू यांचा पण गजरा असतो का? तो दिला तर समोरच्या पार्टीची काय दशा होईल? तिचे (बायको अथवा प्रेयसी) तापमान किती वाढेल किंवा कमी होईल? सुर्यफूल + कमळ + झेंडू ह्यांचा एकत्र गजरा दिला तर नक्की काय काय होईल हे काहीच लिहिले नाही आहे.

नायक : (मनांत... तिज्यायला हा जोश्या येडपटच आहे आणि त्याची बायको महा येडपट.नुसता पगार,हुद्दा,शिक्षण आणि घर बघून लग्न करतांत आणि मग हे असेच होते.व्यवहारज्ञान नसेल तर ह्या इतर गोष्टी काय कामाच्या) आहे जालीम उपाय आहे. पण मला काही माहिती दे.

प्रश्न पहिला : तुझ्या बायकोच्या मोबाईलची रिंग टोन काय आहे?

जोश्या : काही नक्की लक्षांत नाही.कारण आजकाल तिचा मोबाईल आणि ती दोघेही सायलेंट मोड वर असतात.राग व्यक्त करायची हिची ती एक पध्धत आहे.

नायक : ठीक आहे पण राग येण्याआधी कुठली होती?

जोश्या : काय लक्षांत नाही पण काही तरी "टिकटिक आणि दिल किंवा धडकन" असे काहीसे होते बघ. हां बहुदा

"मेरे दिल की घडी करे टिकटिक टिकटिक"

अशी होती बघ..

नायक : अरे बाबा ही नक्की नसेल रिंगटोन... कारण ही तर माझ्या पणजीच्या मोबाईलची रिंगटोन आहे.हो अज्जून जिवंत आहे माझी पणजी. आम्हा सगळ्यांना शतायुषी असण्याचा शाप आहे..

बहूदा तुझ्या बायकोची रिंगटोन अशी असेल

"टिकटिक वाजते डो़क्यांत..धडधड वाढते ठोक्यांत"

जोश्या : अरे हो हिच आहे....आहे म्हणजे राग येण्यापुर्वी होती...

नायक : बरे सध्या ती कुठले पुस्तक वाचत आहे.

जोश्या : तिला वाचनाचा अजिबात गंध नाही.पेपरचा उपयोग फक्त नाटकाच्या आणि सिनेमाच्या जाहीराती देण्यापुरुताच असतो , असे हेचे ठाम मत आहे.

नायक : मग एकदम साधा आणि सरळ उपाय देतो.

तिला घेवून सिनेमाला किंवा नाटकाला जा.....आणि रिंगटोनमुळे हे काम फारच सोपे करून ठेवले आहे तुझ्या बायकोने..तिला घेवून तू "दुनियादारी" सिनेमाला जा..

जोश्या : अरे पण लेका तूच परवा भटाला सांगीतलेस ना की एकदम बकवास सिनेमा आहे म्हणून आणि आता एकदम पलटी.

नायक : मी तुला काय म्हणालो... तिला घेवून सिनेमाला जा.तू सिनेमा बघ असे कुठे म्हणालो?

जोश्या : हे बघ तू हे असे कोड्यांत नको बोलूस.मला नीट व्यवस्थीत सांग.

नायक : ठीक आहे. मग नीट ऐक.

तुझ्या घरी जसा प्रॉब्लेम आला तसाच माझ्या घरी पण आला.पुर्वी मी हे सगळे संसारदेव वाले उपाय करायचो पण आजकाल इटरनेट आणि मोबाईल आणि टीव्ही मुळ्र गोष्टी बर्‍याच सोप्या झाल्या आहेत.मी तर आज काल ह्या रिंगटोनमुळे बायकोचे मागणे लगेच ओळखतो.तुझ्या बायकोने तरी बरीच सौम्य रिंगटोन वापरली माझ्या बायकोने तर भलतीच रिंगटोन वापरली होती.

"देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही"

२/३ दिवस ही रिंगटोन ऐकली पण मुद्दाम थोडे दुर्लक्ष केले आणि मग वेळ काळ बघून मागच्या शनिवारी मी आणि ती सिनेमाला गेलो.

आता तुला तर माहीतच आहे की मी फक्त इंग्रजी सिनेमे बघतो तरी पण गेलो.त्या आधी मस्त पैकी सांग्रसंगीत भोजन केले आणि दुपारच्या शो ला गेलो.

जोश्या : कसा काय होता सिनेमा?

नायक : एकदम बकवास.

एक तर मी आधीच ती कादंबरी वाचली होती. त्यामुळे डोक्यांत एक इमेज तयार झाली होती.स्टारकास्ट जर कथेला पुरक असेल तर आणि तरच सिनेमा किंवा नाटक बघायला मजा येते.

उदा. हॅरी पॉटरचे सिनेमे का चालले तर त्यातील स्टारकास्ट मुळे..त्या हॅग्रीडच्या जागी जर मुक्रीला किंवा डंबलडोरच्या जागी ए.के.हंगलला घेतले असते तर चालले असते का?

माझ्या मावशीकडे बरीच नाटकाची पुस्तके आहेत.बर्‍याच वेळा मी आधी ती नाटकाची पुस्तके वाचायचो आणि मग नाटक बघायचो.

"थँक्यु मी.ग्लॅड" मधल्या ग्लॅडच्या भूमिकेला खरा न्याय दिला तो प्रा.मधुकर तोरडमलांनी.

"तरुण तुर्क..." मधले "डी.डी.टी". आणि "प्रो. हा-हे-ही " ह्यांच्या भुमिकेत शोभले ते "मोहन जोशी" आणि "प्रा.मधूकर तोरडमलच."

"सौजन्याची ऐशी तैशी" मध्ये नानाच्या भुमिकेत राजा गोसावी एकदम पर्फेक्ट

अरे ते तर सोडून दे.. मी तर "सिंहासन" आधी वाचले आणि मग सिनेमा बघीतला त्यात इतके सारे स्टार कास्ट असून देखील मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेत शोभले ते अरुण सरनाईकच. खरे तर त्या वेळी निळू फुले ह्यांची जबरा चलती होती पण कथेला अरूण सरनाईकच योग्य होते.

आपण रुषी कपूरच्या जमान्यातले."बॉबी" "रफु चक्कर" किंवा अगदी गेला बाजार "खेल खेल में" मधला कॉलेज हीरो म्हणून तो खपून गेला (खपून गेला म्हणण्यापेक्षा एकदम योग्य वाटला) पण नसीब मध्ये तो कुठल्याच अँगलने कॉलेज-कुमार वाटला नाही. हे दुनियादारी मधले हीरो पण असेच.....

तो श्रेयसचे काम करणारा असू दे किंवा डी.एस.पी.चे काम करणारा असू दे. त्यातही शिरीन कशी पाहिजे तशी ही नटी काही वाटलीच नाही. त्यात पण मी....ठीक आहे, चलता है... असे म्हणालो असतो पण साईनाथला बघीतले आणि जे डोळे मिटले ते थेट बायकोने सिनेमा संपला असे सांगीतल्यावरच उठलो.आता कथा वगैरे काही विचारु नकोस..बाकी स्टार कास्टचीच इतकी वाट लावल्यावर कथेची नक्कीच वाट लावली असणार.

जोश्या : अरे मग मी जावु का नको? मी तर पुस्तक वाचले आहे आणि तु म्हणतोस ते पटत पण आहे.

नायक : तू मात्र नक्की जा. पण जाण्यापुर्वी ३/४ गोष्टींची खात्री करून घे. बायकोने पुस्तक वाचले आहे का?तिला त्यातील नायक किंवा नायीका आवडतात का? आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे थियेटर ए.सी. आहे का?

जोश्या : आता ह्यात ए.सी.थियेटरचा काय संबंध?

नायक : त्याचे काय आहे सिनेमा आवडला तर हरकत नाही आणि नाही आवडला तर मस्त झोप काढ आणि ये.निदान तूझी बायको तरी खूष होईल.....

शेवटी काय तर "तेरी मेरी यारी तो ......"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users