माहिती हवी आहे : संस्था, एन जीओ

Submitted by प्रार्थना on 7 October, 2013 - 02:13

नमस्कार,
माझ्या एक ओळखीतल्या बाई आहेत त्यांची अडचण मांडत आहे.
वय वर्षे ५५ ह्या पुढे. नवरा, एक मुलगी, एक मुलगा.
नवरा चांगली नोकरी आता रिटायर्ड.
मुलीचे लग्न होऊन तिला दोन मुले, ती संसारात सुखी, तिची स्वतःची नोकरी, नवरा- सासू सासरे गुण्यागोविंदाने नांदतात. तिच्या बाबतीतली या बाईंची सर्व कर्तव्ये पूर्ण.
मुलगा शिक्षण पूर्ण, नव्यानेच नोकरीला लागला आहे, वेगळ्या गावात. त्याचे तिथे बस्तान हळूहळू बसते आहे. त्याचे लग्न पुढील २-४ वर्षात अपेक्षित आहे.
या बाई स्वतः ग्रॅज्युएट, एका खाजगी नोकरीत जवळ जवळ १२ वर्षे काम केलेले. परंतु मुलांसाठी नोकरी सोडावी लागली. सध्या घरीच असतात.
आर्थिक परिस्थिती मध्यम. परंतु स्वतःचा असा स्वतंत्र पैसा शिल्लकीत नाही. काम करण्याची अजून तयारी, मुलांना शिकवणे, सांभाळणे, शिवण, विणकाम याची आवड, हाताला छान चव. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कष्ट करायची तयारी, मनमिळावू, हसतमुख स्वभाव आणि अतिशय कणखर मन .

आता मूळ अडचणी बद्दल. या बाईंनी सारा संसार एकट्यांनी पार पाडला. नव-याची फक्त पैसे मिळवण्याची मदत. तेही बाईंनी मागितले की तेव्हढेच काढून हातात ठेवायचे अशी वृत्ती. कोणतेच काम जबाबदारीने करण्याची वृत्ती नाही. तशात अतिशय आतल्या गाठीचा, अतिशय चिडका स्वभाव. घरातल्या कोणत्याही कामांची सवय नाही, रादर ही कामे फक्त बाईचीच असा अविर्भाव. रिटायर्ड झाल्या नंतर तर सारा दिवस नुसता लोळण्यात . घरातल्या कोणत्याही बाबतीत हातभार नाही.
गेली जवळ जवळ ३५ वर्षे या बाईने हे सगळे निभावून नेले. संसार मोडण्याची ताकद नाही वा तसा विचार करण्याची परिस्थिती त्या बाईंची नव्हती.
आता मात्र या सर्वाला या बाई अतिशय कंटाळल्या आहेत. त्यातून आता घरात फक्त नवरा बायको असल्याने त्यांना आता हे सारे असह्य झाले आहे. इतकी वर्षे मुलांसाठी अन लोक काय म्हणतील म्हणून त्या गप्प राहून संसार ओढत राहिल्या. आता मात्र त्या या सर्वातून बाहेर पडू पाहताहेत. परंतु आर्थिक स्वावलंबन नसल्याने त्या वेगळे घर घेऊ शकत नाहीत. मुलावर आपली जबाबदारी टाकायला त्यांचा अगदी विरोध आहे. मुलगा आईला चल म्हणतो, पण ह्या तयार नाहीत. त्याचे मत मी मुलाकडे गेले की नवराही येईल. अन तिथे मुलाच्या जीवावर ऐदीपणा करेल. ते त्यांना अजूनच त्रासदायल होइल.
त्यांना अशी एखादी संस्था, एन जी ओ हवी आहे जिथे त्या काही कामही करू शकतील, ४ पैसे गाठीशी राहतील अन महत्वाचे म्हणजे रहायला जागा मिळेल.फक्त सुरक्षित अशीच संस्था त्यांना हवी आहे. एखाद्या कुटुंबात राहण्याची त्यांची तयारी नाही. पुढची किमान ४-६ वर्षे त्यांना अशी सोय हवी आहे. तो पर्यंत मुलगा काही सोय करून देईल असे म्हणाला आहे. मुलगा अतिशय समंजस आहे.
तर या बाईंना रहाण्यासाठी अन दैनंदिन खर्चासाठी काम मिळेल अशी काही सोय कोणी सांगू शकेल का? त्यांची पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा मोठ्या शहरात किंवा एखाद्या छोट्या गावातही रहायची तयारी आहे. फक्त संस्था खात्रीशीर असावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

अशा संस्थांची माहिती असल्यास ती कृपया द्यावी ही विनंती !
धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईंनी घेतलेला निर्णय आवडला.>> +१
त्यांना लवकर असं काम मिळू दे.
त्यांच्या जीवनाची घडी लवकरच नीट बसू दे ही शुभेच्छा.

असा निर्णय घ्यायला फार मोठं मनोबल लागतं. बाईंच खूप कौतुक आणि शुभेच्छा! सहज सुचले म्हणून: त्या अनाथालय किंवा वृद्धाश्रम अशा ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करू शकतात. तिथे राहण्याची सोय होईलच शिवाय पैसे मिळतील आणि एक सामाजिक कार्य केल्याचं समाधानही! वनवासी कल्याण आश्रम वै. संस्थांना देखील अशा स्वयंसेवकांची गरज असते. माझ्या माहितीमध्ये एक ज्येष्ठ जोडपे असे काम करीत होते.

वनवासी कल्याण आश्रम >>+१ माझ्याही ओळखीत एक काका आहेत तिथे स्वयंसेवक म्हणून काम करणारे.

बाईंनी घेतलेला निर्णय आवडला.>> +१