तुझे वाचते फक्त डोळे.......

Submitted by भाग्यश्री ७ on 17 September, 2013 - 09:20

हिशोबी जगाची नको मोह, माया, जिव्हाळा नको
मला एकटी मी पुरे, आप्त कोणी निराळा नको

स्मृतींनी असे चित्त आभाळले, श्वासही वादळी....
जुन्या आसवांचा नव्याने मला पावसाळा नको

ऋतू कोणता अंतरी चालला मी तुझ्या जाणते..
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको

जरा गीत ओठांवरी, स्मीत गालांवरी ठेव ना....
तुझ्या नाखुषीचा जगाला जरा ठोकताळा नको

नको तू विचारूस माझी खबरबात आता सखे
अशा छान गप्पांमध्ये जीवघेणा धुराळा नको

भाग्यश्री कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! अनेक ओळी व खयाल आवडले. (कदाचित काही ओळी अधिक सीमलेस होऊही शकल्या असत्या, पण असो)

मला एकटी मी पुरे, आप्त कोणी निराळा नको<<<

ऋतू कोणता अंतरी चालला मी तुझ्या जाणते..
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको<<<

नको तू विचारूस माझी खबरबात आता सखे
अशा छान गप्पांमध्ये जीवघेणा धुराळा नको<<<

वा वा

धन्यवाद! Happy

स्मृतींनी असे चित्त आभाळले, श्वासही वादळी....
जुन्या आसवांचा नव्याने मला पावसाळा नको>>>>>>> वा वा

ऋतू कोणता अंतरी चालला मी तुझ्या जाणते..
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको........सुंदर शेर

नको तू विचारूस माझी खबरबात आता सखे
अशा छान गप्पांमध्ये जीवघेणा धुराळा नको.......क्या ब्बात !

मनापासून शुभेच्छा !

-सुप्रिया.

सुंदर

खूप आवडली गझल
मीटर बेहतरीन आहे खूपच आवडले
मतल्याची पहिली ओळ अजून छान जमली असती दुसरी खूप छान आहे
पावसाळा वेधशाळा धुराळा जास्त आवडले
धुराळा सर्वोत्तम

ऋतू कोणता अंतरी चालला मी तुझ्या जाणते..
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको>>> व्वा!

मतलासुद्धा फार आवडला ..छान गझल! Happy

स्मृतींनी असे चित्त आभाळले, श्वासही वादळी....
जुन्या आसवांचा नव्याने मला पावसाळा नको

नको तू विचारूस माझी खबरबात आता सखे
अशा छान गप्पांमध्ये जीवघेणा धुराळा नको

विचारांमधे अधिक clarity हवी, असे वाटते.

अहाहा.

क्या बात है. सर्वच ओळी आवडल्या.

ऋतू कोणता अंतरी चालला मी तुझ्या जाणते..
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको

आणि

नको तू विचारूस माझी खबरबात आता सखे
अशा छान गप्पांमध्ये जीवघेणा धुराळा नको

वरच्या ओळी खुपच आवडल्या. पैकीचे पैकी मार्क दिले. Happy

-दिलीप बिरुटे

अ‍ॅडमीन महोदय,

हे प्राध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे द्रोणाचार्यांच्या आवेशात गुण वाटत फिरत आहेत. यांच्या बेबंदशाहीला आळा घालण्यात यावा अशी विनंती! Light 1

हिशोबी जगाची नको मोह, माया, जिव्हाळा नको
मला एकटी मी पुरे, आप्त कोणी निराळा नको

ऋतू कोणता अंतरी चालला मी तुझ्या जाणते..
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको

सुरेख !
गझल अतिशय आवडली.

शुभेच्छा !

वा!
तुझे वाचते फक्त डोळे, मला वेधशाळा नको.... क्या बात है!

'तुझ्या नाखुषीचा जगाला जरा ठोकताळा नको' ही ओळ (मला) नीटशी कळली नाही.
मी ती ''तुझ्या नाखुषीचा जगाला असा ठोकताळा नको' किंवा ''तुझ्या नाखुषीचा जगाला उगा ठोकताळा नको' अशी वाचली. आपल्याला नेमका काय अर्थ अभिप्रेत आहे ते कळल्यास बरे होईल.
धन्यवाद!

जयन्ता५२

जयंतजी, जरा या शब्दात जरासुद्धा हा अर्थ मला अपेक्षित आहे.
' जगाला थोडीसुद्धा तुझी नाराजी दिसू द्यायची नसेल तर तू हासत, गात रहा.....' असे अभिप्रेत आहे.
अर्थात उगा हा शब्दही मला आवडला. धन्यवाद