"आठवण ___"

Submitted by अनिल आठलेकर on 16 September, 2013 - 15:03

उदासवाणी झुळुक भाबडी
कातरवेळी हळवी होते,
कडेकपाऱ्या तुझ्या मनाच्या
चुटकीतच ओलांडुन येते.....

तुझी आठवण तू नसताना
सदैव माझ्या सोबत असते
मनात वेडी आशा तरिही
तुला सभोती शोधत असते......

तुझी अवस्था अशीच आहे
हळूच कोणी सांगत असते
कळते नंतर तुझ्या भावना
फूलपाखरू मांडत असते.......

अलगद केंव्हा सकाळ वेडी
आठवणींशी झोंबत असते
स्वप्नामधली लुप्त चांदणी
भुवईपाशी लोंबत असते.....

मध्यान्हीचा सूर्य अताशा
उगाच थोडा थांबून येतो
जाता जाता मला पाहुनी
दीर्घ उसासा लांबून देतो...

वाट हरवते संध्यासमयी
तुझ्याच गावी पाउल नेते
आठवणीना क्षितिजापाशी
तुझी नव्याने चाहुल येते.......

~अनिल आठलेकर..,
16/09/2013

Group content visibility: 
Public - accessible to all site users