'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्ताने - श्री. गणेश मतकरी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 16 September, 2013 - 02:19

'इन्व्हेस्टमेंट' हा ज्येष्ठ साहित्यिक श्री. रत्नाकर मतकरी लिखित व दिग्दर्शित मराठी चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होतोय.

या चित्रपटाचं सहदिग्दर्शन केलं आहे श्री. गणेश मतकरी यांनी.

साक्षेपी समीक्षक व लेखक म्हणून गणेश मतकरी चित्रपटप्रेमींमध्ये नावाजले आहेत. गेली पंधरा वर्षं ते सातत्यानं चित्रपटविषयक लेखन करत आहेत. कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, चित्रपटमाध्यमाचा संपूर्ण आदर राखत केलेल्या त्यांच्या समीक्षणांचे नवखे व दर्दी प्रेक्षक चाहते आहेत. उत्तम चित्रपट निर्माण होण्यासाठी उत्तम प्रेक्षक आवश्यक असतात, असं मत ते आपल्या समीक्षणांतून अनेकदा मांडत असतात. अनेक चित्रपटविषयक नियतकालिकांशी व फिल्म सोसायट्यांच्या चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ’रूपवाणी’सारख्या चित्रपटांना वाहिलेल्या नियतकालिकांसाठी, ’सा. सकाळ’ व ’अक्षर’ दिवाळी अंकासाठी, त्यांनी अनेक वर्षं सातत्यानं लेखन केलं आहे. ’दिव्य मराठी’ या वृत्तपत्रात व ’मुक्त शब्द’ या मासिकात चित्रपटविषयक सिद्धांतांबद्दल त्यांनी लिहिलं आहे.

मायबोली.कॉम 'इन्व्हेस्टमेंट'ची माध्यम प्रायोजक आहे. या निमित्तानं श्री. गणेश मतकरी यांनी खास मायबोलीकरांसाठी लिहिलेला हा खास लेख.

ganesh.jpg

अमोल (डिरेक्टर ऑफ फोटोग्रफी अमोल गोळे) 'इन्व्हेस्टमेंट'विषयी बोलताना एक गोष्ट नेहमी सांगतो, जी खरी आहे. त्याने जेव्हा चित्रपटाची पटकथा ऐकली, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग बाबांना म्हणाला, ' काका, जगात खरोखर कोणी चांगलं नसतंच का?' यावर मला वाटतं बाबा नुसते हसले असावेत.

'इन्व्हेस्टमेंट' अनेक चित्रपट महोत्सवांमधून दाखवला गेला, इथल्या तसंच न्यू यॉर्क, जर्मनीच्याही. त्या निमित्ताने आम्हांला वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या तेव्हा लक्षात आलं, की अमोलची प्रतिक्रिया ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रीया म्हणता येईल.

मला स्वतःला ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. कारण 'इन्व्हेस्टमेंट'मध्ये केवळ वाईट माणसं दिसतात असं नाही. त्यात आपल्या आजूबाजूला दिसतात तशी सर्वच प्रकारची माणसं आहेत. काही अतिशय भली, काही तडजोडी करणारी, काही सुखवस्तू, काही स्वार्थी, काही वैयक्तिक प्रगतीचा विचार करणारी, तर काही त्या प्रगतीपलीकडे काहीच पाहू न शकणारी. किंबहुना मी तर असं म्हणेन, की टिपिकली त्यातल्या ज्या व्यक्तिरेखेच्या पदरात बराचसा वाईटपणा घातला जातो, तीदेखील पारंपरिक अर्थाने वाईट नाही. तिचा दोष म्हणायचा तर एवढाच, की ती आजच्या काळाशी सर्वार्थाने बांधलेली आहे. तिला मागे पडायचं नाही. तिची नजर पुढे लागलेली आहे. अधिक चांगल्या परिस्थितीकडे, अधिक उज्ज्वल भविष्याकडे. पण मला सांगा, आजच्या महत्त्वाकांक्षी तरुण पिढीतल्या कोणाची नजर तशी नाही?

photo 4.JPG

मी जेव्हा २००३मध्ये 'इन्व्हेस्टमेंट'ची कथा ऐकली, तेव्हा मला सगळ्यात अधिक जाणवलं ते तिचं हे आजचं असणं. अर्थात, ही गोष्ट आजपासून दहा वर्षांपूर्वीची आहे, अन् या दहा वर्षांत परिस्थिती रॅडिकली बदललेली तर नाहीच, वर ती कथेच्या अधिक जवळ गेलेली आहे. मी स्वतःही तेव्हा होतो त्याहून या कथेच्या अधिक जवळ आहे. यातलं कुटुंब हे माझ्या स्वतःच्या किंवा माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या कुटुंबापेक्षा फार वेगळं नाही. आणि या जवळच्या अंतरावरून मी निश्चितच म्हणू शकतो की ही गोष्ट वाईट माणसांची नाही, साध्या माणसांची आहे. कदाचित थोड्या अधिक हुशार, अधिक एफिशियन्ट माणसांची, जी आल्या प्रसंगासमोर हताश होऊन न राहता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या निर्णयाला विशिष्ट अर्थ देऊ करते ती ते ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीची चौकट. या चौकटीकडे लक्ष वेधणं, ती तिथे आहे याची जाणीव करुन देणं, हा या कथेमागचा किंवा चित्रपटामागचाही हेतू आहे.

हा लेख लिहिण्यापुरती मी माझी समीक्षकाची भूमिका बाजूला ठेवली आहे, असं आपण समजू कारण माझा या चित्रपटाशी इतका जवळचा संबंध आहे, की मी त्याच्या गुणवत्तेची चिकित्सा करण्यात मुद्दा नाही. ती तो पाहाणार्‍यांनी करावी. मला केवळ काही निरीक्षणं मांडण्यात रस आहे. या निरीक्षणांतून कदाचित त्याच्याकडे पाहण्याची दिशा मात्र मिळू शकते.

बर्‍याचदा आम्हांला चर्चांमधून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे हा चित्रपट कोणा सत्यघटनेवर आधारीत आहे का? याचं उत्तर टेक्निकली 'नाही' असं आहे पण तेही तितकसं योग्य नाही. कारण ही घटना सलग, जशी कथेत आहे, जशी चित्रपटात दाखवली जाते, तशी घडलेली नाही, मात्र त्यामुळे ती सत्य नाही असंही म्हणता येणार नाही. या कथेचे सरसकट सर्व पैलू, बरीचशी पात्र, त्यांचे दृष्टिकोन आणि सामाजिक पार्श्वभूमी आणि काही महत्त्वाच्या घटना या थेट आपल्या आजच्या वास्तवाचा भाग आहेत. त्यातला आशय हा जराही काल्पनिक वा अतिरंजित नाही. संकल्पना , निरीक्षण आणि निष्कर्ष या तिन्ही पातळ्यांवर 'इन्व्हेस्टमेंट' ही सत्यकथाच म्हणायला हवी.

'इन्व्हेस्टमेंट' कथेतच तिची पटकथा दडलेली आहे. बाबा त्यांच्या विपुल लिखाणात अनेकदा साहित्यप्रकार काहीशा प्रायोगिक पद्धतीने मिसळून टाकतात. कधीकधी त्यात सोयीचा भाग असतो, म्हणजे विषय सुचला आणि अधिक तपशिलात काम करायला वेळ नसेल, तर तो एखाद्या सोप्या (म्हणजे त्यांच्यासाठी सोप्या, हे जनरल स्टेटमेन्ट नाही) फॉर्ममधे नोंदवून मग फुरसतीत त्याकडे पुन्हा वळायचं. उदाहरण द्यायचं, तर त्यांचं 'दादाची गर्लफ्रेन्ड' हे नाटक, हे असं आधी कथारूपात केलेल्या टिपणावर आधारित आहे. (याची नोंद घेणं आवश्यक, की मूळ कथा सोय म्हणून लिहिलेली असली, तरी ती कुठेही डफरावलेली नाही, हे ती पाहून कोणीही सांगू शकेल). किंवा कधीकधी ही साहित्यप्रकाराची मिसळ हा योजनेचा भाग असतो. 'लोककथा ७८'ची हिशेबापलीकडे कलावंत असणारी आणि नाटकाचा सहासात प्रसंगांचा फॉरमॅट मोडीत काढून पटकथेसारखी दर चारपाच मिनिटाला प्रसंग आणि नेपथ्ययोजना बदलणारी, तरीही प्रयोगात अत्यंत बंदिस्तपणे उभी राहू शकणारी संहिता, हे उदाहरण. 'इन्व्हेस्टमेंट'ही अशी पटकथा म्हणून दिसलेली, पण मुळात कथारूपात लिहिलेली गोष्ट आहे. कथेचं निवेदन प्राची करते, त्यामुळे तिचा दृष्टिकोन वाचकाला फर्स्ट हॅण्ड कळतो, मात्र त्यामुळे आई आणि आशिष हे इतर दोन दृष्टिकोन लपत मात्र नाहीत. उलट तिच्या बोलण्याच्या शैलीतच ते स्पष्ट होतात. हे तीन दृष्टिकोन 'इन्व्हेस्टमेंट'च्या केंद्रस्थानी आहेत. खरी गोष्ट ही या दृष्टिकोनांचीच आहे.

IMG_5029.JPG

आशिष आणि प्राची हे स्वतःच्या प्रगतीची स्वप्नं पाहाणारं आधुनिक जोडपं, त्यांच्या तालमीत तयार झालेला त्यांचा मुलगा सोहेल आणि आशिषची जुन्या पारंपारिक विचारांना मानणारी आई या यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा. मी जेव्हा मूळ कथा ऐकली, तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते हे, की यातला सोहेल हा इन्सिडेन्टल आहे. त्याची योजना एखाद्या कॅटलिस्टासारखी आहे. तो जे काही करतो, ते महत्त्वाचं नाही, तर त्याच्या वागण्यामुळे जे दृष्टिकोन समोर येतात तेच खरे महत्वाचे. (हे माझं मत कथा ऐकल्यावर होतं! आजच्या वर्तमानपत्रांना वाचून ते बदललं नाही तरच नवल ! आज मी सोहेलच्या पात्राला केवळ कॅटलिस्ट मानत नाही, तर बाबांना तेव्हा भविष्याची चाहूल लागली होती, असं मानतो!) .

गोष्ट दिवाळी अंकात आली आणि त्या वर्षीच्या महत्त्वाच्या कथांमधे ती गणली गेली. बाबांना जसे अभिनंदनाचे फोन आले, तसेच कथेवर काही करु पाहणार्‍या चित्रपट दिग्दर्शकांचेही आले. मात्र ती बाहेर द्यायची नाही हे आधीच ठरलेलं होतं. काही विषय हे फार संवेदनशील असतात. ते मांडणार्‍या कथा-पटकथांचा तोल हा अतिशय महत्त्वाचा असतो, जो ढळला तर सारच निरर्थक वाटू शकतं. आणि हा तोल ठरवतो तो दिग्दर्शक. एकदा कथा/पटकथा त्याच्या हवाली केली की लेखकाचं त्यावरचं नियंत्रण संपतं. त्यामुळे यावर चित्रपट करायचा तर आपणच करायचा हे ठरवलेलच होतं. बाबांनी लवकरच पटकथा लिहून ठेवली, आणि आम्हांला वाचूनही दाखवली.

'इन्व्हेस्टमेंट'ची कथा आणि पटकथा यात एक छोटा पण महत्त्वाचा फरक आहे. कथेची निवेदक प्राची आहे, त्यामुळे वाचक तिच्या चष्म्यातून सारं बघतो. चित्रपटात मात्र प्रेक्षकांची प्रतिनिधी प्राची नाही. आशिष आहे. यातल्या तीन प्रमुख वैचारिक भूमिकांत खूपच फरक आहे. प्राचीचा व्यक्तीगत प्रगतीवर विश्वास आहे. म्हणजे तिची अन् तिच्या जवळच्या माणसांची प्रगती. या प्रगतीच्या आड कोणी येणं तिला मान्य होणार नाही. कोणत्याही नॉर्मल कुटुंबातल्या जबाबदार पत्नीसारखं तिचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे. आणि ते सुरक्षित ठेवणं तिला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. अ‍ॅट एनी कॉस्ट. तिच्या उलट बाजूला आहे ती आशिषची आई. ती जुन्या रूढी आणि संस्कारांना धरुन आहे. आपल्या नीतीमत्तेच्या कल्पना ती सोयिस्करपणे बदलू शकत नाही. आशिष या दोघींच्या मधला आहे. तो दोघींनाही समजू शकतो. तो प्रगतीचं मूल्यही ओळखतो आणि संस्कारांची किंमतही जाणतो. पण त्यामुळेच त्याच्यापुढचे निर्णय अधिक कठीण आहेत. या दुहेरी जबाबदारीत त्याची थोडी फरफटही होते कधीकधी. पटकथेत त्याला असलेलं महत्त्व चित्रपटाचा तोल ठेवण्यासाठी योजलेलं आहे.

photo 3.JPG

या चित्रपटाबद्दल एक गंमत अशी की, त्यात दोन वेगळ्या शैली एकत्र येतात. एका बाजूने तो खूप वास्तववादी तपशिलांना एकत्र करतो. अगदी आपल्या सर्वांच्या वागण्याबोलण्यातले तपशील, संवादातले तपशील. दृश्यभागातही हेच. घरापासून स्मशानापर्यंत प्रत्येक प्रसंग लोकेशनवर चित्रीत केला आहे, आणि खरेपणा टिकवण्यासाठी रंगभूषेपासून प्रकाशयोजनेपर्यंत प्रत्येक ठिकाणी विचार केलेला आहे. त्यामुळे हे वास्तववादाचं स्कूल इथे काही अंशी जरूर आहे. याउलट आशयात मात्र पटकथा तशी थेट वास्तववादी नाही. ती सिलेक्टीव आहे. ती मघा सांगितलेल्या दृष्टिकोनांशी प्रामाणिक राहून त्यांच्यातल्या संघर्षाला समोर आणते. यासाठी एक साधी योजना आहे. अनावश्यक गोष्टी, प्रसंग दाखवायचेच नाहीत, जे या दृष्टिकोनाना डायल्यूट करतील. वास्तववाद म्हणून नाही वा इतर कोणत्या कारणासाठीही नाही. पटकथेला जे म्हणायचय ते अतिशय स्पष्ट आहे. हा स्पष्टपणा कॉम्प्रमाईज करेल किंवा प्रेक्षकाला उगाच संभ्रमात पाडेल असं काही (वास्तववादाच्या किंवा व्यक्तिरेखांना ढोबळ खोली देण्याच्या नावाखाली) वापरायचं नाही. यामुळे हा चित्रपट वास्तववाद आणि 'सिनेमा विथ अ‍ॅन अजेन्डा' यांच्या मध्यावर आहे. हे निरीक्षण आउट ऑफ द हॅट केलेलं नाही. पटकथा हा त्याचा पुरावा आहे. ते पडताळून घेणं सहज शक्य आहे.

मला आणि सुप्रियाला कधीकधी कोणी विचारतं, की बाबांबरोबर काम करण्याचा काय अनुभव, तर यात काही नवीन सांगण्यासारखं नाही कारण आम्ही कायमच त्यांच्याबरोबर काम करत आलो आहोत. वेगवेगळ्या टोप्या बदलत. सुप्रिया प्रामुख्याने अभिनेत्री आणि नंतर वेशभूषाकार म्हणून, मी मुलांच्या नाटकात अभिनेता म्हणून, नंतर कॉलेजपासून साहाय्यक दिग्दर्शक म्हणून, ('साटंलोटं' नाटकाच्या १९९५मधल्या अमेरिका दौर्‍यात म्युझिक ऑपरेटर म्हणूनही) 'गहिरे पाणी' मालिकेच्या काही भागांना त्याच्या संहितांचा दिग्दर्शक म्हणून आणि 'इन्व्हेस्टमेंट'ला सहदिग्दर्शक म्हणून. खरं तर आमचा बराचसा घरातला वेळही एकत्र काम करण्याचा असतो असं म्हणता येईल, कारण काही ना काही कामं ही चालूच असतात. आईबाबांचे नवे प्रोजेक्ट्स असतात, नवं लिखाण वाचून दाखवलं जातं, त्यावर चर्चा होतात, त्यांच्याहून खूपच कमी प्रमाणात माझं आणि सुप्रियाचं लिखाणही चर्चेला पडतं. या चर्चांमधे आई आणि पल्लवीचाही (माझी पत्नी) सहभाग असतो. या घरातल्या चर्चांचंच एक्स्टेन्शन म्हणूनच चित्रपटाकडेही पाहता येईल.

'इन्व्हेस्टमेंट'ची संहिता खूप आधी तयार होती. त्यामुळे कामाला लागण्याआधीच बहुतेक सगळं ठरलेलं होतं. कास्टमधल्या अनेकांबरोबर आम्ही आधी काम केलेलं होतं. अमोलबरोबर काम करण्याचा अनुभव नवा होता, पण तो इतक्या चटकन ग्रूपमधे सामील झाला की तो आधीपासूनच आमच्याबरोबर काम करत असावा, असं वाटावं. पटकथेवर आधी काम झालेलं होतं, पण आम्हांला ते कागदावर शंभर टक्के ठरवायला आवडत नाही. तशानं त्याची उस्फूर्तता कमी होऊ शकते आणि छायालेखकाच्या सहभागालाही मर्यादा पडते. त्यामुळे आधी ठरवलेले आराखडे बेस म्हणून वापरणं, तालमी करुन पाहताना काही नव्या गोष्टींची भर पडू शकते का पाहणं, अमोलशी चर्चा, या सगळ्यांचा चित्रीकरणात सहभाग होता. कलावंतांपैकी सारे, म्हणजे तुषार दळवी, सुप्रियापासून लहान पण लक्षात राहणार्‍या भूमिकेतल्या भाग्यश्री पाणेपर्यंत सारेच कलावंत रंगभूमेवरचे होते, त्यांना प्रयत्नाचं गांभीर्य होतं आणि तयारीही.

'इन्व्हेस्टमेंट' बनवताना आम्हांला जराही त्रास झाला नाही. यानिमित्ताने आमच्या टीममधे मोलाची भरच पडली. सहनिर्माते म्हणून उभे राहाणारे मंदार वैद्य आणि अनिश जोशी, आमच्याबरोबर आधी काम न केलेला पण बारीकसारीक गोष्टींचा सतत विचार करणारा संकलक सागर वंजारी, साउंड डिझाईन साठी पुष्कळ कष्ट घेणारे दिनेश उचील आणि शंतनू अकेरकर यांच्याशी आमची छान मैत्री झाली. संगीताची बाजू सांभाळणारा माधव विजय ( आजगावकर ) तर आमच्या नात्यातला आणि 'गहीरे पाणी'पासून आमच्याबरोबर काम करत असलेला आहे. आमच्या चित्रपटात गाणी नसल्याने त्याच्या कामाला मर्यादा होत्या, पण तसं असतानाही प्रेक्षक 'म्युझिक कोणाचं आहे?' असं विचारतात ते त्याच्या कामामुळेच. या सगळ्यांत ओढले गेले, ते पल्लवी आणि आमचा मित्र नितीन कुंभारे. त्यांचं निर्मितीदरम्यान सुरू झालेलं काम अजूनही चालू आहे.

'इन्व्हेस्टमेंट'ला पहिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तो त्याची प्रिव्ह्यू आवृत्ती मुंबई चित्रपट महोत्सवाच्या निवड समितीकडे पाठवली तेव्हा आणि त्यानंतर अनेक ठिकाणी तो फिरुन आला. असा एक संकेत आहे, की चित्रपट महोत्सवाच्या प्रेक्षकांना आवडणारा चित्रपट काही वेगळा असतो. हे असं का, कोणाला माहीत! मी स्वतः अनेक महोत्सवांना हजेरी लावली आहे आणि या मंडळींची आवड काही खास वेगळी असेल तर मला तरी ती दिसली नाही. मला या महोत्सवांमध्ये सर्व प्रकारचे लोक भेटलेले आहेत. आधीही आणि 'इन्व्हेस्टमेंट'च्या निमित्तानेही. ही सारी आपल्या नेहमीच्या पाहण्यात असतात तशीच माणसं होती. आमच्या चित्रपटाबद्दल बोलताना या सार्‍यांच्या प्रतिक्रिया बर्‍याचशा सारख्या होत्या, असं म्हणता येईल. न्यू यॉर्क इंडिअन फिल्म फेस्टिवलच्या डिरेक्टरपासून चेन्नई महोत्सवातल्या थिएटरच्या डोअरकीपरपर्यंत बहुतेकांची.

'इन्व्हेस्टमेंट' हा काही मसाला चित्रपट नाही हे उघड आहे. हे लपवण्याचा आम्ही कुठेही प्रयत्न केलेला नाही. मात्र मसाला चित्रपट ही करमणुकीची व्याख्या आहे असं किती दिवस म्हणत राहणार? शेवटी करमणूक म्हणजे काय, तर कलावस्तूनं, मग ते नाटक असो वा चित्रपट, प्रेक्षकांना धरुन ठेवणं, त्यांना गुंतवणं, विचार करायला लावणं. हे 'इन्व्हेस्टमेंट' करु शकतो हे त्याने छोट्या पातळीवर सिद्ध केलेलं आहे. आम्ही २० सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित करतो आहोत खरे, मात्र वितरणाचा आम्हांला तसा प्रत्यक्ष अनुभव नाही. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळूनही या प्रांतात आम्हांला मदत करण्यासाठी कोणी पुढे झालेलं नाही. आम्ही जे काही करतो आहोत ते पिकल एंटरटेन्मेंट सहाय्याने पण आमच्या जिवावर. चित्रपट प्रदर्शित करण्यामागे हेतू तो महोत्सवांपुरता मर्यादित न राहाता सर्वांपर्यंत पोहोचावा, त्याला त्याचा प्रेक्षक मिळावा, हा आहे. तसा तो मिळतो का, हे मात्र आमच्या प्रयत्नांइतकंच प्रेक्षकांच्या प्रतिसादावरही अवलंबून आहे.

Chair_30x40.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. Happy

(हे माझं घोर अज्ञान म्हणा किंवा अजून काही म्हणा, पण रत्नाकर मतकरी आणि गणेश मतकरी यांच्यात बाप-लेकाचं नातं आहे हे मला आत्ता कळतंय !!)

(हे माझं घोर अज्ञान म्हणा किंवा अजून काही म्हणा, पण रत्नाकर मतकरी आणि गणेश मतकरी यांच्यात बाप-लेकाचं नातं आहे हे मला आता कळतंय !!)
+१ आणि बरेच असतीलही Happy

मस्त! Happy मतकर्‍यांचं हे स्टँड-अपार्ट विषयावरचं स्टँड-अपार्ट काम बघण्याची उत्सुकता आहे.

रत्नाकर मतकरी लिखित-दिग्दर्शित 'ईंवेस्टमेन्ट' बघून आलो. चित्रपट शुक्रवारी प्रदर्शीत होतोय पण आज कोरम - आयनॉक्सला विशेष खेळ होता.

बघायलाच हवा. उत्सुकता ताणली गेलीये आता. गणेश मतकरींचा लेख सगळ्यात नंतर आला ते बरं झालं, त्यांनी म्हटल्याप्रमाणे चित्रपट पहाण्यासाठी एक दृष्टिकोन मिळतोय या लेखातून.
सेनापती, कसा वाटला चित्रपट?

मस्तच लेख.
खरं सांगायचं तर मी रत्नाकर मतकरींपेक्षा गणेश मतकरींचं लिखाण जास्त वाचलं आहे. Happy
त्यांचे नाते हा लेख वाचेपर्यंत मलाही ठाऊक नव्हते. गणेश मतकरींचा ब्लॉगही (आपला सिनेमास्कोप) मी नियमीत वाचत असतो.

चित्रपट बघावासा वाटतो आहे. पण आमच्याकडे बघायला मिळेल की नाही, शंका आहे. Sad

चांगला लेख आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळूनही या प्रांतात आम्हांला मदत करण्यासाठी कोणी पुढे झालेलं नाही. >> हे वाचून जरा आश्चर्य वाटले. एकमेकातली स्पर्धा/व्यावसायिकता यामुळे असे होत असेल कदाचित.

@माधवी : हे वाचून जरा आश्चर्य वाटले >>> मला यात काहीही आश्चर्य वाटलेले नाही. हे अनेक सिनेमांबाबत घडले आहे. सो-कॉल्ड 'करमणुकी'त बसेल असे या सिनेमात काहीही नाही आणि गंभीर विषयांना दुर्दैवाने प्रेक्षकच फार मोजके येत असल्याने वितरक हात लावत नाहीत. अश्या वेळेला आपणच पुढाकार घेऊन जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगितले पाहिजे

असो. मी पाहिला आहे हा सिनेमा. हादरवून टाकणारा अनुभव आहे ... सकस पाहण्याची इच्छा असणाऱ्या कोणीही अजिबात चुकवू नये असा.
लवकरच त्यावरचे रसग्रहण टाकणारच मायबोली वर ...

छान लेख.

गणेश मतकरींचा ब्लॉग गेले काही वर्ष फॉलो करतेय. त्यांच्या बहुतेक सगझ्ळ्या पोस्ट वाचते. तरी मी ललिताच्या बोटीत. Uhoh