कसेतरीच वाटते कधीकधी

Submitted by बेफ़िकीर on 13 September, 2013 - 10:11

कसेतरीच वाटते कधीकधी

उदास वेळ गाठुनी सरी नभात दाटती
ऋतू प्रतारणा करत नवीन चूल थाटती
उरात दु:ख घेत चोरटी सुखे पहाटती

कसेतरीच वाटते कधीकधी

कुणीतरी हवे असेल तर कुणी न भेटते
कुणी नको असेल तर हरेक अंग खेटते
मनी विरक्त भाव पण तरी शरीर पेटते

कसेतरीच वाटते कधीकधी

उन्हास श्रावणाकडून रोजगार पाहिजे
स्मितास आसवांकडून हातभार पाहिजे
उषा नवीन आणण्या निशा तयार पाहिजे

कसेतरीच वाटते कधीकधी

==============================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उन्हास श्रावणाकडून रोजगार पाहिजे
स्मितास आसवांकडून हातभार पाहिजे

वाह वा !

अगदी अगदी !

आवडलीच

ऋतू प्रतारणा करत नवीन चूल थाटती
उरात दु:ख घेत चोरटी सुखे पहाटती..
खोल आतले ठसठसते कसेतरीच वाटणे बाहेर काढलेय कवितेतून.

कविता आवडली, विशेषकरून पहिले दोन बंध 'कसेतरीच वाटते कधीकधी' हा भाव प्रचंड सामर्थ्याने व्यक्त करतात असे वाटले.

ऋतू प्रतारणा करत नवीन चूल थाटती>>> अप्रतिम!