फरपट

Submitted by फूल on 10 September, 2013 - 03:21

नशीबाच्या शोधात दूर देशी आलो
अन इथवर येऊन परतीच्या वाटाही विसरून गेलो
हीच झाडं, हेच वारे, हेच ऋतू आपले
पसरलेले हिरवे माळ अन रस्तेही आपले
इथल्या मातीत पाय रोवून उभे राहू लागलो
पाळामूळांसकट आता इथेच गुंतू लागलो
तरीही येतो एक क्षण असाच अडवा तिडवा
हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा
फरपट्ल्यासारखा घेऊन जातो पुन्हा घरट्याकडे
रक्ताळलेले आपण खोल आत मनामध्ये
जखमा तशाच भरून निघतात पण व्रण मात्र तसेच
प्रत्येक व्रण एक दूत होतो आठवणींचा पूल होतो
आता पाय मातीत रोवूनही त्यात मूळं रुजत नाहीत
त्यांनाही कदाचित वाटत असावं ही माती आपली नाही
पायाखालची जमिन सरकतानाही रुजल्याचा आव आणतो
ही माती ही झाडं हे सारं आपलंच असं मनाला भासवतो
खोल आत कुठेतरी ती जखम ठुसठुसतच असते
तिची जाणीव चेहऱ्यावर कधीही आणायची नसते
पूर्वी झटकलेल्या आठवणींवरही आता पुटं चढू लागतात
आठवांचे आठव ही येईनासे होतात
पुन्हा तसाच एक क्षण फरपट नेतो
आपणही आता "सवयीने" फरपटत जातो
आता जखमा फार होत नाहीत
आणि झाल्या तरी सलत नाहीत
आता आपणही सरावलेले असतो
मनही सरावलेले असते
आणि पलिकडे आपल्या नसण्याला आता घरटेही सरावलेले असते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

-- हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा

छान उतरल्या आहेत तुझ्या भावना, फुला.
कुठल्याही मातीत आतून उमलून येऊन फुलणं जमतच काही फुलंना Happy

छान