गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक : सर्वांगसुंदर हातगड आणि खड्या चढाईचा अचला

Submitted by सह्याद्रीमित्र on 9 September, 2013 - 06:01

कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्याची नशा चढावी लागते असं म्हणतात. एकदा का त्या गोष्टीनं तुम्हाला झपाटून टाकलं की ती तडीस नेण्याची मजाच वेगळी असते.महाराष्ट्रातल्या तमाम गिर्यारोहकांवर असंच एक गारुड स्वार झालंय. त्याचं नाव आहे "सह्याद्री" !!! आज सह्याद्री प्रत्येक गिर्यारोहकाचा केवळ छंदच नाही तर आयुष्य बनला आहे. त्याच्या द-याखो-यातून रानोमाळ भटकण्याचं लागलेलं व्यसन हे जगातलं सगळ्यात "पॉझीटिव्ह" व्यसन असावं आणि ते सुटावं अशी अपेक्षाही नाही !!!

नाशिक जिल्हा !!! महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त डोंगरी किल्ले उराशी बाळगणारा प्रदेश म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या जिल्ह्याची बातच काही और आहे !! हातगड - अचला पासून ते साल्हेर - मुल्हेर पर्यंत आणि आड - पट्ट्यापासून ते गाळणा - कंकराळ्या पर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. या जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुद्धा तितक्याच वेधक. सेलबारी - डोलबारी असो किंवा त्र्यंबक - वाघेरा ची रांग…स्वत:च आपलं एक खास वैशिष्ट्य आहे. पण या सगळ्याची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे सातमाळा रांग !!! चौदा अभेद्य आणि 'एक से एक' गिरिदुर्गांची मालिका या रांगेला सह्याद्रीने बहाल केली आहे. यातला एक एक दुर्ग म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकाचं 'ड्रीम डेस्टिनेशन'!!! जानेवारी २०१३ मध्ये मार्कंडया,रवळ्या - जवळया,सप्तशृंगच्या रूपाने अस्मादिकांनी या रांगेच्या शुभारंभाचा नारळ फोडला होता. तेव्हापासूनच या रांगेतल्या प्रत्येक डोंगराने जणू काही झपाटून टाकलं. जून महिना उजाडला. पहिल्याच आठवडयात पावसाने पुण्यात थैमान घालायला सुरुवात केली. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी सत्कारणी लावायला सातमाळेसारखा ऑप्शन शोधूनही सापडला नसता. नाशिक जिल्ह्यात त्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण अगदी नगण्य होतं. अखेर फोन खणाणले…पर्याय निवडले… होकार मिळाले आणि मोहीम ठरली. दोन दिवसात सातमाळा रांगेतले बिनीचे किल्ले अर्थात हातगड,अचला,अहिवंत आणि रांगेच्या थोडासा शेवटच्या भागात वसलेला कण्हेरा उर्फ कण्हेरगड !! चार किल्ल्यांची परिपूर्ण डोंगरयात्रा !! या ट्रेकच्या मॅनेजमेंटची जबाबदारी अर्थातच माझ्यावर येउन पडलेली. त्यामुळे दोन दिवसांचा 'पिल्यान' बाकीच्या पंचमहाभूतांना समजावून सांगण्याकरता गुरुवारी जेव्हा आम्ही 'बेडेकर' वर जमलो तेव्हा उपस्थितांच्या चेहे-यावर इंजिनियरिंगच्या पोरांना भारताची राज्यघटना लिहायला सांगितल्यासारखे काहीतरी विचित्र भाव होते. अखेर आपल्याला दोन दिवसात एव्हरेस्ट सर करायचे नसून सह्याद्रीतले चार किल्लेच बघायचे आहेत हे त्यांना पटवून द्यायला मला अर्धा तास लागला. पुढच्या कहाणीला सुरुवात करण्याआधी मला या बाकीच्या टाळक्यांची ओळख करून द्यावी लागेल.

चिन्मय कानडे - चिन्या - आमच्यातलं त्यातल्या त्यात स्कॉलर कार्ट. सध्या रशियात डॉक्टर व्हायचा प्रयत्न करतोय (पण आम्ही सुचवलेल्या विषयावर स्पेशलायझेशन करण्याचा सल्ला मात्र त्याने साफ नाकारला आहे !!!).

निखिल फडके - पका - इंजिनियरिंगची एक सीट वाया घालवणारा विद्यार्थी. आम्ही याला 'पका' हे नाव का पाडलं याचा शोध आम्हालाही आजपर्यंत लागलेला नाही.'इंजिनियरिंग का करू नये' यावर याचं अनुभवात्मक व्याख्यान ठेवल्यास इंजिनियरिंगच्या एखाद्या नामवंत कॉलेजने स्थापनेपासून जेवढा नफा कमावला नसेल तेवढा नफा ह्या व्याख्यानाचे संयोजक काही तासात कमावतील !!

ओंकार गोखले - गोखले - इंजिनियरिंग पूर्ण झालं आहे. ह्याचा आमच्याबरोबरचा आणि आयुष्यातलाही चौथा पाचवा ट्रेक. त्यामुळे तसा नवीन गडी. अत्यंत शांत आणि गरीब स्वभावाचं गुणी बाळ. ट्रेकमधलं गि-हाईक. याच्या गरीब स्वभावाचा फायदा चिन्मयने कसा घेतला हे पुढे येइलंच.

ऋग्वेद गुपचूप - (कधीपासून) सी.ए. करतोय. पण ' बॅलन्स शिट मध्ये लॉस आल्यावर तो नक्की कुठे टाकावा ' याचं उत्तर याला शेवटपर्यंत सापडलं नाही. पकाच्या बिल्डींगमध्ये राहतो. पण याचं गडगडाटी हास्य ऐकून दुर्योधानानंही लज्जेनं मान खाली घातली असती यावर आमचं एकमत झालं आहे.

ऋतुराज सफई - ऋत्या - इंजिनियरिंग पूर्ण झालं आहे. ऑफिसमध्ये आणि ट्रेकमध्येही बॉसच्या तुडुंब शिव्या खाणारा गुणवंत कामगार. फिटनेस उत्तम.

आणि

अस्मादिक - स्वमुखे स्वस्तुती करू नये असं समर्थांनी लिहून ठेवलं आहे !!!

यातले मी, चिन्मय आणि पका एकाच शाळेतले,एकाच वर्गातले आणि एकाच बॅचचे विद्यार्थी. बाकीचे तीन आमच्याच शाळेतले पण आमच्यापेक्षा वयाने (आणि अनुभवानेही !!) लहान. याशिवाय अजून एक मेंबर आमच्यात ऐनवेळी वाढला होता. यशवंत चौधरी उर्फ काका. आमच्या गाडीचे ड्रायव्हर. एकदम मस्त माणूस आणि कुशल सारथी. संपूर्ण ट्रेकमध्ये वागण्याबोलण्यातून कुठेही ' डायवरी गुर्मी ' आम्हाला कधीही जाणवली नाही. ट्रेक वेळेत पूर्ण करण्यात काकांचाही सिंहाचा वाटा होता. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता आम्ही पुणं सोडलं तेव्हा पावसाची रिपरिप सुरूच होती. आपण शहरातून कधी एकदा बाहेर पडतोय याची घाई काकांपेक्षा चिन्मयलाच जास्त झाली होती. कारण चाकणला पोहोचताचक्षणी त्याने विचारलेल्या 'एकशे एकोणतीस वॅट + पस्तीस कोलंब = किती गिगाबाईट ' या 'पाच पेरू + तीन वडे = किती अंडी ' असल्या धर्तीवरच्या प्रश्नाने गोखलेला ए.सी. सुरु असतानाही दरदरून घाम फुटला !! हा प्रश्न म्हणजे गोखलेवर भविष्यात होणा-या मानसिक अत्याचारांचं चिन्मयानंदांनी केलेलं जाहीर सुतोवाच होतं. मग शाळेतल्या शिक्षकांच्या बोलण्याच्या विशिष्ट पद्धती,शाळेतले अविवाहित शिक्षक आणि शिक्षिका आणि त्यांची (ब-याचदा आपापसातही) फसलेली प्रेमप्रकरणं,जीव तोडून शिकवणारे शिक्षक विरुद्ध जीव घ्यायला टपलेले शिक्षक असल्या विषयांचा आमच्याकडे कसलाही तुटवडा नव्हता. हे चर्चासत्र चंदनापुरी घाटातल्या आमच्या आवडत्या ' लक्ष्मी ' ढाब्यावर गाडी जेवणासाठी थांबेपर्यंत सुरु राहिलं. लक्ष्मी ढाबा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. चोवीस तास सुरु असणारं हे हॉटेल दिवस आणि रात्रीचे आचारी वेगळे असूनही अप्रतिम चवीचं जेवण सदासर्वदा कसंकाय देऊ शकतं हे मला आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे. आपण ' नाशिक ' जिल्ह्याच्या ट्रेकला आलो आहोत हे विसरून उपस्थितांनी यथेच्छ हादडलं. जेवणानंतर तरी गाडीतला गोंधळ कमी होईल हा माझा अंदाज साफ खोटा ठरवत पोटात चार घास गेल्याने हा आवाज चारपटीने वाढला. नाशिक रोडला आम्ही पोचलो तेव्हा नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांवर अप्रतिम पुस्तक लिहिणारे माझे गिर्यारोहक मित्र आणि नाशिकच्या 'वैनतेय' गिर्यारोहण संस्थेचे पदाधिकारी श्री. संजय अमृतकर यांनी (रात्री बारा वाजलेले असूनही) त्यांच्या घरी येण्याचा केलेला प्रेमळ आग्रह मात्र माझ्याकडून मोडवला गेला नाही. पुढचा मार्ग नीट समजावून घेवून आम्ही नाशिक रोड सोडलं. गाडी आता दिंडोरीमार्गे सापुतारा रस्त्याला लागली होती. आजचा पहिला किल्ला होता हातगड !!

सापुतारा हे गुजरातमधलं सुप्रसिद्ध हिल स्टेशन. गुजरात आणि नाशिककडच्या पर्यटकांचं महाबळेश्वर !! याच सापुता-याच्या अलीकडे पाच किलोमीटर्स वर महाराष्ट्र - गुजरातच्या सीमेवरचा हातगड हा छोटासा किल्ला वसला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला हातगड याच नावाचं गाव आहे . हातगड गावाच्या मारुती मंदिराबाहेर साडेपाच वाजता चहाची तयारी करायला म्हणून आम्ही चुलीसाठी काटक्या जमवू लागलो. चहाचं सामान घरून आणण्याची जबाबदारी गोखलेवर सोपवण्यात आली होती. पण त्याने आणलेल्या पातेल्याचा आकार बघून यात प्रत्येकाला वैयक्तिकरित्या स्वत:चा चहा बनवून घ्यावा लागेल याविषयी कोणाचंही दुमत नव्हतं. कारण गोखले आपण घरात चहासाठी वापरतो तसलं पातेलं घेऊन आला होता !!! ट्रेकच्या पहिल्याच सकाळी चिन्मयच्या टीकात्मक शिव्या खाण्याचा बहुमान गोखलेनं कोणीही न सांगता पटकावला होता. शेवटी सापुतारा रोडवरच्या एका चहावाल्याचा आश्रय घेणं आम्हाला भाग पडलं. पण त्या महापुरुषाने सात जणांचा चहा बनवण्यासाठी जेवढा वेळ घेतला त्या वेळात चिन्मयच्या हस्ते एखादी बायपास सर्जरी सहज पार पडली असती. त्याने गवती चहाच्या नावाखाली दिलेलं रसायन बघून आपण मॅगीच्या मसाल्याचं पाणी चहा समजून प्यायलं असतं तर किती बरं झालं असतं हा विचार प्रत्येकाच्या मनाला त्या परिस्थितीतही शिवून गेला !!! या सगळ्यामध्ये एकच गोष्ट आनंद देणारी होती आणि ती म्हणजे हातगड किल्ल्याच्या नव्वद टक्के भागापर्यंत गाडीचा लाल मातीचा रस्ता गेला आहे. सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरु असून पुढच्या वर्षी किल्ल्याच्या पाय-यांपर्यंत डांबरी रस्ता होणार असल्याची माहिती चहावाल्याने पुरवली. वणीच्या बाजूने आपण सापुतारा कडे यायला लागलो की मध्ये बोरगाव हे तसं मोठं असलेलं गाव लागतं. बोरगाव पासून सापुता-याकडे जातानाच हातगडचा चौकोनी आकार नजरेत भरतो. सापुतारा चार - पाच किलोमीटर्सवर राहिलेलं असताना उजवीकडे कळवण,सटाणा,अभोणा या गावांकडे जाणारा रस्ता व त्याची दिशादर्शक कमान दिसते. या कमानीतून आत गेल्यावर हातगड गाव आहे. पण हातगड किल्ल्यावर जायला हातगड गावात जाण्याचं काहीच कारण नाही. या कमानीतून न वळता आपण सापुता-याच्या दिशेने जाऊ लागलो की उजवीकडे 'आनंदो रिसोर्ट' नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या लगेचच पुढे उजवीकडे गेलेला लाल मातीचा रस्ता किल्ल्यावर गेला आहे. सध्या मिनीबस सहज जाऊ शकेल इतक्या रुंदीचा हा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता थेट किल्ल्याच्या पाय-या जिथे सुरु होतात तिथपर्यंत गेला आहे.

सर्व फोटोज © ओंकार ओक

हातगडकडे जाताना दिसणारा अचला किल्ला (उजवीकडे) आणि तौला शिखर (डावीकडे)

हातगड गावातून हातगड किल्ला

हातगड किल्ल्यावर गेलेला गाडीचा रस्ता.

गाडीरस्ता जिथे संपतो तिथून लगेचच पुढे किल्ल्याच्या पाय-या सुरु होतात. या पाय-यांकडे जाताना उजवीकडे थोडसं वरच्या बाजूला कातळाच्या पोटात पाण्याचं भलंमोठं टाकं आहे.

हातगडाचे पहिले व दुसरे प्रवेशद्वार

पहिल्या दरवाजावरील शरभशिल्प

पहिल्या दरवाजा जवळील मराठी शिलालेख

हातगडाचे तिसरे प्रवेशद्वार

हातगडाचा चौथा दरवाजा

चौथ्या दरवाजातून आपण हातगडाच्या माथ्यावर प्रवेश केल्या केल्या गडाचा एकूणच विस्तार आपल्या लक्षात येतो. गडमाथ्यावर पोहोचल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा गेलेल्या आहेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर गडाची एकसलग तटबंदी असून तिच्यात एक छोटीशी कमानही आहे. या बाजूला एका पीराचे स्थान असून त्याच्या मागेच गडाच्या तटबंदीवर बांधलेल्या सुरेख चर्या आहेत. पाण्याची काही टाकीही आपल्याला या बाजूला बघायला मिळतात.

हातगडावरील एकसलग तटबंदी

तटबंदीच्या भागातील बांधकामांचे अवशेष

गडाच्या तटबंदीवरील चर्या

हातगडाचा संपूर्ण गाभा हा त्याच्या बालेकिल्ल्याच्या परिसरात सामावला आहे. बालेकिल्ल्याच्या परिसरात अवशेषांची अक्षरश: रेलचेल असून त्यात दोन कोठारं,पाण्याची टाकी,एक अतिशय सुंदर असा तलाव,शिवलिंग व नंदी, एक सुटा बुरुज,राजवाड्याचे व इतर बांधकामांचे भग्नावशेष आणि इतर ब-याच गोष्टी आहेत. हातगड किल्ल्यावरच्या सगळ्याच वास्तूंचे फोटो इथे देता येणं शक्य नाही कारण किल्ल्यावर इतक्या वास्तू आहेत की संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायला कमीत कमी एक ते दीड तास लागतो. हातगडवरच्या काही वास्तू डोळ्याचं पारणं फेडणा-या आहेत !! आकाराने लहान असला तरी हातगड एकाच भेटीत बरंच काही देऊन जातो. वणी - सापुतारा सारख्या प्रमुख वाहतुकीच्या मार्गावर वसलेला हा किल्ला जवळपास वरपर्यंत गाडी जात असल्याने सहकुटुंबही अगदी सहज भेट देण्यासारखा आहे !!!

हातगड किल्ल्यावरील तलाव

हातगड किल्ल्यावरील कोठार व त्याच्या शेजारी असलेली छोटेखानी कमान

हातगड किल्ल्यावरील उध्वस्त वास्तूंचे अवशेष

किल्ल्यावरील आणखी एक कोठार

हातगड किल्ल्याची माची

किल्ल्यावरील बांधकामाचे अवशेष आणि पाण्याचे टाके

किल्ल्यावरील सुटा बुरुज

बालेकिल्ल्यावरील उध्वस्त बांधकामे

हातगड गावाचा कोवळ्या उन्हातील सुंदर नजारा

हातगड बघून साडेनऊच्या सुमारास आम्ही पिंपरी अचलाच्या फाट्याजवळ पोहोचलो तेव्हा डावीकडे दिसणा-या अचला आणि तौलाच्या अजस्त्र आकाराने आम्हाला धडकीच भरली. दिवसाची सुरुवातच हातगड सारख्या सुखवस्तू किल्ल्याने झालेली. त्यात अचला सारखा सातमाळा रांगेतल्या ' दादा ' किल्ल्यांपैकी एक किल्ला चढायची आपली शारीरिक आणि मानसिक तयारी झाली आहे की नाही हा विचार करण्यातच आमचा बराच वेळ गेला !! पिंपरी अचलाच्या फाट्यावर साईराज नावाचं ट्रेकर्सना चहा नाष्ट्या साठी उत्तम असं हॉटेल आहे. हॉटेलचे मालकही पिंपरी अचला गावचेच निघाले. "ह्यो किल्ला ??? दिवस खातो. दिसतो तेवढा सोपा नाही. लय वंगाळ चढावं लागतं. " ह्या त्यांच्या अनुभवात्मक वाक्यांनी म्हणा किंवा हॉटेलच्या शेडमधून दिसणा-या आणि आभाळात घुसलेल्या अचला आणि तौलाच्या प्रचंड आकारामुळे म्हणा, आम्हाला मिसळीचे दोन घास नकळतपणे कमीच गेले !! नाशिकहून वणी मार्गे सापुता-याला जाताना बोरगावच्या अलीकडे उजवीकडे पिंपरी अचला गावाचा फाटा आहे. ह्या फाट्याहून आतमध्ये शिरलं की पिंपरी अचला उर्फ स्थानिक भाषेत 'पिंपरी आंचल' नावाचं गाव लागतं. गावातून सरळ जाणारा रस्ता हा अहिवंतवाडी मार्गे वणी - नांदुरी - कळवण रस्त्याला जाउन मिळाला आहे तर डावीकडचा रस्ता अचला पायथ्याच्या 'दगड पिंप्री' या गावात जाउन थांबला आहे. या फाट्यावर वळताना दिसणा-या आणि सुमारे सहा -सात फुट उंचीच्या वीरगळीही प्रेक्षणीय आहेत. दगड पिंप्रीच्या सुनील भुसारला मी गाडीतूनच फोन लावला. "दादा,मी वणीला आलोय. पण गावात माझं नाव सांगा. कोनी पन तुमाला गडावर घेऊन जाईल . " इति सुनील. दगड पिंप्री गावातलं अजून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे रवी डंबाळे. कोणत्याही गिर्यारोहकाला गडावर घेऊन जायचं म्हटलं तर गावातले लोक आधी रवीचंच नाव सुचवतात. पण आम्ही गावात पोहोचून चौकशी केली तेव्हा रवीसुद्धा कामानिमित्त बाहेर गेला होता. तसं अचला किल्ल्याची वाट दाखवायला स्थानिक माणसाची गरज नाही. पण अचानक दाटून आलेलं आभाळ आणि नवखा प्रदेश यामुळे आम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. वर वाटेत समजा पावसानं झोडपलं आणि त्यात जर गडावर धुकं आलं तर हाताशी असलेला वेळही फुकट जाण्याची शक्यता होती. शनिवार असल्याने गावातली बाकीची तरुण मंडळीही कामावर गेल्याने सध्या तुम्हाला गडावर घेऊन जायला कोणीही नाही असा निर्वाळा देऊन दगड पिंप्रीच्या ग्रामस्थांनी असमर्थता दर्शवली. नाईलाजाने आम्ही गडाचा रस्ता विचारून घेतला आणि गडाच्या दिशेची शेतं तुडवायला सुरुवात केली. गावापासून मोजून पाचशे फुट गेलो असू आणि तितक्यात मागून गावक-यांच्या हाका ऐकू यायला लागल्या, "दादा थांबा,रवी आलाय बाहेरून. तो येतोय तुमच्या बरोबर." व्वा !!! याला म्हणतात नशीब. रवी आणि त्याचा गुलाब चौधरी नावाचा एक मित्र असे दोघं आमच्या टोळक्यात सामील झाले. आम्ही आता अचलाच्या खिंडीची वाट धरली.

दगड पिंप्रीच्या वाटेवरून तौला आणि अचला

दगड पिंप्रीच्या मारुती मंदिरा बाहेरील कीर्तीसुरमुख शिल्प

अचला किल्ला

दगड पिंप्रीमधून अचला कडे पाहिलं की त्याच्या उजवीकडे एक खिंड दिसते आणि त्या खिंडीत एक झेंडा लावलेला दिसतो. दगड पिंप्रीतून निघाल्यापासून अर्ध्यातासात आम्ही त्या खिंडीत पोहोचलो. या खिंडीत पत्र्याचं छप्पर असलेलं एक मंदिर असून मंदिराच्या मागून गेलेली वाट एक खिंड पार करून पलीकडच्या बिलवडी गावात उतरते आणि तिथून अहिवंतगडावर जाते. सध्या या वाटेवर रस्ता करण्याचं काम सुरु आहे. या मंदिरापासून वीसेक मिनिटांचा छोटा चढ चढला की आपण अचलाच्या वाटेवरच्या एका मोठ्या पठारावर येउन पोहोचतो. या पठारावर मारुतीची शेंदूर लावलेली एक मूर्ती असून इथून दिसणारा अचलाचा भव्य कातळकडा मात्र नजरेत भरतो. गडाची चाळीस टक्के चढाई संपल्याची खूण म्हणजे हे पठार. भर्राट वा-याचा झोत सुखावायला लागला. विश्रांतीची संधी साधून पका आणि मंडळी गोखलेची शाळा घायला सुरुवात करणार इतक्यात मी मुद्दयाला हात घातला.

"काय करतोस तू ??" मी रवीला विचारलं.

'बारावी पास झालोय. आता कॉलेजात जायचंय. " रवी.

"किती टक्के पडले बारावीत ???" आता जो प्रश्न मी मुद्दाम टाळण्याचा प्रयत्न करत होतो नेमका तोच प्रश्न ग्रुपातल्या कोणाच्या तरी तोंडून निघून माझ्या आणि रवीच्या कानावर येउन आदळला.

"सत्तर.डिस्टिंक्शन आहे !!!" बसमध्ये किंवा लोकलमध्ये नुकतीच ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलता बोलता सहज गणिताचा विषय निघावा आणि आपण केवळ त्याचं नॉलेज तपासून बघण्यासाठी कुत्सितपणे M2 M3 च्या लेव्हलचं गणित विचारल्यावर "मी ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी मधून गणितात गोल्ड मेडल मिळवलं आहे. " हे त्याचं उत्तर ऐकून आपली काय अवस्था होईल तसले काहीतरी भाव प्रश्नकर्त्याच्या चेहे-यावर उमटले !!!

"बराच वेळ राहिलाय का रे अजून ??" लज्जेखातर झालेल्या या विषयबदलातील अगतिकता बहुतेक रवीच्याही लक्षात आली. कारण पुस्तक समोर ठेवून जरी आपल्याला बारावीचे पेपर लिहायला लावले तरी इतके टक्के आपल्याला सात जन्मातही पडणार नाहीत हे त्या प्रश्न विचारणा-याच्या लक्षात आलं असावं !!!

"ह्ये काय इथंच. ह्ये टयेपाड चढलं की मंग आडवीच वाट आहे. " अचलाच्या कातळपोटाशी जाउन विसावणा-या एका खड्या चढणीकडे रवीनं बोट दाखवलं. त्या चढाचा अंश बघतचक्षणी हा चढ आपला घाम काढणार हे समस्तांच्या लक्षात आलं. रवी आणि गुलाबच्या मागून बारा पावलं आता निमूटपणे अचलाच्या धारेचा चढ चढू लागली. दहा - पंधरा मिनिटातच फुललेल्या श्वासांचे आवाज कानी पडू लागले. पाऊस नसला तरी हवेतल्या दमटपणाने चढ नकोसा केला होता. पाच - दहा पावलांनंतर दोन - तीन मिनिटांच्या विश्रांतीसाठीचे थांबे होऊ लागले. अचलाचा कातळमाथा आता अंगावर येऊ लागला. पूर्वेकडे त्रिकोणी आकाराचा भैरोबा डोंगर आणि त्याच्या मागच्या अहिवंतचा विस्तारही नजरेत भरला. वा-याचे झोत सुरु झाले. शेवटच्या टप्प्यात कातळाच्या पोटातल्या खोदीव पावट्या लागल्या आणि अखेर फार कुठेही वेळ न घालवता आम्ही अचला माथ्याकडे नेणा-या आडव्या वाटेच्या सुरुवातीलाच असलेल्या छोटया गुहेत विसावलो. पूर्वेला अहिवंत,त्याच्या मागे मार्कंडया,सप्तशृंग,रवळ्या - जवळयाचं सुरेख दर्शन झालं. पठारावरून निघाल्यापासून पंचवीस मिनिटात आम्ही तो चढ पार केला होता. ही त्या खड्या चढाची कृपा कारण त्याने आम्हाला मोठ्या विश्रांतीचा मौकाच दिला नव्हता !!

अचलाच्या पहिल्या खिंडीतलं मंदिर. याच्या मागून गेलेली वाट बिलवडी मार्गे अहिवंतवर गेली आहे.

भैरोबा डोंगर आणि मागे अहिवंतगड. भैरोबा डोंगराच्या पायथ्याला कच्चा गाडी रस्ता दिसतोय.

अचलाच्या पहिल्या पठारावरचं मारुतीचं शिल्प आणि मागे अचला किल्ला

अचला किल्ल्याचा अंगावर येणारा खडा चढ

अचलाच्या कातळकड्याच्या पोटातून माथ्याकडे नेणारी आडवी वाट. वाटेवर पुढे रवी आणि मागे गुलाब.

कातळकड्याच्या पोटातून गेलेली आडवी वाट काही वेळाने पुन्हा चढाचं रूप धारण करते आणि शेवटी गडमाथ्यावर जाउन विसावते. या वाटेवर गडाच्या काही पाय-या सुरु होतात. गडमाथ्याकडे जाताना वाटेत पाण्याची काही कोरडी टाकी आहेत. पण मुख्य माथ्याच्या थोडसं खाली पाण्याच्या जोडटाक्यांचा समूह असून शेजारीच एका झाडाखाली काही मूर्त्या ठेवल्या आहेत. अचलाच्या माथ्यावरची टाकी बारमाही नसावीत कारण आम्ही जूनच्या पहिल्या आठवडयात जाऊनही गडाच्या एकाही टाक्यात पाणी मिळालं नाही. याचा अर्थ मागचा उन्हाळा आणि हिवाळ्यातही गडावर पाण्याची वानवा असावी. त्यामुळे गडावर फक्त पावसाळ्यात पाणी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. या पाण्याच्या टाक्यांपासून गडमाथा फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर आहे. शेवटची खडी चढण पार झाली आणि अखेर दगड पिंप्रीहून निघाल्यापासून दोन तासात आम्ही गडमाथा गाठण्यात यशस्वी झालो होतो. आनंदवनभुवनी !!! गडमाथ्यावर सध्या काहीही अवशेष नाहीत पण वरून पश्चिमेकडे दिसणा-या तौला शिखराचा देखावा मात्र केवळ अविस्मरणीय आहे. भर्राट वा-यात विसावलेल्या आम्हा सुखी जीवांना सह्याद्रीने पण त्याची अनेक रुपं अचला माथ्यावरून उलगडून दाखवली !! साडेअकरा वाजत आले होते. आधीच्या प्लॅनप्रमाणे आज हातगड आणि अचला बघून अहिवंतच्या पायथ्याच्या दरेगावात मुक्कामी जायचं होतं. पण अपेक्षेपेक्षा हातगड आणि अचला वेळेच्या आत बघून झाले होते. पूर्ण दिवस हातात होता. त्यामुळे आजच कण्हेरा करून उद्या अहिवंत बरोबर आणखी एखादा किल्ला जोडता येईल असा प्रस्ताव मी बाकीच्यांसमोर मांडला. सातमाळेतला आणखी एक किल्ला विनासायास बोनस मिळतोय म्हणल्यावर त्याला नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. लागलीच आम्ही अचला उतरायला सुरुवात केली. ढगांचा गडगडाट सुरु झाला. पण आता त्याची फिकीर नव्हती. सातमाळा रांगेतला आणखी एक बहारदार किल्ला आज खात्यात जमा झाला होता !!!

अचला माथ्याकडे नेणा-या खोदीव पाय-या

अचला माथ्याकडे जाताना लागणारं पाण्याचं कोरडं टाकं

अचलावरील टाकीसमूह

किल्ल्याचा सर्वोच्च माथा

अचला माथ्यावरून होणारं तौला शिखराचं लाजवाब दर्शन...!!

किल्ले अचला… एक दिलखुलास अनुभव !!!

आम्ही दगड पिंप्रीमध्ये परतलो. रवी आणि गुलाबला त्याची बक्षिसी दिली आणि गावात कपडेवाटपाचा कार्यक्रमही पार पाडला. सह्याद्रीच्या द-याखो-यांमध्ये राहणा-या या भूमिपुत्रांच्या प्रती असलेली एक कृतज्ञता म्हणून आम्ही जवळपास प्रत्येक ट्रेकमध्ये कपडे किंवा खाऊवाटप करत असतो. त्यांच्या चेहे-यावरून ओसंडून वाहणारा निरागस आनंद हीच तर आपण त्यांच्याप्रती ठेवलेल्या जाणीवेची खरी पावती असते !!!

अचलाचा अभेद्य कातळकडा आणि तौलाचं अस्मानी शिखर आता कृष्णमेघांनी झाकोळून गेलं होतं. पिंपरी अचलातून कोल्हेर गावामार्गे वणी - नांदुरी - कळवण रस्त्याकडे जाताना वाटेवरच्या अहिवंतचा प्रचंड आकार मात्र नजरेत सामावत नव्हता. ढगांच्या मुलायम पुंजक्यांमध्ये त्याचा हिरवागार कातळकडा न्हाउन निघाला. भान हरपून सहा नजरा अहिवंतवर खिळून राहिल्या होत्या. गाडी आता कण्हेराच्या दिशेने धावू लागली होती.

क्रमश:

गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग दोन : कण्हेरगडाचा "चकवा" आणि सप्तश्रुंगची अविस्मरणीय भेट !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओंकार,
वर्णन तपशीलवार अन् रंजक पद्धतीनं मांडलंय.. मस्तंच!!!
सातमाळा रांग कधी जमतीये, याची वाट बघतोय...

सह्याद्रीच्या द-याखो-यांमध्ये राहणा-या या भूमिपुत्रांच्या प्रती असलेली एक कृतज्ञता म्हणून आम्ही जवळपास प्रत्येक ट्रेकमध्ये कपडे किंवा खाऊवाटप करत असतो. त्यांच्या चेहे-यावरून ओसंडून वाहणारा निरागस आनंद हीच तर आपण त्यांच्याप्रती ठेवलेल्या जाणीवेची खरी पावती असते !!! >>>>> खूपच स्तुत्य उपक्रम.

सुंदर वर्णन आणि सुरेख प्रचि ....

खूपच सुंदर वर्णन .............आणि फोटो सुद्धा ..
सुरवातीला मित्रांची करून दिलेली ओळख फारच आवडली. Happy