"पर्व"

Submitted by मुरारी on 7 September, 2013 - 07:35

भैरप्पांचा "पर्व"चा , (उमा कुलकर्णी यांनी केलेला) अनुवाद हातात आला , तेंव्हा महाभारतावरील अजून एक कादंबरी इतकेच त्याचे स्वरूप मनात होते.काहीतरी हटके असणार याची कल्पना आलेली होती. वाचायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच भैरप्पानी पेललेल्या शिव धनुष्याची जाणीव झाली. आयुष्यातली जवळ जवळ १२ वर्ष एका कादंबरीसाठी खर्ची घालणे म्हणजे खरंच ग्रेट गोष्ट आहे.महाभारत घडलेल्या जागांचा शोध काढून तिथल्या निसर्गाचा,लोकांचा,संस्कृतीचा अभ्यास करून, मूळ महाभारतातल्या चमत्कारांचा, दंतकथांचा,शापांचा,वरदानांचा सुसंगत असा वैज्ञानिक, हल्लीच्या मानवी तर्कदृष्टीला पटेल असा निष्कर्ष काढून तो कादंबरीत आखणे.शिवाय त्यातली महाभारत आपल्या निवेदनातून उलगडणारी हटके पात्रनिवड.

पर्व वर परीक्षण असे लिहायला घेतले तर कदाचित मूळ कादंबरी सारखाच एक जाडजूड ग्रंथ व्हायचा. इतके दिवस महाभारताबद्दल जे ग्ल्यामर इतक्या साहित्यिकांनी आपल्याभोवती निर्माण केले होतं, त्याचा चक्काचूर करण्याच काम "पर्व" व्यवस्थित पार पाडत, तेही वाचताना कुठेही "छे हे काही पटले नाही बुवा" असे वाटत नाही. अख्या पर्व कादंबरीत लेखक कुणा एकाची बाजू घेत नाही, कोणाला हिरो किंवा कुणाला खलनायक ठरवत नाही. जे घडलं असाव ते तो फक्त आपल्या समोर तर्कसंगत पणे मांडण्याचा प्रयत्न करतो, आणि माझ्या मते हेच या कादंबरीचे यश आहे.

कुंतीला पंचतत्वांपासून पांडव झाले.. अशी कथा असताना , भैरप्पा प्राचीन भारतातही नियोग पद्धत (सरोगसी) अस्तित्वात होती हे ठामपणे मांडतात.
कृष्णाने कालिया मर्दन केले असे न म्हणता , पूर्वी नाग नावाच्या लोकांची टोळी होती. त्यांना संपवले
किंवा द्रौपदीला मिळवण्यासाठी पांडवान्मध्येच सुरु झालेली भांडणं, आणि भांडण मिटव्ण्यासाठी कुंतीनेच द्रौपदीला तुला समाधान द्यायला ५ ५ पुरुष असताना चिंता कसली असा दिलेला सल्ला !!
एक ना अनेक , कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर भैरप्पा आपल्या मनावर महाभारताविषयीच्या चढलेल्या चमत्काराचा बुरखा टराटरा फाडतात. आणि मग एकदम हि सगळी पात्र अगदी ( कृष्ण ,कर्णासकट)मानवी पातळीवर वावरायला लागतात. हि सगळी आपल्यासारखीच अनेक विकारांनी बनलेली असतात. त्यांच्यातही लैंगिक वासना, कट -कारस्थान , सत्तेसाठी काहीही करण्याची वृत्ती असते. कौरव वाईट किंवा पांडव सगुणाचे पुतळे हा भेद उरतच नाही. उरते ती फक्त सत्ता मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी गाठलेली मानवी स्वभावाची नीचतम हद्द आणि कदाचित व्यासांना अभिप्रेत असलेल हेच ते "महाभारत". एक अप्रतिम महानाट्य. मानवी स्वभावाचे प्रत्येक पैलू .. किंवा माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याची मांडणी केलेलं एक प्राचीन काव्य .
शेवटा कडच्या युद्धात तर मानवपातळी वरून हि पात्र पशुपातळीवर येतात. युद्ध संपेपर्यंत प्रचंड मानव संहार होतो.कौरवांचा दारूण पराभव होतो.पण पांडवांना हि जिंकल्याचे समाधान नसतेच , युद्ध काळात झालेली अपरिमित हानी, निर्वंश झालेले पांडव आणि उजाड झालेला परिसर, रिता झालेला खजिना आणि दोन वेळच्या जेवणाची पडलेली भ्रांत हीच त्यांना मिळालेली युद्ध जिंकल्याची भेट. ५००० वर्षा पूर्वीचा सुडाने रंगलेला खेळ या काळातही जुना वाटत नाही . मानवी प्रवृत्तीत काडीचाही फरक पडलेला नाही हेच खरे

या कादंबरीवरही अनेक वाद विवाद झडले असतील , झडत राहतील.. पण भैरप्पानी दाखवलेली दिशा नक्कीच नाकारण्याजोगी नाही

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तकाची चांगली ओळख करून दिली आहे. महाभारत मुळात जसं होतं तसं 'जय' या स्वरूपात कदाचित आपल्याला अनोळखी वाटेल! मग इतर लोकांनी लावलेल्या अन्वयार्थाबद्दल चर्चा वादविवाद होतात यात नवल ते काय! महाभारतातील पात्रे मुळातच रामायणासारखी आदर्शवत नाहीत. त्यांच्यातील परंपरेने चालत आलेला जो काही देवत्वाचा अंश आहे तो भैरप्पांनी काढून टाकून ती हाडामांसाची माणसे होती हे दाखवले आहे. पुस्तक आवडू दे किंवा नाही पण एकदा वाचावे जरूर.

पर्व -- वाचल्यानन्तर खाड्कन डोळे उघड्तात अन आपण आतापर्यन्त काय बघत-वाचत- ऐकत आलो त्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न पडतो...!!!!!!!

खुप अभ्यास, चिन्तन असलेला लिखाण.. अन्तर्मुख करणार लिखाण...

खरचं.... महाभारतातल्या प्रतिकात्मक गोष्टी खर्‍या कशा घडल्या असतील याचा अंदाज होता, पण हे पुस्तक वाचल्यावर अगदी झिणझिण्या आल्या डोक्याला...

नक्की वाचेन. अस्से काही वाचायला खूप आवडते. बरे वाटते.

असेच काही रामायणाबद्दल वाचायची इच्छा आहे. काही आहे का?

पर्व -- वाचल्यानन्तर खाड्कन डोळे उघड्तात अन आपण आतापर्यन्त काय बघत-वाचत- ऐकत आलो त्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न पडतो...!!!!!!! >>>>> अगदी अगदी

आपण इतके दिवस या पात्रां कडे माणूस म्हणून बघत नव्हतो हे खूप जाणवत वाचल्यावर. अफाट आहे पुस्तक.