'इन्व्हेस्टमेंट'च्या निमितानं संवाद - श्री. तुषार दळवी

Submitted by मंजूडी on 4 September, 2013 - 12:08

'जिवलगा', 'मृगजळ', 'भेट', 'नॉट ओन्ली मिसेस राऊत', 'देवराई', 'कदाचित', 'रिटा' यांसारख्या चित्रपटातून, 'चाहूल', 'तनमन' यांसारख्या नाटकांमधून आणि असंख्य हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या प्रसन्न आणि प्रगल्भ अभिनयाचं दर्शन घडवणारे अभिनेते श्री. तुषार दळवी 'इन्व्हेस्टमेंट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

या निमित्तानं श्री. तुषार दळवी यांच्याशी साधलेला संवाद -

’इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन.

धन्यवाद.

’इन्व्हेस्टमेंट’ २० सप्टेंबरला प्रदर्शित होतोय. बरीच उत्सुकता वाटत असेल ना?

उत्सुकता निश्चितच आहे, कारण एकतर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट अनेक चित्रपट महोत्सवांमध्येही दाखवला गेलाय. मी सर्वच महोत्सवांमध्ये जाऊ शकलो नाही, पण जिथेजिथे गेलो, तिथल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम होता. आता चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याबद्दल उत्सुकता आहे. कारण हा चित्रपट केवळ महोत्सवातल्या चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी नाही. कुठलाही सुजाण प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहे. सर्वच स्तरातल्या प्रेक्षकांना आवडावा, असा हा चित्रपट आहे. मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतं. त्यांना चित्रपटातलं काय आवडलं, काय आवडलं नाही, हे जाणून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

चित्रपटातल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल का?

माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे आशीष घोरपडे आणि तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्यूटिव्ह आहे. आशीष, त्याची बायको प्राची आणि मुलगा असं कुटुंब आहे. त्यालाही त्याच्या व्यावसायिक जीवनात खूप पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी त्याला तडजोडी कराव्या लागणार आहेत. त्याला हे पुरतं माहीत आहे, आणि तो तडजोडी करतोही आहे. पण या तडजोडी करताना त्याची सदसद्विवेकबुद्धी कुठेतरी जागी आहे. त्याचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते म्हणा किंवा आई त्याची शिक्षिका होती, म्हणून असेल कदाचित. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे तडजोडी किती आणि कुठपर्यंत करायच्या, हे त्याला माहीत आहे. पण तरीही त्याची मनस्थिती द्विधा आहे, कारण आता तेवढं फक्त पुरेसं नाही. आपल्या कुटुंबासाठी काही गोष्टी करताना तो अस्वस्थ होतो. तो आतल्या आत कुढतो, कारण त्याच्या मनातलं द्वंद्व तो आतच दाबून ठेवतो. थोडी कॊंप्लेक्स अशी ही व्यक्तिरेखा आहे.

ही भूमिका नकारात्मक आहे, असं तुम्हांला वाटतं का?

अजिबातच नाही. ही भूमिका नकारात्मक मुळीच नाही. आशीष पूर्णपणे कुठल्याही गोष्टीच्या आहारी गेलेला नाही. किंबहुना त्याची सदस्द्विवेकबुद्धी जागी असल्यामुळे तो या विचारानं अस्वस्थ असतो, की आता नक्की आपण कुठे चाललो आहोत? याचा शेवट नेमका कुठे होणार आहे? मला असं वाटतं की, समाजात बहुसंख्य लोक असे असतात की जे तडजोडी कराव्या लागतात म्हणून करतात. मुद्दाम ठरवून तडजोडी करणारे फार कमी असतात. तुम्ही समाजाचे, व्यवस्थेचे भाग असता, त्यात तग धरून राहायचं असेल, तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्हांला तडजोडी करायला भाग पाडलं जातं. तुमच्या महत्त्वाकांक्षाही असतात, तुम्हांला पैसेही भरपूर हवे असतात. या चक्रातून मग बाहेर पडणं कठीण असतं. असे अडकलेलेच लोक हल्ली अवतीभवती जास्त असतात. सदसद्विवेकबुद्धी जागी आहे, पण तिचा वापर करू की नको करू, या विचारानं त्रस्त असे हे लोक आहेत.
अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात, वावरताना आढळतात.

आपल्याकडे गेल्या काही वर्षांत गोष्टी इतक्या प्रचंड वेगानं बदलल्या झाल्या आहेत की, त्यांच्याशी जुळवून घ्यायला अजून बराच अवधी जावा लागणार आहे. प्रत्येकजण कुठेतरी धावतोय, कुठे जाणार आहोत, कुठे पोचायचंय हे बर्‍याच अंशी धूसर आहे, त्यात स्पष्टता नाहीये अजिबात. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हरवतं आहे, मानसिक समस्या वाढत आहेत. कुठेतरी एक गोंधळलेली अवस्था आहे, असं मला वाटतं. त्यामुळे असे लोक आजूबाजूला दिसतातच. तसंच स्वतःत पाहिलं तरी दिसतातच.

invtu1.jpg

या भूमिकेसाठी तुम्हांला काय तयारी करावी लागली?

कथा पटकथा मतकर्‍यांचीच असल्यामुळे पहिल्यापासून चित्रपटात नक्की काय होणार आहे, याबाबतीत स्पष्टता होती. मतकर्‍यांच्या लिखाणाबद्द्ल मी काय बोलणार? ते किती उत्तम लिहितात हे मी सांगायची गरज नाही. चित्रपटाची कथा कमालीची बांधीव होती. चित्रपटाबाबतच्या त्यांच्या कल्पना पक्क्या होत्या. त्यामुळे पटकथा वाचल्यावर मलाही क्लॅरिटी होती . शिवाय ज्या काही शंका होत्या त्याबद्दल आधी भेटून चर्चा केली होती. सेटवर जाताना कुठलीही संदिग्धता नव्हती, आणि हे कलाकारासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.

दुसरी गोष्ट अशी की, मतकर्‍यांबरोबर मी आधीही काम केलेलं आहे, आणि आमची केमिस्ट्री उत्तम जमते. त्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टीवर बोलू शकतो किंवा वादही घालू शकतो. तेही खिलाडूवृत्तीनं गोष्टी मान्य करतात किंवा कलाकाराचा दृष्टिकोन काय आहे हे बघतात, त्यामुळे शूटिंगच्या वेळी आम्हांला अनेक बाबतींत स्वातंत्र्य होतं. प्रत्यक्ष शूट सुरु असतानाही काही नवीन गोष्टी सुचतात, त्यावेळी दिग्दर्शकाचा आधार महत्त्वाचा असतो. मतकर्‍यांचा 'करुन बघूया' असा दृष्टिकोन असल्यानं काम करताना खूप मजा आली.

दिग्दर्शक म्हणून रत्नाकर मतकर्‍यांचा हा पहिलाच चित्रपट, तर तो अनुभव कसा होता?

आधी एक स्पष्ट करायला हवं, की रत्नाकर मतकर्‍यांचा हा पहिला चित्रपट असला तरी त्यांनी अनेक नाटकं आणि मालिका यांचं दिग्दर्शन केलं आहे. तर, मी आधीही नव्या दिग्दर्शकांबरोबर पूर्वी काम केलेलं आहे. बरेचदा त्यांच्याही डोक्यात थोडा संभ्रम असतो. पण इथे कथा-पटकथा-संवाद हे सगळं मतकर्‍यांचच असल्यामुळे त्यांना गोष्टी स्पष्ट होत्या. आणि टीमवर्कवर त्यांचा विश्वास असल्यानं सगळं युनिट कुटुंबासारखं होतं. त्यांचा मुलगा गणेश त्यांना साहाय्य करत होता, सुप्रियाही होती. मला असं वाटतं की पडद्यावर गोष्टी जमून येण्यासाठी या पडद्यामागच्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या असतात.

invtu2.jpg

सुलभाताई, सुप्रिया विनोद यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?

सुप्रियाबरोबर मी यापूर्वी ’तनमन’ हे नाटक केलं आहे. आम्ही एकत्र एकांकिकाही केल्या आहेत. सुप्रियाबरोबर माझी चांगली मैत्री आहे, तिच्याबरोबर काम करताना अर्थातच नेहमी मजा येते. आम्ही चांगले मित्र असल्यानं कामात खूप मोकळेपणा असतो. तिच्याबद्दल मला ही एक खात्री असते, की एखादी गोष्ट मी तिला सांगितली किंवा तिनं मला सांगितली, तर ती योग्य पद्धतीनं स्वीकारली जाईल. जे काही शुद्ध असेल ते एकमेकांना सांगायचं, त्यात दुसरा काही हेतू नसतो, तेवढी ती पारदर्श्क आहे आणि तेवढीच ती खरी आहे. आमच्यात गैरसमजांना अजिबात वाव नाही आणि म्हणूनच तिच्याबरोबर काम करायला मजा येते.

सुलभाताईंबरोबरही मी पूर्वी काम केलंय. त्याही आविष्कारच्या आणि मीही प्रायोगिक नाटकांमधून आलेला असल्यानं आमची अनेक वर्षांची ओळख आहे. एकत्र कामं खूप केली आहेत असं नाही, पण ओळख प्रदीर्घ कालावधीची असल्यानं आमच्यात रॅपो मात्र चांगला आहे. त्यांची थोरवी ही आहे की, त्या इतक्या मोठ्या आहेत वयानं, अनुभवानं, कर्तृत्वानं, पण त्या स्वतःचं मोठेपण कधी जाणवू देत नाहीत. त्यांच्यात एक खोडकर मुलगी आहे आणि त्यांनी अजूनपर्यंत ती जपून ठेवलीये. आम्ही सेटवर टाईमपास करत असतो आणि त्या जरी जास्त काही बोलल्या नाहीत तरी त्या डोळ्यांनी मध्येच अशी एखादी हालचाल करतात, मधेच एखादा शब्द कानात पुटपुटतात, की लक्षात येतं की त्याही आपल्यात सामील आहेत. तर यामुळे त्यांचं दडपण कधीच त्या जाणवू देत नाहीत. त्यांच्याबरोबर काम करताना अगदी मजा येते.

२००० साली 'चाहूल' नावाचं तुमचं नाटक आलं होतं. ते नाटक ही नांदी आणि हा चित्रपट ही पुढची पायरी, असं म्हणता येईल का?

अगदी तसंच नाही म्हणता येणार. त्यावेळी चंगळवादाची सुरुवात होत होती, आज जितक्या ठळकपणे या गोष्टी दिसतात किंवा आपण त्यांच्या आहारी गेलो आहोत हे जाणवतंय, तसं तेव्हा नव्हतं. मतकर्‍यांनी चित्रपटात चंगळवादाला तात्कालिक रुप दिलं असलं तरीही त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. 'चाहूल'मध्ये प्रशांत दळवींनी ते वेगळ्या प्रकारे हाताळलं होतं. ’इन्व्हेस्टमेंट’मध्ये आम्हांला एक मुलगा आहे आणि आजकाल पालक त्याकडे पुढच्या आयुष्याची तरतूद म्हणून कशाप्रकारे पाहतात, हे प्रभावीपणे आलं आहे. पण एक नक्की म्हणता येईल की, मतकर्‍यांनी आणि दळवींनीही समाजाचा आरसा म्हणून या कलाकृती सादर केल्या आहेत. त्यांना जे सांगायचं आहे, ते त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. कुठेही शर्करावगुंठन केलेलं नाही. या दोन्ही कलाकृती त्या त्या काळाच्या मानानं आक्रमक आहेत आणि या दोन्हींत ’तुम्ही’ प्रतिनिधी आहात, असं म्हणायला हरकत नाही.

हा चित्रपट एका भीषण वास्तवाकडे बोट दाखवतो, तर हे प्रत्यक्षात येईल, अशी भीती वाटते का?

हे काही आपण सांगू शकत नाही, म्हणजे भविष्य काही आपण वर्तवू शकत नाही. एक मात्र नक्की आहे की, असं होऊ शकतं आणि आपल्याला याचं भान राखणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता ज्या प्रकारे गोष्टी चालल्या आहेत, ते बघून असं वाटतं की, अरे, आम्ही जे दाखवलं त्याहीपेक्षा काही भीषण होऊ शकतं की काय..मला असं वाटतं की असं होऊ नये. आमच्या चित्रपटाचा उद्देश हाच आहे की, जरी एक कथा म्हणून, चित्रपट म्हणून आम्ही हे दाखवलं असलं, तरी आज अगदी प्रत्येक ठिकाणी हे असं होतं, असं आमचं अजिबातच म्हणणं नाही. पण असं घडू शकतं, घडतं आहे, म्हणून थोडा विचार करणं, थोडं भान राखणं, स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला मरू न देणं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे वास्तव प्रत्यक्षात येऊ नये, असा उद्देश आहे चित्रपटाचा खरंतर.

invtu3.jpg

तुम्ही मघाशी म्हणालात तसं कथा-पटकथा आणि दिग्दर्शन रत्नाकर मतकर्‍यांचं असल्यानं चित्रपट कसा असणार आहे, याची पूर्ण कल्पना तुम्हांला होती. हा झाला चित्रपटाचा भाग, पण हल्लीच्या मालिकांमध्ये असं होतं का? चित्रपटामध्ये काम करणं आणि मालिकांमध्ये काम करणं यांत फरक जाणवतो का? तुम्हांला नाटक, चित्रपट, मालिका यांपैकी कुठलं माध्यम जास्त आवडतं?

अर्थातच नाटक आणि चित्रपट ही दोन माध्यमं… मालिकांचं झालंय असं की रोज त्या दिसत असल्यानं ते एपिसोड रोजच्या रोज शूट करणं, ते चॅनलकडे पोहोचवणं, सगळ्यांच्या तारखा सांभाळणं, त्यात ते बजेटचे निर्बंध, चित्रीकरणाची वेगवेगळी स्थळं, इतक्या सगळ्या गोष्टी असतात की ती व्यवधानं सांभाळून चित्रीकरण करावं लागतं. त्याचबरोबर कथा कशाप्रकारे पुढे जाईल हे सुरुवातीला ठरवता येत नाही. लोकांचा प्रतिसाद बघूनही अनेक गोष्टी ठरवल्या जातात. कमी भागांची मालिका असेल, अगोदरच ठरलेले भाग असतील तर गोष्ट वेगळी. पण अनेकदा तसं होत नाही. शेवटाबद्दल संदिग्धता असते, कलाकार बदलतात. कथानक वेगळंच वळण घेतं. शिवाय बजेट सांभाळत चित्रीकरण करावं लागतं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारं आहे हे.

चित्रपटामध्ये मालिकेपेक्षा नक्कीच एक वेगळेपणा आहे. चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यानं प्रकाशयोजनेला वेळ लागू शकतो. तयारीसाठी खूप वेळ लागत असल्यानं कलाकारांना सेटवर वेळ मिळतो. त्यामुळे मालिकेच्या तुलनेत ते काम जरा जास्त रीलॅक्सिंग असतं. त्यामुळे तुम्हांला कामाकडे लक्ष द्यायला एकतर वेळ मिळू शकतो. आणि शिवाय संदिग्धता नसते, कथा माहीत असते, आणि शक्यतो त्या कथेमध्ये फार मोठे बदल होत नाहीत चित्रीकरण करताना.

छोट्या पडद्यावर कुठली भूमिका तुम्हांला सर्वांत जास्त आवडते, सूत्रसंचालक म्हणून की अभिनेता म्हणून?

असं सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण मला दोन्ही गोष्टी आवडतात. पण अभिनेता म्हणून काम करत असताना मी एखादी व्यक्तिरेखा साकारत असतो आणि सूत्रसंचालक म्हणून काम करत असताना तुषार दळवी या व्यक्तिमत्त्वाचे काही गुण त्यामध्ये आपोआप येतात. सूत्रसंचालन करताना सहभागी लोकांबरोबर बोलता येतं. त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्याशी बोलून बर्‍याच गोष्टी नव्यानं कळतात. त्यामुळे दोन्हीमध्ये डावंउजवं करणं जरा कठीण आहे.

तुमचे भविष्यात काय प्रोजेक्ट्स आहेत?

'स्टार प्रवाह' या वाहिनीवर सप्टेंबरपासून दर रविवारी दोन तासांची एक कथा प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत “आमच्या बाबांच्या लग्नाला यायचं हं...' या नावाच्या एका कथेत माझी प्रमुख भूमिका आहे. याखेरीज ’आवाज कुणाचा?’ हा चित्रपटदेखील याच वर्षी प्रदर्शित होइल. एका नाटकासंदर्भात विचार सुरू आहे. या वर्षी नाटकाचा शुभारंभ नक्की होईल.

***

टंकलेखनसाहाय्य - अश्विनी के, नंदिनी

invposter1.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली झाली आहे मुलाखत. Happy
फक्त काही ठिकाणी
>>>रत्नाकर मतकर्‍यांचा>>> ह्या ऐवजी 'रत्नाकर मतकरी ह्यांचा' किंवा 'रत्नाकर मतकरींचा' असं असायला हवं असं वाटतंय.

मुलाखत छान झाली आहे Happy सुप्रिया मतकरींचे काम बरेच दिवसांनी बघायला मिळणार.

ह्या ऐवजी 'रत्नाकर मतकरी ह्यांचा' किंवा 'रत्नाकर मतकरींचा' असं असायला हवं असं वाटतंय.>> +१..वाचताना जरा विचित्र वाटत आहे.

छान आहे मुलाखत Happy

> >>रत्नाकर मतकर्‍यांचा>>> ह्या ऐवजी 'रत्नाकर मतकरी ह्यांचा' किंवा 'रत्नाकर मतकरींचा'
आणि मतकर्‍यांचा हेच बरोबर.
संदर्भ - मा. चिनूक्स