पत्रकथा: नाते तुझे नि माझे (संपूर्ण)

Submitted by बागेश्री on 2 September, 2013 - 08:27

मित्रहो,
अनेक दिवसांनतर पुन्हा एकदा माझ्या लाडक्या फॉर्म मधील कथा सुरू करतेय...पत्रकथा.

"नाते तुझे नि माझे"

-बागेश्री
_________________________

पत्र क. 1

मानसी....!!!
चूक, बरोबर, योग्य, अयोग्य... ह्या सार्यांच्या पल्याड जाऊन हे पत्र...

हा आचरटपणा आहे?
असेल.
पण बाळबोधपणा नक्कीच नाही.

आज तू दिसलीस, इथे, माझ्या अपार्टमेंटमधे... नाहीच राहू शकत आहे मी तुझ्याशी संवाद न साधता.
काय वाटलं?
सगळ स्तब्ध झालं...
तू तूच आहेस का, ही खात्री करून घेण्यातच मिनीटं सरून गेली... मी तुझा पाठलाग केला नाही, पण मागोमाग येत गेलो, ती मिनीटं कमावली, जमवली, तू तूच आहेस का जाणून घेण्यासाठी...

तुझे खांद्यापर्यंतचे केस... घट्ट लपेटून घेतलेली साडी... ह्यातलं काहीही 'तू' असल्याची साक्ष नाही, पण ही तूच आहे, असा आतून ठाम आवाज.....

तुझ्या घराच्या गेट्जवळ येताच तू मैत्रिणीचा घेतलेला निरोप... वॉचमनशी तुझे निरोप देणे घेणे... तोच किनरा आवाज... आणि मला वाटणार्या शक्यतेचं खात्रीत झालेलं रुपांतर!

वयानुरूप जरा कृश दिसते आहेस.. पण तू "आहेस"
ते ही, माझ्याच अपार्टमेंट मध्ये... योगायोगावर अपरिमित विश्वास ठेवण्यास भाग पाडते आहेस

मला खरंच व्यक्त होता येत नाही आहे- ते काम तू उत्तम करशील...
मधले वर्ष जरासे सारून, हा संवाद पुढे नेशील?
अपेक्षा नाही ही, निव्वळ इच्छा!

तुझा,
अनुराग..

त्.टी: वॉचमनला विचारलं, तुझा लेटर बॉक्स नं. १२, तिथेच टाकतो आहे हे पत्र.
माझा २९
बाय द वे, टेक्सासमध्ये स्वागत आहे....

----------------------------------------------------------------

पत्र क्र. 2

प्रिय!

अजूनही तुझ्यातलं अवखळ बाळ आहे तसंच शाबूत पाहून फार छान वाटलंय...
संवादासाठी मी नेहमीच तयार असते.

बाकी टेक्सास फार छान आहे.. इथल्या वातावरणाशी मी इतकी पटकन समरस होईन, नव्हतंच वाटलं! मात्र खास आहे सगळंच...

-मानसी
-------------------------------------------

पत्र क्र. 3

बाळ?

तुझ्यातल्या काही गोष्टी कायम 'न बदलण्यासाठीच' आहेत का?
कायम?
वयाच्या ४७व्या वर्षी तू मला बाळच म्हणावंस?

आणि ह्या इतक्या मोठ्या योगायोगाचं "आपण ह्या इथे परराष्ट्रात भेटतोय, तेही तब्बल १५/१६ वर्षांनंतर" तरीही तुला आश्चर्य, आनंद, चमत्कारिक वगैरे पैकी काहीही वाटू नये?

मला अशक्य आहे आजही हे पचवणं, समजणं...
तुझ्यातली निर्लेपता जीवघेणी आहे मानसी.... असं वागत राहिलीस तर आयुष्यातला एक एक माणूस गळून पडेल.. एकटी राहशील... एकटीच राहून जाशील.

तू इथे कशी काय पण?
मी श्रवण बरोबर शिफ्ट झालो आहे.
हे त्याच्या शिक्षणाचं शेवटचं वर्ष, आता इकडेच राहू म्हणतोय..
त्यानं तुला पाहिलं का?
पाहिलं तरी तो तुला ओळखेल का?
तू त्याला पाहिलंस? कळवळलीस?
काय वाटलं, त्याला पाहून?
तू कृश का झाली आहेस अशी?

-अनुराग

त.टी.- दोन वर्षांपूर्वी मेघना गेली, एका अपघातात, तेव्हापासून श्रवण मागे लागला होता, 'बाबा, इकडे टेक्सासला येऊन रहा म्हणून' मग आलो, तसं एकटं रहाणं जमलंही नसतं!

------------------
पत्र क्र. 4

उफ्फ मेघना!
गोड मुलगी होती फार... श्रवणही हेलावला असेल... तुला मन घट्ट केलं पाहिजे आता ओनू...

मला धक्का बसणं किंवा आश्चर्य का वाटावं?
"ह्या जगात केव्हाही काहीही होऊ शकतं, Life is strange and a roller coaster ride" हे मला माहितीय्, रादर हाच माझ्या जगण्याचा गाभा आहे...
याउलट,
अनेक वर्षांनी संवाद घडला, हा क्षण अनुभवते आहे, जगून घेते आहे...

श्रवणला अजून तरी पाहिले नाही, कळवळणार नाही.

-----------------------------------------------------
पत्र क्र. ५

मानसी...

"मला 'तू' कधी कळली आहेस का?"
हा प्रश्न मला खूप सतावत असायचा, हळू हळू प्रश्नाची तीव्रता लोपली, मी संसारात- मेघनात, श्रवणच्या संगोपनात मश्गूल झालो. मग परिस्थिती बदलली... श्रवण इकडे आला... तिकडे भारतात आम्ही दोघंच राहिलो आणि नंतर मी एकटाच उरलो.
आणि आता अनेक-अनेक वर्षांनंतर, निव्वळ एका हाकेच्या अंतरावर तू राहते आहेस म्हटल्यावर... सगळ्या आठवणी ताज्या झाल्यात..तो लोपलेला प्रश्नही नवजीवन मिळाल्यासारखा फुलारून आलाय!

तुला समजून घेता आलं असतं तर? तर आज आयुष्य फार वेगळं असतं, खरंच फार फार वेगळं असतं.
एक मान्य करू? 'ते फार समृद्ध असतं'...!

तू म्हणतेस ते खरं आहे, आय एम अ किड... नाहीतर तुला 'तेव्हा' गमावलं असतं का?
लहान बाळाच्या पुढ्यात खेळणी असली की, ते नाही का एखादं हातात घेतं, तितक्यात जास्त रंगीन, आकर्षक खेळणं दिसलं की पहिलं तिथेच टाकून दुसर्‍याकडे झेपावतं! तसाच मी.. खरंय तुझं..!

तू कणखरपणे काही गोष्टी का नाहीस ऐकवल्या, कधीच? तुझा हक्क असूनही?
मी आज "असं केलं असतं तर..." वगैरेच्या गप्पा मारतो आहे, जेव्हा की आता काहीही करणं शक्य नाहीच... तुला नाही का ह्यातलं काही वाटत "जर- तर" पैकी?
तुझ्या तक्रारी का नसतात, जगण्याकडून, व्यक्तींकडून....

तू एक अख्खं बायबल आहेस.. तुला समजून घ्यायला एक जन्म नाही पुरणार!
त्यात माझ्यासारख्या बाळाची समज ती किती?

हे पत्र वाचून मला माझ्या भूतकाळाचा पश्चाताप होतो आहे वगैरे काही समजू नकोस.. मी सुखाचं आयुष्यच घालवलं.
पण बरेचदा असं नाही का होत, आपण विचार करतो, ह्या ऐवजी तो मार्गच धरून ठेवला असता तर, सगळं "अजून चांगलं" असतं का?

समाधानाचा अट्टहास, दुसरे काय!

-ओनू

त्.टी- माझं नाव इतक्या गोड पद्धतीनं कधी मेघना घेऊ शकलीच नाही, ती कधीतरी अनुराग ऐवजी 'अनू' म्हणायची, मग मी वैतागायचो- मी मुलगी आहे का? वगैरे...
But trust me, 'Onu' sounds lot better....

-----------------------------------------------------------

पत्र क्र ६

ओनू, ओनू,
My Boy, you are a kid, Baby...

१६ वर्षांपूर्वी पडलेले प्रश्न! तेच, अजूनही तेच? कमाल... कमाल...!
तुला माहिती आहे,
तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं मला तेव्हा देता आली नव्हती, मी चुकत नाहीये, हे मला माहिती होतं, पण समर्थन करता येत नव्हतं.
बहुधा तेव्हा माझे शब्द तितकेसे समंजस नव्हते, वागणं सरळ होतं, परंतू शब्दांत "कारणं" देता येत नव्हती. आता क्ल्यारिटीच क्ल्यारिटी आहे ओनू... वागण्यात आणि शब्दांतही... पण; समर्थने कुठवर द्यावीत, ती देऊन नाती टिकतात का? आणि जर समर्थने देऊन नाती टिकणार असतील, तर मुळतः ती द्यावीच का लागतात? आधी ह्याचं उत्तर दे!...... मला नाही, स्वतःला.

तुला झपाटलेपण अनुभवता आलंय का रे?
वागून गेलो त्याचा यत्किंचितही पश्चाताप न करता?
निव्वळ झपाटलेपण?
मला वाटतं, ते झपाटले काही क्षण म्हणजेच जगणं, बाकी त्या क्षणांच्या आजूबाजूचे क्षण म्हणजे जगण्यातला निव्वळ सोपस्कार!

तुला जगताना,
खाली अंथरायला भूतकाळाची चटई हवी असते, अंगावर ओढायला भविष्यकाळाची दुलई... आणि समाधानाची झोप..
याउलट मला हा असलेला 'वर्तमान' टक्क डोळ्यांनी जगायचा असतो, पुढच्याच क्षणाला मृत्यू येता असेल तर तो अंगभर ओढून घ्यायचा असतो.... मला कुठलाही क्षण दवडायचा नसतो, तो जगायचा असतो, आहे तसा, आणि आत्ता! बास आत्ता तो जगायचाच असतो...

मग हिशेब कसले, जुळवाजूळव कसली?
समोरचाही कदाचित त्याच्या पद्धतीने, त्याला हवं तसं जगतो आहे असे समजून, मी त्या वागण्याचे समर्थन मागत नाही..
मला, ती गरजच भासत नाही!

ओनू,
मरण्याआधी जगून घे!
मिथ्या प्रश्नांच्या बाहेर पडून...

उद्या सकाळी साडे-अकराच्या सुमारास येतोस?
कॉफी पिऊया...
तोच अरोमा... तोच कॉफीचा गरमपणा अनुभवत "वर्तमानाच्या" गप्पा मारूयात...

निखील साधारण, ९:०० वाजता निघतो, त्याचं ऑफिस जवळच आहे, तो गेला की माझी सकाळची कामं ११ पर्यंत संपतात...
बघ, जमल्यास ये, नाहीतर पत्रोत्तर पाठव,
सवडीनेच!

-मानसी

------------------

पत्र क्र. ७.

मानसी...

I am so sorry!!
मी आज पाहतोय तुझं हे पत्र! Alas...

गेले तीन-चार दिवस मी घराच्याही बाहेर पडलो नाहीये, लेटर बॉक्स उघडलाच नाही, फार विचित्र मनोअवस्थेत गेले आहेत हे काही दिवस.

तुमचा मुलगा पिऊन मित्राच्या घरी टॉयलेट मध्ये पडलेला आहे आणि बापाने त्याला उचलून घरी आणावा...

तू म्हणशील, आजकालच्या काळात, तेही टेक्सास वगैरे मध्ये फार काही वावगं नाही हे.

मग मनोवस्था वगैरे खराब होण्यासारखं काय त्यात...

पण झालं. खूप हर्ट झालं.

तुला आठवतं, एकही व्यसन नव्हतं मला, आजही नाही आहे, आयुष्य सुखातच गेलंय त्याहीशिवाय.

माझ्या मुलाला त्याच्या आयुष्यातलं सारं काही 'बेस्ट' तेच देऊ केलं, पण पडलो, कमी पडलो. तो अर्शवट शुद्धीत असताना जे बरळत होता, त्यावरून कळतंय कमी पडलो.

तुला कदाचित माझा भूतकाळ तितका माहिती नसावा, तुला हे माहिती आहे, माझे वडील अति पिण्याने गेले. पण त्या मागचा इतिहास नसेल माहिती तुला, कारण कधी शेअर करण्याची संधीच नाही मिळाली, तू ही कधी खोदून विचारलं नाहीस. आज सांगतो-

बिझनेस मध्ये झालेलं नुकसान, पार्टनर्स ने केलेला दगा-फटका नाही पचवता आला त्यांना, इतका शिकला सवरलेला माणूस पण मनाच्या कमकूवतपणा मूळे व्यसनाधीन झाला.... मी नुकताच मिसरूडं फुटणार्यातला, घरातली प्रत्येक गोष्ट टिपकागदासार्खी टिपणारा, आईची अवस्था पहावत नसायची, इतकी इभ्रत समाजात होती आणि आता ती दारूड्या नवर्याची बायको उरली होती...

विचित्र असतं हे सगळं, जगणं अचानकच "स्ट्रेंज" होतं. काल्-परवा पर्यंत आपले वडील आपले हिरो असतात आणि नंतर घरातलं नको असलेलं लोढणं?
गटाराच्या जवळून, कचराकुंडी जवळून, रेल्वे प्लॅट्फॉर्मवरून, बसस्टँडच्या आवारातून कुठूनही बापाला उचलून आणायचा....

रस्त्यावर कुणी पालथा पिऊन पडलेला असेल की त्याला उताणा करून हाच आपला बाप का, हे पहायचं!!

रोज एक अनुराग घराच्या एका कोपर्यात रडत उभा असायचा, आईची टिपं पहात

परवा श्रवणला उचलून आणताना, मला एक भावी अनुराग दिसला.... माझ्या घरात कोपर्यात उभा असलेला... विषण्ण, उदास, भावनाहीन.

असो.

फार रडगाणं झालं.
मला माफ कर, तू अगदी कॉफी प्यायला बोलावलं होतंस... आणि ह्या सगळ्यामुळे मी नाही येऊ शकलो...

फार वाट पाहिलीस?

-अनुराग

त.टी: आता तू म्हणशील हाकेच्या अंतरावर बसूनही, हा पत्रव्यवहार का?
खूप चुका घडून गेल्यात भूतकाळात, तुझ्याशी संवाद न साधल्याने...
तुला असं भेटवून देवाने सुसंधी देऊ केलीये... असं मोकळं होता येतंय... तुझ्या डोळ्यातल्या प्रखर प्रगल्भतेपुढे/ खरेपणापुढे असा मोकळा होईन की नाही, हे आजही नाहीच सांगू शकणार.
------------------

पत्र क्र. ८

अनुराग!

आपल्या वागण्याचा मुलांवर संस्कार घडत जातो, हे खूप खरं असलं, तरी आपली मुलं आणि आपण, हे दोन भिन्न जीव असतो, हे ही तितकंच खरं!

आपल्या संस्काराखाली ती जितकी घडत जातात, त्यापे़क्षा कैक अधिक जग बघायला लागल्यावर ती शिकतात.
त्यांची दु:खं आपल्यापेक्षा वेगळी होतात, त्यांचं स्वतःचं असं एक आयुष्य असतं, आपण त्यातला निव्वळ एक भाग असतो, आपण सर्वव्यापी होऊ पाहिलं की नात्यात तणावच येतो.

आपल्याला मात्र आपल्या अपत्याचं भलं बुरं स्वतःलाच ठरवायचं असतं, त्यांच्यावर आपली मतं लादताना त्यांच्या निर्णयक्षमतेवर बोट ठेवतो आपण.

श्रवण मोठा झाला आहे, त्याच्या दु:खाने की अत्य्योच्च सुखाने त्याला झिंगवलं आहे ते बघ एकदा..
मुलं आपल्याला हवी तशी घडली नाही की, राग-संताप-उद्वेग ह्याच भावना आपल्याला गिळून टाकतात, एक त्रयस्थ बनून एकदा त्यांना भेट द्यायला हवी, आपण भावनांची गुंतवणूक कुठे करतो? त्यांना अपेक्षा चिकटवतो, त्याचा गुंता करतो.

तू कॉफीसाठी आला नाहीस त्या दिवशीची गंमत ऐक,
फारा दिवसांनी मी शुभ्र पंजाबी घातला होता, थोडासा आय मेक अप, हलकी गुलाबी लिपस्टीक, केसात एक पीन असं ग्रुमिंगही केलं...
खरं सांगते, फार ताजं तवानं वाटलं...

ह्या काही वर्षांत, शरीर म्हणजे जगण्याचं केवळ माध्यम असं वाटत असताना, त्या माध्यमाला सजवताना मजा आली.
मी भारतात असताना, नोकरी करत होते तेव्हा दर दिवाळीला आमची ऑफीस बस सजवली जायची, त्यात बसून प्रवास करताना आत बसलेल्या मला फार मौज वाटायची, सणासुदीचं वातावरण पाहून प्रसन्न प्रसन्न व्ह्यायचं मन... असच वाटलं... मी तयार झाले तेव्हा! माझ्या आतलं चैतन्य बाहेरच्या रंगरंगोटीनं आनंदलं.

त्या दिवसानं मला काय दिलं?
आनंद दिला, कुणाची वाट पाहताना- चाहूल शोधण्यातली हुरहूर जाणवून दिली... जिवंतपणाची बरीच चिन्ह सापडली.

खूप प्रयासानं, जाणून बुजून मी अनेक जाणिवांवर माझं वर्चस्व निर्माण केलंय, तो होल्ड जरा ढिला करण्यातली मजा अनुभवली..

घरी आल्यावर निखीलही म्हणाला,
"ओह मानसी, यू आर लुकींग सो ब्यूटीफूल, दॅट आय कान्ट रेसीस्ट ऑफरिंग यू डिनर आऊट.. लेट्स गो"

ओह ओनू...
व्हॉट अ‍ॅन इव्ह दॅट वॉज.

मी, निखील आणि त्याची गर्लफ्रेंड- जेसिका
आम्ही तिघे गेलो होतो...Kemah Boardwalk इथे!

वॉव...
आकाशपाळणे, मोठ्या राईड्स.. खूप काही
झगमग...
लव्हबर्डस ची रेलचेल...
फार वेगळी मजा आहे.. खूप ओपन रिलेशन्शीप्स, इंटिमेट कपल्स पाहिले...
त्यांचं तारुण्य फुलपाखरासारखं आहे, तितकंच नाजूक, रंगबिरंगी

लहानपणीच्या रंगीत जत्रा आठवल्या, अर्थात त्याची ह्याच्याशी थेट तुलना नाहीच.... पण मी मात्र काही वेळापूरती फार लहान झाले.. ह्या यंगस्टर्स मधे मिसळून गेले... तिथेच काहीबाही खात खात मजा केली..

जेसिका!
फार गोड मुलगी आहे ही. एकदम सॉर्टेड.
फार घुसत नाही कुणाच्याच भावविश्वात, जे आहे- असे आहे, बास.
निखीलबद्दल प्रोटेक्टीव्ह आहे, पण पझेसीव्ह नाही.
त्यां दोघांचं नातं कधी पहा... निखळ मैत्रीच जास्त आहे, प्रेमापेक्षा.
वचने नाहीत, आणा भाका नाहीत, पण कायम एकमेकांना सोबत असतात, अपेक्षा नावाचा खुळचट प्रकार नसल्याने जबरदस्त अंडर्स्टेंडिंग आहे दोघांत.. मी त्यांना एकमेकांबद्दल तक्रार करताना पाहिलंच नाही आहे... इतकं सुंदर एकमेकांना "आहे तसं" स्वीकारलं आहे त्यांनी की मला पदोपदी आश्चर्य नि आनंद होतो असं सहज्-सुंदर नातं पाहताना..

मला म्हणते,
आय लाईक यू मानसी, यू आर अ नाईस फ्रेंड!
वॉव...
आपल्याकडे सासू सूनेत किती पोकळ मान-पान, अपेक्षांच ओझं...
प्रत्येकाकडे एक 'इंडिवि़ज्यूल" म्हणून पाहिलं की आयुष्य सुट्टं सुट्टं होतं...सुंदर होतं, हे पुन्हा पुन्हा पटत जातं!

मनाच गुंतणं झालं, की व्याप आलेच.

ते दोघे तिथून फिरायला गेले, लॉग वीकेंन्ड फन...!!
मी घरी आले..
कॉफी करून घेतली...
एक एक सीप पिता पिता संध्याकाळ रिचवली...

तुला एक सांगू, मला सिम्पथी आवडत नाही... मला एकटं कधी वाटलं नाही...मी जगले जगत गेले.. क्षण क्षण, त्यातला हर कण..
पण आठवणी ठेवल्या नाहीत, मला मी जगून गेल्याचा कुठलाच पुरावा नको आहे. तूझी माझी अचानक गाठ पडते, माझ्यासाठी हा प्रत्येक संवाद नवा आणि तितकाच कोरा करकरीत आहे... त्यावर भूतकाळाच्या रेघोट्या नाहीत.

-मानसी.

_______________________________

पत्र क्र. ९

खरं बोलली आहेस अगदी.

बाप लेकाच्या नात्याला, त्रयस्थ होऊन भेट द्यायलाच हवी आहे...
फक्त त्याच एका नात्याला नाही, तर प्रत्येक नात्यालाच एक अशी भेट द्यायला हवी आहे..
नात्यांनाच नाही, एकदा स्वतःलाच अशी भेट द्यायला हवी आहे.. भेट, द्यायलाच हवी आहे.

चूका घडतात, नाही का मानसी?
प्रत्येकाच्याच हातून.
त्या घडतानाची मानसिकता एकदा स्वतःतून वेगळं होऊन पहायला हवी... स्वतःतले दोषही लख्ख दिसतील मग...
हे असं त्रयस्थ होऊन जगणं, मला किंवा माझ्यासार्ख्यांना, ठरवून करावं लागतं.
तू ते सहज करतेस.

तूला अगदी आदर्शवादाकडे झुकलेलं जगणं हवं आहे... नव्हे,
तू ते तसंच जगते आहेस...
आधी तुझ्या अलिप्त भुमिकेची मला चीड येत असे... हळूहळू कळत गेलं, तो तुझा अंगभूत स्वभाव आहे
आणि आदर्शवाद तुझी वृत्ती.

पण-
पण मी सामान्य माणूस आहे मानसी....
मला विकार आहेत.
मला भावना कळतात.
मी अनेकवेळा भावनाविवश होतो.
माझा मुलगा पिऊन पडला असेल, तर मला त्रास होतो.. त्याला काय दु:ख आहे, ह्या विवंचनेने हेलावतो.
मी निर्वीकारपणे जे होतंय ते पाहू शकत नाही.
मला अपे़क्षा असतात, आहेत.
लोकांना माझ्याकडून असलेल्या अपे़क्षांचा मला आदर आहे, त्याची जबाबदारी मी टाळत नाही.
माझ्या मुलाच्या तोंडून, त्याच्या ह्या वडिलांकडून अपेक्षाभंग झालेला कळताच, माझे डोळे पाणावतात.
मी आठवणी जपतो. जगतो.
माझ्या जवळच्यांचे मृत्यू मी त्रयस्थ होऊन पाहू शकत नाही.
मला एक दु:खी भूतकाळ असला तरी, एक सुखाचा भविष्यकाळ असावा, असा अट्टहास आहे.
मुलाचं कुठे चुकत असल्यास, आजही त्याच्या निर्णयांमध्ये फेरफार करण्याची वेटोपॉवर वापरण्याची खुमखूमी आहे..
कारण..

मी सामान्य माणूस आहे.
मी अतिसामान्य आहे.

मला तू दिसतेस,
जुन्या आठवणी डोकं वर काढतात.
त्याचबरोबर तुला सोडण्याचा निर्णय आठवतो.
तो निर्णय तुला तुझ्या तोंडासमोर येऊन न सांगू शकल्याचा मूर्खपणा/ पळपूटेपणा/ षंढपणा आठवतो.
तुझ्यावर केलेला अन्याय आठवतो.
तू गप्पपणे तो सहन केल्याचं आठवतं.
तू निघून जाताना, हक्कानं दोन गोष्टीही न ऐकवल्याचं आठवतं.
तू गेली आहेस, हा क्षण चक्क सिलीब्रेट केल्याचं आठवतं
तू गेल्यानंतर तुझ्याच आठवणीत तळमळल्याचं आठवतं.

मानसी....
तुला मी श्रवणपासून तोडल्याचं आठवतं.

खूप ओझं मनावर घेऊन जगलो आहे मी.
तू काहीही न विचारता निघून गेलीस, स्पष्टीकरण न मागता, हक्कांची मागणी न करता.
अन्याय करणार्‍याविरुद्ध प्रतिकार नाही केलास... मला तेव्हा तुझं ते शांत वागणं म्हणजे माझ्या पदरात पाडून घेतलेलं यश वाटलं.
नंतर तुझ्या अबोल वागण्यानेच मला तुझ्यावर केलेल्या अन्यायाच ओझं जाणवून दिलं...

हे ओझं मनावर घेऊन इथवर आलो आहे...
ते उतरवायचं आहे.
भूतकाळात जाऊन मला गोष्टी सुधरता येणार नाहीत, पण ज्यांना मी त्रास दिला आहे, त्यांची क्षमा मागण्याची संधी मला दवडायची नाही आहे.

-अनुराग

त.टी.
ह्याला काय म्हणशील?
जूनं उकरून काढण्याची इच्छा नाही गं, पण चुकलो होतो, एक नातं तोडून दुसरं जोडताना, खूप कोडगा झालो होतो, स्वार्थी झालो होतो, इतका की, "तुला काय वाटत असेल" ह्याचा विचार करण्याची गरजही वाटली नव्हती.

तुझ्यावर अन्याय करताना, मी जगण्यातल्या "त्या" क्षणाशी प्रामाणिक होतो का?

आज वाटतं तुझ्याजागी मी असतो, तर असा संवाद सुरू करू शकलो असतो का?
---------------------------------------------------------

पत्र क्र. १०

अनुराग!!

तू संवादाची मागणी केलीस, तेव्हाच आपला संवाद ह्या वळणावर येणार, ह्याची मला खात्री होती.
मी कॉफी प्यायला येण्याचं आमंत्रण तू शिताफीनं टाळलंस, तेव्हाच मला जाणावलं भूतकाळाच्या वेदना अजूनही आहेत तुझ्या मनात.

न्याय, अन्याय!!
कुणी करावा निवाडा?
नातं तुडवून एखादा निघून जातो.. मागे राहिल्यानं रडत बसावं का?

आपल्या दोघांतल्या घडून गेलेल्या गोष्टींवर, अनेक वर्षांनंतरही मी विचार करत बसत असे, तेव्हा मला माधव फार समजावून सांगायचा.....
तो कुठेतरी नजर गुंतवून खूप काही बोलत असायचा, त्याचं आयुष्याबद्दलच बोलकं तत्त्वज्ञान मला रिलेट करता येतं, प्रत्येक नात्यांशी, नात्यातल्या लोकांशी. कारण, कुठेतरी त्याची माझी विचारधारा घट्ट जुळायची.

तो कायम म्हणायचा..."मरण दिसायला लागलं ना मानसी, की आपण किती "फोल" जगलो ते जाणवायला लागतं.. फार प्रकर्षाने!
मग वाटतं, व्यक्तींच्या लहान सहान वागण्याकडे त्यांच्या रिअ‍ॅक्शन्स कडे लक्ष न देता, त्यावर चिक्कार विचार करत न बसता पुढे गेलो असतो तर?"

कदाचित मला हा फोलपणा आपलं 'नातं मरताना' कळला होता. म्हणूनच-
तू डिव्होर्स मागितलास. मी दिला.

तुला हवा होता. मला नको होता.
पण दिला, कारण...
तुला हवाच होता.

...आणि आता,
आता कळतंय तो मी तेव्हा दिला, म्हणूनही तुझ्या डोक्यावर ओझं आहेच!
ओझं... तो सहज मिळाल्याचं?

तो क्षण माझ्यासाठी जड होता, अवघड होता... पेलला.

मला पोटगी नको होती.
आनंदानं संसार केला होता.
त्या तुझ्यासोबत घालवलेल्या वर्षांना, आनंदाला व्यवहाराच्या पातळीवर आणून पैश्यांची घासाघीस करून नात्याचा भाव ठरवावा वाटलाच नाही.
माझ्या गाठीला माझं शिक्षण होतं, श्रवण झाला तेव्हाच नोकरी सोडली होती. ह्या डिव्होर्सने मी कफल्लक झाले होते त्यामुळे त्याला माझ्याबरोबर फरफटू द्यावं वाटलं नाही.

तुला माझ्याकडून अपेक्षित काय होतं..
मी रडावं
कळवळावं
याचना करावी
माझा तुझ्या घरावर, मुलावरचा हक्क सांगावा...
हे सगळं?

तू अगदी काडीमोड घेण्याचा निर्णय दिलास, तुझ्या मनात आपल्या नात्याची जागा ठरून गेली होती, तू आधीच पुढच्या प्रवासाला लागला होतास
अशा वेळी, मी त्रागा, आदळ आपट करण्यात कितीसं तथ्य होतं? तुला मोकळं व्ह्यायचं होतं, तुला मोकळं होऊ दिलं, तरीही तुझ्याच मनावर ओझं?

मी, एखाद्या मुलीने घालावा तो गोंधळ घातला नाही, 'हक्क हक्क' म्हणत आटापिटा केला नाही, म्हणून तुझ्या मनावर ओझं?

मंगळसूत्रात बांधली गेली तरंच नाती टिकतात?

मग माझं आणि माधवाचं काय म्हणू?

मी एक केलंय, मी जगलेय.
आला तो क्षण. आला तसा.
खूप दु:खही
खूप सुखही
मला तक्रार नाही
मला अपेक्षा नाहीत

आपण दुरावल्यावर मला एक ल़क्षात आलं-
नात्यातल्या प्रेमभावना कायमस्वरूपी नसतात, त्यांना त्या व्यक्तीच्या गरजा संपवतात नाहीतर काळ तरी त्या बोथट करतो.
मग बरेचदा शेवटी उरतो 'नातं टिकवण्याचा अट्टहास'. अनेक वर्ष एखादं नातं जपल्यावर शेवटी शेवटी का तोडावं, तोडणं आपला धर्म नाही, म्हणून जोडून ठेवण्याचा अट्टहास.
आपण त्या अट्टहासापर्यंत पोहोचलोच नव्हतो.
तुझी गरज संपली असावी.

मला लाख प्रश्न पडले होते, नाही कसे.
पण उत्तरं तुला मागायला हवी होती?
म्हणजे जाब विचारायला हवा होता... का काडीमोड असा?
तू कोण होतास तेव्हा?
तुझ्यातल्या चैतन्याने कधीच कुणा दुसर्‍याला जवळ केलं होतं.. तुझं मन माझ्यासोबत नव्हतंच. तुझा घरातला वावर म्हणजे तुझं शरीर होतं... त्या शरीराला जाब विचारायला हवा होता?

तो जाब मी विचारलाच नाही, म्हणून तुझ्यावरंच ओझं?

कशाला पुन्हा इतके वर्ष मागे जाऊया?
विझवलेल्या ज्योतींची काजळी नकोच काढायला... त्यांचं तेवणं मर्यादितच होतं!

तू गेली अनेक वर्षे मेघना बरोबर सुखाचा संसार केलास... श्रवण तुझ्या सोबत आहे...

मला माधवानं "जगणं" शिकवलं, माझ्यासोबत माझा निखील आहे... पुढे मागे जेसिकाही असेल...

आयुष्याने पुष्कळ दिलंय.
जे काढून घेतलं ते नगण्य होतं!

त्या नगण्य गोष्टींसाठी जे भरभरून मिळालंय, त्याकडे दूर्ल़क्ष नाही करता येणार...

चल..
खूप बोलत बसले.

आज आम्ही तिघे "ऑस्टिन" ला निघू
निखीलच्या मित्राच्या घरी उतरू तिथे, २-३ दिवस घालवून परतू....

निवांत बोलूया, मी आल्यावर....

-मानसी

--------------------------------------------------
पत्र क्र. ११

मानसी,
तू परतली असावीस असं समजून हे पत्र..

परदेशात येण्याची, इथलं सारं काही फिरून बघण्याची तुझी इच्छा निखील पूर्ण करतो आहे पाहून छान वाटतंय.
मला आठवतं तुला कायम ़काहीतरी वेगळं, काही नवीन करत राहण्याची इच्छा असते.... ते ़करत राहण्याची जिद्द कशी जपतेस ते कळत नाही...

मी देखील इथे बराच फिरलो..कधी श्रवण बरोबर, ़कधी एकटाच.. पण मला पदोपदी मेघना आठवते. व्याकूळ होतो मी कित्येकदा...
   आपल्याकडे ना मानसी पुरुषांनी असं व्यक्त व्हायचं नसतं. मोकळेपणानं स्वतःच हळवेपण कबूल करायच नसतं.. त्याला ़कमकूवत समजतात. पण ज्यांना मी आतून बाहेरून माहिती आहे त्यांच्यासमोर मी बुरखा घेऊन का वावरावं?

तुला वाटतं, तुझ्याशी डिव्होर्स घेण्याचा निर्णय सोपा होता? सहज होता? हौस होती?
त्यामागे अनेक अस्वस्थ रात्री होत्या, तगमग होती, माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक जीवाची काळजी होती.... आणि कुठेतरी मी ही होतो, मला हवं असलेलं सुख होतं, तुझी बोचरी अलिप्तता होती.

मानसी,
एकमेकांना कोप्मिटेबल नसणं, ते असण्यासाठी प्रयत्नशील नसणंच नात्याची हार आहे.
मन मारत, पर्याय नाही म्हणून निव्वळ सोबत राहणं, ह्या गोष्टीचा कडेलोट झाला, तेव्हा डिव्होर्स चा निर्णय झाला..

आतापर्यंच्या आयुष्यात मी घेऊ शकलेला तो सर्वाधिक कठिण आणि अत्यंत त्रासदायी निर्णय होता.
तुझ्याशी लग्न होण्याआधीचा काळ आयुष्यातला फार त्रासदायी आणि रु़क्ष गेला होता. चार चौघांसारख्या माझ्या, माझ्या संसाराकडून अपेक्षा होत्या. हसरा संसार असावा.  हक्काची, मायेची माणसं मिळावीत, प्रेमाची पखरण असावी... प्रत्यक्षात माझ्या अपेक्षांचं तुला वावडं होतं आणि तुझ्यातल्या अलिप्तपणाने मला कधी तुझ्यामाझ्यातलं एक ठराविक अंतर पार करू दिलंच नाही.

सुखाच्या प्राप्तीसाठी कठोर झालो.
एका क्षणी मोहाने विजय मिळवला,
मी डिव्होर्स मागितला, तू दिलास.

आज घट्स्फोटाच्या घटनेमुळे तू आयुष्याप्रती इतकी बेदरकार, इतकी अलिप्त झाली आहेस का.. असं म्हणावं तर, खरं पाहता तुझ्या त्याच स्वभावविशेषामुळे मला घटाफोट घ्यावा लागला होता.

मी परस्थिती बदलू शकतो, कोणाचा अंगभूत स्वभाव कसा बदलू किंवा 'बदलणार नाही' चा एखाद्याचा पवित्रा कसा बदलू?
मी म्हणालो ना तुला, मी सामान्य आहे, सुखी आयुष्याची अभिलाषा असणारा आहे, त्यामुळे असं वागून गेलो.

तुला तोडणं!
माझ्यापासून आपल्या पोरापासून सोपं नव्हतंच...
तू ते सहज स्विकारलंस, कारणही न विचारता.. तेव्हा वाटलं हे हिच्यासाठी इतकं सहज होतं? ती ही घुसमटत होती, म्हणून तयार झाली?
पण मनासारखं घडलं म्हणून पुढे निघालो..

आयुष्य खूप काही शिकवतं मानसी...
पुढे अनेक टक्केटोणपे झेलले, तुझ्यातले अनेक गुण मेघनात नव्हते..
नकळत तुलना व्हायचीच.. कुणीच परिपूर्ण नाही, समजलो.
सुखाच्या व्याख्या अव्याहत बदलतात, समजलो.
झपाटून निर्णय घेऊन, जवळचं काही तोडलं, की जन्माचा सल राहतो, समजलो.
जगणं म्हणजे 'मी आणि माझं' वलय नसतं, समजलो.

-अनुराग
त. टी. : श्रवणला भेटशील?

----------------------------

पत्र क्र. १२

अनुराग,

हेच जगणं आहे.
वेगळं होण्याची जशी तुझी कारणं आहेत, तशीच तू "वेगळं होऊया" म्हणताच वेगळं होण्याची माझीही आहेत.

पण किती पुढे आलो आहोत आता?
त्याच घडून गेलेल्या घटनांमध्ये किती अडकूया?

कुठल्यातरी एका क्षणी, तुझ्या माझ्यातलं काहीतरी संपलं... तेच काहीतरी, जे अनेक वर्ष तुला मला धरून होतं!

ती ओढ होती का, ते प्रेम होतं का, ती जबाबदारी होती का?
मला माधव सांगायचा.... "ती तडजोड होती. जी एका क्षणी करण्याची थांबवण्यात आली, .. कारण, तडजोड करण्याची गरज संपली होती"

किती खरं आहे हे. नात्यांवर भरवसा तरी का धरावा? आपलं कुठे चूकतं माहिती आहे? जेव्हा आपण आपल्या आनंदाची चावी इतरांच्या हाती देतो, त्याच्याशी इतकं संलग्न असतो की, आपलं सुख दुःख त्याने दिलेल्या प्रतिसादावर अवलंबतं!

हेच दुःखाचं कारण. आपण स्वतः परिपूर्ण असतो पण; आपल्याला आपल्या सुखाची जबाबदारी कुणीतरी घेतलेली हवी असते.

मी मेघनाला पहिल्यांदा भेटले तो दिवस... तिच्या डोळ्यांत मला तुझ्याबद्दलची किती काळजी दिसली, कधी तुम्ही एकमेकांना आपलंसं करून बसला होतात, कळलं आही, पण जी काळजी, जे प्रेम तुला कायम हवं होतं, ते अगदी तसं तिच्या डोळ्यांत होतं.

तडजोडीची तुझी गरज संपणं साहाजिक होतं.

आज तुला, मला डावलून दिल्याबद्दल वाईट वाटताना दिसतंय, पण हे असं वाटावं हे मला कधी वाटलं नाही. तुला हवं ते तू साधलंस, मी ते तुला सहज साधू दिलं, "इथे कधीही काहीही घडू शकतं" ह्यावरचा विश्वास बळावला.

आताही, तुला विश्वास बसेल, श्रवण नुकताच मला भेटून गेलाय?

खरं तर त्याने माझ्या घरी येण्याचं प्रयोजन काय? पण जुळून आलं... तो आता घराबाहेर पडला आणि मी तुला हे पत्र लिहायला घेतलंय. कदाचित हे पत्र तुला मिळण्याआधीच आमची भेट तुला श्रवण ने सांगितलेली असेल, आणि नसेल, तर तुझ्या त्याच्या नात्यात काहीतरी अजून हवंय.

इथे टेक्सास मध्ये गाडी चालवणाऱ्यांचे भलते नियम आहेत. प्रत्येकाने एक स्पीड पकडलेली असते... अनेकजण तर एका ठराविक गतीला पोहचून ती सेट करतात आणि निर्धास्त होतात. मग त्या लेन मधला कुणी एखादा घाईने थांबला की एकमेकांवर धडकल्याच समजा... किंवा "राईट ऑफ वे" जो Higher road ला आहे, त्याने आधी जायचं- ह्या नियमात गफलत झाली की धडका, मग त्वरेने येणारे पोलिस... ह्यात दोन्ही वाहनचालकांनी समजूतदारपणा दाखवला तर ठीक नाहीतर नवं प्रकरण.

अशाच गफलतीत आज निखील आणि जेसिका ची गाडी श्रवणच्या गाडीला धडकली.. आणि श्रवणला जरा मुका मार लागला... त्या दोघांनी आपापसात मिटवलं, परंतू श्रवणला जरा लागल्याने निखिल- जेसिका त्याला इकडे घरी घेऊन आले, गप्पांमध्ये तो जवळपास राहणारा आणि मराठी माणूस म्हटल्यावर कणव आणखीच वाढली निखीलची.

श्रवण!

तो घरात आला, बस एक नजरानजर..

त्याच्या नजरेत ओळख चमकून गेली, पण क्षणभरासाठीच .. मलाही त्याला पाहून उगीच अस्वस्थ झालं! त्याला क्रीम लाऊन देताना, पेनकिलर देताना, त्याचं नाव गाव विचारलं, तो कोण आहे स्पष्ट झालं... लख्ख़ झालं.

श्रवण.. शांत वाटला मला फ़ार. लहाणपणीचा घर डोक्यावर घेणारा मुलगा आणि आताचा अबोल. शांत आहे.. मेघनासारखा बोलघेवडा नाही. मोजकंच बोलला.. काहीतरी जाणून घेण्याची अखंड धडपड सुरू होती त्याची.. डोळ्यांनी शोधत होता, अबोल राहून. कॉफीचा खूप आग्रह केला तर चालेल म्हणाला... "टू शूगर क्यूब्ज प्लीज" अगदी मीच! आधी कॉफीचा गंध घेतला, मग घोट घोट घेत प्यायला... अगदी मीच...! कॉफी पिताना आमच्या गप्पांत फक्त हसून सहभाग नोंदवत होता, बोलणं फार नाहीच!

मी त्याला आणखी काही द्यावं म्हणून आत किचन मध्ये गेले, तो निखील आला मागोमाग...

"मानसी, हीज आईज आर एक्जाक्टली लाईक यूअर्स... प्लीज टेल मी, इज ही ओनली युअर श्रवण?"

मुलांच्या प्रत्येकच प्रश्नांना नाही ना रे उत्तरं देता येत?

-मानसी

-----------------------------------
पत्र क्र. १३

..ज बा ब दा री....
हे शब्द तुझ्याकडून ऐकले तरी कसंस होतं.

तू निघून गेल्यावर किंवा तुझ्यापासून मी वेगळा झाल्यावर आपल्या दूरावण्याची अनेक कारणं मी गोळा केली. हे करताना जमेल तितकं त्रयस्थ होऊन विचार करू शकलो. नव्हे, तो करावाच लागला.

कुठलीही जबाबदारी पेलण्याची जबाबदारी घ्यायलाच तुला मुळात आवडत नाही. इतरांच्या सुखाची तर गोष्ट फार दुरची, स्वतःच्या लोकांची, करून गेलेल्या कमिटमेंटची किंबहूना कशाचीच नाही.
तू परिपूर्ण आहेस, कारण तू फक्त तुझ्या इच्छांना न्याय देतेस.
नसतं हे सोपं. नाही जमत प्रत्येकाला, आपल्या "माणसं जपणं" संस्कृतीत तर नाहीच नाही.

मला, तुला सोडल्याचं दुःख निव्वळ ह्यासाठी जास्त आहे, की "तू" माझी जबाबदारी होतीस आणि तसं असूनही काही कारणांसाठी मला तुझ्याकडे पाठ फिरवावी लागली, जो माझा स्वभाव कधीही नव्हता.

तुला आज हे नक्की सांगेन, तुला सोडणं हे निव्वळ "मी कुणाच्यातरी प्रेमात पडलो होतो" असं कारण नसून, काही जीवांचं भलं करण्याचा हिशोब त्यामागे होता, त्यात तुझंही नाव होतंच.

माझ्यापासून वेगळं झाल्यापासूनचा तुझा प्रवासही उत्तमच झालाय की?

अनेक मनाजोगत्या गोष्टी मिळाल्यात, आणि त्याही अगदी जबाबदारीशिवाय!!
त्यात माधव आहे. त्यात निखील आहे. नाती आहेत परंतू त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या नाहीत.

तुझ्यापासून वेगळं झाल्यानंतर मी लग्न केलं, मेघनाच्या सुख- दुःखांची जबाबदारी घेतली, प्रेमाने ती पारही पाडली.
तू माधवासोबत होतीस, पण लग्न तुला नको होतं.

परवा, श्रवण तुला भेटून आल्यानंतर, "मी एका प्रधान मॅडमला भेटलो, फार सुस्वभावी आहेत त्या" इतकं बोलून वेगळा झाला. त्याने आजवर तुझा फोटो एकदाच बघितलाय, तू फारशी आठवत नाहीस त्याला, इतकं मेघनानं प्रेम दिलंय.

एखाद्याला आपलं म्हटल्यानंतर झोकून देणं, त्याच्या सुख दुःखाशी समरस होणं, ही जगण्याचीच एक कला आहे, मानसी. त्या प्रत्येक भावनेला मी तरी मूर्ख ठरवणार नाही.

कितीही प्रयत्न केला ना मानसी, तर मी नाही विसरू शकत तो दिवस, ज्याने मला आपल्या नात्याबद्दल कुठलातरी ठाम निर्णय घेण्यास प्रवृत्त केलं होतं!

त्या दिवसात तू नोकरी सोडली होतीस, तुझ्या मनाविरूद्ध!
आजही नोकरी सोडल्याचं कारण तू "श्रवण मूळे सोडली" असेच देतेस, जेव्हा की श्रवणच्या वेळेस आलेल्या प्रेग्नेंसी कॉंप्लिकेशन्समुळे तुला नोकरी सोडावी लागली, त्याचं प्रमुख कारणं तुझी तब्येत असच होतं..
तुझी तब्येत स्थिरस्थावर झाल्यावर तू तुझ्या वडिलांचा बिझनेस जॉइन केलास... श्रवणची रवानगी नितनेमाने पाळणाघरात किंवा तुझ्या माहेरी करून.

महत्त्वाकांक्षांना घालावी लागणारी मूरड हे तुझं नाराजीचं प्रमुख कारण मला नेहमीच जाणवत होतं, जेव्हा की माझ्याकडून तुला तुझ्या नोकरीबबतचे कुठलेही अडसर कधीच नव्हते, पण संसार आणि त्याच्या मागोमाग आलेल्या जबाबदाऱ्या तुला हवालदिल करत होत्या....

अशा सगळ्या तणावात तू असताना, मी कामानिमित्त फिरतीवर होतो आणि घाटात जबर अपघात झाला
मला ऍडमिट करून माझ्यावर उपचार सुरू होते, अनेक फ्रॅक्चर्स घेऊन हॉस्पिटलमध्ये तळमळत होतो, मला तुझी आणि तुझीच गरज होती.

असे असताना, काही महत्त्वाच्या मिटींग्ज साठी तू बँगलोर मध्ये होतीस. तू आली नाहीस मानसी, नाहीच आलीस.
माझं असं होतंच कोण जगात? तू आणि श्रवण! त्या बाळाकडून अपेक्षा करण्याचं त्याचं वय नव्हतं, आणि अपेक्षा पेलण्याची तुझी इच्छा नव्हती . आपल्या मनांतला दुरावा स्पष्ट जाणवून द्यायला हा प्रसंग पुरेसा होता.

तुला मीच काय कुणीही बांधून ठेवू शकतच नाही, हे कळण्याइतका शहाणा होत होतो, त्या अपघाताने दिलेलं शहाणपण.

मला काही दिवसात बरं वाटत असताना, तिथेच मेघना भेटली... तिची स्वतःची काही दुःख होती, त्याच हॉस्पिटलमध्ये नुकताच जन्म घेऊन देवाघरी गेलेलं पोर तिला अस्वस्थ करत होतं.... आणखीही खूप काही.

समदु:खी म्हण... प्रेमासाठी आसूसलेले म्हण किंवा आणखी काही म्हण... दोघांत काही तरी जुळत गेलं... भेटीनिशी वाढत गेलं आणि मेघना ह्या जगात असेपर्यंत ते नक्कीच टिकलं, आजही जाणवेल असं काही जुळलेलं.

... मला हॉस्पिटालमधून घरी घेऊन जाण्यासाठी तू आलीस तेव्हा.... मला घरी नेण्यासाठी तुला लंडनला जाण्याची संधी हुकवावी लागली हे दुःख माझ्या अवस्थेपेक्षा जास्त होतं तुझ्या नजरेत.

मानसी, धिस इज नॉट अ ब्लेम गेम.

निव्वळ, आयुष्याला जेव्हा मी एक वळण देऊ केलं, तेव्हा ते अनावधानाने नव्हतं, त्यामागे ठोस कारणे होती, आणि तुला मोकळं करण्याचा विचारही होता, हेच तुला सांगू पाहतोय.

तुझ्या वडीलांना तू हातभार लावताना एक रुपयाचाही मोबदला घेत नव्हतीस, तुझ्या महत्त्वाकांक्षांना शांत करण्यासाठी तुला काम करायचं होतं, काहीतरी सतत करत रहायचं होतं, हे मला फार उशीरा कळंलं, जेव्हा कोर्टात तू श्रवणला तुझ्यासोबत नेण्याचा नकार दिलास, अगदी त्या क्षणाला. इतकं कसं सगळं फाटत गेलं मानसी... ?

काय सोपं होतं सांग ना..

तुझं मूकपणे निर्णय स्विकारणं?
श्रवणाला आईपासून दूर करणं?
तुझ्या भविष्याची मी करू पाहिलेली तरतूद, तूच न स्विकारणं?

सोपं काहीच नव्हतं मानसी, फक्त गरजेचं होतं-
तुझी आणि माझी घूसमट संपवणं!

पुरे... थांबतो.

.......फार वाहवत गेलो आज... फारच! मेघनाची फार आठवण येतेय, माझा पडता डोलारा तिने सांभाळला होता. विनातक्रार.

कमी अधिक बोललो असेन तर माफ कर, पण हे सारं काही वर्षानूवर्ष साचून आहे.
कदाचित तू चूकीची नव्हतीसच, कदाचित मीही चूकीचा नव्हतो... आपण एकमेकांचे सहचर होऊ शकतो, हा निर्णय मात्र चूकला होता, त्याच्या परिणामांना आपल्याला भोगावं लागलं, हेच काय ते.

तुझ्या मागच्या पत्रातलं "श्रवणला भेटून उगाच अस्वस्थ झाले" ह्या वाक्याने मला अस्वस्थ केलं.

मातृत्त्वाच्या भावनेची तरी जबाबदारी तू झटकायला नको, मागची स्थित्यंतरे विसरून त्याला जवळ करण्यास तुला हरकत नसावी, अर्थात त्याला पटणार असेल तर!

--------------------------------------

पत्र क्र.१४

अनुराग..

लेट्स गेट स्ट्रेट.

हा विषय फार ताणू नये अशी माझी इच्छा असताना आपण फिरून तिथेच आहोत, तेव्हा मला वाटतं माझीही बाजू मी मांडायला हवी. हे मी आधीही करू शकले असते, पण नाही केलं, नात्यात एक जण पुढे निघून जात असेल, तर त्याला धरून ठेवण्यात तथ्यच नाही, ज्या क्षणी तू पुढे जाण्याचा निर्णय घेतला होतास त्या क्षणाला माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. आपलं नातं फार "तुझ्या मनासारखं" नव्हतं कधी, पण ते अगदी तोडून तू निघून जाण्याच्या निर्णयाला पोहोचू शकशील असं मी स्वप्नातही कल्पिलं नव्हतं.
पण; जे घडतं, ते स्वीकारण्याचं मी धोरण ठेवलंय, कायमच, तेच केलं, तेव्हाही.

मी आधीपासून किंवा नेहमीच अशीच आहे, नाही का अनुराग?
नेहमीच.

लग्नाआधीही
लग्न झाल्यावरही
काडीमोड झाल्यावरही
अशीच.

मग काय बदलत गेलं? तर
स्वीकार्हता. "मी आहे तशी स्वीकारणं" नाही जमवू शकलास

लग्नाआधीचा माझा अलिप्तपणा, प्रॅक्टीकल जगणं तुला खास वाटायचं, इतर मुलींसारखी मी नाही हे ह्याच गुणांमुळे तुला आवडायचं, विशेष वाटायचं, पण नातं साकारलं आणि अपेक्षा आल्या.

अपेक्षा!!
 
लग्न झालेल्या स्त्री ने अमुक गोष्टी कराव्यातच, ह्या धोरणातून जन्मलेल्या अपेक्षा.

मी लहानपणापासून माझ्या आईल पहात आले होते, तिने तिचं जगणं वेगळं असं ठेवलंच नाही कधी.
तिचा नवरा, तिचे पोरं, तिचे सासू सासरे किंवा इतरही अनेक नाती, त्या प्रत्येक नात्याला पुरे पडण्याचा अखंड अट्टहास. जणू परि़क्षेला बसलेला विद्यार्थी, रोजचा रोज अभ्यास पूर्ण करायचाच आहे, तर अपेक्षांच्या परि़क्षेत उत्तीर्ण होणार. पुढे काय? मागच्या परि़क्षेत उत्तम मार्क मिळवल्यामुळे आता आणखी चांगला पर्फोर्मन्स द्यायचा.. थोडक्यात झटत रहायचं आणि तिला काय मिळतंय, तर असमाधानच! ती जे करतेय, ते 'कर्तव्य' ह्या ठप्प्याखाली नोंदत गेलं
मला काय आठवतंय तर, एकांतात टिपं गाळताना बघितलेली आई!

नकळत माणूस घडत जातो अनुराग, लहान सहान गोष्टींचा संस्कार होतो. म॑ला ह्या परि़क्षा नकोच होत्या.
मग अलिप्तपणा मी रूजवला, अगदी अट्टहासाने, प्रत्येकजण वेगळा आहे, त्याला त्याच्या पद्धतीने जगण्याचा संपूर्ण हक्क आहे, तुम्ही नातं साकारता, एकटेपणाने आयुष्य नाही जगता येत म्हणून ह्याचा अर्थ, त्यानेच आपल्या सुख दु:खांची जबाबदारी घ्यावी, असा होतोच कसा आणि का?

माझं असं वागणंच तुला आधी मोहून गेलं, नंतर काचत राहिलं.
नात्यालाच मग भेगा पडल्या.

मला माणूस म्हणून जगायचं होतं, तुला बायको हवी होती, इथे सगळं फाटलं

तू जो प्रसंग सांगितलास मागच्या पत्रात आणि म्हणालास, त्या प्रसंगामूळे आपण एकत्र न रहावं तू ठरवलंस
ते वाचून मला खरंच काहीच वाटलं नाही.

तुला पुढे जायचं होतं, तू तुझ्या पद्धतीने मला आणि स्वतःलाही कारणे देतो आहेस.

तू हॉस्पिटल मधे अस्ताना, ऑफिसच्या कामामूळे मी नाही येऊ शकले, नाहीच येऊ शकले. नाही आले.
परंतू डॉक्टर्ससोबत मी सातत्याने संपर्कात होते, तुझ्या जीवावर बेतलेलं नाही आणि काही दिवसात डिस्चार्ज मिळू शकतो, हे समजल्यानंतर मी तुझ्या सेवेशी दोन लोकांना पाठवून दिलं. माझी बँगलोरची कामे उरकली आणि ती संपताच तुझ्याकडे आले, लंडनला जाण्याचं टाळलं कारण हॉस्पिटलमध्ये तुझी काळजी घेणारा स्टाफ होता आता घरी मी असणं जरूरी होतं, तुझ्या रिकव्हरीसाठी मी संपूर्णपणे रजा टाकून घरी होते... ह्या गोष्टी तुझ्या लेखी नसाव्यात (माझी हरकतही नाही) पण मला खरंच गम्मत वाटते आहे, ज्या पद्धतीने एकेक कारणं तू जमा केलीस आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतलास.

कुणीच १००% परफेक्ट नाही इथे, नाही का.

माझ्या वागण्यातल्या ज्या गोष्टी तुला खटकत गेल्या, तो बाकी काही नसून अपेक्षाभंग होता!
आणि माझं जे चूकलं ते हे की, मी नात्याला गृहीत धरलं, खूप जास्त. कदाचित तुलाही. कदाचित ह्या विश्वासाला गृहीत धरलं की फक्त अपेक्षापूर्ती म्हणजे लग्न नाही, 'तुला हवी तशी' नात्याची काळजी घेतली नाही तरी फार फरक पडणार नाही, हे गृहीत धरलं, कदाचित हे ही की आपलं नातं कायम टिकणारं आहे.... मी चूकले, मी गृहीत धरलं!

कुठल्याही प्रसंगात कोण कसा वागेल हे सांगता येत नाही अनुराग,
अशा प्रसंगाच्या मालिकांतून तुला अपेक्षित माझं वागणं न ठरल्याने मी हद्दपार झाले.
पण बघ ना-
तुला हवी तशी मेघना होती. काळजी घेऊन संसार उभा ठेवणारी

मला पूरक माधव होता,
कुठेच मला न बांधता आजन्म सोबत करणारा.

खरं तर पूरक साथीदार, ही जगण्याची गरज आहे. तसं नसल्यास मिळालेल्या साथीदाराबरोबर "आहे तसं" निभावून नेण्याची तयारी, ही तरी जगण्याची गरज आहे.

मला आठवतं!
आम्ही निखिल ला अनाथालयातून घरी आणणार होतो तो दिवस!
तो माझ्या आणि माधवाकडे असा काही झेपावला की कळून आलं, नातं आहे. काहीतरी, कुठेतरी.

कधी नाती अशी झटकन जुळतात कधी जुळता जुळत नाहीत
आपण दोघे दुसर्‍या वर्गीकरणातले.

माधव!!!

शेवटी शेवटी फार आजारी पडला होता. तेव्हा भिंतीकडे उदास बघत असायचा..
मी विचारायचे त्याला.. "भूतकाळ छळतो का रे?"
तो पटकन उत्तरायचा "जे जगून गेलो, ते काय छळणार?"

खरंय ना!
जे जगून गेलो, त्या गोष्टींना आपल्याला छळण्याची परवानगी आपण द्यावीच कशाला

मग म्हणायचा-
"फार विसंबू नये कुणावर. कुठल्याच गरजा कुणाच्या फार अधीन करू नये, मग आपल्याला हसण्याआधीही त्याची परवानगी घ्यावी लागते, रडण्याआधीही. माझी सुखं माझी, दु:खही माझंच, असंच जगावं.
बाकी "कुणामुळे" असं- तसं झालं, ही फक्त कारणे झाली.
पहिल्या पायरीला ठेचकाळलो, की कळसाकडे जाण्याचं धैर्य अर्ध संपतं, जगण्याचं असंच आहे...
पायरी पायरी जोडलेली.. म्हणजेच माणसं..! वरही नेणारी, अधीन झालो की तोल जाऊन खालीही आपटणारी.
आपलं भान आपण ठेवावं. ठेचकाळलो तर मात्र जखम बांधावी आणि तितक्याच त्वेषानं पुढे निघावं "

तो असा बोलत बसला की जगणं नव्याने कळायचं!

माझंही पत्र लांबलं फार. थांबते.

राहता राहिला तुझ्या पत्रातला शेवटचा हिस्सा- श्रेयसला जवळ करण्याबाबत.
त्याला जवळ करू कसं!

जे नातं विणूच शकले नाही, ते उसवायला काय म्हणून घेऊ?

-मानसी
------------------------------

पत्र क्र. १५

मानसी..

खरं सांगू!
तुझं पत्र पाहून मला आनंद झाला आहे. खूप जास्त आनंद.
तुझ्यात असलेली चीड, राग, द्वेष किंवा वैताग तू मोकळेपणाने मांडलास ह्यात.

तू खूप समंजस होतीस, आहेस, पण ह्याचा अर्थ कधीच हा नव्हता की तू सारं मनात ठेवावस.
मोकळं व्हावं गं! व्हावं.
राग आला आहे ना, करावा व्यक्त,
रडू कोसळतय ना.. येऊ द्यावं पाणी,
काही मागावसं वाटतय ना, घ्यावं मागून.
जगताना नुसती सोबत म्हणून 'नाती' नसतात, असं हक्कानं मोकळं होण्यासाठीही असतात.

तू मागच्या एका पत्रात म्हणालीस, 'संवादासाठी मी नेहमीच तयार असते' ते खरंय.
पण स्वतःहून संवाद घडवण्याची मात्र तुझी तयारी नसते, इच्छा नसते.
आताही ह्या पत्रांतून संवाद साधताना, तू अनेक दिवसांनी स्वतःला मोकळं केलंस, ते ही माझा तगादा पाहून.

मानसी,
मला काही नको होतं, नको आहे.
काही अर्धवट राहून गेलं होतं, ते आता मोकळं झाल्यासारखं वाटलं.

आपली वयं झाली आहेत, आपापला संसार, आपापल्यापरीने सुखाचा झाला आहे.
आयुष्य एकदाच मिळतं नाही का?
त्यातच आपण पडतो, उठतो, धडपडतो, चुकतो, सरावतो, अनेकदा नव्या उमेदीने जगतो.
आपलंही तसं झालं.
तुला दुखावून गेल्याचा सल होता, त्याबद्दल तुझ्याकडे माफी मागून झाली..

कधी-कधी गणितं चुकतात, कारण त्यातले "हातचे" चुकतात, "गृहीतकं" चुकतात.. आपण मात्र आपल्या धुंदीत.. जोर लावून गणिताची उकल मांडत बसतो.... शेवटी दोन्ही बाजू समान आल्या नाहीत, की चुका कळतात... मग तेच गणित शेवटाकडून वरपर्यंत उलट तपासत जावं लागतं,
तिथे हातचे सापडतात... तिथे गृहीतकं कळतात!
आपण अशीच फेरतपासणी केली, फसलेल्या गणिताची.

ह्या वयात एक मात्र कळलं मानसी,
अनेकदा फक्त "वेळ द्यावा".
नात्यांना,
नात्यातील समस्यांना,
नात्यातल्या गुंत्याला...
सगळं सुटतं बघ... सहज मोकळं होतं!
परिस्थीती गोष्टी अवघड करते... वेळ जाऊ दिला, की तिच सगळं सोडवतेही.
सगळीकडून अवघडलेलो असताना, कुठलातरी मार्ग काढून बाहेर पडण्याची धडपड त्या व्यक्तीचं वैयक्तीक समाधान करू शकते, पण नात्याचं होणारं नुकसान भरून येणारं नसतं.

मी तेव्हा, त्यातून सुटण्याची "घाई" केली... त्यात कदाचित तुझा/माझा फायदा हा झाला, की समस्या समाधान झालं, पण श्रवण?
तो तुझ्यासारखा आहे, आल्या परिस्थीतीशी विनातक्रार समरूप होतो. आयुष्याशी तक्रार करण्यात वर्तमान दवडत नाही.

मेघना एकटी होती, नवर्‍याच्या दुर्धर आजाराने कष्टी होती, नवर्‍याने आजार लपवून ठेवला, त्यात दिवस गेले, पोर जन्माआधीच गेलं, अशा अनेक दु:खाने ग्रासली होती. मी तिच्याशी लग्न केलं, तिला हवं असणारं संसारसुख देऊ केलं. घर- संसार्, इतकंच तिचं विश्व होतं.. आणि समाधानी आयुष्य मिळावं इतकीच तिची अपेक्षा होती

तिनं श्रवणला जवळ केलं, त्याची आई झाली... श्रवणही तिला बिलगला... त्यांचं नातं फार घट्ट होतं, सख्या माय लेकरालाही लाजवेल इतकं निर्लेप होतं. म्हणूनच, श्रवणवर कधी अन्याङय झाल्यासारखं मला वाटलं नाही. मेघनानी तशी वेळ येऊच दिली नाही.
माझ्या श्रवणचं संगोपन अगदी मला हवं तसं झालं.

पण तरीही, नाती सोपी सुटसुटीत का नसतात?

तुला भेटून आल्यावर, काही विशेष घडलं नाही, असं दाखवणारा श्रवण, कामात का एकाग्र होऊ शकला नाही?
काल निखील श्रवणला भेटायला आला, अनेक तास दोघांच्या गप्पा झाल्या... दोघे अस्वस्थ होते..
त्यांच्यात नेमकी काय देवाण घेवाण झाली?

जर निखील जाणतो, मी तुझा कोण होतो, तरीदेखील तो इतका सहज माझ्याशी संवाद साधू शकतोय, ही मुलं जगणं इतकी सहजतेने कशी स्वीकारू शकली आहेत?

मानसी,
काही नाती सरतात.
काही नव्याने आकार घेतात..
कुठल्या नात्याने नव्याने तुला साद घातली तर ती झिडकारू नयेस, असं वाटतं.
तू तुझ्यात पूर्ण आहेस, पण कुणाला परिपूर्ण होण्यासाठी तुझी गरज असेल तर पुढे आलेल्या हाताला नाकारू नयेस, असं वाटतं!
श्रवण- निखीलची धडपड मला वेगळेच संकेत देते आहे.

खरं सांगायचं, तर
नात्यांची ही गुंतागुंत मीच करून ठेवली आहे.
आता मात्र शांत राहून प्रत्येक नात्याला, त्याचा हक्काचा वेळ देणार आहे.
तो द्यायलाच हवा आहे.

-अनुराग.

----------------------

पत्र क्र. १६

ओनू....
मी व्हिजीटर व्हिसा घेऊन आले होते, ज्याची मुदत संपते आहे.
हे मी तुला सांगणार होतेच.
हे पत्र तुझ्या हाती पडण्याआधी मी भारतासाठी रवाना झालेली असेन.

पुन्हा एकदा तुला सांगते आहे-
आपल्या दोघांतील भूतकाळ माझ्यासाठी कुठलीच जागा व्यापून रहात नाही.
घडून गेले, ते का, कसे, कशासाठी ह्या बाबी निदान आतातरी फोल आहेत.
तुझ्या आणि श्रवणपासून दुरावल्यानंतर मी प्रयत्नपूर्वक स्वतःला प्रत्येक नात्यापासून दूर ठेवलं आहे.

श्रवणला ज्याप्रकारे मेघनाने लळा, माया लावून आपलंसं केलं तसं कदाचित मी निखीलच्या बाबतीत केलं नाही.
त्याला उत्तम संगोपन दिलं, परंतू माझं स्वतःचं, माधवाचं अस्तित्त्व जपत. असे असूनही निखिलचा तितकाच जीव आहे माझ्यावर, जितका माझा आहे त्याच्यावर.. माझं तितकंच प्रेम जेसिकावरही आहे. पण म्हणून कुणाला अडकवून ठेवणे माझा स्वभाव नाही. प्रत्येकजण वेगळा आहे, त्यांचं विश्वही, त्यांना जेव्हाही माझी गरज भासेल, मी असेन. अर्थात तेव्हाही त्यावेळची परिस्थीती पाहूनच मी वागेन.

ओनू,
व्यक्तिगणिक प्रेमाची परिभाषा बदलते.
आपल्या परिभाषेत बसू शकत नाही म्हणून ते प्रेम बाद ठरवण्याचा वेडेपणा करणं, हीच फार मोठी चूक आहे.

मुद्दा राहता राहिला मी कुठली नाती स्वीकारावीत हा.
माझ्या आयुष्यात मी कुठल्या नात्यांना स्वीकारावं, त्यांना कुठे आणि कशी जागा द्यावी, हा प्रश्न सर्वस्वी माझा आहे, नाही का?

निखीलला माहिती असलेलं सारं काही तो श्रवणसोबत बोलला असावा हे उघड आहे.
आणि हे पत्र लिहून झाल्यावर त्याला माझ्या प्रत्येक प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे.

माझ्यासाठी कुणी काही, माझ्या संमतीशिवाय करावं, माझ्या माघारी करावं, हे मला मान्य नाही. ते करण्याचं स्वातंत्र्य आणि हक्क मी कुणालाही दिलेला नाही. तुला तर नाहीच पण अगदी निखीललाही नाही.

चल...
आयुष्यानं संधी दिलीच, तर भेटू. असेच अचानक, कधीतरी, कुठेतरी. परंतू नव्याने, कारण तेव्हा 'आपला भूतकाळ' हा विषय आपण ओलांडलेला असू.

तुला पुढील आयुष्य आनंदाचं आणि आरोग्यपूर्ण लाभो.

भेटूच.
-मानसी.

--------------------
पत्र क्र. १७

प्रिय मानसी...

मी काय लिहू?
मुळात तुझ्या शेवटाच्या पत्रानंतर, मी हे पत्र लिहावे तरी का?
हा संवाद सुरू करतना कळत नव्हतं, संवाद साधावा की नको ते, आज पुन्हा तिथेच उभा आहे.
तू भारतात जाऊन महिना होऊन गेला.
अचानक सुरू झालेला पत्रव्यवहार अचानक थांबलाही.
थोडा अवधी लागला, सगळं पचवण्यासाठी.
तुझी पत्र पुन्हा एकदा वाचून काढली.
खूप मोकळं वाटतं आहे.

तुझ्याशी बोलून एक फार प्रकर्षानं जाणवलं.
आपला जन्म होतो, जन्मत: अनेक नाती घेऊनच येतो आपण, पुढेही असंख्य जोडतो... जोडत जातो...
आणि मग स्वतःला हरवतो.
ही जाणीव झाली, की स्वतःला शोधतो.. प्रत्येकाच्या अपेक्षांखाली इतके दबलेले असतो की निव्वळ घुसमट हाती येते, ही घुसमट इतके दिवस आपलाच भाग बनून राहिलेली असते, "मला काय हवंय" चा शोध सुरू झाला की, आधी व्यापते ती ही घुसमट. मग सुटण्याचे उपाय, मनांना दुखवणं. त्यांना दुखावलं म्हणून आपलं पुन्हा उदास होणं!

मग तुझं पटतं!
आधीपासूनच प्रत्येकाकडे इंडिविज्यूअल म्हणूनच पहावं.
त्याच्या मर्यादा, त्याच्या इच्छांमध्ये फार शिरकाव करूच नये.
आपल्याकडून जमेल तितकं द्यावं, आपली मर्यादा संपली की आवरतं घ्यावं, समोरच्याकडूनही तितकीच अपेक्षा बाळगावी... आयुष्य सुट्टं सुट्टं होतं. खरंच आहे तुझं.

पण; शेवटी प्रत्येकजण वेगळा... आयुष्याची ज्याची त्याची समज वेगळी, म्हणून प्रत्येकाच्या हातून घडणार्‍या चुकाही वेगळ्या, त्या सुधारण्याच्या पद्धतीही.

मानसी,
तुझा भारतातला पत्ता मला माहिती नाही.
पण श्रवण भारतात येतो आहे.
निखीलकडून त्याने तुझा पत्ता मिळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतू तू पुन्हा नाराज होऊ नये म्हणून निखील ने दिला नाही, ह्यावेळी त्याला जेसिकाने मदत केली आहे, श्रवण तुला हे सगळं सांगेलंच, अर्थात तू त्याला घरात घेतलंस तरच.
तो भारतात त्याच्या काऊंटरपार्ट विजीट वर येतो आहे, नवा प्रोजेक्ट्च्या ब्रीफ साठी, २१ दिवसांसाठी तो तिथेच असेल.. त्या दरम्यान तुझी भेट घेतो म्हणाला आहे, त्याच्या हाती हे पत्र.

एक खरं सांगतो, मी पत्रोत्तराच्या अपेक्षेत मुळीच नाही.
श्रवणला तू कसं वागवावस हेदेखील मला सांगायचं नाही.
तो ज्या पद्धतीने तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे, त्याला पहाता तुमच्या दोघांच्या नात्यात मी एक त्रयस्थ आहे, सपशेल त्रयस्थ. तुमच्या दोघांच्या नात्याचे अधिकारी तुम्हीच आहात, मात्र श्रवणकदून तुमच्या भेटीबद्दल ऐकायला आवडणार आहे..

मला जाता-जाता फक्त तुझे आभार मानायचे आहेत
संवाद साधू दिलास.. तो पुढे नेलास, मोकळेपणाने बोललीस, ऐकूनही घेतलंस, चुकाही दाखवल्यास...
मी मला नव्याने समजलो, तुलाही समजून घेता आलं.
पुढे कधी संवाद झालाच तर आपण दोघे आपल्या गतकाळावर बोलणार नाही आहोत, हे मात्र खरं. गतकाळाबद्दलचा अस्वस्थपणाच कमी झाला आहे माझा..

आपल्या दोघांत काही जुळलं नव्हतं कधी, पण सगळंच बिनसलही नाही आहे.
दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती म्हणून एकमेकांशी बोललो, छान वाटलं.
पुन्हा कुठल्याश्या वळणावर प्रत्यक्ष भेटू तेव्हा, डोळ्यांत तक्रारी नसतील.
आपलेपणाही नसेल बहुधा पण परका भावही नसेल. तेवढच पुरे आहे.

काळजी घे.

-अनुराग
----------------

पत्र क्र. १८

Dad,
I have never ever thought that I shall write you a letter and express myself like this.

Trust me Dad, I am shaken... I have moved inside out.

These last few days forced me to believe, yes... yes life is a roller coaster ride. Life was strange and it will continue to be so.

Mansi is struggling with blood cancer (Chronic leukemia) from last two years.

मी कुठल्या धुंदीत हे ई-मेल तुम्हाला करतो आहे, आय डोन्ट क्नो.
गेल्या दहा दिवसात मी फोनवर तुमच्याशी नीट नाही बोललो, त्याचं कारणही हेच आहे.
मानसीला कालच मी अ‍ॅडमिट केलं आहे, शी इज क्रीटीकल. निखील लवकरच इथे पोहोचेल.
योगायोगाने मी इथे होतो, तिला अ‍ॅडमीट करू शकलो. Its difficult for me to imagine what would have happened to her, if she would have been alone, here!
असो.

हीच रिअ‍ॅलीटी आहे.

ही रिअ‍ॅलिटी आहे, की ती माझी जन्मदात्री आहे.
ती अनेक वर्षांनी मला भेटली आहे आणि मरनासन्न आहे.

मी भारतात आलो, हॉटेलवर सामान टाकलं, तडक तिला भेटायला आलो, तिला न भेटता मला तिकडे झोप लागलीच नसती, इतका मी अस्वस्थ होतो. ती घरात घेईल का, ही भितीही होती, आणि ती घेईलंच असंही आतून वाटत होतं.
तुम्ही मला सांगितलं होतं, भेट झाली की फोन कर, कळव... मी फोन केला, पण सविस्तर बोललो नाही तुमच्याशी... त्याला अनेक कारणं आहेत. मला खूप काही सांगायचं आहे डॅड, पण मी तुमच्याशी बोललो तर कदाचित रडेन, म्हणून लिहीतो आहे. प्लीज अंडर्स्टँड मी.

आय स्टील रिमेम्बर....
मी दारात उभा होतो तिच्या, बेल वाजवली, काही मिनीटात दरवाजा उघडला.
काही क्षण रिकामे गेले.. मग ओळख पटल्याचं हसू.. आणि मग काहीतरी खूप हवं असलेलं मिळाल्याचं हसू..
त्या स्मितहास्याने माझी अर्धी अस्वस्थता संपवली.

डॅड,
आम्ही खूप वेळ काहीच बोलू शकलो नाही. मी आत येऊन नुसताच बसून होतो.
कुठून सुरूवात करायची?
आणि कुणी?

तिचं घर किती नेटकं आहे, ह्यावर मी बोलायला लागलो... मग दोघांतलं धुकं सरत गेलं... काही तास थांबलोच नाहीत.

तिला कशाचीच तक्रार नाही, मलाही.
त्यामुळे बोलणं फारच सकारात्मक झालं. अनेक वर्षांनी कोणी जिवश्च भेटावा आणि मग बोलणं थांबूच नये असे अधाशी बोलत बसलो. मी आजवर काय काय वाचन केलं, हे जाणून घेऊन ती अधिक आनंदली, तिच्या माझ्या बर्‍याच आवडी सारख्या आहेत... पुस्तकांपासून ते कॉफीपर्यंत.

काय संबोधू, असं विचारलं तर निक्षून सांगितलं, "मानसी" म्हण!
नात्याचं संबोधन लाऊन अपे़क्षा चिकटायला नकोत म्हणाली.
तिच्याच घरी ठेऊन घेतलं तिने मला, मी ऑफिसने बुक केलेल्या हॉटेलवर 'काही दिवसांनी येईन, हॉटेल रूम बुक्ड असू द्या' असं सांगून टाकलं, तिने रहा म्हटल्यावर मला जावं वाटलंच नाही. हे सगळं तुम्हाला कळवलं नाही मी, फोनवरही नाही सांगितलं की मी तिच्या घरी आहे. 'का 'ते नकाच विचारू.

डॅड,
आय वॉज मिसींग समथिंग. शी इज अ ग्रेट फ्रेंड.
आणि तिला 'एक व्यक्ती' म्हणून जगायचं होतं, ती तशीच आहे. तिला मानसी म्हणून हाक मारतानाही खास वाटतं, नाही जाणवत आपण "आई" सोबत बोलतो आहोत, जाणवतं आपण बस एका व्यक्तीसोबत बोलतो आहोत, जी तिच्या दृष्टीने परिपूर्ण आहे... चार लोकांपे़क्षा वेगळी आहे.
तिच्यातलं हे वेगळेपणच, तिने लोकांना जोडलं नसलं तरी तिला लोकांशी बांधून ठेवतंय बहुधा.

दोन दिवस इथे काढल्यानंतर मला एका संध्याकाळी म्हणाली, "मी डॉक कडे जाऊन येते, येतोस का? ऑन दी वे मस्त कॉफी डे मध्ये स्नॅक्स आणि कॉफी घेऊया, मग तू घरी ये, मी डॉककडे जाऊन येते, माझी सिटींग ड्यू आहे, पण मी कंटाळा केलाय, आता जरा त्रास होतो आहे"

डॉक, सिटींग, कंटाळा, त्रास..? मला संदर्भ लागेना...

तेव्हा कळलं, तिची अवस्था काय ते आणि तिला काय झालेलं आहे ते.
कमाल आहे ती, तिला त्रास होतो, पण बाजूला बसलेल्या आपल्याला तो कळतदेखील नाही. तिच्या चेहर्‍यावर ते येतच नाही....

ती नेहमी अशीच वागत आली असेल का?
कुठलंच दु:ख न दिसता, दाखवता.

डॉक सेड, शी हॅज टू गेट अ‍ॅडमीटेड.
ती म्हणाली, आताच नको, माझ्याकडे पाहूणे आहेत, मला फक्त लवकर आराम पडणारी औषधं द्या, अ‍ॅडमीट नंतर कधी.
आम्ही घरी आलो.
तिला अधिकारवाणीने, 'आताच अ‍ॅडमीट हो' सांगावं कुणी?

त्या दिवशी, घरी आल्यावर निवांत गप्पा मारत पडलो होतो.. मी प्रयत्न करत होतो, तिचा त्रास समजून घेण्याचा.
पण तिचा त्रास, तिची दु:ख हा विषय आला, की आपण तिचे कुणी नसतो. तो तिचा आणि तिचाच वैयक्तीक मामला असतो.
मी विचारलं, "मानसी, तुझ्याडे फोटो अल्बमस आहेत? मला बाघायचे आहेत फोटोज. माझ्या लहानपणीचे, तुझे- माझे- डॅड्चे, तुझे- माधवचे- निखीलचे"
ती त्वरित म्हणाली, "नाही. उगाच आठवणी कुठे वाहू? ते बघत बसून स्वतःला हळवं करून घ्या, मग अश्रू, मग तगमग... "

मग तिला मी तुमचं पत्र दिलं.
तिने ते लगेच वाचलं, फाडून टाकलं!
मी विचारलं हे काय, "अश्याच आठवणी मिटवत पुढे जातेस?"
ती "प्रयत्न करते"

मग तिने मला मोकळ्या मनाने, तिचा आणि तुमचा पत्रव्यवहार सांगितला, ज्याबद्दल मला कल्पनाच नव्हती.
त्या पत्रव्यवहाबद्दल बोलताना, ती फार कोरडेपणाने बोलत होती. म्हणाली, "शेवटचं पत्र ओनूला व्यवस्थित लिहीता आलं नाही"
मी "मग आता लिही"
ती "लिहून ठेवलंय"
मी "मग पाठवलं का नाहीस"
ती "नाही पाठवावं वाटलं"

तो विषय तसाच राहिला.

डॅड,
तिचं घर बघा... निव्वळ टापटिप आहे.
खाली तीन खोल्या, आतून गोल जिना, वर तिची आवडती खोली आणि गेस्ट रूम.
व्यवस्थितपणा. सगळं स्वच्छ, नितळ.
ती ही तशीच आहे ना? सॉर्टेड.

तिने मला रूम दिली आहे, मी मात्र लिविंग रूम मधे सोफ्यावर झोपतो, सकाळी माझ्या अंगावर पांघरूण असतं.

खूप शांतता आहे इथे. घरात, तिच्या मनातही.

मी दिवसभर ऑफिसला असतो, संध्याकाळी अगदी हक्काचं घर असल्यागत इथे येतो.. कधी मी बाहेरून काही आणतो, कधी ती छानसं करून ठेवते पण स्वतः मात्र पथ्यपाण्याचं खाते.

ती टेक्सासला ट्रीट्मेंट्साठी आली होती, निखील त्याच्या वीकेंडला तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचा, बोनमॅरोचा ऑप्शन जुळून येत होता, आणि ही मात्र निघून आली, तिला फार ट्रीट्मेंट करून जगणं लांबवायचं नाही आहे.गरजेपुरते औषधपाणी करेन म्हणते. सगळं आक्रीत आहे.

आठ दिवस तिच्याबरोबर राहिलो...
एका रात्री अचानक तिला रक्ताची उलटी झाली, म्हणून तडक तिला त्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं..
पण गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत, तिच्या हलगर्जीपणाने जास्तच.

मी आता हॉस्पिटलमधे बसूनच ईमेल लिहीतोय.. मनाला येईल ते सुचलं तसं, तुम्हाला लिहून कळवतोय.
मनःस्थिती विचित्र आहे.
I am vulnerable.

तिला अ‍ॅडमिट केल्यानंतर, डॉक्टरांनी तिचे रिपोर्ट्स मागितले.
माझ्याकडे कसे असणार ते? ते घरी होते...
ते आणायला तिला स्वतःला जायचं होतं, तिला कसंबसं समजावल्यानंतर तिने मला सांगितलं, कुठून घ्यायचे ते.
अनिच्छेने तिने कपाटाची चावी दिली, तिच्याकडे पर्यायच नव्हता. म्हणाली,
"श्रवण, माझं आयडी कार्ड आणि मेडिक्लेम एका काळ्या पर्स मधे आहेत, ती पर्स लॉकर मधे आहे, ती न उघडता मला आणून दे, बाकी रिपोर्ट्स कपाटात सगळ्यात खालच्या कप्प्यात एकत्रितपणे ठेवले आहेत, घेऊन ये"

मी सगळं घेऊन येईपर्यंत, तिला आत नेलं होतं.
मला पर्स उघडावीच लागली, तिच्या कार्डसाठी.

पण आता सारखं वाटतंय,
ती उघडावी लागली नसती तरंच बरं झालं असतं.
______________________________

पत्र क्र.१९

डॅड,
मी मानसीची अ‍ॅडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यावर सगळ्यात आधी निखीलला कॉल केला. तो लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतो म्हणाला आहे, त्याच्या व्हिसाची सोय कशी लागेल ते लागो, त्यात महिनेही जाऊ शकतील. मी इथे असल्याने, मानसीला झटपट अ‍ॅडमिट करू शकलोय, ह्याचा निखीलला फार आधार वाटला.

कसं असतं डॅड हे सगळं? निखील तर मला पत्ता ही द्यायला तयार नव्हता मानसीचा, जेसिकाने दिला.
मी इथे येऊ शकलो, त्याच दरम्यान मानसीला त्रास झाला.
तिचे शेजारी फार माणूसकीचे आहेत, पण अशा प्रसंगी जवळचं कुणी नजरेसमोर असेल तर?
त्यातही कधी काळी जन्माला घातलेलं पोर?

काही वेळापूर्वी मानसीला भेटून आलो. कसंनूसं हसली.
डोळे मिटून आहे, पण तरीही स्वस्थ आहे.डॉक्टर्स जमेल त्या उपाययोजना करत आहेत.
रात्री मात्र तिला पुन्हा तसाच त्रास झाला तेव्हा डॉक्टर्स खजील झाले आहेत, जे काही आहे ते सुस्पष्ट नजरेसमोर दिसतंय.

Dad,
Coming back to the point..
Trust me I am damn restless, forgive me if I sound strange!
मला मानसीच्या पर्स मधे दोन पत्रे मिळाली. इतरवेळी वाचून झालं की पत्र लगेचंच फाडून टाकणार्‍या मानसीने, ती दोन- दोनच- पत्रे का जपली असावीत? अशी पत्रे ज्याने जगणं जवळून समजावं! अशी, ज्याने विश्वास बसावा, आपल्याही पलिकडे, आपल्याच सोबत खूप काही घडत असतं.
आपण त्यात गोवलेले असतो, अन् आपल्याला माहितीच नसतं.

कधी वाटतं...
माणूस चुकीचा नसतो. पण परिस्थीती असते.

मी जे करायला नको तेच केलं.
पत्रं वाचली.

एक मानसीने तुम्हाला लिहून ठेवलेलं
एक माधवाने मानसीला लिहीलेलं.

माझी मनःस्थिती अशी का, हे ती पत्रं वाचूनच तुम्हाला कळेल.
मानसीची परवानगी न घेता, ही पत्रं तुम्हांला मी पाठवतो आहे, कारण तुम्ही ह्या सगळ्यातील एक अविभाज्य घटक आहात.

मानसीनं भारतात परतून आल्यावर तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं, पण तुम्हाला न पाठवलेलं पत्र-
=============================

ओनू

मन- विचार शांत असताना आणि कसलाही आवेग मनात नसताना हे पत्र!
मला खरंच माहिती नाही, हे पत्र तुला मी पाठवेनही का. मग का लिहीतेय?
कधी कधी विचारांतले संभ्रम मिटवण्यासाठी, मला कागद फार उपयोगी पडतो. तसंच हे...

मी दोन आठवड्यांपूर्वी टेक्सासहून तडका-फडकी भारतात निघून आले. तुझ्याशी ना नीटसा संवाद घडला, ना भेटू शकले निघण्याआधी.
मला कुठेतरी जाणवू लागलं होतं, आता श्रवण जीवनात येईल आणि मग मनाची असंख्य आंदोलनं!
तसं काही होण्याआधीच निघून आले. श्रवणपासून दूर.

कशी गम्मत असते बघ...
खूप कणखर असणंही सोपं नसतं नि खूप हळवं असणंही.

निखील मला पक्का ओळखतो, बघ.
खरंच माझ्या मनातली प्रत्येक खळबळ त्याला ओळखता येते...

श्रवण पहिल्यांदा टेक्सासमध्ये माझ्या घरी आला होता, त्याला माहितीही नव्हतं, मी कोण ते.
पण त्यानंतरची माझी तगमग निखीलने टिपली होती, भलेही ती तगमग क्षणिक असेल, भलेही ती क्षणिक असल्याचं मी भासवलं असेल. पण काहीतरी आत हललं नक्की होतं आणि त्या कोपर्‍याला श्रवणाने साद घालूच नये, असं प्रामाणिकपणे वाटतं होतं. त्याच्याप्रति असलेलं कुठलंच कर्तव्य मला पार पाडता आलं नाही किंवा मी पाडलंच नाही.
मग आता कुठल्या हक्काने मी त्याच्या सादेला प्रतिसाद द्यावा? फक्त जन्म दिला होता म्हणून?

ओनू, आपला डिव्होर्स होण्याआधी, तुझ्या माघारी, मी आणि मेघना भेटलो होतो.
मेघना खूप मोकळी झाली माझ्याजवळ तेव्हा, रडली, सारी सारी दु:खं सांगितली, तू तिच्या जीवनात आल्यामुळे तिला मिळालेलं समाधान सांगत होती. श्रवणला कसं हृदयाशी ती जपून ठेवेल, हे सांगितलं.
तिच्या वागण्यात तसूभरही खोटेपणा नव्हता.

तो काळ आयुष्यातला फार वेगळा काळ होता. वय तरूण होतं. मी मानी होते. तू मनाने मला केव्हाच त्यागलं होतंस, मेघनाचा झाला होतास. माझ्या हाताशी नोकरी नव्हती, पोटगी मी घेणार नव्हते, श्रवणला सोडायला तू ही तयार नव्हतास, मेघनाकडे तो सुरक्षित राहणार होता. झालं.... घेतला निर्णय. पण-
पदोपदी ह्या निर्णयाने त्रास झाला तुझ्यासाठी नाही, तर श्रवणसाठी मन मागे रेंगाळायचं, अन् पदोपदी मन कठोर होत गेलं.
कणाकणाने बदलत गेले.
अधिक कठोर अधिक रु़क्ष.
त्यात माधव भेटला... त्याच्यामुळे तर जगणं आहे तसं स्वीकारायला "सहज" जमत गेलं.

आज वाटतं...
मेघना कोण होती?
तिला मी भेटले तेव्हा मला तिचा राग का नाही आला?
तुला, श्रवणला ती जपेल असं म्हणत, माझ्याच संसाराच्या काडीमोडाला मी होकार कसा देऊ शकले?
आज ह्या घडीला, मी श्रवणची जन्मदात्री असूनही मला त्याच्यावर मेघनाचाच हक्क आहे असं का वाटत रहातं?
निखील, जेसिका, माधव हे जास्त जवळचे वाटतात, पोटच्या पोरापेक्षाही?

मला मागून मिळालेलं प्रेम नकोच असावं बहूधा.
मला देता आलं तसं मी दिलं, ते कुणाच्या व्याखेत कधी अजिबात बसलं नाही, तर कधी फार चपखल बसलं.
मी दूर व्हावे अशी मागणी नात्यांनी केली, मीही हट्टाने नाती धरून नाही ठेवली ... सोडून दिली.
आणि खरं सांगते, ठराविक काळानंतर त्याचा त्रासही होईनासा झाला.

आपल्यासमोर दोन पर्याय फेकून, खरा निर्णय परिस्थीतीच घेत असावी.
आपण निमूट चालायचं.
शेवटी पोहोचण्याचं स्थळ जरी सगळ्यांसाठी एकच, तरी प्रत्येकासमोर मार्ग मात्र दोन.
सगळं जुळून आलं, तर आपण जगण्याच्या राजमार्गावरून जाऊ.
नाहीच, तर मात्र खडबडीत पायवाटा.

रक्ताची नाती फक्त साद घालतात, गरजेला माणसांची मागणी करतात...
प्रेमाने जुळून आलेली, सहवासाने गहिरी झालेली नाती, निरपेक्ष असतात. काहीही न मागता, सर्वस्व देतात.

आज मला विचारलंस, तर मला जीवनाप्रती तक्रार नाहीच.
त्याउलट जगण्यानं फार शहाणपण दिलं.

मी फार दिवसांची सोबती नाही.
पण खरं सांगू,
आपला अंत असा माहिती असला की बरं असतं, उगाच अनपेक्षिततेचं सावट रहात नाही.

मी माझ्यावर कधी कुणाला अवलंबून ठेवलं नाही. माझ्यावर निर्भर ठेवून एखाद्याला पंगू जगणं द्यावं, हेच मुळात मला मान्य नाही. प्रत्येकाने स्वतंत्र जगावं, हेच कायम वाटत आलं, तसच मी जपलंही.
आणि ह्या घडीला मन कुठेच गुंतलेलं नाही, निखीलला जेसिका मिळाल्यापासून तर अधिकच समाधान आहे.

ज्या सार्‍या पाशांतून सुटले आहे, आता नव्याने कुठले जखडून घ्यावेसे वाटत नाहीत. तसंही पाशांमध्ये मन गुंतवण्यासाठी ना माझ्या हातात वेळ आहे, ना इच्छा.

निरपेक्ष, निर्लेप मन सुख देतं.
आता, ते तसंच रहावं!

-मानसी.

==================================

डॅड,
हे पत्र वाचल्यावर मी हललो. हादरलो.
मी तिला भेटलोच नसतो, तर तिने टेक्सासला थांबून ट्रीट्मेंट केली असती का पूर्ण?

मी नको म्हणून भारतात निघून येणारी मानसी, मी दत्त म्हणून दारात उभा राहिल्यावर, तो क्षण किती सहजतेने स्वीकारते?

आठ दिवस तिनं मला ठेऊन घेतलं, मोकळ्या मनानं राहिली, तिच्या प्रत्येक वागण्यातून मला जाणवत होतं, तिला अनेक वर्ष माझी कमतरता जाणवली आहे. हव्या असलेल्या गोष्टीपासून फक्त 'स्वतःचा शेवट' जवळ आहे म्हणून ती धावतेय का? की ती मुळातच अशी आहे?

तिने माझ्याप्रती कुठलीच कर्तव्य केली नाही म्हणते, मग मी आय.सी. यू. मध्ये भेटायला जाताच, माझ्या नावाने ती तिचं घर करून ठेवलंय असं सांगते,
एके काळी पोटगी न घेतल्याने मला सोडून जाणारी ती, आज तिच्या आई वडीलांच्या आणि तिच्या स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेल्या श्रीमंतीचा हिस्सा मला देऊ इच्छिते, ही त्या कर्तव्यांची भरपाई करावी वाटते का तिला?

का नाती इतकी गुंततात.

मला नको तिचं घर, पैसा.
तीच काही काळ अजून हवी आहे.
आई म्हणून नसली तरी, हक्काची जवळची व्यक्ती म्हणून.

--------------------------------------

पत्र क्र. २०

Dad,
This is another letter, by Madhav to Manasee.
See the understanding they had... see the bond they had shared... and ... can't say anything, few facts have made me speechless.

-------------------------------------

प्रिय मानसी...

माझ्या स्वभावाच्या अगदीच विरोधात जाऊन हे पत्र लिहीतोय.
आता या मिनीटाला तू कुठल्यातरी पुस्तकात पार हरवून गेली आहेस. वाचताना मधेच कुतूहल येतं तुझ्या चेहर्‍यावर तर कधी स्वतःशीच हसतेस, कधी उसासे. इतकी तल्लीन होऊन वाचते आहेस, तेव्हा अनेकदा पारायणे केलेली रणजित देसाईंची "स्वामी" च वाचत बसली असशील.
तू काही वाचत असताना तुला वाचायला मला फार आवडतं...
समोर ठेवलेली कॉफी पार निवून गेली आहे.. आता लक्षात येईलच तुझ्या, पुन्हा ती गरम करून घ्यायला उठशील तेव्हा, स्डडी मध्ये टेबलाशी मी काय खुटपूट करतोय हे डोकावून जाशील

किती वर्षे झाली गं सोबत आपल्याला?
किती जाणतो आहोत एकमेकांना...

हे पत्र हाती पडल्यावर तुला विश्वास होणार नाही. "माधवाचं पत्र?" म्हणत कितीतरी वेळ लिफाफा हाती धरून बसशील, ह्या माणासाने पत्र वगैरे लिहीलंय म्हणत स्वतःला नीट एकवटशील आणि दिवसभरातल्या सगळ्यात निवांतवेळी पत्र वाचायला घेशील. घाई, धसमूसळेपणा, अधाशी होणे म्हणजे तू नाहीसच.

मानसी,
हे पत्र जपून ठेव.
जेव्हाही उदास वेळी "आपण चूकलो होतो का?" असं वाटत राहिल, पत्र उघड, वाच.. नि:शास टाक.
परतून शांत हो.

हा प्रश्न अधे-मधे सतावतो तुला, तेव्हा तू सबंध दिवस अस्वस्थ असतेस, माझ्याशी बोलून हवी असलेली उत्तरं मिळाली की समाधानी मनाने झोपतेस. माझ्या माघारी कोण ही उत्तरं देईल?
म्हणून हा प्रपंच.
कदाचित अजून काही वर्षांनी तुला हा प्रश्न पडणारच नाही, इतकं तू आयुष्य आहे तसं स्वीकारलेलं असशील.
पण, कधी सहज काही संदर्भ तपासून पहावे वाटाले, तर म्हणून का असेना, असू दे तुझ्याजवळ, माझ्या मनातलं काही.

मानसी,
उत्तरं कधीच बदलत नाहीत.
एखादी घटना घडली, की आता नेमकं काय करायला हवं आहे, ते अगदी आपल्याकडून पुढच्या सेकंदभरात ठरलेलं असतं. मग उरते ती फक्त ठरवलेल्या गोष्टीची पूर्तता.
असं असूनही आपण घेऊन गेलेल्या निर्णयाला कधी कधी पुनःपुन्हा आपल्याचकडून आपल्यालाच स्पष्टीकरण हवं असतं.. मानवी स्वभाव, बाकी काहीच नाही.

जगणं म्हणजे एक अखंड प्रक्रिया.
त्यात आपल्याशी निगडीत प्रत्येकाच्या भावविश्वाचा विचार करत जगतो तेव्हा ती प्रक्रिया अधिक जटिल होते.
ती जितकी सोपी करत जाऊ, तितका मनाचा कठोरपणा वाढतो.
माणासांचा वापर करून घ्यायला शिकलात, की जगात निभाव लागण्याचं प्रमाण कैक पटीनं वाढतं
बदल्यात तुमचा वापरही होतो, मग कुरबूर नाही करायची.
"मला काय पाहिजे" ते कळणं, आणि ते मिळवण्यासाठी अशा सगळ्या प्रकारांचा वापर करणार्‍यांचं मला फारसं कौतुक वाटत नाही आता.
पण, एखाद्याला काहीतरी पाहिजे, तो आपल्यासमोर येतो, आणि आपणही त्याला मदत करतो, ह्या वृत्तीचं मला आश्चर्य वाटतंच वाटतं. पुन्हा त्या मदत केलेल्या गोष्टींची शेखी न मिरवणाराही विरळा.

तो दिवस आपण कसे विसरू?
मी तुला भेटायला आलो होतो.
तू माझी कुणीही नव्हतीस.
मी तुझा कुणीही नव्हतो.
पण; मी तुझ्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला.
परिस्थीती?
की,
स्वार्थ?

तसं म्हटलं तर तू अगदीच कुणाच्या इच्छेखातर त्या व्यक्तीच्या मनासारखं वगैरे वागण्यातली नाहीस. सारासार विचार करून तुझ्या मूल्यांच्या आणि तत्वांच्या विरोधात नसलेल्या गोष्टीच तू स्वीकारतेस.
विचाराअंती तू ही प्रस्ताव स्वीकारलास.

आपण एकत्र आलो.
दोन अगदीच अनोळखी, लाईफ पार्टनर.

म्हणतात, दुधाने तोंड भाजल्यावर वगैरे, इथे आपणच भाजलो होतो. अशावेळी भावनाप्रधान निर्णय घेण्याची शक्यता अशीही कमी होते. आपण सावध होतोच, म्हणूनच वास्तववादी निर्णय घेऊ शकलो.

तुझं कौतुक ह्यासाठी वाटलं, की एका नात्यातून सुटल्यानंतर दुसर्‍यात अडकण्यासाठी तुझा ठाम नकार होता, माझाही. तेव्हा गरज म्हणून एकत्र येताना आपण इतर विवाहीतांसारख न जगण्याचा प्रस्ताव तू ठामपणे मांडलास, मला तो सर्वाथाने पटला.

आपल्याला, प्रेमापे़क्षाही, कायम सोबत असणारी मैत्री हवी होती.
ती मिळवता आली.
आज एकमेकांना इतके ओळखतो..
एक खेळकर नातं आयुष्यभर सोबत राहिलं.
मानसी,
जगताना सुख दु:खाची भिती नसते. सुख अनुभवायला आणि दु:ख वाटून घ्यायला हक्काचं कुणी नाही ह्या विचाराने खरा खचतो माणूस.
इथे आपण एक हक्काचं नातं मिळवलं..
थोडक्यात, करार केला. डोळसपणे आणि तो फार योग्य ठरला.

माझ्या भूतकाळामुळे एक ल़क्षात आलं होतं. कितीही घट्ट नातं ताटकन उसवू शकतं, कुठून, कसं, कुठे नाही सांगू शकत कोणी. पण असं घडतं खरं, अनेक वर्षे एखाद्याबरोबर घालवल्यानंतर त्या व्यक्तीला आपण पुरेपूर ओळखतो असं वाटतानाच एखादा प्रसंग त्या व्यक्तीला विचित्र वागवतो, आणि कधीच न जाणवलेला स्वभावाचा एखादा कंगोरा दिसतो, घडल्या प्रकाराने आपण हतबुद्ध, दि:ग्मुढ असेपर्यंतच त्या व्यक्तीचं बर्‍याचदा आपल्यापासून दुरावणंही घडतं!

मग विश्वास कशावर असावा?
व्यक्ती, त्याच्या वागण्याच्या पद्धती, आपला स्वभाव, त्याचा स्वभाव? नाही.
स्वतःवर!
कुठलेही धक्के पचवू शकण्याच्या आपल्याच क्षमतेवर.

प्रत्येकजण वेगळा आहे, त्याचा स्वभाव, त्याचे गुण, तसे त्याचे दोषही.
एखादा "आपला" आहे, म्हणून त्याने अमूक तमूक प्रसंगात आपल्या अपेक्षेनूसारच वागायला हवंय, हा आपला आपल्याही नकळत तयार झालेला समज असतो, अपेक्षा असते, तिला तडा गेला, की विश्वासाला तडा गेला असं म्हणायला आपण मोकळे. हा असला अपे़क्षाभंग म्हणजेच आपल्याला वाटणारा विश्वासघात...
असं गुंततं सगळं एकमेकांत.

तुझा माझा संसार किती हसरा आहे. तसं पाहिलं तर तुझाही काडीमोड झालेला. माझाही.
आपण त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हतो.
आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत.
काय जुळतं? मन, भावना, वृत्ती, स्वभाव? नाही.
आयुष्य जगण्याच्या व्या़ख्या. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याची समान दृष्टी.
एकमेकांमध्ये असलेल्या कमतरतेवर बोट ठेवण्यापेक्षा आपण ज्या व्यक्तीमुळे पूर्ण होतो त्याच्या अस्त्तित्वाला दिलेलं महत्त्व!

मी माझं आजारपण लपवून ठेवलं नव्हतं. ते मलाच फार उशीरा कळलं होतं, त्यात बायकोला दिवस गेले होते.
मानसी,
प्राक्तन, नशीब असल्या शब्दांवर माझा विश्वास नाहीच.
आपल्या समजेच्या बाहेरील गोष्टींना आपण दिलेली ही नावे आहेत.

ह्या मिनीटाला मागे वळून पाहिलं, तर भूतकाळ दिसतो.
जरा स्थिर उभा राहिलो की वर्तमान.
भविष्याचं काय?
निव्वळ अन्सर्टनटी. अनिश्चितता.
एखाद्या रम्य रस्त्यावर आपण भटकायला निघावं अन् अंगावर काहीतरी पडून आपण गारद व्हावं!
डोळ्यातली स्वप्ने, मनातल्या इच्छा, क्षणभरात गुंडाळून बाजूला.
कशाच्या जोरावर आपण बेत आखलेले असतात?
त्या अनिश्चिततेच्याच.
"सगळं काही मनासारखं होईल" ह्या जपलेल्या आशेच्या.

"अपत्य"
हे स्वप्न असावं प्रत्येकच जोडप्याचं! ते आमच्या बाबतीत साकार होत असताना, मला आणि बायकोला माझ्या आजारपणाबद्दल समजलं!
मुल सुदृढ असावं त्याला माझा सहवास नको म्हणून ती माहेरी निघून गेली. त्या मिनीटाला, तिच्या पोटातल्या न उमललेल्या जीवाने माझ्यावर मात केली. अनेक वर्षे आमचा केलेला संसार त्या येणार्‍या जीवापुढे क्षुद्र ठरला.
मी एकटा पडलो.
स्वतःच्या कुठल्या इच्छा किंवा गरजांना जास्त महत्त्व द्यावं, हे मेघना मला जाता जाता शिकवून गेली. तिच्या आई- वडीलांचा ह्यात सहभाग होता. माझ्यामुळे तिचं व बाळाचं आरोग्य कायमचं खराब होण्याच्या शक्यतेला त्यांना संधी द्यायची नव्हती.

कोण चूक, कोण बरोबर?

प्रत्येक निर्णयाला किती कंगोरे असतात. किती दृष्टीकोन.
आपल्याला आपलाच चष्मा प्यारा असतो, त्यातूनच आपल्याला स्वच्छ दिसत असल्याची खात्री असते.

"जन्मण्याआधीच तुमचं पोर गेलं!"
इतकीच एक बातमी मिळाली. मेघना नाहीच.
आणि मेघनाला ना नवरा ना मुल मिळालं!

पुढे मेघना आणि अनुराग एकत्र आले.

आणि मी तुझ्याकडे आलो....!
मनुष्य सारखा नाही, पण भावना ज्या जगभरात वावरतात त्या समान आहेत, त्या जाणवून घेण्याची तीव्रता फक्त भिन्न.

मला मुल दत्तक हवं होतं!
जे अस्तित्त्वात नाही असं सांगून मेघनाच्या आई वडीलांनी एका अनाथालयात नेऊन ठेवलं होतं, तेच!
जे अनाथ नव्हतं, तेच!
मला त्याचा हक्कही हवा होता आणि मेघनाला कळूही द्यायचं नव्हतं!
त्याची दोन कारणे होती.
मेघना- अनुराग, श्रवण बरोबर खुष होती, तिचा संसार सुखाचा सुरू होता.
माझ्या ज्या मुलापायी तिने मला त्यागलं होतं, ज्याच्या जिवंत असल्याची खबरही तिला नव्हती, त्या आम्हा दोघांना आता स्वतंत्र जगायचं होतं!

त्या मुलाला आई-वडील असावेत, ह्या सदिच्छेने, कोर्टात सादर करताना योग्य पेपर्स असावेत, ह्या माझ्या स्वार्थासाठी मी तुझ्या पुढ्यात उभा होतो मानसी, लग्नाचा प्रस्ताव घेऊन.

तू तो स्वीकारलास. निखीलची आई झालीस...

तुझं मुल मेघनाच्या पदराखाली होतं, तिचं तुझ्या!
तुझ्यातल्या डोळस "आईने" मला कायमच स्तिमीत केलंय.
तुझ्यातल्या मातृत्त्वाने माझ्यातलं नवरेपण कधीच जिंकलंय.

निखील चालू लागला तेव्हाची गोष्ट असेल ना ही-
आपण केलेल्या कोर्ट मॅरेजचा कागद मी जाळून टाकत होतो, तू माझ्या बाजूला उभी होतीस..
मला विचारलंस तू.. "केलंस मला मुक्त?"

मानसी,
तू मुक्तच होतीस.
आहेस.
त्या कागदाला नष्ट करून मी स्वतःला सोडवून घेतलं, कधी-कधी आपण नवरा- बायकोसारखं वागवं ह्या उर्मीला कायमसाठी दडपवावं म्हणून मला तसं वागावं लागलं, नंतर तुझं माझं नातं आणखीच उमलत गेलं आहे... कारण तुला बायको म्हणून बघणं संपलं. आजही तुझ्यातली खेळकर, समंजस मैत्रिण मला भूल पाडते.
तास-न-तास कुठल्याश्या पुस्तकावरच्या चर्चा, एखादा नवा खाद्यपदार्थ दोघे मिळून करण्याची धडपड, निखीलचा अभ्यास हे सारं तुझ्यासोबत करताना जगणं आकर्षक झालंय.

माझ्या आजारपणामुळे आलेल्या मर्यादा तू पेलतेस,
निखील तुझ्या हाती फार सुखरुप आहे. माझं भावविश्वही.

एकच रूखरूख आहे... तुझी श्रवणशी गाठ-भेट. (हा विषय जरी काढला तर तू बोलू देत नाहीस)
पण त्याची तुझी भेट व्हावी एकदा..
तुझ्या मातृत्त्वाला पूर्णत्व यावं!
माझ्या समोर नाही, तर निदान माघारी तरी.

आपल्याला दु:ख हवीच असतात, ताजी नाही मिळाली की आपण जुनी उकरत बसतो... तसं झालंच कधी तर पुन्हा हे पत्र वाच!

काहीही चुकलेलं नाही, परिस्थीतीने खेळ खेळलेत हे ध्यानी येईल. तू शांत होशील.

-तुझाच
माधव

----------------------------------------------------------------

डॅड,
काहीही न मिळता सगळं मिळालंय, असंही वाटतय.
आणि डोळयासमोर सगळं संपतय असही वाटतंय...

निखीलचा व्हिसा इतक्यात होत नाही आहे.

मला डॉक्टर आत बोलवत आहेत.
मी येतो...

लव्ह यू डॅड.
-श्रवण.
-----------------------------------

(समाप्त)

my page- #बागेश्री
https://www.facebook.com/Bageshree

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरुवात केलीयसं हं.. रियाच्या धमकीला प्रेमळ पाठिंबा Happy
रच्याकने.. गुंतागुंत पण लिहीणार ना पुढे?

>>त्.टी: वॉचमनला विचारलं, तुझा लेटर बॉक्स नं. १२, तिथेच टाकतो आहे हे पत्र.
माझा २९
बाय द वे, टेक्सासमध्ये स्वागत आहे..>> हे खटकले.
टेक्सास मधे वॉचमन असलेली कम्युनिटी - म्हणजे अपस्केल- अशा ठिकाणी असे वॉचमनला विचारुन लेटर बॉक्सचा नंबर मिळणार नाही. लेटर बॉक्सही पोस्टल एम्पॉइ व्यतिरिक्त कुणाला उघडता येणार नाही अशी सिक्युअर्ड असणार. इथे वॉचमन नसलेल्या साध्या अपार्टमेंट्सच्या मेल बॉक्स देखील सिक्युअर्ड असतात आणि असा मेल बॉक्स नं. कॉम्प्लेक्सच्या ऑफिसमधे चौकशी केली तरी मिळणार नाही.

या बागीला जुने क्रमशः पुर्ण केल्याशिवाय नवे भुंगे सोडायला परवानगी नाकारायलाच हवी Wink

बागे ही तरी पुर्ण कर देवी. Happy

या बागीला जुने क्रमशः पुर्ण केल्याशिवाय नवे भुंगे सोडायला परवानगी नाकारायलाच हवी
>>
याला अनुमोदन + स्वतःच्या मित्राला वर्तुळातून सुटायला सांगा आधी जाऊन Proud

स्वतःच्या मित्राला वर्तुळातून सुटायला सांगा आधी जाऊन >>>> भुमितीय कथा लवकर पुर्ण होत नाहीत असा सिध्दांत बहूतेक तूच मांडला होतास ना ! Happy त्रिकोण, वर्तुळ.. Proud

अविनाश Proud
रिया, चाफा Lol

काही दिवस माबो चा टच काय गेला, सगळं बाऊंसर जायला लागलंय Happy

पत्रकथा वाचक मित्रांचं स्वागत...दुसरं पत्र पोस्टेड!

चनस, रिया, भानू
डायरेक्ट फोर्थ गिअरला नाही पळवू शकत ना गाडी... Wink
आता कुठे पहिला गिअर पडलाय
मानसीनं पत्रव्यववहाराला/संवादाला होकार दिलाय, पाहूया अनुरागराव काय म्हणतात ते, उद्या....!

तुझ्यातली निर्लेपता जीवघेणी आहे मानसी.... असं वागत राहिलीस तर आयुष्यातला एक एक माणूस गळून पडेल.. एकटी राहशील... एकटीच राहून जाशील.
>>>
बास! जीवघेणं वाक्य आहे हे! याचीच मलाही भिती वाटते अनेकदा Sad

काही तरी भन्नाञ वाचायला मिळणारेय! पक्का!
वेटींग!!!!

<<<<<<<तुझ्यातली निर्लेपता जीवघेणी आहे मानसी.... असं वागत राहिलीस तर आयुष्यातला एक एक माणूस गळून पडेल.. एकटी राहशील... एकटीच राहून जाशील.>>>>>

अशी निर्लेपता जपता येणं महत्वाच...एकटं काय ग अतः पासून ईति पर्यंत असतोच की आपण प्रत्येकजण !

आवडेश !

हा " क्रमश: " कायमचा काढुन नाही का टाकता येत????>> सुखदा त्यासाठी सॉरी.. पण भरभर टाकतेय की भाग Happy

मस्त आहे लिखाण. आणि इथेच पुढचे भाग टाकताय हे पण चांगले आहे, उगाच शोधाशोध / दुवे देणे करायलाच नको.
यंदाची गणपती उत्सवातली स्पर्धा जणू आपल्यासाठीच Happy
For your ready reference please http://www.maayboli.com/node/44947

अनू..
घे पत्र चार व पाच एकत्र..

हर्पेन, थँक्स...
काही छानसं सुचलं तर लिहेन पक्का Happy

Pages