सारे जुनेच आहे काही नवीन नाही. . . (तरही)

Submitted by इस्रो on 1 September, 2013 - 09:43

देशात आज उरला, सच्चा धुरीण नाही
सारे जुनेच आहे, काही नवीन नाही

चि़खलात जन्म घेई, हे कमल फुल तरीही
पावित्र्य कधी तयाचे, झाले मलीन नाही

शिकला कधी न शाळा, त्याचे दुकान आहे
पदवी असूनही मी, बनलो अमीन** नाही

जोडायचे पुन्हा की, तोडायचेच नाते
हा प्रश्न आपुला गं, न्यायालयीन नाही

पटणार ना कुणा हे, पण सत्य हेच आहे
येथे कुणी कुणाचे, भाऊ बहीण नाही

कण एक मी धुळीचा, हे मानतो परंतू
मी आजही हवेच्या, झालो अधीन नाही

-नाहिद नालबंद
[९९२१ १०४ ६३०]
---------------------------------------------------------------------------
शेवटचा शेर हा मूळ शेराचे मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे.
कुणाचा आहे माहित नाही. ज्यांचा आहे त्यांची क्षमा मागून-
मूळ शेर -
"माना के मुश्ते खाक बढकर नही हू मै,
लेकिन हवा के रहमो करम पर नही हू मै"
--------------------------------------------------------------------------
**(अमीन = न्यायाधीश किंवा मोठा अधिकारी)
--------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषांतराचा शेर फार छान झाला इतरही छान
(ण व न ही अक्षरे अलामतीनंतरेची न बदलणारी अक्षरे म्हण्नून चालतात का असा प्रश्न पडतो मला Happy )

ण व न ही अक्षरे अलामतीनंतरेची न
बदलणारी अक्षरे म्हण्नून चालतात का असा प्रश्न
पडतो मला >>+1
माझ्या एका गझलेबाबत हाच प्रश्न पडलाय मला .

@खुरसाले साहेब काही दिवसापूर्वीच मझ्या हाती आलेल्या नव्या माहितीनुसार काही व्यंजने अश्याप्रकारे वापरणे काही जण सूट मानतात जसे ट-ठ , श-ष , पण मला हा मुद्दा पटला नाही मी इथे प्रश्न केला कारण नाहिद भाईंसारख्या ज्येष्ठ गझलकाराचे मत जाणता यावे म्हणून Happy
ण व न बाबत : मला ज्या मित्राने ही माहिती दिलेली त्याने असे सांगीतले की चालते म्हणून !: Happy

वैभवजी, सुशांतजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ण व न ही अक्षरे अलामतीनंतरेची न बदलणारी अक्षरे म्हणून चालतात की नाही याबद्दल मलाही ठामपणे सांगता येणार नाही. तशा प्रकारच्या एक दोन गझल वाचनात आल्या होत्या. त्यामुळे माझी अशी समजूत झाली की असे चालते त्यामुळे मीही लिहलं.

* * * जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती * * *

जोडायचे पुन्हा की, तोडायचेच नाते
हा प्रश्न आपुला गं, न्यायालयीन नाही>>>>> मस्त!

पटणार ना कुणा हे, पण सत्य हेच आहे
येथे कुणी कुणाचे, भाऊ बहीण नाही>>>>> सत्य परिस्थिती!!! Sad