भिकारी पाहिलेला माणूस..

Submitted by तनवीर सिद्दीकी on 31 August, 2013 - 00:06

मी काही तरी वाचत बसलो होतो. इवलीशी-मोठीशी पिवळी -हिरवी अगणिक झाडे जास्त-मध्यम-संथ वेगाने पुढे सरकत होती.समोर आमच्या मातोश्री सकाळच्या वाचलेल्या पेपरावर काकडी कापत खिडकीबाहेर निसर्ग सोंदर्य टिपत होत्या....बाबा बाजूच्या सीटवर आडवे होवून कुंभकर्णाच्या व्यक्तिमत्वाची लोकांना आठवण करून देत होते..अध्ये - मध्ये दिसणाऱ्या गाई - म्हशी, कोठेतरी डबक्यात पोहणारे बगळे, धावत्या नजरेत शेतीतून डोकावणारी फळे..भाज्या चटकन मातोश्रींना माहेरची - गावाची आठवण करून देत होत्या..त्या माझ्या वाचनात खंड घालत होत्या इथपर्यंत तर ठीक होते पण येत्या उन्हाळ्यात गावाकडे जायचंच असा 'ठराव' ही आमच्या कुटुंबाच्या वर्तमान अर्थ मंत्र्याकडून म्हणजेच खुद्द माझ्याकडून 'पास ' करून घेत होत्या..मी स्मित हास्य देत एकेक दृश्याची स्तुती करत ( आणि मनात लाखोली वाहत ) सांगता करत होतो आणि सध्याच्या चित्रपट सृष्टीतील नट - नट्यांनाही लाजवेल असा उत्कृष्ट अभिनय करीत 'मी वाचनात फार मग्न आहे' असा अविर्भाव वारंवार आणण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या अभिनयाबरोबर एका चित्रपटाच्या कथानाकाप्रमाणे भरपूर गोष्टी काळाच्या ओघात पण वेळेच्या वेगात पुढे - पुढे सरकत होत्या - जशी मातोश्रींची प्रवास वर्णने, वाटेतील बोगदे, स्वत:च अंग सुकवत शांत पडलेल्या नद्या, छोटी मोठी घरे, अनोळखी रास्ते..ओळखीची स्टेशने..........मुंबई आमच्या दिशेने जवळ सरकत होती......

भारतीय सैन्य प्रमाणे कामात आणि सुट्टी मिळण्यात फार मोठ्या जोखमीची माझी नोकरी असल्याने आणि फार खटाटोप ना करता सहजच रजा मंजूर झाल्याने काही का असेना फार दिवसानंतर मुंबईत येणे हा मोठा दैवयोगच असल्याने माझी स्वारी फार आनंदात होती. एखाद्या मित्राने पार्टीची फुकट ऑफर दिल्यावरही जशी आपण 'कोण कोण आहे? ' अशी आगावू चौकशी करतोच ना तशी मुंबईत जाताना आपली आगगाडी कोठे-कोठे थांबेल याची मला जाम काळजी !!! माणसाने प्रवासात एकवेळ ज्ञान प्राशन केले नाही तरी चालेल पण प्रत्येक ठिकाणाचे प्रसिध्द अन्न प्राशन जरूर करावे अश्या मताचा मी माणूस!!!! त्यामुळे येत येत नागपूरची संत्री..नाशिकची द्राक्षे वगैरे ढोसत आता मन कर्जतच्या वडापावची वाट पाहत थांबले होते........

अचानक गाण्या - वाजवण्याचा आवाज आला....

कलयुगात पैसे कमविणे हे श्वास घेण्या इतके महत्वाचे!!!!....जन्माला आल्यापासून थडग्यात जाईपर्यंत माणसाचे दैव त्याच्या पूर्वजांनी पेरलेल्या किंवा आई वडिलांनी कोरलेल्या नाहीतर अमक्या तमक्या ग्रहांनी - देवाने चिरलेल्या हातच्या - माथेच्या रेघाच त्याच कर्तुत्व ठरवतात अस म्हणतात आणि याबद्दल जास्त वादही नसावेत.. स्वत:च्या कर्तुत्वाची आयुष्यभर जगासमोर परीक्षा देत जगताना मिळणारी मिळकत म्हणजे पैसा होय...मग ते कोणी वारासाहाक्काच्या जमिनीवर हक्क सांगून कमवतो, कोणी १०-१५ मोठी पुस्तके वाचून -लिहून बनवतो, कोणी उन्हा-तान्हात खडी फोडत मोजतो तर कोणी त्यासाठी रस्त्यावर भांडी विसाळताना ही दिसतो...

असाच या स्पर्धक जगात स्वत:चा कर्तुत्वाची परीक्षा करणारा एक अदभूत व्यवसाय आहे - भीख मागण्याचा......

याला व्यवसाय म्हणणे बरोबर की चूक हा ही एक खरतर परिसंवादाचा प्रश्न आहे..कारण एखाद्या पूर्वनियोजित धंद्याप्रमाणे या तही पद्धतशीर भांडवल टाकून आपल्या 'कला' विकण्याची कसब मी पहिली आहे....

एका लहानश्या लोखंडी रिंगणातून एक पाच-सहा वर्षाची चिमुरडी पडत धडपडत ट्रेनमध्ये उद्या मारून दाखवत होती. तिच्या या कार्यक्रमातील भागीदार आणि उंचीला तिच्याहून अर्धा फुट मोठा एक पोट्ट्या दोन रस्त्यावरच्या सपाट किरकोळ झप्प्या घेवून काहीतरी पण सुरेख वाजवत होता. मध्येच हलणाऱ्या आणि अचानक संथ होवून धक्के मारणाऱ्या ट्रेनमध्ये ते दोघे इथे तिथे पडतही होते. आडव्या सीटचा मधला दांडा कोपराला लागून त्या चिमुरडीला लागल्यावर तिचा दोन सेकांदापुरताचा बालिश रडवेला चेहरा चित्रागुप्तानंतर फक्त मीच त्या ट्रेनमध्ये बहुधा पहिला असावा!!!!!!! सर्वजन मात्र त्या सर्व मजबूर धिंगाणा खूप मजा घेत होते...... त्याच्या विचित्र हालचालीवर खिदळत होते....'क्या बात है!!' म्हणत कोणी फुकटच दाद देत होते तर ' आगे जाव रे, नसती कटकट यांची....' म्हणत त्यांच्या वयोमानानुसार मोजल्यावर उत्कृष्ट अशा प्रदशर्नाची वास्तवातली 'किंमत' सांगत होते.....

मागून एक १०-१२ वर्षाचा पोरगा अर्धनग्न, आपल्या शरीरावरचा मळका - फाटका शर्ट काढून डब्यातल्या लादीवरचा कचरा पुढे ढकलत- साफ करत येताना दिसला....कुणाच्या इकडे तिकडे सरकलेल्या बैगा सावरत - उचलत त्या खाल्चीही घाण 'कवर' करत - चपला बूट वाचवत पुढे पुढे सरकत होता...

पुढे कवायत करत असलेले हे 'बहिण भाऊ' त्या हिशोबानेच पुढे होत होते..मध्येच कोणीतरी अतिशहाणा अजून हातातल्या शेंगदाण्याची टरफले खाली टाकून ' इसको भी झाड ले बे ' अशी ऑर्डर सोडत होता तर कोणी त्या कवायत वाल्या पोरीला धरून तिच्या तोंडावर रंगवलेल्या मिश्या, गालावर लावलेल्या लालुकडे बघून चेष्टा करीत होता..'यासाठी बरे पैसे भेटतात यांना!!' असे टोमणेही येत होते....

खरी कसोटी आता त्या गर्दीत भिकारी ओळखण्याची होती!!!!!!!!!

कर्जत स्टेशन हळूहळू जवळ येत आहे अशी त्या तिघांना सवयीप्रमाणे आमच्या अगोदर जाणीव झाली..कवायत वाल्या भाऊ बहिणीने कवायत थांबवली..कचरा साफ करणाऱ्या थोरल्याने पूर्ण कचर एकत्र करून पद्धतशीरपणे दाराबाजुच्या बेसिन खालच्या कचरापेटीत टाकला..आपला 'भांडवली' शर्ट पुन्हा अंगावर चढवला...आणि एक रांगेत तिघे सर्वांकडे थांबत एक हात कायम पुढे ठेवत..आणि एक हात पोटावर चिकटवत - उपाशी उदराचा खड्डा दाखवत केलेल्या मेहनतीचा मोबदला - आपल्या भाषेत 'भीख ' मागत होते....

'काय होणार रे या देशाच देवा?..' , ' केवढीशी पोरे ही बघा भीख मागतायत!!' , ' काम सांगा करायला तर नाही करणार '', ' माफ कर बाबा' अश्या कितीतरी सूचना, अभिप्राय आणि सल्ले त्या ७२ सिटी 'डोक्यांतून' ट्रेन मध्य कुजट लोखंडी वासाबरोबर वातावरणात विरत होते..पोर पुढे पुढे सरकत होती..जवळपास अर्धा डबा मागून सुद्धा बोहनी न झाल्याने ते चुकचुकत होते..छोटी चिमुरडी आता आता थोरल्याचा शर्ट धरत - घाबरत ( ?) मागे - पुढे पाहत - स्टेशन कडे पाहत बिचकत होती..एवढ्यात माझा नंबर आला...!!!!

मी पाकिटात हात टाकणार एवढ्यात आईने थांबवले..' काही गरज नाही' म्हणून ती पण नजरेने गरजली..मीही मग वरमलो..मग आईने उरलेल्या काही काकड्या त्यांना देवू केल्या ..त्या पोरीच्या डोळ्यात एक भूख होती असे मला दिसत तर होतेच पण तरीही तिने काकड्यांना तोंड मुरडले..ती माझ्याकडे आणि माझ्या खिश्याकडे गेलेल्या हाताकडेच पाहत होती..काय बोलावे हे तिला बहुतेक शिकले गेले नसावे....!!! पण पायाला हात लावून, रडका स्वर आणून ते तिघे मला विनवत होते..मातोश्री आता संतापल्या होत्या..'चरबी बघा किती यांना.!!' म्हणत नाक मुरडत आई सुद्धा आता बाहेर पाहू लागली..गाडी एव्हाना थांबत आली होती..आईने काकडीही रागात प्लेटफोर्म वरच फेकून दिली..ह्या सगळ्या गडबडीत मी मात्र कोशल्याने - न राहवल्याने खिशात हात टाकून जे भेटले ते त्या लहानगीला दिले....ते पाच रुपयाचे नाणे होते...!!!

एका चेंडूत ३ धावा हव्या असताना जशी चीत्याच्या वेगात पहिली धाव क्रिकेट पटू घेतात तेवढ्या वेगात ती चिमुरडी आनंदाने डब्याबाहेर पळाली...काहीतरी जिंकल्यासारखा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता...ती रडत खोटे तर नव्हती ना? अस क्षणभर वाटलंच पण तिला आनंद झाला ना...पुरे..असो....मी तिघांनाच पाहत होतो...आणि मग पाणी घ्यायला खाली उतरलो...पण कुतुहुलाची नजर त्यांच्यावरच होती..चला काहीतरी खातील ते पण बिचारे..!!!...मला स्वत:चा गर्व वाटला...मदत केल्याबद्दल...त्या तिघांना मी एका वडापावच्या गाडीपाशीही जाताना पाहिले..थोडे हायसे वाटले मनाला....पण २ मिनिटापुरतेच ...कारण चित्र काहीतरी वेगळेच होते...

एक धिप्पाड मिशीदार प्राणी तिथे पहिल्यापासून वडापाव खात उभा होता..पिंजरातल्या पोपटाप्रमाणे त्यासमोर जावून ते तिघे थांबले होते. आणीबाणीच्या वेळी पकडल्या गेलेल्या माणसावत त्या तिघांची त्या मिशिधारकाने झडती घेतली...सर्व पैसे काढून घेतले...चार-दोन शिव्या घातल्या..त्या थोरल्या सफाई कारागिराच्या दोन सणसणीत कानाखाली लावल्या..बहुतेक भीख न मिळाल्याची शिक्षा होती ती...छोटा चिमुरडा - चिमुरडी मात्र माराला वाचले होते...बहुतेक माझ्यामुळे..त्या पाच रुपयाच्या नाण्यामुळे..असो काहीही असेल पण मला आता परिस्तिथी कळायला लागली होती.....!!!!

ते कमिशन होते!!!!

त्याच्या मोबदल्यात त्या मिशिधारकाचा रोजचा ठरलेला हिस्सा होता!!!

कसला?..का?...माहित नाही...

त्याला कवायत शिकवण्याचा?

त्याला साफसफाई शिकवण्याचा?...

की आमच्यासारख्यांच्या रोज शिव्या खावून , त्या पचवूनही मग पैसे कमवण्याचा धडा शिकण्याचा?..

माहित नाही...

पण होते.....

''म्हणून ती पोरे घाबरत होती !!!'' - मी पुटपुट्लो.

भुकेसाठी नाही पण त्यांचे कमिशनचे पैसे पूर्ण न झाले तर मिळणाऱ्या मारासाठी..शिव्यांसाठी...

पापण्यातून वाहणाऱ्या हलक्या हलक्या अश्रुमुळे क्षणभर अंधुक दिसत होते....''समोसा पण आण रे'' - बाबा ओरडत होते..मी भानावर आलो..

''हो..हो..आणतो''

काय करू? काय करू?...मनात विचाराचा घोळ झाला..त्यांना पैसे देवू?..समोसा आणून देवू?..काय करू?..ते अजून त्या माणसा समोर 'ऐकत' उभे होते...त्याचा वडापाव खावून होईपर्यंत त्यांना बहुतेक ते भुकेल्या पोटी पाहत आणि ऐकत थांबावेच लागणार होते...एवढ्यात गाडीची शिटी झाली..'बघूया परत डब्यात आले ना तर काहीतरी करू त्यांच्यासाठी' असा मनाशी चंग बांधून मी आत शिरलो...मुद्दामच ३ समोसे ही जास्त बांधून घेतले होते....!!!!!

आत्मा उदास झाला होता...दोन्ही मेंदू एक दुसऱ्याला प्रश्न विचारत होते..नाहीतरी माझ्यासारखा सामान्य माणूस यात काय करू शकतो?....काही बदल आणू शकतो का?...त्या पोरांना हे अस करण्यापासून थांबवू शकतो का?...पण उत्तर एकच आले.....- नाही....काहीच नाही...

अरे जो स्वत:ची राष्ट्रीय संपत्ती - ट्रेन साफ ठेवू शकत नाही..ती चुकून घाण झाली तर ते काम पूर्ण न करणाऱ्या प्रशासनाला काही बोलू शकत नाही..ते स्वार्थ म्हणा..किंवा कमीपणा म्हणा..किंवा काळाची गरज म्हणा..पण एक पोट्ट्या ने साफसफाई केली तर त्यातही त्याला टोमणे मारणे...भिकारी म्हणणे..आवरू शकत नाही...दोन लहान अजाण पोराच्या निदान कसरत समजून तरी कौतुक करू शकत नाही...त्या मिशिवालाच्या रागात जावून दोन थोबाडीत मारू शकत नाही...तो काय करणार?...तो काहीच करू शकत नाही...!!! तो फक्त बडबड करू शकतो..देश खराब झाला अस बोलू शकतो...बाकी काही नाही करू शकत...अरे आपण तर गर्दीतून असे 'अभिकारी' पण ओळखू शकत नाही...फारतर मेहरबानीने २-५ रुपये देवू शकतो....माझ्यासारखे..अजून काहीच करू शकत नाही...

आणि मीही हाच मार्ग स्वीकारला होता..!!

चुकलो की नाही माहित नाही..

तेवढ्यात ते दिसले!! पण ते डब्यात चढलेच नाहीत...!! गाडी हलायला सुरवात झाली...मी त्यांना खुणावत होतो...पण ते मग्न होते...फार मग्न...

माहित आहे ते कश्यात मग्न होते?..

यशस्वी विकासाची वाटचाल दर्शवणाऱ्या वर्तमान पत्राच्या मुखपृष्ठावर चुरगळत आमच्या मातोश्रीने फेकलेल्या काकड्यांच्या वरची माती आपल्या मळक्या हाताने साफ करत ते तिघे त्यांचे वाटे करत होते..एक दुसऱ्याला प्रेमाने भरवत होते...

तीन 'अभिकारी' जेवत होते हो....!!!!!

बहुतेक पुढच्या शिफ्टसाठी तयार होत होते,,,

कसली शिफ्ट?...

अजूनही भीख मागण्याचीच वाटते तुम्हांला?..

तुमचा दृष्टीकोन.....असो...

माझ्या मते मी मात्र तीन 'दगड' काळजाच्या अ 'भिकाऱ्यांना' बघितलंय...आणि त्यांच्या व्यथेत ढिलाई आणण्याचा छोटासा खटाटोप केला एवढंच.....

पण एक गोष्ट सांगेन मी.....

भीख मागायलाही काळीज लागते...आणि मेहनत करून - काम करूनही भाकर नाही भेटली ना तर त्या अवस्थेत 'मागायला' तर लाजही वाटते...आणि हो आता मला कळले की प्रत्येक भिकाऱ्याचा एक हात पुढे आणि एक हात पोटावर का असतो ते..!!!! - कारण त्याला दोन्ही गोष्टी हव्या असतात - पैसे कमिशन चुकवायला आणि भाकर पोटाची आग शमवायला...नाही?....विचार करून बघा...शक्यता नाकारता येत नाही..

...होय ना?....

तनवीर सिद्दिकी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दच नाहीत ..... बरेचदा आपण काय बरोबर अन काय चुक यातच घोळ घालत बसतो. कधी पैसे दिले म्हणुन तर कधी नाही दिले म्हणुन चरफडत बसतो. सत्य काहीहि असो, पण आपण काहीच करु शकत नाही याची हतबलता जास्त वाटते आहे.

कृपया लिहित रहा.

मेरा भारत महानमधिल वर्षानुवर्षे पहात असलेले जळजळीत वास्तव!
शब्दमांडणी अचूक! कुणावरही प्रत्यक्ष बोट न उचलताही बरेच काही सान्गुन जाणारी शब्दरचना. Happy
आपण स्वतः खरोखरच माणूस म्हणवुन घ्यायला लायक आहोत का हा प्रश्न उपस्थित करणारे लिखाण!

असा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

कधी पैसे दिले म्हणुन तर कधी नाही दिले म्हणुन चरफडत बसतो. >> खूप मनातलं!!

तनवीर खूप खूप मनातलं मनापासून लिहीलं आहे... मी कधी तुमच्या कॅटेगरीमधली... (यथाशक्ती यथामती मदत करू पाहणारी), कधी तुमच्या आईसारखी (कशाला फिरतात ही मुलं, नको देऊस त्याना पैसे, एकाला दिले की दहाजण कोंडाळं करतात असं नवर्‍याला फटकारणारी, पासून माफ करो पर्यंत!) आणि मग कधी नाही करू शकले तर अरे द्यायला हवे होते पैसे असं मनातच हळहळणारी!!

तटस्थ राहून कधी विचार करते तेव्हा वाटतं कुठून येत असतील ही मुलं? आईबाबाने वार्‍यावर सोडलेली? पळवून आणलेली? वाट चुकलेली? घरातून पळून आलेली??? कोणास ठाऊक!! आईबापाच्या उबदार सुरक्षित छत्रचायेखाली राहणार्‍या जगातील गोंडस मुलांपेक्षा जगाचे आणि जगण्याचे भान फार फार लवकर आलेली...

नेहमीच वेगळ्या वाटेने जाणारे विषय निवडता ते प्रत्यहीपणे मांडता..\
लिहीत राहा.. पुलेशु

कारूण्यही विकावं लागतं ही मेरा भारत महान मधील सर्वात दुर्दैवी गोष्ट!

वाचुन अस्वस्थ वाटले कारण रेल्वेचा प्रवास नित्याचा, आणी त्यातुन हे अनूभव पण तसेच. कधी मी पण पैसे /खाणे देत होते, तर कधी बाबा द्यायचे. असे अजूनही वाटते की कुठे आहेत हे मंत्री संत्री की जे बड्या बड्या बाता मारुन बालमजुरी आणी बलकांचे हक्क याबद्दल बोलत असतात.

आणी कुठे असतील या निराधारांचे आई वडिल की जे अजुनही डोळ्यात प्राण आणुन आपल्या हरवलेल्या मुलांची वाट बघत असतील. त्यांना काय माहीत असेल की लहानपणी पळवल्या गेलेल्यात आपलेही कुणी असेल्.:अरेरे:

तनवीरजी तुम्ही सामना मध्ये ( उत्सव/ फुलोरा पुरवणी ) मध्ये हॉस्टेल लाईफ वर काही लिहीले आहे का? नाव वाचल्यासारखे वाटले.

विदीपांची पोस्ट कुठयं?>>>>>>.....रश्मी ते विजय देशमुख आहे. मी चुकुन लिहीलं.

मस्त !

नि:शब्द Sad
ड्रीमगर्ल .. अगदी असंच होत.. पण जमेल तितके त्यांना जेवण द्यायचा प्रयत्न करते मी जर मुलं किंवा वृद्ध लोक असतील तर
एकदा असेच डेक्कनला थांबले होते तेव्हा एक आजी-आजोबा आले पैसे मागायला म्हणुन दिले नि मग मागे बघीतलं तर त्यांचा मुलगा-सुन (वय २५-३०) नि नातु आरामात चालतं होते.. राग आलाच Sad

खूपच छान लिहिलंय .
>> तनवीर खूप खूप मनातलं मनापासून लिहीलं आहे... मी कधी तुमच्या कॅटेगरीमधली... (यथाशक्ती यथामती मदत करू पाहणारी), कधी तुमच्या आईसारखी (कशाला फिरतात ही मुलं, नको देऊस त्याना पैसे, एकाला दिले की दहाजण कोंडाळं करतात असं नवर्‍याला फटकारणारी, पासून माफ करो पर्यंत!) आणि मग कधी नाही करू शकले तर अरे द्यायला हवे होते पैसे असं मनातच हळहळणारी!! >> अगदी सहमत dreamgirl तुमच्याशी.

सर्वांचे फार फार आभार. __/\__

ड्रीमगर्ल (सौ. जान्हवी तेरसे)जी, मी आर्या (नयनाजी), आबासाहेबजी, नंदिनीजी, आदिती पुरोहित जी, भ्रमर (मिलिंद माईणकर) जी, स्मीतुजी, शोभा १२३(सुलभा)जी, रश्मी (रिमा ) जी,मुक्तेश्वर कुळकर्णी जी, चनसजी, कवठीचाफाजी, माशाजी, कंसराज( राजेश भारंबे) जी, अदिती( अनु) जी, स्वाती २( स्वाती देशपांडे) जी सर्वांच्या अभिप्रायांनी भरून पावलो.

माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या याचा आनंद !!

@ रश्मी (रिमा )जी, होय. मीच तो !! सध्या सामना पेपरात दर शनिवारच्या फुलोरा पुरवणीत 'हॉस्टेल लाइफ' या थीमवर लिहित आहे. दर शनिवारी एक आठवण.

पुन्हा एकदा आभार __/\__

Pages