निळाई....

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 August, 2013 - 07:43

माझं निळ्या रंगाचं वेड नक्की कधीपासुनचं आहे कोण जाणे पण आहे एवढं खरं...
मग ते निळे आकाश असो, निळा सागर असो, निळ्या डोळ्यांचा राज कपूर असो किंवा माझ्या आवडत्या सुशिंच्या कथेतला निळ्या डोळ्यांचा बॅरीस्टर अमर विश्वास असो. हा निळा रंग माझं सगळं आयुष्य व्यापून राहीलेला आहे हे मात्र खरं !

ग्रेसची एक कविता आहे 'निळाई' !

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

ग्रेसना पण निळाईचे आकर्षण होते का हो? या 'निळाई'च्या आकर्षणातुन अगदी पिकासोसुद्धा सुटलेला नाहीये. सन १९०० ते १९०४ या कालावधीत पिकासोने असंख्य चित्रे केवळ निळ्या रंगात चितारलेली आहेत. त्याच्या आयुष्यातील हे काम 'ब्ल्यु पिरियड' या नावानेच ओळखले जाते. मागच्या वर्षी 'कास'च्या पठारावर पसरलेली नेमोफिला (Nemophila (Baby blue Eyes)) ची पठारावर नजर जाईल तिकडे पसरलेली निळी चादर पाहताना वेड लागल्यासारखे झाले होते. वेड लागण्यावरून आठवले 'प्राण्यांची भाषा जाणण्याची जी कला असते ना तिला काय म्हणतात माहीतीये? .... निळावंती ! आणि ही कला जर नीट जमली नाही, व्यवस्थीत वापरली नाही तर वेड लागते असे एक मिथक आहे. निळावंतीशी कधी संबंध नाही आला माझा पण ही आसमंताची 'निळाई' मला कायमच वेड लावत आलेली आहे. गेल्या महिन्यातील ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यात पुन्हा एकदा या निळाईच्या मोहजालाचा विलक्षण अनुभव आला.

पर्थमधला आमचा दिनक्रम साधारणपणे सकाळी ९ ते ५ ऑफीस आणि त्यानंतर साडे सहा - सातच्या दरम्यान कुठेतरी एकत्रीत रात्रीचे जेवण असा असतो. यावेळी एक दिवस गुरुपोर्णिमेचा असल्याने मी संध्याकाळी गृपबरोबर जेवण घ्यायचे टाळले. राहत्या हॉटेलवरच काहीतरी शाकाहारी जेवण घ्यायचे असे ठरवल्याने ती संध्याकाळ मला स्वतःसाठी देता आली. तिथेच जेवण करायचे असल्याने थोडा उशीर झाला तरी चालेल असे ठरवून कॅमेरा घेवून भटकंतीसाठी बाहेर पडलो. बाहेर पडण्यापुर्वी माझ्या रुमच्या बाल्कनीतून सहज एक नजर बाहेर टाकली. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले होते. इथे दिवस तसा लवकरच मावळतो. त्यामुळे आकाशात संध्येची चाहूल लागायला सुरूवात झालेली होती.

विरघले नभांगण...
बघ निघाला माघारी रवी
पसरले श्यामरंग
फुटे निळाईस पान्हा

1

हॉटेलच्या समोरच अगदी मधला एक रस्ता सोडला की समोरच पसरलेला अथांग सागर आहे... निळाशार ! त्यामुळे माझी ती संध्याकाळ तिथेच जाणार हे निश्चीत होते. किनार्‍यावर आलो तेव्हा समोर पसरलेला सागर आणि आकाशाच्या पांढुरक्या तपकिरी रंगाला हलकेच व्यापत चाललेली निळाई समोर आली.

२

अजुन बर्‍यापैकी उजेड होता. त्यामुळे नभांगणातल्या श्वेत ढगांची हळुहळु आसमंत व्यापत चाललेल्या निळाईशी स्वतःचे अस्तित्व राखण्याची शेवटची केविलवाणी धडपड चालु होती.

नकोच मजला सर्व नभांगण
क्षितीजाशी एक रेघ हवी
तुझीच सत्ता, तुझी निळाई
सोबत मजला तुझी हवी

73

एकमेकाशी मस्ती करत दोघांचा मस्त दंगा चाललेला होता.

4

अचानक पुन्हा त्या श्वेतरंगाने आक्रमक पवित्रा घ्यायचे स्विकारले असावे. त्या निळाईवर विजय स्थापीत करण्यासाठी त्याने बहुदा आपले, आपल्यात सामावलेल्या रंगांचे सामर्थ्य आजमावण्याचा निर्णय घेतला. क्षितीजाच्या एका कडेपासून हळुवारपणे सप्तरंगाची एक रेघ आसमंतात उमटायला सुरूवात झाली.

8

असली विलक्षण जुगलबंदी पाहताना मला मात्र संमोहनाचा भास होत होता. क्षितीजाच्या या टोकापासून निघालेल्या त्या सप्तरंगी रेघेचे रुपांतर आपल्या मनमोहक शस्त्रात करण्यासाठी श्वेतरंगाने दुसर्‍या टोकाकडूनही हालचाल सुरू केली होती.

8910

थोड्या वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की हा श्वेत रंग आपल्या रंगांच्या जोरावर त्या निळाईवर विजय मिळवतो की काय असे वाटायला लागले.

11

काही काळापुरता का होइना पण त्याने विजय मिळवला देखील. क्षणभर माझ्या लाडक्या निळाईला विसरून मी रंगांच्या त्या मनमोहक आविष्काराकडे भान हरपून बघत राहीलो.

सखे ही कसली चाहूल ?
मी झालो कसा मश्गुल ?
आकंठ जणु प्रत्यंचाच ती...

हा सोडून मोह स्वप्नांचा
मनाला पडली कसली भूल ...... !

13

भान हरपून त्या वेड लावणार्‍या इंद्रधनुकडे पाहात राहणे एवढेच सद्ध्या आपल्या हातात उरलेले आहे याची नकळत जाणिव झाली आणि मी सगळी अवधाने सोडून त्या नवलाईत हरवत राहीलो....

पण किती वेळ चालणार ही मस्ती? शेवटी हळु हळू त्या निळाईने आपले निर्विवाद साम्राज्य पसरायला सुरूवात केली.

निळ्या अंबराची मिठी ही निळी
खुळ्या जिवाची दिठी ही निळी
निळाई...निळाई... स़खी ही निळी
निळ्या सागराची गाजही निळी

5615

गंमत म्हणजे ही सगळी स्थित्यंतरे अवघ्या एका तासात झाली होती. मावळतीकडे निघालेला सहस्त्ररश्मी अजुनही आपले अस्तित्व दाखवून होता. पण गंमत म्हणजे तेजोमणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या भास्करालाही या निळाईने अगदी निष्प्रभ करून टाकले होते. त्या निळ्या रंगाच्या शितल किमयेपुढे तो सुद्धा आपला स्वभावच जणू विसरून बसला होता.

16

त्या श्यामल निळाईत हरवताना नकळत मला जाणवले की माझ्या ही नकळत मी देखील त्या निळाईचा एक पदर पांघरून घेतला होता.

'ग्रेस' म्हणतात...

निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा?

विशाल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! Happy

अक्षरशः नितांत सुंदर! फोटो, निळाई, ग्रेसांची कविता सगळंच!
मला बोरकर आठवले -- गडद निळे गडद निळे जलद भरुन आले

आयुष्यात असे काहि क्षण येतात कि माणुस भावविभोर होऊन जातो.तो क्षण ओळखण..जगण.. तरल मनाचि माणसेच तसे करु शकतात.तु ते केलस. त्याबद्द्ल तुला सलाम.

खरय सुनिलदा...
पण गंमत अशी आहे की अशा क्षणी आपल्या हातात काहीच राहीलेलं नसतं Wink

धन्यवाद !!!

Pages