लखलख तारा एक निखळला (डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्त्येनंतर लिहिलेली कविता.)

Submitted by निशिकांत on 29 August, 2013 - 03:21

उजेडावरी वार कराया
अंधाराने हात उचलला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

श्रध्दा अंध नसावी म्हणणे
कशामुळे हा गुन्हा ठरावा?
प्रबोधनाविन समाज भोळा
शोषणातुनी कसा सुटावा?
आग्रह धरला तोच कायदा
मेल्यावरती पास करवला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

तर्काधिष्ठित पारख करुनी
नकारले कित्येक प्रथांना
जागर झाला सुरू जनांचा
छेद देउनी दंतकथांना
स्वार्थ बाधला ज्या भोदूंचा
पोटशूळ भलताच भडकला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

विचार क्रांती कशी घडावी?
परंपरांचे प्रिय इशारे
राखेखाली दबून गेली
कुठे न दिसती सुप्त निखारे
अधीच मुठभर, एक त्यातला
कसा कुणी स्फुल्लिंग विझवला?
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

पुरे जाहली स्मशान शांती
अता जरा पेटून उठावे
कुठे हरवली नैतिकतेची
जुनी वादळे कुणास ठावे?
तिमिर दिशेने हजार वाटा
प्रकाश रस्ता कुठे हरवला?
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरे जाहली स्मशान शांती
अता जरा पेटून उठावे
कुठे हरवली नैतिकतेची
जुनी वादळे कुणास ठावे?

वा वा! मस्त. आपण वाहिलेल्या श्रद्धांजलीचे कौतुक