माणसे पेरणारा माणूस.

Submitted by जीएस on 29 August, 2013 - 00:01

एक फेब्रुवारी १९४८ च्या उत्तररात्री नागपूर येथे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उर्फ श्रीगुरुजी यांना गांधीहत्येच्या कटाबद्दल कलम ३०२ खाली अटक झाली. लगेच चार फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली आणि कारागृहात गुरुजींना या बंदीबद्दल माहिती मिळताच त्यांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली. एक स्वप्न भंगले होते. १९२५ साली संघस्थापना करतांना डॉ. हेडगेवारांनी एका फार वेगळ्या कार्याचे स्वप्न पाहिले होते आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण त्यासाठी झिजून मोठ्या विश्वासाने त्याची धुरा गुरुजींवर सोपवून त्यांनी १९४० साली जगाचा निरोप घेतला होता. आणि आता, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अवघ्या सहा महिन्यात ते स्वप्न संपले होते. सर्वांना निदान तेंव्हा तरी असेच वाटले होते.

गुरुजींनी असे कुठल्या कामाचे शिवधनुष्य उचलले होते ? संघाचे नक्की काय काम आहे ? गेली साठ वर्ष, आणि आजही संघ म्हटला की हिंदूराष्ट्र या शब्दावर आणि त्याबदलच्या समज, गैरसमजांबद्दल एक न संपणारी चर्चा सुरू होते. गुरुजींबद्दलही एक तर संघमाध्यमातून प्रकाशित झालेली श्रद्धेने ओथंबलेली चरित्रे किंवा विरोधकांकडून झालेला असत्याधारित विद्वेषपूर्ण प्रचार अशी दोन टोके दिसतात. पण एक संघटना म्हणून या माणसाने काय आणि केवढे काम उभे केले? त्या कामाचा आपल्या देशावर, समाजावर काही प्रभाव पडला आहे का? याचे विश्लेषण अभावानेच आढळते. मनुष्यबळविकास, व्यवस्थापनशास्त्र आणि संघटनाशास्त्र या दृष्टिकोनातून गुरुजींच्या कामाकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे.

स्वातंत्र्यचळवळ सुरू असतांनाच केवळ स्वातंत्र्याने प्रश्न सुटतील की समाजसुधारणेने ? यावर चिंतन आणि काम आगरकर, म. फुले, डॉ. आंबेडकर यांसारखे समाजसुधारक करत होते. डॉक्टर हेडगेवारांचे विश्लेषणही फार वेगळे नव्हते."आपल्या सर्व समस्या या केवळ पारतंत्र्यामुळे उद्भवल्या नसून पारतंत्र्यासकट सर्व समस्या आपण आपल्या स्वतःच्या अवगुणांमुळे ओढवून घेतल्या आहेत. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावामुळेच आपण गुलाम झालो, आणि जर हा मूलभूत दोष दूर केला नाही तर उद्या इंग्रज गेले तरी ते स्वातंत्र्य अल्पकाल टिकेल आणि देशात बेशिस्त, स्वार्थ आणि कलह यांचे अराजक माजेल." हा संघस्थापनेमागचा एक मूलभूत सिद्धांत होता.

पण ही समाजसुधारणा घडवायची कशी? वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करायचे कसे? एक कुठला तरी विशिष्ट विषय, समस्या किंवा स्वातंत्र्यप्राप्तीसारखे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याबद्दल प्रबोधन करणार्‍या संस्था असतात, चळवळी, आंदोलने असतात, राजकीय पक्ष असतात. पण देशभक्त, प्रामाणिक, शिस्तबद्ध, नि:स्वार्थी, संघभावनेने काम करणारी माणसे घडवणारी 'संस्था' उभी करायची म्हणजे काय करायचे? डॉक्टरांनी ठरवले, आबालवृद्धांना रोज एक तास एकत्र करून असे संस्कार करणारी मैदानावरची शाळा म्हणजे संघशाखा. शाखेतून चांगला माणूस घडेल. माणूस घडला तर तो आपोआपच कुठलेही प्रश्न सोडवेल. मंत्र सोपा होता, पण एका गावात दहा बारा बाल आणि तरूणांना गोळा करून पहिली शाखा भरवतांना देशातल्या साडेसहा लाख गावांमध्ये अशा शाखा चाळीस कोटी माणसे घडवतील, आणि ती माणसे देश घडवतील असा विचार करणे हे एक वेडे स्वप्नच होते. पण तेवढा एकच ध्यास घेऊन डॉक्टर अहर्निश काम करत राहिले. १९४० साली हे वेडे स्वप्न आणि सहाशे शाखांच्या रूपाने या स्वप्नाचे एक छोटे प्रारूप गुरुजींच्या हाती सोपवून डॉक्टरांनी जगाचा निरोप घेतला.

बर्‍याच सामाजिक, राजकीय वा व्यावसायिक संस्थांचा वा चळवळींचा संस्थापकांनंतर संख्यात्मक व गुणात्मक र्‍हास झालेला दिसून येतो. संघ मात्र गुरुजींच्या नेतृत्वाखाली वाढत राहिला. फाळणीच्या भीषण हत्याकांडाच्या वेळी पंजाब व सिंध प्रांतातली संघाची जी ताकद होती ती सर्व लाखो हिंदू आणि शिखांच्या रक्षणासाठी पणाला लावली गेली. त्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी प्राणाची आहुती दिली. संघाच्या वाढत्या ताकदीचा अंदाज प्रथमच सरकारला आला आणि अशातच गुरुजींवर गांधीहत्येचा आरोप ठेवून संघावर बंदी आणल्याने आता संघ संपला, गुरुजींच्या कार्याची इतिश्री झाली असे बहुतेकांना वाटले तर त्यात नवल नव्हते.

पण तसे व्हायचे नव्हते. अटकेनंतर सहाच दिवसात सरकारने गुरूजींवरील गांधीहत्येशी संबंधित सर्व आरोप मागे घेतले मात्र सुरक्षा कायद्याखाली त्यांना स्थानबद्ध केले. संघावर कुठलेही आरोप नसतांना बंदी उठवण्याबाबत नेहरू व सरदार पटेलांशी सतत सहा महिने पत्रव्यवहार करूनही सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच गुरूजींनी सत्याग्रहाची हाक दिली आणि हजारो संघ स्वयंसेवकांनी देशभर सत्याग्रह सुरू केला. सत्तर हजारांना अटक झाली. बंदी उठवण्याबाबत अनेक विचारवंत, पत्रकार, राजकीय नेते यांच्याकडून सरकारकडे विचारणा सुरू झाली. सरकारने संघाची लिखित घटना नाही वगैरे कारणे पुढे उभी केली; तीही दूर करण्यात आली. अखेर जनमताच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागले आणि १२ जुलै १९४९ ला सरकारने संघावरील बंदी विनाशर्त मागे घेतली व गुरुजींची सुटका करण्यात आली.

सुटकेनंतर संघकामाला संजीवनी देण्यासाठी गुरुजींनी ताबडतोब देशभर प्रवास आरंभला आणि त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिल्लीला त्यांच्या स्वागतासाठी लोटलेला अलोट जनसागर आणि १३ ऑगस्ट १९४९ ची पाच लाखाची सभा पाहून अवाक झालेल्या बीबीसी ने म्हटले "गोळवलकर हे भारताच्या क्षितिजावर उगवलेला दैदिप्यमान तारा आहेत.एवढा जनसमाज आकृष्ट करू शकणारी भारतात पं. नेहरू हीच एक व्यक्ती आहे."

मात्र आपल्याच सरकारकडून विनाकारण घडलेला दीड वर्षाचा तुरुंगवास, हजारो कार्यकर्त्यांचा छळ आणि मग लोकक्षोभामुळे सुटका व प्रचंड जनसमर्थन या पार्श्वभूमीवर सरकारबद्दल अतिशय कटुता किंवा विजयाचा उन्माद यापैकी कशाचे पुसटसे दर्शनही गुरूजींच्या आचार विचारात झाले नाही. दिल्लीच्या सभेत कोणीतरी त्यांच्या व संघाच्या जयजयकाराची घोषणा करताच त्यांनी भाषणातच स्पष्ट केले की त्यांचा, इतर कोण्या व्यक्तीचा वा संघाचाही जयजयकार होऊ नये. फक्त भारतमाता की जय हीच आपली भावना आणि घोषणा असली पाहिजे. आजही सर्वदूर कुठल्याही संघकार्यात संघनेत्यांचा वा संघाचा जयजयकार होत नाही, भारतमातेचाच होतो. त्याच भाषणात गुरुजींनी आपण आपल्या दाताखाली जीभ आली तर दातावर राग धरत नाही, देश आपला आहे, सरकार आपले आहे, क्षमा करा आणि कामाला लागा एवढ्या साध्या शब्दात संघावरच्या बंदीचा, अन्यायाचा विषय बंद केला.

पुढची चोवीस वर्षे प्रत्येक क्षण गुरूजींनी माणसे घडवण्याच्या कामाला वाहून घेतले. अविरत प्रवास करत उभा भारत पुन्हा पुन्हा पिंजून काढला. कामाचा आवाका प्रचंड होता, समर्पित कार्यकर्ते हवे होते. फावल्या वेळेत करण्याचे हे काम नव्हते. संघातील प्रचारक ही संकल्पना गुरुजींची. संघस्वयंसेवकांनी आयुष्याची काही वर्षे वा सगळे आयुष्य केवळ देशासाठी वाहून घ्यायचे. ज्या भागात पाठवले जाईल तेथील समाजाच्या आश्रयाने रहायचे, आणि तेथील संघकार्य चालवू व वाढवू शकतील असे स्वयंसेवक तेथेच घडवायचे. सगळ्या देशातून प्रतिसाद मिळाला. गुरुजींनी घडवलेले हे दहा हजार प्रचारक व त्या प्रचारकांनी घडवलेले आपल्या आयुष्यातले काही तास रोज संघकामासाठी देणारे लाखो कार्यकर्ते ही कोणी असामान्य माणसे नव्हती. आशा, आकांक्षा, राग, लोभ असे सगळे असलेली आपल्यासारखीच हाडामासाची माणसे पण देशासाठी निरपेक्षपणे काम करण्याचा हा त्याग करायला त्यांना कुठून प्रेरणा मिळाली ? प्रशासनात, कॉर्पोरेट जगात गलेलट्ठ पगार, सर्व सुखसोयी देऊनही अधिकार्‍यांना काम करण्यासाठी 'मोटिव्हेट' कसे करावे यासाठी आम्ही मॅस्लॉव्ह, ड्रकर, फ्रॉईड यांचे सिद्धांत वापरून पहातो, कधी ह्यूमन रिसोर्स तर आता ह्यूमन कॅपिटल वगैरे कसे 'डेव्हलप' करता येईल याचे प्रयोग करत रहातो. पण अशी प्रामाणिक, शिस्तबद्ध, देशसेवेला आयुष्य वाहून घेणारी माणसे शाखेत कशी घडतात? त्यांचे मोटिव्हेशन काय? असा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. वॉल्टर अँडरसन या अमेरिकन अभ्यासकाने संघशाखेवर संशोधन करून स्वतःच्या आदर्शातून आणि एकत्र येण्यातून संस्कार करण्याच्या या शाखातंत्राची 'अद्वितीय' अशी वाखाणणी केली आहे.

गुरुजींनी त्यांना सोपवलेले माणसे घडवण्याचे काम तर भारतभर विस्तारले. गुरुजींच्या कार्यकाळात संघशाखांची संख्या सुमारे सात हजारावर पोहोचली पण आता त्याहून मोठी कसोटी म्हणजे ही घडलेली माणसे समाजात काय सकारात्मक बदल घडवतात ही होती. देशउभारणीसाठी प्रत्येकच क्षेत्रात चांगल्या माणसांची तातडीची गरज होती. गुरुजींनी पैलू पाडलेली माणसे एकेका क्षेत्रात पाठवायला, पेरायला सुरुवात केली. त्या माणसांनी स्वतःला आयुष्यभर गाडून घेतले आणि एक एक संस्था जोमाने उभी राहिली. अशा सर्व संस्था, संघटना, माणसे यांची नुसती यादी द्यायची झाली तरी तो एका ग्रंथाचा विषय होईल. लेखाची मर्यादा लक्षात घेता आपण दोन तीन उदाहरणे पाहू.

काश्मीरप्रश्नी नेहरूंशी मतभेद झाल्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्रिमंडळातून बाहेर पडले. राष्ट्रीय विचारांचा एक पक्ष संघाच्या मदतीने स्थापन करावा असे त्यांच्या मनात होते. गुरुजींनी संघ राजकारणात पडणार नाही, पण देशव्यापक पक्षउभारणीसारखे प्रचंड काम हाती घेण्यासाठी काही स्वयंसेवक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी पाठवेल असे ठरवले. पं. दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख आणि अटलबिहारी वाजपेयी अशा काही संघप्रचारकांना दैनंदिन संघकार्यातून मुक्त करून शून्यातून सुरूवात करून पक्षबांधणीसाठी पाठवण्यात आले आणि २१ ऑक्टोबर १९५१ ला भारतीय जनसंघाची स्थापना झाली. पुढे पंचेचाळीस वर्षे संघात घडलेले शेकडो स्वयंसेवक तळागाळात जाऊन संघटना बांधत राहिले. १६ मे १९९६ रोजी अटबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हा पक्षाच्या दृष्टीने कळसाध्याय म्हटला तरी या अनेक नेत्यांनी राजकारणात राहूनही ज्याप्रकारे तत्वनिष्ठ नि:स्वार्थी कार्याचा आदर्श उभा केला तो संघाच्या राजकारणात कार्यकर्ते पाठवण्याच्या प्रयोगाचा खरा कळसाध्याय होता.

संघ भाजपचे नियंत्रण करतो का? भाजपकडे सत्ता, संघाकडे काही नाही तरी कसे काय करतो? असा प्रश्न आजही अनेकांना असतो. जनसंघ आणि अशा अनेक देशव्यापी संघटनांना जन्म देतांना या सर्वांचे संघातून नियंत्रण करणारी एक यंत्रणा निर्माण करावीशी वाटणे स्वाभाविक होते. पण गुरुजींनी असे केले नाही. आपले काम हे माणसे घडवण्याचे काम आहे. ही माणसे विवेकबुद्धीने योग्य ते काम करतील. आपणच घडवलेल्या माणसांवर आपला विश्वास नसेल, आणि नियंत्रण ठेवावेसे वाटत असेल तर आपला आपल्या कामावरच विश्वास नाही असे होईल एवढे सोपे त्यांचे तत्वज्ञान होते, आणि एवढा त्यांचा माणूस घडवण्याच्या कामावर विश्वास होता.

१९७९ साली जनता सरकारच्या प्रयोगात कुरबुरी सुरू झाल्यावर परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी आणि माहिती व प्रसारण मंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासमोर मंत्रिपद आणि संघविचारांशी बांधिलकी यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय इतर सहभागी पक्षांनी ठेवला. क्षणाचाही विलंब न करता या दोघांनी व इतर जनसंघ सदस्यांनी मंत्रिपदाचा व पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि गुरुजींचा विश्वास किती सार्थ होता हे दाखवून दिले.

१९५२ साली वनवासी क्षेत्रात काम करण्यासाठी वनवासी कल्याणाश्रमाची स्थापना झाली. गुरुजींच्या प्रेरणेने बाळासाहेब देशपांडेंनी आपले सारे आयुष्य त्यासाठी झोकून दिले. कामाला अखिल भारतीय स्वरूप येण्यासाठी अनेक प्रचारक व कार्यकर्ते झटत राहिले. शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य आणि वनवासींच्या नैसर्गिक गुणवत्तेला वाव देण्यासाठी खेलकूद सारखे हजारो प्रकल्प साडेतीनशे जिल्ह्यांमध्ये आज राबवले जात आहेत. मोफत शिक्षण देणार्‍या एक शिक्षकी शाळाच पन्नास हजार आहेत. लिंबाराम चे यश तर आहेच पण वनवासी कल्याणाश्रमात घडलेलाच एक वनवासी तरूण मोठा होऊन आज वनवासी कल्याणाश्रमाचा देशव्यापी पसारा शेकडो वनवासी कार्यकर्त्यांच्या मदतीने सांभाळतो आहे ही त्या माणूस घडवण्याच्या कामाची पावती आहे.

१९५४ साली गुरुजींनी दत्तोपंत ठेंगडींसारख्या द्रष्ट्या प्रचारकाकडे कामगार क्षेत्राचे संघटन करण्याची करण्याची जबाबदारी दिली. 'जगातील कामगारांनो एक व्हा' चा वर्गकलहाचा सिद्धांत नाकारत 'कामगारांनो जगाला एक करा' या भारतीय सिद्धांतावर भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली. १९९६ साली भारतीय मजदूर संघ ही भारतातली सर्वात मोठी कामगार संघटना झाली. पण खरा गौरवाचा क्षण त्याआधीच आला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करताच, आपल्याला मुक्त करायला चीन येत आहे अशी भूमिका घेउन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि त्यांच्या कामगार संघटनांनी संरक्षण साहित्याचे उत्पादन करणार्‍या कारखान्यात व वाहतुकीत संप घडवून आणले. अशा वेळेला भारतीय मजदूर संघ ठामपणे 'देश के हित मे करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम' अशी घोषणा देत उभा राहिला, आणि उत्पादन तसेच वाहतुकीतले अडथळे दूर केले. पुन्हा एकदा देशभक्तीच्या संस्कारांचे महत्व अधोरेखित झाले.

वेगवेगळे पंथ, संप्रदाय, जाती यात विभागलेल्या हिंदू समाजाला एका व्यासपीठावर आणून हिंदू समाजाच्या हितरक्षणाचे काम करण्यासाठी गुरुजींच्या उपस्थितीत २९ ऑगस्ट १९६४ साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली गेली. दादासाहेब आपटे या संघप्रचारकांना ही जबाबदारी देण्यात आली. संघात तर जातीपाती कधीच पाळल्या जात नसत. प्रत्यक्ष गांधी़जी व डॉ. आंबेडकरांनीही संघशिबिरांना भेट दिली तेंव्हा या गोष्टीचे कौतुक केले होते. पण समाजात मात्र भेदाभेद मोठ्या प्रमाणावर होते. अस्पृयुश्यताविरोधी कायदा केला होता पण त्याने काही अनेक सवर्णांच्या मनात असलेली अस्पृश्यता गेली नाही. स्वतः गुरुजी आणि विहिंपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून शंकराचार्यांसह विविध पंथांच्या चारशे प्रमुख धर्माचार्यांना उडुपी येथे एका व्यासपीठावर आणले आणि कोणीही उच्च नीच नाही, सर्व हिंदू हे सहोदर आहेत ही घोषणा त्यांच्याकडून करून घेतली. हिंदू समाजातील विषमता विद्रोहाच्या नव्हे तर समरसतेच्या मार्गाने संपवण्यासाठी विश्व हिंदू परिषद काम करत राहिली. दलितांना देवळात पुजारी नेमण्यासाठीचे प्रशिक्षण व नेमणूक असाही कार्यक्रम यशस्वीपणे राबवत राहिली.

१९५२ सालीच विद्याभारती आणि सरस्वती शिशू मंदिराची स्थापना झाली. ज्यात पहिला तास हा नेहमी 'सदाचार' या विषयाचा असतो अशा वीस हजाराहून अधिक शाळा आज चालतात.

अशा कितीतरी देशव्यापी संस्था गुरुजी सुरू करत गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, हिंदुस्थान समाचार, .. सगळी यादी इथे देणे शक्यही नाही.

स्वातंत्र्यानंतर लगेच निर्वासितांसाठी संघ स्वयंसेवक वास्तुहारा समितीच्या माध्यमातून धावून गेले त्यानंतर देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीत आणि आक्रमणाच्या वेळेस संघ स्वयंसेवक धावून गेले आहेत.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, आहार यांचे एकेका परिसरातले प्रश्न सोडवणे हे सुद्धा पिढ्यानुपिढ्या चालणार्‍या संस्थेचे काम आहे. बाबा आमटे, अभय बंग अशा माणसांनी असे प्रकल्प उभे केलेले आपण बघतो.
भारताला अशा लाखो प्रकल्पांची गरज आहे. त्या संस्था उभ्या करायला, चालवायला स्वतःला गाडून घेऊन काम करतील अशा लाखो माणसांची गरज आहे. गुरुजी संघमाध्यमातून अशी माणसे घडवत गेले, त्यांना पेरत गेले. आज हीच घडलेली माणसे असे दीड लाख सेवाप्रकल्प चालवत आहेत. पन्नास हजार शाखा, तीन हजार प्रचारक, दोन लाखावर कार्यकर्ते हे माणसे घडवायचे काम करत आहेत

समाजाने, विरोधकांनी आणि सरकारनेही गुरुजींच्या या अहर्निश तपस्येची नोंद जरूर घेतली. नेहरूंच्या भूमिकेतही अगदी शेवटी परिवर्तन झालेले दिसते. १९४८ साली गांधीहत्येच्या एक दिवस आधी अमृतसर येथे आम्ही संघाला चिरडून टाकू असे गर्जणार्‍या नेहरूंनीच १९६३ साली २६ जानेवारीला संघाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी करून घेतले. ३००० संघ स्वयंसेवकांनी गणवेषात संचलन केले. लालबहादूर शास्त्रींनी पंतप्रधान असतांना गुरुजींना त्यांच्या एकात्मता मंडळात सहभागी करून घेतले.

गुरुजींच्या निधनानंतरही संसदेची दोन्ही सभागृहे, पंतप्रधान इंदिरा गांधी, संरक्षणमंत्री, राष्ट्रपती, विनोबा, एस एम जोशी, सर्व राजकीय नेते, सर्व वर्तमानपत्रे यांनी गुरुजींना आयुष्याचा प्रत्येक क्षण देशासाठी वेचलेला प्रखर देशभक्त याच शब्दात श्रद्धांजली वाहिली.

माझे कुठलेही पुतळे, स्मारक वगैरे उभारू नये असे मृत्यूपत्रात स्पष्ट लिहून ५ जून १९७३ रोजी गुरुजी या जगातून निघून गेले. नागपूरला कधी गेलात तर रेशीमबागेत त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्या ठिकाणी फक्त एक छोटे प्रतिकात्मक यज्ञकुंड धगधगताना दिसेल, किंवा मग देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात गेलात तरी गुरुजींनी पेरलेल्या माणसांनी घडवलेल्या कार्यमग्न माणसांच्या हृदयात उत्कट देशभक्तीची तीच आग आजही धगधगताना दिसेल.

संदर्भ.

(१) सुपरस्क्रिप्ट वापरता न आल्याने लेखातील त्या त्या वाक्याला संदर्भ क्रमांक देता आला नाही. पण हाताळलेल्या विषयानुसार संदर्भ देत आहे.
(२) संदर्भासाठी अधिकृत आकडेवारी व रिपोर्ट्स उपलब्ध करून दिल्याबद्दल Archives Of RSS, Zandewalan extn. New Delhi यांचा ऋणी आहे.

रा. स्व. संघ, कार्यपद्धती, आकडेवारी
RSS: A Vision In Action - H. V. Sheshadri, Sahitya Sindhu Prakashan.
The Brotherhood in Saffron: The Rashtriy swayamsevak sangh and hindu revivalism Walter Anderson and Shridhar Damle
संघ संस्कारांची बलस्थाने : उत्तम कानिटकर, भारतीय विचार साधना.
मी, मनू आणि संघ : रमेश पतंगे, हिंदुस्थान प्रकाशन.
स्मरणशिल्पे : दामूअण्णा दाते, विवेक प्रकाशन.
मूल्यांकन : दत्तोपंत ठेंगडी
संघगाथा: भारतीय विचार साधना
सरकार्यवाह प्रतिवेदन २०११ - Archives Of RSS
सरकार्यवाह प्रतिवेदन २०१२ - Archives Of RSS
www.rss.org

श्री गुरुजी
समग्र श्रीगुरुजी. खंड १ ते १२. भारतीय विचार साधना.
Shri Guriji: Pioneer of an era - C. P. Bhishikar
समन्वय के सुमेरु - सुरुची प्रकाशन
श्री गुरुजी और राजनीती - सुरुची प्रकाशन
श्रीगुरुजी और सामाजिक समरसता - सुरुची प्रकाशन

फाळणीच्या वेळचे काम
The tragic story pf partition : H. V. Sheshadri
Now it can be told : A. N. Bali

गांधीजी, आंबेडकर आणि संघ
गांधीजी समग्र खंड ९७ ( हरिजन मधील १५ सप्टेंबरची बातमी)
गांधीजी की दिल्ली डायरी - ब्रिजकिशन चांदीवाला
डा. अम्बेडकर और सामाजिक क्रान्ति की यात्रा - दत्तोपंत ठेंगडी

कम्युनिस्टांची भूमिका १९४२, १९६२
The Only Fatherland : Arun Shaurie
Declassified CIA Dossier: http://www.foia.cia.gov/CPE/ESAU/esau-15.pdf
A Traveller and the road: The Journey of an Indian communist - Mohit Sen

विविध संघटना
http://en.wikipedia.org/wiki/Bharatiya_Jana_Sangh
www.bms.org.in
www.vhp.org
www.abvp.org
www.ekal.org
www.bharatiyakisansangh.org
www.vanvasi.org
www.hindusthansamachar.com

सेवाकार्याची आकडेवारी
सेवा दिशा १९९७ - राष्ट्रीय सेवा भारती
सेवा दिशा २००४ - राष्ट्रीय सेवा भारती
सेवा दिशा २००९ - राष्ट्रीय सेवा भारती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकुंचा प्रतिसाद नंतर वाचला. धन्यवाद. ब्रेनवॉशिंगबद्दल जनरल किंवा स्पेसिफिक संघातल्या तथाकथित ब्रेनवॉशिंगबद्दलही तुलनात्मक चर्चा करता येईल. विकुंचा कल्ट ब्रेनवॉशिंगचाही अभ्यास आहेच. इतरत्र केल्यास अधिक बरे.

पेशवा, इथे स्पर्धेच्या मर्यादा होत्या, नंतर थोडे विस्ताराने लिहायचा विचार आहे.

श्रीगुरुजी यांच्याबद्दल संघात खूप आदर आहे हे जाणून होतो. पण इतकी तपशीलवार माहिती पहिल्यांदाच कळाली. लेख खूप सुंदर आहे.

संदर्भासहित दिलेला उत्कृष्ट लेख / निवडलेले व्यक्तिमत्व Happy
कित्येक संदर्भ आजच्या काळात कुणाला माहितही नाहीत/माहित होऊ दिले जात नाहीत, शिक्षण वगैरे क्षेत्रात तर खड्यासारखे बाजुला ठेवले जातात, ती माहिती इथे थोडक्यात मिळते आहे.
लेखाबद्दल धन्यवाद Happy

कारण कितीही वेगवेगळे विचार असले तरीही समजातील सज्जनशक्तीने एकत्र येण्याची सध्या फार गरज आहे. अगदी अगदी

संदर्भासहित लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन. अभ्यासपूर्वक लिहिलेला जाणवतोय.

आशा, आकांक्षा, राग, लोभ असे सगळे असलेली आपल्यासारखीच हाडामासाची माणसे पण देशासाठी निरपेक्षपणे काम करण्याचा हा त्याग करायला त्यांना कुठून प्रेरणा मिळाली >>
पण अशी प्रामाणिक, शिस्तबद्ध, देशसेवेला आयुष्य वाहून घेणारी माणसे शाखेत कशी घडतात? >>
संघाच्या विचारसरणीबद्दल, हिंदु राष्ट्र वगैरेबद्दल दुमत असले तरी संघाच्या असे स्वयंसेवक निर्माण करण्याची पद्धत निश्चित अभ्यसनीय आहे.

"आपल्या सर्व समस्या या केवळ पारतंत्र्यामुळे उद्भवल्या नसून पारतंत्र्यासकट सर्व समस्या आपण आपल्या स्वतःच्या अवगुणांमुळे ओढवून घेतल्या आहेत. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या अभावामुळेच आपण गुलाम झालो, आणि जर हा मूलभूत दोष दूर केला नाही तर उद्या इंग्रज गेले तरी ते स्वातंत्र्य अल्पकाल टिकेल आणि देशात बेशिस्त, स्वार्थ आणि कलह यांचे अराजक माजेल." >>
दुर्दैवाने, स्वातंत्र्य मिळाल्याच्या ५०-६० वर्षांनी आपले राष्ट्रीय चारित्र्य खालावतच आहे Sad

खूपच अभ्यासपूर्ण लेख.

मनुष्यबळविकास, व्यवस्थापनशास्त्र आणि संघटनाशास्त्र या दृष्टिकोनातून गुरुजींच्या कामाकडे बघण्याचा हा प्रयत्न आहे. >>> हे तर आधीच सांगितल्यामुळे पुढील गोष्टी सुस्पष्ट व्हायला मदतच व्हावी.

सामाजिक कार्याची केवळ काही बेटे उभारून भविष्यकाळात काही ठोस हाती लागेल असे वातत नाही. >>> रॉबिनहूड यांच्या या वाक्याशी पूर्ण असहमत ------- मग काय केले तर काही ठोस लागेल याचा आपला काही अभ्यास असेल तर समजून घ्यायला आवडेलच.

जीस.. सुंदर लेख.. धन्यवाद.
मतांतराच्या चर्चेत माझीही ओंजळ अर्थात स्वानुभवाची.

१९९३ ते १९९७ चा ठाण्यातला एक विद्द्यार्थी अभाविप संघटनेत कार्यरत. शिक्षण संपवुन नोकरीला लागला.काही काळ आपल्या शहराबाहेर ही गेला नोकरी निमित्त आणि संघटेनेशी संपर्क तुटला होता. उत्तम कार्यकर्ता पण
परत शहरात आल्यावर लक्षात आलं की आता परत काही संघट्नेत वेळ जमत नाही... अचानक त्या भागातले संघ प्रचारक त्याच्या घरी आले... खरंतर आजवर संघाशी डायरे़क्ट काहीच संबध आला नव्हता मग अचानक हे काय नवीन ... चर्चा झाल्या भेटी आणि हा विद्द्यार्थी संघशाखेशी जोडला गेला.
समाजातल्या प्रत्येक जण हा कस्तुरी मृगासारखा आहे त्याच्या कडे काहीतरी असत जे तो समाजाला सहज देउ शकेल पण ही जाणीव करुन देणं हेच कदाचित गुरुजीनाही अपेक्षीत असेल.

जीएस,

लेख आवडला. स्पर्धेच्या मर्यादा सांभाळून चांगला लिहिला आहे. मात्र श्रीगुरुजींविषयी एक गोष्ट उल्लेखायची राहून गेली आहे. ती म्हणजे त्यांची अध्यात्मिक साधना. श्रीगुरुजी उच्च कोटीचे साधक होते. संघ वाढला तो त्यांच्या साधनेमुळे. आजच्या संघनेतृत्वात साधनेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. हा जर दूर केला नाही तर संघ नि:सत्व होईल.

आजून एक त्रुटी म्हणजे संघ भाजपवर नियंत्रण राखण्यात कमालीचा अपयशी ठरला आहे. ज्या पद्धतीने कम्युनिस्ट पॉलिटब्युरो खासदारांवर अंकुश ठेवते तसे प्रयत्न संघाकडून झालेले दिसत नाहीत. चांगली माणसे बनवणे ठीक आहे. पण हीच 'चांगली' माणसे जेव्हा सत्ताधारी होतात तेव्हा त्यांना मद चढतो. हे टाळण्यासाठी सत्ताधार्‍यांना पूर्वप्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच मिळालेल्या प्रशिक्षणानुसार सत्ताधारी नीतीने वागताहेत का हेही काटेकोरपणे तपासण्याची यंत्रणा उभारायला हवी. सत्ताधार्‍यांना जरबेत ठेवण्यासाठी परत अध्यात्मिक साधनाच कामी येते. श्रीगुरुजींची प्रखर साधना असूनही आज संघाचे साधनेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.

असो. (माझ्याकडून) श्रीगुरूजींपेक्षा संघावर अधिक लिहिणे झाले. चालायचेच! Wink

आ.न.,
-गा.पै.

अतिशय समर्पक व वास्तवपूर्ण लेख. आपली मधुर वाणी व निरपेक्ष प्रेमाने श्री गुरूजीं माणसे पेरत सर्व भारतभर अविरत फिरत राहिले. माझे घर म्हणजे "रेल्वेचा डबा" असे ते हसून म्हणत. विलक्षण स्मरणशक्ती हे एक त्यांचे वेगळे गुणवैशिष्ट होय.

रॉबीनहूड … "रिमोट" शब्दाचा वापर ही एक फॅशन आहे. स्वतःच स्वतःला फार तर्कवादी आणि बुद्धिजीवी समजणारे कुत्सितपणे इतरांकरिता असा शब्दप्रयोग करतात. हा पण तथाकथित पोथीनिष्ठेचाच प्रकार आहे, फक्त पोथीचे नाव “स्वनाम ध्यनता”...! आपसांत पारिवारीक संबंध हा संघ कार्यपद्धतीचा आत्मा आहे. कुटुंब व्यवस्थेत, प्रमुखाला कोणी रिमोट चालविणारा समजत असेल तर बरेच बरे म्हणावे. कोणत्याही निर्णयापूर्वी चर्चा सर्वंकष असते. पण एकदा निर्णय झाल्यावर एकदिलाने काम करणारे कुठेही दिसत नाहित म्हणुन त्यांची अशी टवाळी अनेकजण करतात.
बर्लिनची भिंत कशी पडली ह्याची कारणमिमांसा जाणकारांनी करावी.

“आयुष्यभर संघिष्ट घरात वाढलेल्या" वरदा ह्यांची मते पीडादायक वाटली. जवळून बघुनही संघाबद्दलचे त्यांचे आकलन अनाकलनीय आहे. असे उदाहरण विरळा असावे. कदाचित त्यांची तर्कदृष्टी व बुद्धिमत्ता असामान्य असावी. असो… "ब्रेनवॉशिंगच्या" विवेचानाबद्दल इतकेच म्हणावे वाटते की, पंडीत नेहरूंनी येथील पिढ्यांचे ब्रेनवॉशिंग अतिशय कौशल्याने ह्या आधीच करून ठेवले आहे. हिंदू शब्दावर कमालीचा रोष (अलर्जी) हा त्यांनी पेरलेल्या भ्रामक विचारसरणीचा अंतीम परिणाम आहे. "काफिले आते गये और हिंदोस्तां बनता गया।" ह्या त्यांच्या सिद्धांतामुळे अनेक पिढ्या दिशाहीन झाल्या, संभ्रमावस्थेत गेल्या. "संघाला चिरडून टाकू" ह्याकरिता नेहरूंनी… आणि त्यांच्या पुढील वारसदारांनी आटोकाट प्रयत्न केलेत. वास्तव आज सर्वांच्या पुढे आहे. आजवर देशहिताला बाधक ठरलेला हा संभ्रम, संघाच्या शतपूर्ती पोवतो क्षीण झालेला दिसेल. शुभम् भवतु…!

जीएस, वाह फार छान ओळख करून दिलीत.

संघाबद्दल लहानपणापासुन ऐकिव माहिती बरीच आहे,
फार वाचन किंवा अभ्यास नाही. सहभाग तर नाहीच नाही.

गुरूजी काय ? नानाजी काय ? एकनाथजी काय ही सारी फार म्हणजे फार मोठी अद्भुत व्यक्तिमत्वे होती.

राष्ट्रभक्तीने (धर्म नाही) भारली गेलेली सज्जन आणि सुविचारी लोक एकत्र येऊन एकदिलाने काम करत आहेत हे खरोखर कौतुकास्पद आहेच. ज्यांना राष्ट्रापेक्षा स्वतःचे महत्व वाढवायचे असते ते लोक अशा सत्कार्याला नावे ठेवणे, शंका काढणे पक्षी विरोध करणे, इ. सर्व करत असतात. अशा लोकांची कमी नसते समाजात.

दुर्दैवाने चांगल्या विचारांचा प्रसार आणि चांगल्या लोकांचे संघटन हे नेहमीच जिकीरीचे असते.
त्याच्या तुलनेत दुष्प्रवृत्तींचा प्रसार आणि संघटन फार लवकर आणि सहज होते की काय असे वाटते.

चांगल्याला शाळा आवश्यक असते, वाईटाला नाही.

Pages