गेट आयडीया !

Submitted by कवठीचाफा on 27 August, 2013 - 17:12

" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? "

" माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? "

" कोणती तक्रार सर ? "

" मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून"

" सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? "

" ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? "

" मी समजलो नाही सर"

" नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं "

" त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ? "

" माझा नेटसेटर गेले तीन दिवस अत्यंत सावकाश चालतोय"

" सर आपण आपला पिसी चेक केला आहात का ? त्यात व्हायरस असेल तरी नेट स्लो होऊ शकतं "

" मी माझा पिसी तर चेक केलाच आहे पण तुमच्या नेटसेटरची दोन्ही बाजूची कव्हरही भिंगातून तपासलीत कुठे तुटली वगैरे नाहीत "

" सर नेटसेटरच्या कव्हर तुटण्याचा संबंध त्याच्या स्पिडशी नसतो "

" असं कसं ? समजा तुमच्या पायातली चप्पल तुटली तर तुम्ही धावाल की आहे त्यापेक्षा हळू चालाल ? "

" सर तुमच्या जवळपास तीन किलोमीटरच्या परीसरात कल्पनाचा टॉवर आहे का ? "

" आहे पण तुम्ही कितीही म्हणालात तरी आख्खा पिसी घेऊन मी त्या टॉवरवर चढू शकणार नाही"

" नाही सर, आपला नेटसेटर थ्रीजी आहे "

" म्हणजे तीन गावं फिरून येतं का नेटवर्क माझ्याकडे ? "

" सर, थ्रीजी म्हणजे थर्ड जनरेशन "

" मागच्या की पुढच्या ? मागच्या तीसर्‍या पिढीतला नेटसेटर असेल तर परत घेऊन जा, अचानक एक्सपायर झाला तर .."

" तसं नाही, कधी कधी वातावरणामुळे थ्रीजीच्या स्पिडवर परिणाम होतो, पाऊस वगैरे पडत असला तर.. "

" खरंच की, पाऊस पडत असताना नेट चांगलं चालतं हो, पण घेताना हे नाही सांगितलं की थ्रीजीची कनेक्टीव्हीटी पावसाच्या थेंबांनी मिळते "

" तसं नाही सर, वातावरण ढगाळ असलं की नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो कधी कधी "

" मग तर नाहीच चालणार, घरात पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून माझ्या घरातलं वातावरण कायम ढगाळच असतं "

" घरातलं नाही सर, मी ओव्हर ऑल वातावरणाबद्दल बोलतोय "

" अच्छा म्हणजे देशातल्या वातावरणाबद्दल, ते तरी कुठे धड आहे सध्या ? सगळं ढगाळ हो "

" सर देशातलं नाही हो, प्रत्यक्ष वातावरण जे तुमच्या खिडकीतून दिसतं ते "

" माझ्या खिडकीतून समोरच्या आज्जींचं घर दिसतं, पण त्याचं नांव साईकृपा आहे, `वातावरण' नाही काय "

" सर तुम्ही माझी चेष्टा करत आहात का ? "

" मी नाही तुम्हीच चेष्टा लावलेय माझी, नेटसेटर घेताना जाहिरात अशी केलीत की जणू याच्या सहाय्यानं मी भविष्य पाहू शकेन, पण इथे आजचं इमेल पहाता येईल की नाही याची खात्री नसते मला "

" सर, तुम्ही आमच्या सेवेबद्दल नाराज आहात का ? "

" नाही हो, उलट तुमच्यामुळे माझ्या नावावर थोडंफार पुण्य जमा होत असेल वरती, रोज `देवा आज तरी नेट सुरू असू दे' चा धावा केल्यानं "

" सर याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो "

" देवाचा धावा केल्याबद्दल तुम्ही दिलगीरी व्यक्त कशाला करताय ? ऑलरेडी माझ्या अकाऊंट मधे देवाचं दिलगिरीचं इमेल येऊन पडलंय, `इथे मी काही मदत करू शकत नाही' असं "

" सर, मी आपली अडचण समजू शकतो, मी ताबडतोब आपल्या तक्रारीची नोंद घेतो "

" पुढे ?? "

" पुढे काय ? सर ? "

" नुसती नोंद घेणार ? आणि नेटवर्क मिळत नसेल तर नंतर काय निषेध व्यक्त करणार आहात का ? "

" नाही सर, योग्य त्या विभागाकडे सोपवून तीचं निवारण करणार, पण यासाठी एक आठवडा लागेल "

" तुम्ही साधं इंटरनेट वापरण्यासाठी नेटवर्क देताय हो, लष्करे तोयबाचं नेटवर्क यापेक्षा कमी वेळात उभं राहून चालायला लागेल "

" सर आपल्या माहितीसाठी सांगतो, आपला कॉल रेकॉर्ड होत आहे "

" काय सांगता ? एक काम करा, आपलं संभाषण मला ताबडतोब पाठवा, त्याचं काय आहे मी अजूनपर्यंत माझा आवाज फोनवर कसा येतो हे ऐकलेलंच नाहीये "

" या व्यतिरीक्त मी आपली काही मदत करू शकतो का सर ? "

" आहे हा प्रॉब्लेम न सोडवताच अजून एखादा प्रॉब्लेम यायची अपेक्षा करताय का ? "

" कल्पनामधे कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर, आपला दिवस शुभ जावो "

शप्पत सांगतो त्यानं शुभ ऐवजी अशुभ म्हंटलेलं मला स्पष्ट ऐकू आलं.
बरं आता आणखी कुठली वायरलेस इंटरनेट सेवा महाराष्ट्रात आहे हे सांगितलंत तर बरं होईल, कारण पुढची पोष्ट कदाचित दुसर्‍या कंपनीच्या नेट वरून टाकायची वेळ येईल माझ्यावर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud Proud
फुल्ल चाफा स्टाईल...... Happy

<<" ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? " >>
<<तुमच्या नेटसेटरची दोन्ही बाजूची कव्हरही भिंगातून तपासलीत कुठे तुटली वगैरे नाहीत " >>
<<" नुसती नोंद घेणार ? आणि नेटवर्क मिळत नसेल तर नंतर काय निषेध व्यक्त करणार आहात का ? ">>

इथे फिस्सकन हसलो....... Lol Biggrin

अरे चाफ्या, क्षणभर माझेच रेकॉर्ड केलेले कॉल ऐकून लिहीलंस कि काय असं वाटलं Proud
सेम टू सेम अनुभव !!
वर खूप शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न करणारी कन्या असेल कि अजूनच इरीटेटिंग. सरळ बोलीभाषेत बोलली तर चाललं असतं अशा टोनच्या मराठीत केलेली समजावणी आणि संगणकातलं ज्ञान ग्राहकाला असूच शकणार नाही या उदात्त भावनेने सांगितलेले उपाय. स्पीडच्या तक्रारीसाठीच एकदा कॉल केला होता तेव्हां माझं काही ऐकून न घेता तुमच्या कँप्युटरचं कंन्फ्युरेशन सांगा. कंन्फ्युरेशन म्हंजी स्पीड, हार्ड डिस्क, विंडोज असतं सर. रिस्टार्ट करा. आता चालतंय ? परत रिस्टार्ट करा. मी काय सांगते ते ऐका. असं करत करत शेवटी तुमच्या भागात आमचा थ्री जीचा टॉवर नाही . होता पण टेक्निकल प्रॉब्लेममुळं बंद पडला. सहा महीने लागतील सर. आणखी काय सेवा करू ? हा अनुभव कधीच विसरणार नाही.

थ्रीजीची कनेक्टीव्हीटी पावसाच्या थेंबांनी मिळते "...
मग तर नाहीच चालणार, घरात पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून माझ्या घरातलं वातावरण कायम ढगाळच असतं..
लष्करे तोयबाचं नेटवर्क यापेक्षा कमी वेळात उभं राहून चालायला लागेल "
Lol

मी इतक्यावेळा तक्रारी केल्या की शेवटी रिजनल मॅनेजरचा फोन आला होता. त्याने कारवाई केली होती, पण शेवटी ते सगळं कुत्र्याच्या शेपटासारखं, पुन्हा काही दिवसांनी तेच. Sad
२-३ कस्टमर केअरवाले मित्रही झाले नंतर Happy

सहीच ... Happy

Lol

Proud

धन्यवाद मंडळी Happy
तरिही बीएसएनएलचा उंदीर जास्त भारी होता >>>>> आम्ही आपल्याशी सहमत आहोत सर Proud

Pages