जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

Submitted by अभय आर्वीकर on 25 August, 2013 - 19:22

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

                   कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्‍याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.

                  पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?

                  सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाच्या वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.

१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.

३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.

                  या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्‍या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला. 

                  ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्‍हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.

तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.

शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खाण्यास द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.

पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.

हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे. 

३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.

                  दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अ‍ॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे. वैष्णोदेवीला जाण्यामागे भक्तिभावाने देवीदर्शन घेणे असा आईचा उद्देश तर आईला यानिमित्ताने शारिरीक व्यायाम देणे असा माझा उद्देश होता.


मृत्यूच्या दाढेतून परत आलेली माझी आई

                   हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त अन्य तर्‍हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते. 

                                                                                                                - गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

(.....अपूर्ण....)

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. नंतर दूध आणि भात खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्‍या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी
----- केवळ शनिवारच ़ का रविवार चालत नाही?

योग आणि प्राणायामाला या कायद्याने बंदी नाहीये. आयुर्वेदिक औषधे तसे आजीचा बटवा टाईप औषधांनाही विरोध नाहीये. आणि मंत्र , गंडे दोरे करायला बंदी नसून फक्त हेच उपचार करून डॉ कडे जाऊच न देणे याला बंदी आहे.
का उगाच प्रत्येक गोष्टीचा विपर्यास करताय?
तसेही या कायद्याबाबत खूप अपप्रचार करून झालाच आहे , त्यात अजुन कशाला भर टाकताय. जितक्या पॉझिटीव्ह केसेस तुम्ही सांगताय तशाच अनेक नीगेटीव्ह केसेस सुद्धा आहेत. वर्तमानपत्रातून बातम्या येतच असतात की सतत. बाकी डॉ लोकच यावर जास्त बोलू शकतील पण तुमचा दृष्टीकोन पुर्वग्रह दुषित आहे असे वाटतेय.

<< पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्‍याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात? >>

या पुर्ण पॅरा वर जाणकार अभ्यासू व्यक्तींनी अधिक प्रकाश टाकावा. पारंपारिक उपचार पद्धतीला कायद्याने शिक्षा नाहीये. असे मला यावरच्या चर्चेतून तरी वाटले. मला वाटतेय, की मुटे जी गैर समजुतीतून किन्वा जाणीवपुर्वक कायद्याचा अपप्रचार करत आहेत.

......पोलिस माञ खुश असतील सरकार ने आणखीन एक बाहुल दिल त्याच्या हातात. ते दाखुन पैसे उकळायला मोकळे.....

१) कायद्यात कुत्रा-विंचू-श्वानदंश आहे. अर्धांगवात, कावीळ कुठून आले?
२)कायद्यात मंत्रतंत्र, गंडेदोरे आहे; झाडपाला,औषधोपचार, प्राणायाम, योग कुठून आले?

मूळ विधेयकातला वैदू(जडीबुटीची औषधे देणारे?) हा शब्द वगळण्यात आला आहे. लोकांकडून मिळालेल्या सूचना आणि अक्षेपांचा विचार केला गेल्याचे हे एक उदाहरण.

सत्यनारायण घातला, वारीला गेलात तर या कायद्यानुसार तुरुंगात जावे लागेल असे म्हणणार्‍यांत आणि या वरच्या लेखात काय फरक आहे?

वटहुकूम जारी झालाच आहे. शेतकरी संघटना या वरच्या कलमाला (ज्यावर लेखमाला लिहिली जात आहे) न्यायालयात आव्हान देईल का?

इस्पितळात दाखल केलेला रुग्ण दगावला तर तोडफोड, कर्मचार्‍यांना मारहाण इ. प्रकार घडल्याच्या घटना येत असतात. पण जडीबुटी, झाडपाला वापरून केलेल्या उपचारांनी रुग्ण दगावल्याने/तब्बेत खालावल्याने असे उपचार करणार्‍या व्यक्तीला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची बातमी कधी वाचनात आलेली नाही. तस्मात सर्व इस्पितळे, दवाखाने, प्राथमिक उपचार केंद्रे बंद करावीत किंवा जडीबुटीवाल्यांच्या ताब्यात द्यावीत काय?

<ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय?> याचे उत्तर मायबोलीवरचे डॉक्टर्स देऊ शकतील.

<या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत> अगा जे घडिलेचि नाही

तेच ते अन तेच ते.
जी गोष्ट दोन ओळीत सांगण्यासारखी आहे, त्यासाठी तीन लेख लिहून झालेत. आणि एकही 'नवा' मुद्दा तुम्ही आणलेला नाही. तुमच्या एकुलत्या एक मुद्द्याची लक्तरे पहिल्या लेखाच्या प्रतिसादात अनेकांनी काढलेली आहेत, त्याकडे डोळेझाक करून आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून काय साधते आहे मुटे साहेब?
"मी ऐकले आहे / असे म्हणतात / माझा अनुभव आहे" या प्रकारच्या गप्पांना शास्त्रात काहीही अर्थ नसतो, हे तुम्हाला ठाऊक आहे काय?
तुम्हीच लिहिलेल्या कायद्याच्या कलमात "कुत्रा / साप / विंचू चावल्यास.." आणि "वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून" हे दोन मुद्दे पुरेसे सुस्पष्ट नाहीत काय? तुम्ही दिलेली उदाहरणे कावीळ / लकवा या आजारांची आहे, श्वानदंश किंवा सर्पदंशाची नाहीत. तुमच्या मातोश्रींनी स्वखुशीने पर्यायी उपचार घेतलेले आहेत. कोणी त्यांना रोखलेले किंवा बळजबरी केलेली नाही. मग वरची उदाहरणे इथे गैरलागू ठरत नाहीत काय?
देशी (आयुर्वेद / युनानी) आणि पर्यायी (होमिओपथी) उपचार पद्धतींना शासन स्वतःच प्रॅक्टिसचे परवाने देते. (तुमच्या भाषेत- सरकारी अधिकार्‍याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र. ) या पद्धतींसाठी शासनाने स्वतंत्र 'आयुष' विभाग काढला आहे. याची कल्पना आहे का?

तुमचे लेख अत्यंत केविलवाणे आणि हास्यास्पद होत चालले आहेत, तरीही पुढील लेखांक येऊ द्या. त्यानिमित्ताने प्रतिसादातून या कायद्याबद्दल जे प्रबोधन होते आहे, त्याचा 'कुंपणावरच्यां'ना नक्कीच फायदा होईल.

Problem is these alternative medicines are not provable, repeatable. They have some examples of miracles and 100s of other of failure. So decision/laws are always based on probability to serve maximum. Some exceptions are always there on either side. You are concentrating on exceptions not what is commonly happening. First aids home remedies are always welcomed but must be followed by professional help. e.g. if some one is on fire, you will spray water without waiting for doctor to arrive. But once fire is put-off, take him to doctor and don't keep doing home remedies is what LAW is all about. OR should be about. And about police, they don't need law for what they do. They always make money.

But I understand point you want to make.

जो बात दवा से बन न सकि,
वो बात दुआ से होती है

त्यानिमित्ताने प्रतिसादातून या कायद्याबद्दल जे प्रबोधन होते आहे, त्याचा 'कुंपणावरच्यां'ना नक्कीच फायदा होईल. >> +१

वटहुकूम जारी झालाच आहे. शेतकरी संघटना या वरच्या कलमाला (ज्यावर लेखमाला लिहिली जात आहे) न्यायालयात आव्हान देईल का? >>> संघटनेची अधिकृत भुमिका अशी नसावी असा अंदाज संघटनेशी संबंधित व्यक्तींनी मी त्यांना याबाबत विचारल्यावर व्यक्त केला.

शनिवार ही अ.न्धश्रध्दा आसेलही, पण मी ४/५ वर्षांचा असताना गावठी येरंडाच्या पानांच्या उपचाराने काविळीतून मुक्त झालेलो आहे. Happy

मुटे साहेब आपल्या आईचा अनुभव आश्चर्यकारक आहे पण अशक्य नाही.
पारंपारिक ज्ञानातून औषधे देण्याचा वारसा काही कुटुंबांमधे असतो. उदा. वैदूंना या कायद्यातून वगळले आहे. जे जे पारंपारिक ते ते सर्व त्याज्य ही भुमिका योग्य नाही हे मान्य. परंतु जे जे पारंपारिक ते ते सर्व ग्राह्य हे अमान्य. अभय बंगांनी या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करुन बालमृत्यू घटवले. बेअर फूट डॉक्टर ही संकल्पना ग्रामीण भागात खूप चांगली आहे. त्या धर्तीवर मला मांत्रिक तांत्रिक लोकांनाच योग्य प्रशिक्षण देउन मानसमित्र बनवले तर ते सायकियाट्रिस्टचा बराच भार हलका करतील.
या कायद्याच्या स्वरुपात कुठले बदल असावेत? कसा असावा हा कायदा याविषयी काही लिहिले तर ते अधिक उपयुक्त ठरेल.

मुटेसरांचे अनुभवविश्व संपन्न आहे हे तर स्पष्टच आहे शिवाय एखाद्या गोष्टीचा त्याना ध्यास लागला तर त्या संदर्भातील आवश्यक ती माहिती प्रत्यक्ष जागेवर जाऊन ते घेतात हे वरील लेखात प्रकट झाले आहे. असे असले तरी शासन जो काही वटहुकूम या संदर्भात काढणार आहे [किंवा काढण्याची प्रक्रिया चालू झाली आहे] त्यात केवळ "..."कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे."... अशी एकमेव ओळ असूच शकत नाही. हे त्या कलमाचे ठळक रुप झाले तर त्याची सविस्तर व्याख्या तसेच विस्तार पुढील भागात जरूर असते. म्हणजे न्यायाधिश गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावताना केवळ दोनच पाने वाचतात पण प्रत्यक्ष तो निकाल ३०० पानापेक्षा जास्त असतो. वटहुकूमात 'मंत्रतंत्र, गंडेदोरे" याची प्रत्येक कलमानुसार व्याख्या तर असणारच शिवाय पोलिस स्टेशनलाही कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणजे नेमके काय केले पाहिजे यासाठीचा जी.आर. देखील स्वतंत्रपणे निघेल.

"वैद्यकिय उपचार" फक्त रितसर पदवी घेतलेल्या व्यक्तीनेच केले पाहिजेत असा कायदा म्हणत असेल तर मग उद्यापासून तुमच्या गावापासून काहीशी दूर राहात असलेली ती सेवाभावी महिला कावीळवर उपचार उपलब्ध करून देऊ शकत नाही असा अर्थ होईल. मला वाटते कायदा इतका कठोर होणार नाही. कारण ती महिला मंत्रोच्चार गंडेदोरे यांचा आसरा घेत नाही. तिच्यासारख्याच अनेक व्यक्ती आजच्या घडीला या समाजात आहेत आणि त्याही अशीच निरलसपणे वैद्यकिय सेवा करताना आपण पाहतो. ज्याना विश्वास वाटतो ते त्यांच्याकडे जातात, ज्याना वाटत नाही ते तक्रार करत नाही. ही परंपरा चांगली एवढ्यासाठीच की त्यात देवाच्या नावाने चांगभलं असला काही प्रकार नसतो.....आणि सरकारला हेच यातून शाबीत करायचे आहे.

जी.आर. निघाल्यानंतर यावर सविस्तर बोलता येईल.

अशोक पाटील

किती नको म्हटलं तरी या धाग्यावर नजर वळतेच.
मुटेजी शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी जोडले गेलेत तर मी एकंदरच ग्रामिण आरोग्याशी.

मंत्र तंत्र आणि आयुर्वेदिक औषधे यात फरक आहे हे तर वरती ज्ञानेश यांनी लिहिले आहेच.

सर्प आणि श्वानदंशात हे काबिळ आणि अर्धांग मध्येच आलेत.
मागेही मी कुठल्यातरी वाहत्या धाग्यावर लिहिले तसे- आम्हीही लोकांच्या श्रद्धेच्या आड येत नाही.
सिद्धिविनायकाला नारळ फोडून हातात धागा बांधला तर ती श्रद्धा आणि मरीआईला कोंबडं कापून अर्धांग झालेल्या पायाला मोराचं पिस बांधलं म्हणजे अंधश्रद्धा असं निदान मी तरी मानत नाही.
आमच्या दवाखान्यात दाखल झालेल्या सगळ्या रूग्णाना त्यांची इच्छा असेल तर गावठीपॅरॅलिसिस स्पेश्यालिस्टकडे अर्धादिवस जाऊन यायची परबानगी दुसर्‍या दिवशी आम्ही देतो. Wink
गंमत म्हणजे आमच्या भागातले सुप्रसिद्ध पॅरालिसीस स्पेश्यालिस्ट यांनाच दोन महिन्याम्पूर्वी पॅरालिसीस झाला.
मग त्यांना सातीअम्मा कडेच आणण्यात आले.
योग्य त्या अ‍ॅलोपथिक उपचारांनंतर आजोबा चालत तिसर्‍या दिवशी घरी गेले.
आता ते माझ्याकडे पेशंटस रेफर करतात. Wink
पॅरालिसीस आणि काविळीच्या प्रकारांबद्दल आणि त्यातल्या बरं होण्याच्या पॉसिबिलिटीजबद्दल बहुदा एक लेखच लिहावा लागेल असं दिसतंय.
पण धोबळमानाने ५० टक्केहून अधिक पॅरालिसीस आणि ८० टक्केहून अधिक काबिळी या सेल्फ लिमिटींग प्रकारात येतात.
तुम्ही इलाज करा अथवा करु नका ते बरे होणारच असतात. याचाच फायदा बर्‍याच बुबाबाजी करणार्या लोकांना मिळतो.
(आम्हालाही मिळतोच पण ते क्रेडीट आम्ही आमच्या वैद्यकीय ज्ञानाला देतो स्वतःकडच्या दैवी गुणांना नाही)
या बरे होणारच असणार्या ५० टक्क्यांबद्दल आधुनिक वैद्यकाचा रोल काय तर या रोगाच्या १७६० कारणाम्पैकि नेमक्या कुठल्या कारणाने हा रोग झालाय हे पहाणे, तो पुन्हा उदभवू नये म्हणून प्रयत्न करणे.
आणि मूळात जे सेल्फ लिमिटींग नाहीत त्यावर योग्यते उपचार करणे.

मी पाच वर्षांपूर्वी जेव्हा प्रथम या भागात राह्यला आले( हे माझे सासर आहे). तेव्हा इतक्या अंधश्रद्धा होत्या की विचारू नका.
त्यात लेडी डॉक्टरने डिलिवर्या सोडून दुसरे काही करणे लोकांच्या पचनी पडत नव्हते.
पॅरालिसीसच्या पेशंटला एकदा त्या बाबाकडे नेवून आणले की तीन महिने शेतातल्या घरात टाकून देत, देत कशाला बहुतांश लोक अजूनही देतात. तेवढ्या काळात म्हणे बायकांचे तोंड बघायचे नाही, काकणांचा पैजणांचा आवाज ऐकायचा नाही.
अगदीच नाईलाज असेल तर पुरूष डॉक्ट्रकडे जायचं.
माझ्या प्रॅक्टिसच्या सुरूवातीलाही आमच्या अहोंना सगळ्यानि वेगवेगळ्या मार्गानी पॅरालिसीसचे पेशंटतरी तुम्ही बघा असे सुचवुन झाले पण अहोंनी अज्जिबात ऐकले नाही.
मग हळुहळु रूग्णाना रिझल्ट मिळू लागल्यावर आत्ता अशी परिस्थिती आहे की आमच्या जिल्ह्याच्या काही तालुक्याम्तले लोक वीकनेस म्हटलं की सातीअम्माकडे धावत येतात. Wink

असो . लिहायचं म्हटलं तर पुष्कळच आहे याबाबतीत.

शिबाराणी,वीकनेस हातातही असू शकतो. न धावायला काय झालं?
काही लोकांच्या डोक्यातही असतो म्हणा. पण तो असूच द्या. Wink
माझ्याकडे त्यावर इलाज नाही.

पॅरालिसीस आणि काविळीच्या प्रकारांबद्दल आणि त्यातल्या बरं होण्याच्या पॉसिबिलिटीजबद्दल बहुदा एक लेखच लिहावा लागेल असं दिसतंय.
पण धोबळमानाने ५० टक्केहून अधिक पॅरालिसीस आणि ८० टक्केहून अधिक काबिळी या सेल्फ लिमिटींग प्रकारात येतात.
तुम्ही इलाज करा अथवा करु नका ते बरे होणारच असतात
. याचाच फायदा बर्‍याच बुबाबाजी करणार्या लोकांना मिळतो.
(आम्हालाही मिळतोच पण ते क्रेडीट आम्ही आमच्या वैद्यकीय ज्ञानाला देतो स्वतःकडच्या दैवी गुणांना नाही)
<<
याला १००% अनुमोदन.
बोल्ड केलेला भाग महत्वाचा.

एक लेख लिहूनच टाका.

सातीअम्मांच्या पॅरालिसीस पोस्ट वरुन आठवलं.
नुकतीच मी व अजुन एक माबो कर निवांत पाटिल, दोघानी कोल्हापुर ते गोकाक ट्रिप मारली बुलेटवरुन.
त्यावेळी वाटेत एका गावात चहा घेण्यासाठी थांबलो.
कर्नाटकातील गाव असल्याने लिपी कळाली नाही. त्यामुळे नाव वाचता आलं नाही.
नन्दीगोली... (अजुन मोठं नावं होतं) असं काहिस नाव तिथल्या लोकानी सांगितलं.

तर त्या छोट्याशा गावात, जिकडे जायचा रस्ताही बराच खराब आहे अशा गावात खुपशा मोटारी दिसल्या.
जास्त करुन सर्व महिन्द्रा जीप, महिन्द्रा मॅक्स, फोर्स क्रुजर , ट्रॅक्स प्रवासी वाहतुक होतील अशा प्रकारच्या.

नि पा नी कुतुहल म्हणुन चौकशी केली (त्याना कुतुहल वाटलेलं एवढुशा गावात चारचाकीचा जुना बाजार कसा काय) तर तिथे एक वैदु आहे.
लकवा पेशालिस्ट.
तो एक आठवड्याला एक इन्जेक्शन देतो म्हणे. ३०० रु एक इन्जेक्शन. असं एक महिना करायचं.
लकवा पुर्ण बरा होतो.

त्यात स्टेरॉइड कन्टेन्ट असेल का अशी चर्चा करतच आम्ही मार्गी लागलो.

अजुन एक किस्सा होता.
तो नि पा स्वतःच सांगतील.
त्यानी त्या विशिष्ट औषधाचं अनॅलिसीस केलं होतं.

साती, Happy
पण धोबळमानाने ५० टक्केहून अधिक पॅरालिसीस आणि ८० टक्केहून अधिक काबिळी या सेल्फ लिमिटींग प्रकारात येतात.
<<< हे माहीत नव्हतं. थोडं बरं वाटलं हे वाचून.

सिद्धिविनायकाला नारळ फोडून हातात धागा बांधला तर ती श्रद्धा आणि मरीआईला कोंबडं कापून अर्धांग झालेल्या पायाला मोराचं पिस बांधलं म्हणजे अंधश्रद्धा असं निदान मी तरी मानत नाही.
<<< म्हणजे तुम्ही या दोन्हींना श्रद्धा मानता की दोन्हींना अंद्धश्रद्धा?

साती,
तूम्हा लोकांच्या अथक परिश्रमानंतरही असे गैरसमज समाजात आहेत याचा अर्थ तूम्ही लोक पुरेसे लेखन करत नाही आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही, असाच आहे.
अशा प्रत्येक लेखाला तूम्हा लोकांकडून योग ती माहीती देणारा स्वतंत्र लेख, हाच "उतारा" आहे.

मला राहून राहून त्या हैदराबादच्या मासोळ्यावाल्याचा विचार येतोय. उद्या तिकडे जर का हा कायदा आला तर दर वर्षी लाखोच्या संखेनी जाऊन मासोळ्या खाणा-यांचे काय होणार. बिचारे दमावाले. हाईट म्हणजे दम्याचे पेशेंट बरेही होतात.
दम्यावर उपचार म्हणून हैद्राबादेत दिली जाणारी मासोळी मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राला पुरुन उरली हे नक्की!
मासोळीवाले अनुभवपण येऊ द्यात!

मुटेंची लेखमाला एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी आहे असं वाटु लागले आहे. Sad

लालशाह, माझ्या एका मैत्रिणीने तो उपचार घेतला होता. काही सुधार नाही

वरदा,विदिपा धन्यवाद.
इतक्यात काही लेख लिहून होईलसे वाटत नाही.
दिनेशदा, आमच्यापुरतं आमचं ध्येय (सध्यातरी) अ‍ॅफॉर्डेबल टर्शरी हेल्थ सर्विसेस अ‍ॅट अ‍ॅप्रोचेबल प्लेस असे ठेवलेय .
त्यामुळे जनजागृती करणे सध्याचा अजेंडा नाही. अर्थात वेळ मिळेल तसे पेशंटचे ब्रेन वॉशिंग चालू असतेच.

लालशहा, तो हैद्राबादवाला वैदू प्रकारात येतो त्यामुळे त्याच्यावर कारबाई होणार नाही.

तो दम्याचे औषध म्हणून जे देतो ते सब घोडे बारा टक्के न्यायाने एकच असते.
त्याचा कितीतरी कमी टक्के लोकांना खरोखर फायदा होतो. बाकी भ्रमरने लिहिले आहेच.
त्याविषयी बाकी सगळे तुमच्या विपूत वेळ मिळताच लिहिते.

गजानन, दोन्ही श्रद्धाच. व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या.
म्हणूनच माझ्या पेशंटना मी यापैकी कोणतीच गोष्ट करण्यापासून अडवत नाही.
फक्त एकच सांगते ,बाकि सगळ्याबरोबर आमचे औषध सोडू नका. Wink

Pages