विषय क्रमाक २ = धवलक्रांतीचा वेडा जनक.. डॉ. वर्गीस कुरीयन

Submitted by जाई. on 24 August, 2013 - 15:48

वेडेपणा म्हणजे काय ? चारचौघासारख न वागता वेगळ वागण की दिलेल्या परिघाच्या बाहेर जाउन चौकटीबाहेर जाउन वागण ?? आणि या वेडेपणाचा समाजाला फ़ायदा झाला तर ?? मग तो वेडेपणा ठरतो का ?? का समाजाभिमुख काम वेडेपना अंगी असल्याशिवाय करता येत नाहीत ? स्वप्न ही वेडॆपणीच पाहायची असतात का ?? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न

पण सॅम पित्रोदाच्या शब्दात सांगायचे झाले तर किंचीत वेडेपणा अंगी बाणवल्याशिवाय गोष्टी घडवुन आणल्या जात नाहीत.घडवता येत नाही. कारण त्याशिवाय दुध उत्पादक शेतकर्याच्या सहकारी संस्थामार्फ़त आपल्या देशाला दुध उत्पादनात स्वयपुर्ण बनवण्याचे स्वप्न पाहणारे डॉ वर्गीस कुरीयन वेडे ठरले नसते.

वर्ष १९४८, स्थळ दिल्ली , एके दिवशी सकाळी परदेशी शिक्षण घेउन परतलेला , स्वतवर दांडगा विश्वास असलेल्या काहीसा आगाउ असा एक भारतीय तरुण शिक्षण उपसचिवाना भेटण्यासाथी जातो. तेथे त्याला कळ्त की भारत सरकारच्या स्कॉलरशिप अन्तर्गत त्याची नियुक्ती आणंद या ठीकाणी झाली आहे. मात्र युनियन कार्बाईडच्या कारखान्यात नोकरी करण्याची ईच्छा असल्याने हा तरुण ती ऑफर ठोकारुन लावतो. त्यावर उपसचिव त्या तरुणाचे शिक्षण सरकारी तिजोरीतुन झाले असल्याने त्याला खटला भरायची धमकी देतो. त्या सरकारी खर्चाचा परतावा करण्याची ताकद नसल्याने चरफ़डत तो तरुण आपला मामा नवनिर्वाचित मंत्री जौन मथाई यांच्याकडे सुटकेच्या मार्गाकडे जातो. पण ईथे मात्र वेगळच घड्त. " तुला तुझ्या हिमतीवरच भविष्य उभ करायच होत. मग ते उभारा, मी तुला कोणतीही मदत करणार नाही. " या शब्दात कानउघाडणी केली जाते. मामे आजीनी नोकरी बदलण्याच राहू दे , निदान पगार वाढवायला तरी मदत कर या रदबदलीलाही केराची टोपली दाखवून "त्याला ती मिळणार नाही हेच बघायच माझ कर्तव्य आहे" या शब्दात उत्तर मिळत.सुटकेचे सारे दोर कापले गेलेला हा तरुण नाईलाजाने आण्नदकडे प्रयाण करतो. भारताला दुग्धउत्पादनात स्वंयपुर्ण बनवन्यार्या धवलक्रान्तीच्या जनकाची डॉ वर्गीस कुरियनची सुरुवात अशी होते.

स्वातंत्रपुर्व काळात आणंदमधल्या कैरा ईथे ब्रिटीश सरकारने दुधडेअरी चालू केली होती. ईथेच सरकारी एकाधिकारशाही विरुध सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसाचा संप झाला होता. स्वातंत्रोत्तर काळात येथे असलेल्या साय उत्पादक केन्द्राचा कार्यभार कुरियनवर सोपवण्यात आला. सक्तीने लादलेल्या या ओझ्यामुळे कुरियन तसा नाराज होता. आणंद मध्ये त्या काळी सुविधांच्या नावाने बोंब होतीच. सरकारी कारभार असल्याने केन्द्रातही सावळागोंधळ होताच. त्यातच कुरियनला राहत्या घरापासुन अडचणीचा सामना करावा ला्गल्याने त्याला फ़ार काळ ईथे राहण्यात रसही नव्हता. त्यामुळे दिल्लीला सतत पत्रे पाठवून करारपत्रातून मुक्ततेचा धोशा त्याने चालूच ठेवला होता. या प्रयत्न्नाना अखेर यश आल आणि यातून सरकारने त्याची मुक्तता केली. जायला निघणार ईतक्यातच त्याची भेट बाजूच्या कैरा सहकारी दुध संघाचे अध्य़क्ष त्रिभुवनदास पटेल यांच्याशी झाली. कुरियनचे बेत समजताच त्यांनी त्याला दोन महिने थांबायाची विनंती केली. शेतकर्याच्या हिताशी अतिशय एकनिष्ठ आणि कमालीची सचोटी , प्रामाणिकपणा अंगी असलेल्या या असाधारण विलक्षण माणसाला नकार देण कुरियनला अवघड गेल. त्रिभुवनजीशी आणि कैरा जिल्ह्यातल्या दुध सहकार तत्वाशी त्याच्या आयुष्यभराच्या मैत्रीची ही मुहुर्तमेढ आहे याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती.

लवकरच संस्थेच्या कामामधे कुरियन गुंतत गेला. केवळ स्वतकरता नव्हे तर समष्टीच्या कल्याणाकरता काम करायची सुसंधी त्याला दिसली. हे समाधान त्याला परिपुर्णतेचा आनंद देउन गेल. शेवटी केवळ दोन महिन्यासाठी थांबलेला कुरियन १९५० साली कैरा संघाचा सरव्यवस्थापक झाला. भारताच्या धवलक्रांतीची ही नांदी होती.

एकदा झोकून द्यायच ठरवल्यानंतर कुरियनने मागे वळून पाहिल नाही. याकामी त्याला साथ मिळाली ती त्रिभुवनदास पटेल, एम एच दलाया यासारख्याची. त्रिकूट शासन म्हणून लवकरच या तिघांची ख्याती कैरात पसरली. कैरातल्या छोट्यातल्या छोट्या मुद्द्द्यावर कुरियनने ल़क्ष दिले. दुध व्यवसायातले तात्कालिक ईश्यू उदा दुधाची नासाडी, दुध भुकटी, दुधाच्या वितरणातले दोष यावर काम करायला सुरुवात केली. याचा परिनाम म्हनजे १९४८ सालच रोजच २०० लिटर्सच उत्पादन १९५२ साली २०००० लिटर्सपर्यत पोचल. आधुनिक डेआरी चालवण्याकरता योग्य ते कौशल्य मिळाव यासाठी न्युझीलंडला जाउन योग्य ते प्रशि़क्षणही घेतल.

या सर्व धडपडीच रुपांतर ३१ ओक्टोबर १९५५ सालच्या अंमूल डेअरीत झाल. मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरलेल्या म्हशीच्या दुधाच काय करायच हा प्रश्न कुरियनपुढे उरलेला होताच. त्याची भुकटी करता येईल अशी कल्पना त्याच्या मनात आली . व तसा प्रस्ताव त्याने मांडला. मात्र हे काम सोप नव्हत. जगभरातल्या जाणकारांनी म्हशीच्या दुधाची भुकटी होऊ शकत नाही असा निर्वाळा अगोदरच दिला होता. त्यात या प्रस्तावाला विरोध करायला सरकारी अधिकारीही टपलेलेच होते. मात्र कार्यात येण्यार्या अडचणीच प्रगतीला साहायभुत ठरतात यावर कुरीयनची गाढ श्रद्धा होत्ती. त्याने हे आव्हान स्वीकारल आणि म्हशीच्या दुधाच्या भुकटीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. कुरियनच्या भावी वाटचालीची ही एक झलक होती.

सहकार तत्वावर गाढ विश्वास असण्यार्या कुरियनने हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अमूल डेअरीचा प्रकल्प हाती घेतला. अर्थातच ह्यातही त्याला अनेक अडथळे पार करावे लागेल. सरकारी पातळीवरचा विरोध, त्याहीपे़क्षा आपल्याच माणसाना तुच्छ लेखण्याची, विरोध करण्याची प्रवृत्ती हा सर्वात मोठा अडथळा होता. हे कमी की काय म्हणुन युनिसेफ़बरोबरचा यंत्रसामुग्रीचा वाद, कमी मुदतीत प्रकल्प पुर्ण करायच आव्हान बॉयलरला लागलेली आग ह्या अडचणी होत्याच . मात्र या सार्याचा बाउ न करता कुरीयनने त्यावर धीराने मात केली आणि पुर्णपणे सहकारी तत्वावर चालणारी शेतकर्याच्या मालकीची डेअरी असावी हे सरदार पटेलांच स्वप्न अमूलच्या रुपाने प्रत्यक्षात उतरवल.

या घटनेतुन कुरियनलाही बरच काही शिकायला मिळाल. विकसित देशांमधला "जाणकारांचा" तांत्रिक सल्ला हा विकसनशील देशाच्या गरजा वा प्रत्यक्ष परिस्थितीशी निगडीत नसून त्यांच्या स्वताच्या देशाच्या आर्थिक हितसंबंधाशी जॊडलेला असतो हा धडा त्याला मिळाला. यामुळेच पुढील वाटचालीत बहुराष्ट्रीय कंपन्याबाबत त्याने कडक धोरण स्वीकारल. नेस्लेला परवानगी देतानान्ही अनेक अटी घातल्या. सहकार हाच शेतकर्याच्या पर्यायाने देशाच्या प्रगतीचा पाया आहे यावरची निष्ठा अधिकाअधिक द्रुढ झाली. कोणत्याही विकासाचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच असायला हवा याचा आग्रह त्याने धरला. तसेच नोकरशाहीशी घडलेला संघर्ष हा पदोपदी करावा लागेल याचीही खुणगाठ त्याने मनाशी बांधली.

केवळ उत्पादन न वाढता त्याचे वितरणही योग्य प्रकारे झाले पाहिजे यावर त्याचा भर राहिला.सहकारी संस्था असली तरीही त्याचे काम अगदी व्यावसायिकरीत्या व्हावे या विचारातुनच अमूलच्या ब्रॅडची जाहिरात करायची योजना आखली गेली. यातुनच अमूल ब्रॅडचा जन्म झाला. पुढे १९६६ साली युस्टास फ़र्नाडिसांनी अमूलच शुभंकर जन्माला घातला. ती छोटी खट्याळ मुलगी. पुढे ती ईतकी प्रसिध झाली की ती आणी अमूल ब्रॅड अस एक समीकरणच बनून गेल.

सामान्य माणूस हा भारतीय प्रगतीचा मुख्य आधार आहे यावर कुरियने नेहमीच भर दिला. यामुळेच केवळ अमूलच्या बॅलन्सशीटचे आकडे फ़ुगवण्यात धन्यता न मानता त्यात सहभागी असण्यार्या या घटकाचीही प्रगती झाली पाहिजे याकडेही त्याने ल़क्ष पुरवले. अमूलमूळे एका नव्या सामाजिक वीणीची सुरुवात झाली. उदाहरणार्थ दुध व्यवसाय हा प्रामुख्याने स्त्रियांच्या हाती होता. या भरभराटीला येण्यार्या उद्योगामुळे स्त्रियांच्या हाती पुरुषाईतकाच पैसा खेळू लागला. त्यांच आर्थिक स्वावलंबन झाल. दुसर म्हणजे अमुलमधे प्रथम येण्यार्स प्राधन्य या तत्वावर दुध संकलन केल जाई. रांग सर्वाना समान होती. जातिसंस्थेसारख्या रुढीचे किमान टवके उडायला यामुळे मदत झाली.तसच स्वच्छतेच महत्व सर्वाना पटवून देण्यात आल. दुध व्यवसायासाठी पशुधन सर्वात महत्वाच असल्याने पशुवैद्याकाची नियुक्तीही करण्यात आली. त्याबरोबरच बायकामुलांकरता "आरोग्याची काळजी कशी घ्यावी" याबाबतचे कार्यक्रम घेण्यासाठी त्रिभुवनदास फ़ौडेंशनचा निर्मिती झाली.

अमूलच्या या प्रगतीशील घौडदौडीमुळे ईतर ठिकाणाहुन काम करण्याबाबत कुरियनना बॊलावण येउ लागल. दिल्ली मिल्क स्कीमच काम हे त्यापैकीच एक. प्रचंड प्रमाणात भ्रष्ट्राचार , गैरव्यवस्थापन , गैरप्रकार याची बजबजपुरी तिथे माजली होती. पण दिल्लीतले दलाल, राजकारणी यांच्या झोटिंगशाहीला न जुमानता ,हितसबधाला धक्का देउन प्रसंगी शत्रुत्व पत्करुन कुरीयननी डीएमएस गदागदा हलवुन सोडली व केवळ ४२ दिवसात घोळ निस्तरुन तिला नव रुप दिल.

१९६५ साली पतप्रधान लालबहादूर शास्त्रीबरोबर झालेली भेट कुरियनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आणंदचा प्रकल्प पाहिल्यानंतर देशभर असे आणंद व्हावेत अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठीच्या योजनेची संपूर्ण जबाबदारी कुरीयनवर सोपवण्यात आली.या कामासाठी नॅशनल डेअरी डेवलमेण्ट बोर्ड ( एनडीडीबी) स्थापन करण्यालाही मान्यता देण्यात आली. ऑपरेशन फ्लडची ही सुरुवात होती

अर्थात हे काही एवढ सोप नव्हत. त्यासाठी कुरियनना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. आणंद पॅटर्न देशभर रुजावा अशी खुद्द पंतप्रधानांची ईच्छा असली तरीही बहुतेकाना ते आपल्या राज्यात यशस्वी होईल हेच मान्य नव्हते. सर्वात मोठा अडथळा तर नोकरशाहीचा होता ऑपरेशनच फ़्लडच यशस्वी होण हा त्यांच्या आजवरच्या सरकारी खाक्याला धक्का होता. ही योजना प्रत्यक्षात येण हे ही काही हितसबधाना धक्का लावणार होत. मात्र हातात घेतलेले काम तडीस लावण्याच्या स्वभाव असल्याने कुरियननी यातूनही मार्ग काढला. या योजनेच महत्व , फ़ायदे अनेकाना पटवून देत योग्य त्या परवानग्या मिळवत या प्रकल्पाची मुहुर्तमेढ सप्टेबर १९६५ रोवली गेली.

थोडक्यात सांगायचे तर या प्रकल्पाचे तीन टप्पे होते. पहिला ट्प्पा म्हणजे देणगी म्हणुन मिळालेल्या दुग्धजन्य पदार्थापैकी दुधाच्या भुकटीच दुधामधे रुपांतर करुन त्याच वितरण मुंबई , दिल्ली, कलकत्ता मद्रास ईथल्या सरकारी दुध योजनाना करायचे. जेणेकरुन तिथल्या बाजारपेठावर नियंत्रण मिळावता येईल. अपे़क्षेप्रमाणे कुरीयनना ईथेही संघर्ष करावा लागला. सर्वप्रथम वर्ल्ड फ़ूड प्रोग्रमशी दोन हात करावे लागले. तसेच देणगी मदत मिळावताना भारत कॊणाचाही मिंधा राहणार नाही हे कुरीयननी कटाक्षाने पाहिल. योग्य किमतीपेक्षा कमी किमतीत देणगी उत्पादन विकु देणार नाही आणि भारतातल्या दुध व्यवसायाच ख़च्चीकरण होउ देणार नाही हे ही बजावून सांगितल.

योजनेतल्या दुसरा ट्प्पा होता दुधवितरणातून आणी देणगी रुपातल्या पदार्थाच्या विक्रीतून जो काही पैसा मीळेल त्याच्या वापर शहरातल्या जनावरांच्या निगराणीकरता तसच दुध उत्पादन, संकलन , आणि त्यावरच्या प्रक्रियेकरता वापरण्यात येईल असा. दुध प्रकियेच विकेन्द्रीकरण, सहकार प्रणालीवर भक्कम विश्वास, उत्पादक व ग्राहक यांच्याशी थेट संवाद, ग्राहकाला त्याच्या पैशाच योग्य ते समाधान, उत्पादकाला पैसे मिळण्याबरोबरच त्याचा स्वताचा विकास ही टप्प्याची मुख्य वैशिष्ट्ये होती. स्वकीयाच्या विरोधाला मोडुन टाकत, आर्थिक हितसबन्धाना भीक न घालत्ता प्रचंड विश्वासाने या टप्प्यावरही कुरियननी यश मिळवल. हे यश ईतक भव्य होत की ज्या राज्यानी हा प्रकल्प राबवला नव्हता तिथल्या राज्यकर्त्याना जनतेच्या रोषाला सामोरे जाव लागल. या दुसर्या टप्प्यामध्ये दुध संकलन केद्रांचा आकडा १८ वरुन १३६ वर गेला. शिवाय शहर्यातल्या २९० बाजारपेठांनी विक्रीकेंद्र वाढवली. हा टप्पा संपण्याच्या सुमाराला ४.२५ कोटी शेतकर्याची,त्यांच्या सहकारी संस्थाची एक स्वयंपूर्ण यंत्रणा उभी राहिली. दुधाच्या भुकटीत आणि विक्रीतही विक्रमी वाढ झाली.

बाजारांतून प्रमुख दुधयंत्रणेचा बस्तान नीट बसण्यासाठी या सगळ्याच्या वापर हा यंत्रणेच्या तिसरा ट्प्पा. १९८५ ते १९९६ च्या काळात अगोदर अस्तिवात असलेल्या ४२००० सहकारी संस्थामध्ये ३०००० ची भर पडली. मोठ्या प्रमाणावर सभासदाचे प्रशि़क्षण केल गेल. महिला सभासदांची पर्र्यायाने महिला सहकार संस्थाची संख्या वाढली.दुधाच संकलन, व्यवस्थापन, विक्री तसेच जनावरांच्या आरोग्यविषयक सेवा , चाराची सोय , पौष्टिक खाद्य यावर भर देण्यात आला.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार ऑपरेशन फ्लड मध्ये गुंतवलेल्या २०० कोटी रुपयांवर भारतीय ग्रामीण व्यवस्थेतून दरवर्षी २४००० कोटी रुपये असा मोबदला मिळाला होता. हे ऑपरेशन फ्लडच नेत्रदीपक यश होत.

अशाप्रकारे चार दशक लागलेल्या या ऑपरेशन फ्लडला निश्चित असा आकार आला . ते मार्गी लागल आणि ही धवल पताका जगभर फ़डकली.

चाळीस वर्षाचा कालावधी घेतलेल्या या ऑपरेशनबाबतीत कायम वांदंग झडले. त्यावर सतत चर्चा होत राहिली. प्रसार माध्यामाची , जनतेची यावर कायम नजर राहिली. आश्चर्याची गोष्ट असी की आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी या प्रकल्पाच कौतुक झाल असल तरी खुद्द देशात मात्र यावर कायम शंका व्यक्त होत राहिली. यातली काही वर्षे तर कुरीयन आणि सहकार्यासाठी सत्वपरीक्षेची ठरली. टाईम्समधून अल्वारिस यांनी लिहीलेली धवल असत्य ही एक मालिका हे याच ठळक उदाहरण. यात धवलक्रांती कशी अयशस्वी ठरली आहे याच लिखाण केल होत.
हे कमी की काय म्हणून ऑपरेशनच्या स्वरुपाला देखील अनेकांचा विरोध होता. देणगी स्वरुपात मिळलेल्या दुध भुकटीमुळे देश कसा आयातप्रधान झाला आहे ही भीती व्यक्त केली गेली. जी अर्थातच अनाठयी व कुरीयनना न ओळखता आल्याच्या मानसिकतेतून केली गेली होती. दुसर महत्वाचा आरोप म्हणजे या प्रकल्पासाठी खेड्यातल पोषणमूल्य युक्त अन्न शहराकडे वळवून खेडुताच्या जीवावर शहरवासियांच पोषण करण अर्थातच या आरोपालाही योग्य त्या आकडेवारीने सप्रमाण दाखवून देउन कुरीयननी खोडून काढल.या ऑपरेशनसाठी वापरल्या जाण्यार्या यंत्रसामुग्रीविषयीसुद्धा वाद झाले. यंत्र आयातीमुळे भारताला परालंबित्व आल असा टीकाकाराचा आक्षेप होता. यंत्र निर्मतीच्या आकडेवारीमुळे हा ही आरोप बिनबुडाचा ठरला.

मात्र या सार्याच्या परिणाम उच्चस्तरावरही झालाच. अनेक हितसबध जोपासता न आल्याने कुरीयनानी अनेकांशी वितुष्ट् घेतल होतच. शेवटी बराच गदारोळ झाल्यानंतर औपरेशन फ़्लडच्या यशाअपयशाच मूल्यमापन करण्यासाठी झा समिती नेमण्यात आली. जिने अर्थातच अनुकूल असा अभिप्राय देउन टीकाकरांची तोंड बंद केली आणि या एकूणच प्रकल्पाबद्द्ल कुरीयन तसेच एनडीडीबीची पाठ थोपाट्ली.

मात्र या सगळ्यामुळे कुरीयन अजिबात विचलीत झाले नाहीत. आगीतून बाहेर पडल्यानंतर हिर्याच तेज आणखी उजाळत त्याप्रमाने कुरीयन आणि प्रकल्पाच झाल. तिसर्या टप्प्यासाठी जागतिक बॅकेन्च सुलभ अर्थ साहाय व त्याही पेक्षा १२ ओक्टोबर १९८७ रोजी एनडीडीबीला कायद्यानुसार मिळालेली स्वायत्ता याने कुरीयन यांच कर्तुत्व आणखी झळाळून निघाल.जगभर या ऑपरेशनची ख्याती पसरल्याने परकीय देशाकडून उदा. रशिया , श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशातुनही हा प्रकल्प राबण्याची विचारणा होउ लागली.
केवळ ऑपरेशन फ़्लड पुरत कुरीयन याच कर्तुत्व सीमीत नाही. अमूल बेबी फ़ुड , धारा खाद्यतेल, ३०००० सहकारी संस्थाची निर्मिती , व्हेन्डीग मशीन्स, मीठगरासांठी केलेले प्रयत्न, ईर्माची स्थापना अशा अनेक कामागिर्या त्यांच्या नावावर नोंदलेल्या आहेत

धवल क्रांतीचे शिल्पकार असण्यार्या डॉ वर्गीस कुरियन यांची ही कहाणी.. मेटर्लजी विषयात करिअर करण्याची ईच्छा असनारे कुरियन नशिबाच्या एकाच कलाटणीमुळे दुध व्यवसायात आले आणि त्यात गुंतत गेले. निस्वार्थी व्रुत्त्तीने केवळ शेतकर्य़ाच्या विचार करण्यार्या या माणसाच आयुष्य म्हणजे विविध रंगाचे मिश्रण आहे. त्यात त्यांची आव्हान , त्यांच यश , त्यांच वैफ़ल्य असे अनेक रंग आहेत.
सहकार तत्वावर गाढा विश्वास असण्यार्या या माणसाने सहकारी तत्वावर व्यावसायिकरीत्या यशस्वीपणे उद्योग चालवता येतात हे दाखवून दिल. डेमोग्राफ़िक डीवीडंडची कल्पना प्रत्यक्षात उतरवली.
खेड्यापाड्यातल्या गरीबाना मिळाण्य़ाकरता निर्जतुक आणि सकस दुधाची निर्मिती, त्याच्या वितरणासाठी उभारलेली साखळी यंत्रणा हे यातले प्रमुख टप्पे. त्यांनी निर्माण केलेला अमूल हा जगातला सर्वात मोठा ब्रंड ठरला. दरडोई दुध उपलब्धतेत झालेली वाढ हे डॉ कुरीयनच आणखी एक कर्तुत्व. विना सहकार नाही उध्दार हे तत्व कुरीयन यांच्या कामाच सुत्र होत.बहुराष्ट्रीय कंपन्याना भारतीय बाजार पेठा आंदण मिळू नयेत याची पूरेपूर काळजी घेतली. त्यानी निर्माण केलेल्या संस्था ह्या भारतीय दुध व्यवसायाचा आधारस्तंभ ठरल्या.गांधी पटेलांच्या सामान्य माणसाची ताकद कुरीयननी ओळखली. त्याना एकत्र आणल. आणि देशाला एका क्षेत्रात स्वंयपूर्णता मिळवून दिली. शेतकर्याच्या नोकरदार असे जन्मभर म्हणवून घेण्य़ात या माणसाने धन्यता मानली

मात्र ही वाटचाल सोपी नव्हती. अनेक अडचणीचा त्यांना सामना करावा लागला. बर्याचदा संघर्ष कारावा लागला. सनदी नोकरशाहांशी तसेच सत्ताधार्याशी उडणारे खटके नेहमीचे होते. या कटू अनुभवामुळे दुध व्यवसायातील शेतकर्याच्या खरा शत्रू हा सरकार आणि अधिकारी आहेत हे त्यांचे मत अखेर पर्यत कायम राहिल.

आपले निर्णय अंमलात आणणयासाठी अनेक कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागले. थंड काळजाचा, हट्टी, दुराग्रही, वेडा अशा अनेक विशेषणांनी त्यांना हिणवल गेल. मात्र एवढ होउनही न डगमगता योग्य तेच पायंडे पाळण्याबाबत कुरीयन आग्रही राहिले . त्याची गोमटी फ़ळे पुढे मिळाली

भारताचा मिल्कमन म्हणुन गौरवलेल्या डॉ कुरियनना अनेक मानसन्मान मिळाले. मेगसेसे पुरस्कार ( त्रिभुवनदास आणि खुरोंडीसहित संयुक्त ) , वॉटलर पीस प्राईज, डेअरी मॅन ओफ़ द ईयर , मिशिगन युनिवर्सिटीकडुन मिळालेली डॉक्टरेट हे काही वानगी दाखल पुरस्कार. भारतामध्येही त्यांना पद्मश्री, पद्मविभूशण अश्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल.

या प्रवासात कुरीयनना त्रिभुवनदास पटेल, दलाया . पत्नी मॊली, यशवंतराव चव्हाण , लाल बहादुर शास्त्री , ईन्दिरा गांधी सारखे राजकारणी , शिवरामन , सुबम्रण्यम सारखे सनदी अधिकारी आणि सर्वात मह्त्वाच म्हणजे सामान्य शेतकरी अशा अनेकांची साथ मिळाली . किंबहुना या सर्वाशिवायचा त्यांच्या प्रवास सुखकर ठरला नसता

एकेकाळी वेडा हट्टी म्हणून हिणवल्या गेलेल्या या माणसाच वेडेपण देशासाठी द्रष्ट ठरल. सॅम पित्रोदांनी म्हटल्याप्रमाने या माणसाची स्वप्न वेडी असली तरीही खरी होती. त्याची प्रत्येक गोष्ट पटावी असे नाही पण या माणसाने आपल्याला एक स्वप्न दिल आनि त्या स्वप्नातला वाटा सर्वाना हवा आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सर्वासाठी ही अशी वेडी माणस अधिकाअधिक प्रमाणात हवी आहेत.

डॉ वर्गीस कुरियन ....
या माणसान नेहमीचा श्रीमंत होण्याचा मार्ग धुडकावला.....
नावही न एकलेल्या आणंदला आपल कार्यक्षेत्र बनवल.....
विदेशी कंपन्याना तोडीस तोड देत अमूलची निर्मिती केली. ....
धवलक्रांतीच्या जनकाचा हा प्रवास अतिशय रोचक , विलक्षण !!!!
मती गुंगवणारा , रंजक , आणि भारतीय मनोव्रुत्तीवर
झगझगीत प्रकाश टाकणाराही !!!

संदर्भ...
१) माझही एक स्वप्न होत ( आय टु हॅड अ ड्रीम या पुस्तकाचा सुजाता देशमुख कृत अनुवाद)
२) काही आंतरजाल स्त्रोत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला लेख! कुरियन यांच्याविषयी इतकं वाचलं नव्ह्तं याअगोदर!

छान लिहिलास जाई Happy

जाई....

"डॉ.वर्गीस कुरियन" या नावाला स्पर्धेच्या निमित्ताने इतका मान दिला जात आहे हे पाहून मनस्वी आनंद झाला आहे. मला वाटते 'अमूल' जादूवरील हा तिसरा निबंध असावा आणि तो जाई यानी तितक्याच ताकदीने तोलला आहे. खुशी याचीही की डॉक्टरांच्या कार्याची महती सांगत असताना त्यानी त्रिभुवनदास पटेल यांच्या योगदानाचाही तितक्याच तोलामोलाने उल्लेख केला आहे. खुद्द वर्गीस यानीही पुस्तकात श्री.पटेल यांच्याबाबतीत असेच कृतज्ञतेचे उद्गार काढले आहेत. डॉक्टरांचा केरळामधील जन्म तर उच्च शिक्षण अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सटीतील. स्कॉल्ररशिप मधील एका अटीनुसार शासन आदेश देईल त्या ठिकाणी ड्युटीसाठी जायचे इतपत माहीत. त्यामुळे 'आणंद' नामक कुठेतरी गुजराथ प्रांतात गाव आहे याची त्याना कल्पनाही नसेल आणि तिथे तर आपल्याला जायचेच नाही, राहायचेही नाही...केवळ अटीची पूर्तता करण्यापुरतीच हजेरी....एवढ्या तुटपुंज तडजोडीवर स्टेशनवर उतरलेला तो युवक पुढील कित्येक दशके तेथील जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातो आणि आणंद तसेच अमोल ह्या नावाना विश्वपातळीवर आणून ठेवतो ही एक चमत्कारीक घटना होय.

हा विषय फार आनंददायी आहे....एवढ्यासाठी की अगदी "चांदोबा" धर्तीसारख्या कथेसारखी त्याची बांधणी झाली आहे म्हणून तो आणखीनच भावतो.

डॉ.वर्गिस कुरियन यांच्या खाजगी जीवनाचा उल्लेख जाई यानी केला आहे. जागा मर्यादेमुळे सार्‍याच गोष्टी सांगता आल्या नसतील तरीही इथे प्रतिसादाच्या निमित्ताने सांगत आहे की मॉली ह्या त्यांच्या पत्नीही त्यांच्यासमवेत कामात इतकी गर्क असायच्या की जणूकाही त्यांचे जीवन डॉक्टरांच्या कार्याला वाहून घेतले होते. योगायोग म्हणजे डॉ.वर्गिस यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यात मॉली यांचेही देहावसान झाले. जोडीला "निर्मला" नामक एक मुलगी आहे.

एका सुंदर लेखाबद्दल जाई यांचे अभिनंदन.

अशोक पाटील

जाई, गं मस्तच लिहलयस.. Happy
कुरीयन यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती.. वाचलं नव्हतं. धन्यवाद माहिती करुन दिल्याबद्दल Happy

लेख मस्त जमलाय . . पण काही ठिकाणी न आणि ण मध्ये गफलत झालीये . संयोजकांची परवानगी असेल तर सुधारून घ्या .

>>सामान्य माणूस हा भारतीय प्रगतीचा मुख्य आधार आहे यावर कुरियने नेहमीच भर दिला. यामुळेच केवळ अमूलच्या बॅलन्सशीटचे आकडे फ़ुगवण्यात धन्यता न मानता त्यात सहभागी असण्यार्या या घटकाचीही प्रगती झाली पाहिजे याकडेही त्याने ल़क्ष पुरवले. अमूलमूळे एका नव्या सामाजिक विणीची सुरुवात झाली >>>>
सुंदर लिहिलेस जाई, दिलेल्या शब्दमर्यादेत माहिती,निरीक्षणे अन रंजकतेचे योग्य मिश्रण साधून.

जाई, सुंदर माहितीपूर्ण लेख. डॉ. कुरीयन हे कायम माझे आवडते व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती वाचायला मिळाली.

सुरेख....

लहान होते तेंव्हा शाम बेनेगल चा "मंथन" सिनेमा पाहिला होता. बाबा खुप भारावुन जाउन कुरियन बद्दल बोलत होते. तेंव्हा काहीच समजलं नव्हतं. फक्त त्या सिनेमातलं गाणं "मारो गांव काठापारी" , स्मिता पाटिल आणि गिरिश कर्नाड तेवढे मनात रेंगाळत होते ( त्या सिनेमात गिरिश कर्नाडांनी कुरियन ची भूमिका केली आहे).... नंतर बाबांच्या कामा निमित्त कॉलेज मधे असताना एकदा "आणंद" ला गेलो होतो. त्या वेळेस बाबांनी काय चक्र फिरवली माहित नाही पण अमूल चा प्रकल्प आतून पहाता आला. आणि खूप भारावले....

"मंथन " परत पाहिला. त्यांचं आत्मचरित्र वाचून काढ्लं.... खरच त्या माणसाला सलाम. जे काही मी पाहिलं ते प्रचंड भव्य होतं... आजुबाजुच्या सगळ्या गावांमधिल लोकांना त्यांनी शेअर होल्डर केलं .... हे काम अज्जिबात सोप्प नाही..... येवढा मोठ्ठा जुगाड त्यांनी कसा केला असेल !!! मुळात कंपनी बद्दल आत्मियता निर्माण करण्या साठी त्याच लोकांना मालक बनवण्याचं सहकार चळवळीचं येवढं मोठ्ठ उदाहरण निदान भारतात तरी नसेल.....

कुरियन नुसतेच वेडे आणि स्वप्न बघणारे नाहित, ते म्हणजे अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट गुरु म्हणावे येवढं त्यांच क्र्तुत्व महान आहे...

जाई हा विषय घेतल्या बद्दल तुमचं अभिनंदन.....

मामे आजीनी नोकरी बदलण्याच राहू दे , निदान पगार वाढवायला तरी मदत कर या रदबदलीलाही केराची टोपली दाखवून "त्याला ती मिळणार नाही हेच बघायच माझ कर्तव्य आहे" या शब्दात उत्तर मिळत------>आजच्या काळात असला राजकारणी मामा दुर्मिळच म्हणावा लागेल

बाकी लेख छानच..

शोभनाताई ;अश्विनी; तोषवी ; भारतीताई ; कविन ;मुग्धानंद ;स्वाती ;तोषादा; स्वाती ;प्रताय ;मोहन की मीरा ; sacheen मनपुर्वक धन्यवाद

मस्त माहितीपूर्ण लेख.
आजच्या काळात असला राजकारणी मामा दुर्मिळच म्हणावा लागेल >>++

सॅम पित्रोदा यांच्यावर कुणीच लिहीलं नाहीये ना या स्पर्धेत?

सुंदर लिहिलेयस जाई. भरपुर माहिती अगदी नेटक्या शब्दात बसवलीय. छान जमले. मनापासुन भिनंदन.

आणंद मलाही तेव्हा मंथनमुळेच पहिल्यांदा कळले होते.

शेतकर्याच्या नोकरदार असे जन्मभर म्हणवून घेण्य़ात या माणसाने धन्यता मानली>>>>> हे वाक्य वाचायला खुप सुंदर... तमाम नोकरशाहीला चपराक देणारं आहे...... सरकारी नोकरी म्हंजे नक्की कोणाची चाकरी ... आणि कोणाशी बांधिलकी हे वारंवार जाणवुन देणारा लेख ... जाई माहीती बद्दल खुपच धन्यवाद...... आपले तथाकथीत सहकार मह्र्षी हालेख वाचतील का.......

मला बर्‍याच गोष्टी पहिल्यांदा कळल्या...
छान लिहिलयेस!
माझ्यामते तू हे सगळं मोबाईल वरून लिहिलयेस ना (का)?
(गेस आहे हा माझा Wink )

वा ! जाई फार सुरेख लिहिलं आहेस. अतिशय अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ !
काही वाक्य फारच मस्त जमलीत, उदा. >>>विकसित देशांमधला "जाणकारांचा" तांत्रिक सल्ला हा विकसनशील देशाच्या गरजा वा प्रत्यक्ष परिस्थितीशी निगडीत नसून त्यांच्या स्वताच्या देशाच्या आर्थिक हितसंबंधाशी जॊडलेला असतो <<<
>>>दूध प्रकियेच विकेन्द्रीकरण, सहकार प्रणालीवर भक्कम विश्वास, उत्पादक व ग्राहक यांच्याशी थेट संवाद, ग्राहकाला त्याच्या पैशाच योग्य ते समाधान, उत्पादकाला पैसे मिळण्याबरोबरच त्याचा स्वताचा विकास ही टप्प्याची मुख्य वैशिष्ट्ये होती.<<<
>>>त्याची प्रत्येक गोष्ट पटावी असे नाही पण या माणसाने आपल्याला एक स्वप्न दिल आनि त्या स्वप्नातला वाटा सर्वाना हवा आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सर्वासाठी ही अशी वेडी माणस अधिकाअधिक प्रमाणात हवी आहेत.<<<
खूप आवडला लेख !

Pages