विषय क्रमांक १: पंचवार्षिक योजना - अौद्योगीकरण अाणि सामाजिक विकास यातून स्वयंपूर्णता अाणि समृध्दी?

Submitted by kaushiknagarkar on 24 August, 2013 - 10:02

भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला तेंव्हा आम्ही हजर नव्हतो यात अामचा काही दोष नाही असं अामचं ठाम मत अाहे. अामचा जन्मच तेंव्हा झाला नव्हता. अाम्ही असं ऐकलं अाहे की त्यापूर्वी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. फुलातला रस शोषून घेतल्यावर भुंगा जसा उडून जातो तसे भारताच अार्थिक शोषण करून पोट भरलेले ब्रिटीश रसहीन भारतभूमी सोडून गेले.

असं सांगतात की, जाताजाता भारताची फाळणी करून ब्रिटिशांनी बाडबिस्तरा हलविला.
त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना भारताचं पंतप्रधान पद मिळून, त्यांच्या सरकारचं राज्य तेंव्हा सुरु झालं. जवाहरलाल नेहरू यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं म्हणतात, पण वकिलीचा व्यवसाय त्यांनी केलेला दिसत नाही. त्याऐवजी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा खटाटोपच त्यांनी जास्त केला. नाही म्हणायला सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेतील अधिकाऱ्यांवर भरलेल्या देशद्रोहाच्या खटल्यात त्यांनी लक्षणीय कामगिरी केल्याची नोंद अाहे. मोहनदास गांधी हे त्यांचे गुरू होते. हे देखील बॅरिस्टर झाले होते पण त्यांनीही वकिली फारशी केलेली दिसत नाही. वकिली करून पैसा मिळवण्यापेक्षा भारतीय जनतेच्या कल्याणासाठी खस्ता खाणे त्यांनी अधिक श्रेयस्कर मानले.

गांधीजी, त्यांना महात्मा म्हणत, नेहेमी स्वत: विणलेल्या खादीचे धोतर नेसून भारतभर पायी फिरत असतं. या भारतभ्रमणातून गांधीजींना भारतीय जनतेच्या हालअपेष्टा अाणि व्यथांची जाणीव झाली असं नेहेमी म्हटलं जातं. ते अर्थातच चुकीचं अाहे. नुसतं पायी फिरून असा काय भारत दिसणार? याउलट अाम्ही विमानातून फिरताना जास्त भारत पाहात असतो असं अामचं प्रामाणिक मत अाहे. विमानातून अाणि एसी गाडीतून फिरताना ( गाडी शक्यतो इंपोर्टेड ब्रँडचीच असावी असा अामचा कटाक्ष असतो) अाम्हाला जी माणसं भेटली त्यांना काही व्यथा वगैरे असतील असं अाम्हाला जाणवलं नाही.

गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरू होते. हे सारे लोक नेमस्त म्हणून अोळखले जात. अापलचं बरोबर असा अाग्रह धरावा; 'जुनं ते सोनं' हा मंत्र सतत जपत कोणत्याही सुधारणेला कडाडून विरोध करावा अाणि कोणी 'अरे' म्हणायच्या अाधी अापणच 'कारे' म्हणून अारडाअोरडा दंगाधोपा करावा; असं मस्त जीवन जगण्याऐवजी हे नेमस्त लोक; अहिंसा, विचारविनिमय, सामोपचार, तडजोड, सर्वधर्मसमभाव असल्या डेंजरस अाणि कालबाह्य कल्पना उराशी बाळगून असत. नेहरू याच पठडीतले असं अाम्ही ऐकलयं.

नेहरूंनी अनेक चुका केल्या असं काही लोक म्हणतात. नेहरूंनी कधीच एखादी छोटिशी सुध्दा चूक कधी केली नाही असं त्यांचे समर्थक म्हणतात. चूक करणं सोडून द्या, नेहरू चूक हा शब्द देखील कधी उच्चारत नसत. चूक हवी असली तर ते 'खिळा द्या हो जरा' असं म्हणत असत, असं कोणीतरी कोणालातरी सांगत असताना कोणीतरी ऐकलं, असं कोणीतरी आम्हाला सांगितलं. ते खरच असणार, कारण नेहरूंविषयी, किंबहुना सगळ्याच मोठ्या लोकांसंबंधी, कोणीतरी कोणालातरी सांगितलेलं नेहेमी खरं असतं हे सगळ्यांना माहीत आहे. पण नेहरूंनी भारताच्या विकासासाठी जी धोरणं, म्हणजे पॉलिसी, स्वीकारली ती चुकीची होती असं आम्हाला फार ठामपणे वाटतं. ठामपणे वाटलं म्हणजे मग त्याला पुराव्याची अथवा तर्कशुध्दतेची जोड देण्याची बिल्कुल गरज नसते असं आमचं ठाम मत आहे.

या चुकीच्या धोरणाचा धडधडीत पुरावा म्हणजे, मुलभूत सुविधा आणि उद्योग यावर भर देण्याचं त्यांचं धोरण. हे धोरण नुसतं तत्वत: मान्य करून थांबले असते तरी पुढचा अनर्थ टळला असता. परंतु एक चूक झाकण्यासाठी पुढची घोडचूक, म्हणजे हे धोरण अमलात अाणण्यासाठी पंचवार्षिक योजना अाणि त्यासाठी प्लॅनिंग कमिशनची स्थापना. या घोर चुकीचे भीषण परिणाम जनतेला लगेचच भोगावे लागले. कारण मूलभूत सुधारणा होण्यास फार वेळ लागतो अाणि त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तुंच्या निर्मितीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.

साधा पोलादाचा पत्रा बनवायचा म्हणजे किती उपद्व्याप होता. अाधी लोखंड अाणि कोळशाच्या खाणी खोदायच्या. म्हणजे त्यासाठी खोदाईची यंत्रं अाणा, कामगारांना शिक्षण द्या, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. खनिजं खाणीतून कारखान्यापर्यंत नेण्यासाठी लोहमार्ग, रस्ते बांधा. अायात निर्यातीसाठी बंदरं बांधा, जहाजं अाणा. पोलादाचे कारखाने बांधा, त्यासाठी तंत्रज्ञान मिळवा. ते कारखाने चालू रहावेत म्हणून अभियंते अाणि प्रशासक हवेत म्हणून त्या क्षेत्रातल्या उच्चशिक्षणाची व्यवस्था करा. एक ना अनेक. अाणि इतका खटाटोप वर्षानुवर्षे करून; अनेक अपयशं पचवून; स्वार्थ, लाचखोरी, बेफिकिरी, फितुरी, संकुचित दृष्टीकोन अशा अनेक मानवी विकारांशी झगडा करून, हाताशी काय येणार तर काही पत्रे, तारा अाणि रूळ. त्यापेक्षा छान परदेशी वस्तु मागवून घेणं किती सोपं होतं. पण तसं झालं नाही, त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटली तरी अामजनतेला गाडी घ्यायची झाली तर फक्त अँबॅसेडर किंवा फ़ियाट एवढेच पर्याय उपलब्ध होते. साधी अंघोळ करायची झाली, तर लाईफबॉय साबण किंवा लक्स यापलीकडे जाता येत नव्हतं. हा असला घोर अन्याय जनतेने कसा सहन केला असेल देव जाणे.

या काळात भारताच्या कोशात परकीय चलनाची गंगाजळी अगदी तुटपुंजी होती; बहुसंख्य जनतेला दोन वेळचं खायला मिळण्याची भ्रांत होती; रोगराई व बालमृत्यूचं प्रमाण फार जास्त होतं; पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, रोजगार, वैद्यकीय मदत, या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या; अन्नधान्य, तेल, साखर, औषधे अशा जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होता; या आणि असल्याच इतर कारणांची लांबचलांब यादी देऊन या चुकीच्या धोरणाचं समर्थन केलं जातं. ही असली कारणं देऊन विचारी माणसांना अंतर्मुख करता येईल कदाचित, आणि म्हणूनच आमचा त्याला कडाडून विरोध आहे. किंबहुना विचार करायलाच अामचा विरोध अाहे. विचार केल्याने उगाच डोक्याला त्रास मात्र होतो असं आम्हाला ठामपणे वाटतं. केवळ खिशात पैसा नाही, पोटात अन्न नाही अाणि डोक्यावर छ्प्पर नाही म्हणून कोणी गाडीचं स्वप्न पाहू नये का? अंघोळीला बादलीभर पाणी मिळण्याची मारामार अाहे म्हणून त्यांनी उंची साबण वापरूच नयेत का?

भारत स्वतंत्र झाला त्याचवेळी, काही वर्षं अलिकडे वा पलीकडे, इतरही अनेक राष्ट्रे सार्वभौम बनली. वर उल्लेख केलेले अडचणींचे डोंगर या सर्व राष्ट्रांपुढे सर्वसाधारणपणे सारखेच होते. पण यातल्या बऱ्याच देशांना धडाडीचे नेते लाभले. लोकशाहीमुळे विकासाच्या गतीला खीळ बसते हे त्वरित जाणून त्यांनी लौकरात लौकर आपापल्या देशांची लोकशाहीच्या जोखडातून मुक्तता केली. आपल्या सारखा शूर, वीर, चतुर, सर्वगुणसंपन्न नेता देशाच्या आणि लोकांच्या उध्दारार्थ युगायुगातून एकदा जन्म घेतो हे समजावून घेऊन त्यांनी तहहयात देशाची सेवा करण्याची शपथ घेतली. इतकच काय, आपल्या मागे आपल्या वारसांनी देखील आयुष्य देशाच्या सेवेत खर्च केलंच पाहिजे असा निग्रह केला. आपल्याला किंवा त्यांना या महान कठीण कार्यापासून सुटण्याचा मोह होऊ नये म्हणून त्यांनी देशाची घटना बदलून घेतली. केवढी ही कर्तव्यनिष्ठा. किती महान त्याग. असा त्याग करणारी या एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या भारत देशात एकही व्यक्ती निघाली नाही. अॉलिंपिक स्पर्धांमधे जी बोंब असते तीच रड इथेही.

विकासाच्या वाटेतला लोकशाहीचा अडसर दूर झाल्या बरोबर इतर देशांमधे चहुकडे विकासच विकास झाला. चकचकीत, सुबक आणि सुंदर असा परदेशी माल बाजारात जिकडे तिकडे दिसू लागला. मोठ्या शहरात, विशेष करून राजधानीत राहाणाऱ्या जनतेची अगदी चंगळ झाली. वीज, पाणी वगैरे सुविधा नसल्या तर नसोत; पण उंची कपडे, अत्तरे, सिगरेटी, दारू आणि तऱ्हेतऱ्हेच्या मोटारी सहज मिळू लागल्या. त्या सत्ताधीशांच, त्यांच्या कुटुंबियांच अाणि त्यांच्या समर्थकांच कोटकल्याण झालं. या सगळ्या विकासाचा त्या त्या देशांना जबरदस्त फायदा होत होता असं ते जनतेला अाणि जगाला ठणकावून सांगत होते. कसा झाला, किती झाला, कुणाचा झाला असले प्रश्न विचारत बसून फुकट वेळ वाया घालवू नका. कोणी ठणकावून सांगितलं की ते खरं असतं असा आमचा ठाम विश्वास आहे. आता यावरही तुम्ही विश्वास ठेवायला तयार नसाल तर मात्र खऱ्याची दुनिया नाही राहिली असचं म्हणावं लागेल.

काही देशात तिथल्या 'कृतघ्न' जनतेला हा असला ‘विकास’ नको होता अाणि त्यामुळे यापैकी बऱ्याच महाभागांना कठीण परीस्थितीस तोंड द्यावे लागले. त्यांच्या प्रमाणेच 'देशसेवा' करण्याची इच्छा असलेल्या विरोधकांनी त्यांना खाली खेचण्याचा चंग बांधला. काही ठिकाणी 'अडाणी अाणि अाळशी' जनतेला इम्पोर्टेड मोटारींपेक्षा रोजच्या खाण्यापिण्याचा प्रश्न जास्त महत्वाचा वाटत होता. त्यांना भडकवून काही देशद्रोही नेत्यांनी लोकांना रस्त्यावर येण्यास चिथावणी दिली. लोकांच्या आंदोलनांना कंटाळून इतर काही देशात लष्कराने सत्ता हातात घेतली. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'नाईलाजानेच' हे करावं लागलं होतं.

या उलट भारतातली परिस्थिती होती. कितीही पैसा असला गाठीला, तरी असला फॉरीनचा माल मिळत नव्हता सहजा सहजी. बहुसंख्य जनतेला तुटपुंज रेशनचं धान्य, रॉकेल यावरच गुजारा करावा लागत होता. दुष्काळ पडला, रोगराई अाली, नैसर्गिक अापत्ती अाली तर कोणीतरी मदतीला येत होतं, पण त्याचं काय एवढं? भारतीय सेनाधिकाऱ्यांनी अशी 'महत्वाकांक्षा' न ठेवल्याने भारतात हा असला 'विकास' घडू शकला नाही. त्यामुळे लोकशाहीची मुळं त्या भूमीत खोलवर रुजली आणि लोकशाहीच तण फोफावतच गेलं. इतकं की एकोणीसशे पंचाहत्तरमधे 'आणीबाणी' नावाच्या तणनाशक विषाचा प्रयोगही निष्फळ ठरला.

मध्यंतरीच्या काळात बरीच सामाजिक स्थित्यंतरं होऊन समाज ढवळून निघाला. वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस अशा सेवासुविधा उपलब्ध झाल्याने आणि निर्भयपणे घराबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महिला मोठ्यासंख्येने शिक्षणासाठी आणि लौकरच नोकरीसाठी नियमितपणे घराबाहेर पडू लागल्या. त्यामुळे सामाजिक जीवनाची सारी घडीच बिघडून गेली.

शहरातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी आणि रोजगारीच्या नव्या संधीचा फायदा घेण्यासाठी खेड्यातल्या लोकांचा ओघ शहराकडे वळला, आणि ग्रामीण समाजजीवनामधेही उलथापालथ झाली. जातीभेद, अज्ञानातून आलेली अंधश्रध्दा, अार्थिक पिळवणूक अशा शतकानुशतके काटेकोर काळजीने जपलेल्या परंपरा डोळ्यादेखत मोडून पडत राहिल्या. प्रत्येक गावात शाळा, गाव तेथे रस्ता, रस्ता तेथे एसटी अशा योजनातून भारतभर दळणवळणाची सुविधा अाणि शिक्षणाचा प्रसार वाढून देश जवळ अाला. अाता चार टाळकी जवळ अाली की डोकी फिरणार, दंगेधोपे होणार हे ठरलेलचं अाहे. तसे ते झाले, अघुनमधून होत राहातात पण हाताबाहेर जात नाहीत हा केवळ ‘सुदैवाचा’ भाग अाहे. देशातल्या सर्वसाधारण शांततेचं श्रेय भारतीय जनतेच्या सहिष्णुतेला अाणि केंद्रसरकारच्या (मग ते कोणत्याही पक्षाचं असू दे) संयमी हाताळणीला दिलं जातं ते साफ चुकीचं अाहे असं, अामच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे, अामचं ठाम मत अाहे.

एकोणीसशे ऐंशी साल अवतरलं तोपर्यंत भारताने, दोन युध्दातले विजय, यशस्वी अणुचाचणी, हरितक्रांतीद्वारा अन्नधान्न्याची स्वयंपूर्णता अशा काही किरकोळ बाबतीत यश मिळविलं होतं. मात्र कोणत्याही महासत्तेच्या हातचं बाहुलं होण्याचं नाकारून अलिप्ततेचा एकाकी मार्ग चालण्याचा अट्टाहास केल्याचा परिणाम म्हणून अाधुनिक तंत्रज्ञानान अाणि उद्योगधंद्यासाठी लागणारं भांडवल तसच बाजारपेठा यांना भारत वंचित राहिला होता. परंतु सर्वांशी मैत्री राखण्याच्या या 'पुळचट' धोरणामुळे असेल कदाचित, पण जेंव्हा पेट्रोलियमचे भाव गगनाला जाऊन भिडले तेंव्हा रातोरात कुबेरासारख्या श्रीमंत झालेल्या अाखाती देशात काम करून भरपूर पैसे कमावण्याची संधी सर्व थरातल्या भारतीयांना मिळाली. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या, खेडयापाड्यातल्या, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या अनेक कुटुंबातून कोणी ना कोणी मध्यपूर्वेत जाऊन पैसे कमावून अाणू लागलं. या पैशामुळे त्यांचं जीवनमान उंचावलं. कोणी जमिनी घेतल्या. कोणी घरं बांधायला, सुधारायला घेतली. स्कुटर, मोटारसायकल यासारखी वहानं, गॅसच्या शेगड्या, फ्रिज, टिव्ही, रेडियो यासारखी उपकरणं यांची मागणी वाढली. शिक्षण ही चैन न रहाता निकड झाली अाणि खाजगी शिक्षणसंस्थांना पेव फुटलं. हजारो तरूण संगणकशास्र अाणि इतर तांत्रिक शिक्षणाचा अाणि इंग्रजी भाषेच्या ज्ञानाचा लाभ घेउन जगभर प्रोग्रॅमर्स म्हणून कार्यरत झाले.

अशारितीने पुढच्या वीसवर्षात केवळ सुदैवाच्या जोरावर भारताची परिस्थिती अाणि प्रतिमा, एक भिकारी अाणि दुबळा देश अशी होती ती पूर्णपणे पालटून, अाता भारताकडे एक अाधुनिक, चैतन्यशील लोकशाही अाणि भावी महासत्ता म्हणून पाहिलं जाऊ लागलं. एकेकाळी चाळीस कोटी जनतेच्या पोटासाठी पुरेसं अन्नं नसे, इतर देशांनी दयाबुध्दीने दिलेला किडका गहू रेशनवर रांगेत राहून घ्यावा लागे. त्याच देशात अाज शंभर कोटीच्यावर लोकसंख्या होऊन देखील, अन्नधान्याची सुबत्ता अाहे. लहान पोरांच्या तोंडाला लावायला देखील दुधाचा थेंव मिळायची मारामार असे तिथे अाता दुधाचा महापूर वाहातो अाहे. लोकांच्या अंगावर कपडा अाहे. कुपोषण कमी होऊन अारोग्यसेवा विस्तृत प्रमाणावर उपलब्ध झाल्याने बालमृत्यूचे प्रमाण खालावले असून सरासरी अायुष्यमर्यादा वाढली अाहे. सार्वजनिक जीवनात स्थैर्य अाहे, जेमतेम का होईना कायद्याचं राज्य अाहे. हा सगळा स्वयंपूर्णतेच्या धोरणाचा परिणाम अाहे असं तुमचं मत असलं तर ते अगदी चुकीचं अाहे असं अामचं ठाम मत अाहे.

काही संदर्भ:
(खरं तर अाम्ही ठामपणे सगळं समजावून सांगितल्यावर संदर्भ हवेत कशाला?)

पंचवार्षिक योजना:
http://en.wikipedia.org/wiki/Five-Year_plans_of_India

http://planningcommission.nic.in/plans/planrel/fiveyr/welcome.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाचा धागा सार्वजनिक करायला विसरलो होतो. तो तसा करून पुन्हा प्रकाशित केला आहे.
बाकी कोणताही बदल केलेला नाही.
हे संयोजकांना कसं कळवायचं ते ध्यानात आले नाही.
तसेच हा लेख आता सार्वजनिक झाला की नाही याची खातरजमा कशी करायची ते ही समजले नाही.

उपरोधाचा सूर आवडला, पण प्लानिंग कमिशनची कार्यपद्धती, त्या कमिशनची लीडरशिप-त्यांची कामासंबंधी व्हिजन, त्याचा एकूण इकॉनॉमी वर, जीडीपी वर झालेला परिणाम, गेल्या ५० एक वर्षात प्लानिंग कमिशनमधे झालेलेल महत्वाचे बदल या सर्वांबद्दल लिहायले हवे होते म्हणजे लेख परिपूर्ण झाला असता.
या विषयावर तुमचा अभ्यास असेल तर स्पर्धा संपली तरी सविस्तर लेख लिहू शकता.

मेधा,
अभिप्राय आवडला. धन्यवाद. आपण सुचविलेल्या सुधारणाही योग्यच आहेत. प्लानिंग कमिशन हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. परंतु त्यासंबंधी विस्त्रुत प्रमाणात माहिती आणिउपलब्ध आहेच. मी त्यामागे धावलो नाही कारण तो माझ्या लेखाचा मूलभूत मुद्दा नव्हता.

माझ्या लेखाचा हेतु हा प्लानिंग कमिशनच्या निर्मितीमागे स्वयंपूर्णतेचं धोरण होतं ती घटना कशी, किती आणि का महत्वाची होती यावर प्रकाश टाकणं हा होता. ह्या स्पर्धेसाठी सादर झालेल्या कितीतरी लेखांचे चरित्रनायक्/नायिका यांना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची संधी मिळाली ती या घटनेमुळे असं मला वाटतं.