विषय क्र.२ : दूरदर्शन

Submitted by नंदिनी on 22 August, 2013 - 04:19

आमिर खानने जेव्हा सत्यमेव जयते हा एक महत्त्वाकांक्षी दूरचित्रवाणी कार्यक्रम एका खाजगी वाहिनीसोबत करण्याचे ठरवले तेव्हा हा कार्यक्रम त्याच दिवशी त्याच वेळेला दूरदर्शनवरून देखील प्रसारित झाला पाहिजे अशी त्याची प्रमुख अट होती. सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं एकंदर स्वरूप लक्षात घेता, दूरदर्शनवर हा कार्यक्रम दाखवण्यामागचा त्याचा हेतू सहज समजून येईल. कारण, देशभरामधे केबल वाहिन्यांचे कितीही जाळे पसरलेले असले तरी आजही भारताच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोचणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन. ३१ वाहिन्या, ६६ अद्ययावत स्टुडिओ, १४१३ ट्र्रान्समीटर्स आणि १२ कोटीहून अधिक घरांमधे पोचण्याची क्षमता असलेले दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठ्या दूरचित्रवाणी नेटवर्कपैकी एक आहे.

सध्या केबल वाहिन्यांच्या जंजाळामधे आणि एकंदरीतच माहितीच्या विस्फ़ोटामधे माध्यमे क्षणाक्षणाला बदलत आहेत. करमणुकीचे मनोरंजनाच्या संज्ञा बदलत आहेत. एफ़एमच्या लोकप्रियतेने रेडीओ पुन्हा एकदा कानात वाजू लागलाय, पण एके काळी या ऑल इंडिया रेडिओचेच बाळ असलेले आणि नंतर पूर्ण माध्यमसत्ता एकहाती गाजवणारे दूरदर्शन हे जरा दुर्ल़क्षित झालेले आहे. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळामधे दूरदर्शन, त्याची संकल्पना आनि विकास याचबरोबर विकासात्मक संवाद (डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन) यामधे असलेले योगदान अढळ आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५६ मधे दूरचित्रवाणीचा शैक्षणिक, ग्राम विकास आणि सामाजिक प्रगतीचे माध्यम म्हणून उपयोग करण्यासाठी २० हजार डॉलर निधीची तरतूद करण्यात आली. १९५९मधे दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू झाले, यादरम्यान त्याचे अस्तित्व आकाशवाणीचा एक विभाग यापलिकडे नव्हते. मात्र या माध्यमाचे महत्त्व आणि सामर्थ्य यांचा अंदाज तेव्हा पुरेसा आला होता कारण तेव्हा याकडे मनोरंजनाचे माध्यम म्हणून न पाहता समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणूनच पाहिले जात होते. या चाचणी प्रक्षेपणामधे गणित विज्ञान इत्यादि कार्यक्रमांना विद्यार्थीवर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाले होते.

एप्रिल १९६५ पासून सुरूवातीला आठवड्याला चार दिवस आणि दिवसातून एकच तास अशा दूरदर्शनच्या सर्वसाधारण प्रक्षेपण सेवेचा आरंभ केला. दिल्ली आणि आसपासच्या खेड्य़ांमधे बुधवार आणि शुक्रवार आठवड्यातून दोन दिवस २० मिनीटांचे शेतकी विषयक कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात येई. हे कार्यक्रम बघता यावेत म्हणून प्रतेक खेड्य़ात टीव्ही संच सार्वजनिक स्थानी ठेवले होते. हे कार्यक्रम अणुउर्जा विभागाने माहिती प्रसारण मंत्रालय, आकाशवाणी, भारतीय कृषी अनुसंधान संस्स्थान आणि दिल्ली प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवले. १५ ऑगस्ट १९६५ पासून दररोज प्रक्षेपणाला सुरूवात केली. १९७२ मधे मुंबई, जानेवरी १९७३ मधे श्रीनगर, आणि त्यानंतर कलकत्ता, मद्रास, लखनौ, अमृतसर आणि जालंधर ही केंद्रे चालू झाली. हे प्रक्षेपण भूस्तरीय होते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी उपग्रहीय संचार प्रणाली वापरणे आवश्यक होते.

साईट (सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलीव्हेजन एक्स्परिमेंट) हा विक्रम साराभाईंच्या पुढाकाराने अमेरिकेच्या नासा आणि भारत सरकार यांच्यात एका करारान्वये नासाच्या उपग्रह संचार प्रणाली वापराचा एक प्रयोग करण्यात आला. यामधे नासाची उपग्रह संचार प्रणाली दररोज काही ठराविक तासांकरिता भारतीय उपखंडातील दूरचित्रवाणी प्रसारणाकरिता वापरण्यात येणार होती. या प्रयोगामधून असे लक्षात आले की, विकासात्मक संवादासाठी दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. या प्रयोगानंतर ट्रान्समीटर्सच्या मदतीने भूस्तरीय कार्यक्रम पक्षेपित करण्यात येऊ लागले. बहुचर्चित खेडा कम्युनिकेशन प्रोजेक्ट यानंतरच चालू करण्यात आला. १ एप्रिल १९७६ पासून दूरदर्शनला स्वतंत्र अस्तित्व मिळाले आणि पुढील दोन दशकांमधे अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम प्रसारित करून भारताच्या माध्यमक्रांतीमधे एक मोलाची भर घातली गेली.

नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धा हा भारतासाठी एक मानबिंदू होता, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला हा पहिलाच मोठा क्रीडासमारंभ होता. या स्पर्धांआधी देशभरामधे दूरदर्शनचे जाळे पसरवण्यात आले. लघुशक्ति प्रक्षेपण केंद्राची उभारणी करून हे थेट प्रक्षेपण गावागावात पोचवण्यात आले. हे प्रक्षेपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे याकरिता रंगीत प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आणि इतके दिवस कृष्णधवल असलेले दूरदर्शन रंगीबेरंगी बनले.

यानंतर भारताने इन्सॅट१अ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून उपग्रह संचार प्रणालीच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रीय प्रसारण एकाच वेळी विविध केंद्रावरून प्रसारित करता येणे शक्य झाले. दूरचित्रवाणी बातम्यांचे राष्ट्रीय प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक मीडीया यांची सुरूवात झाली. इन्सॅट १ब प्रक्षेपणानंतर आंध्र प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधे नियमित प्रसारण सेवा सुरू झाली. १ जुलै १९८४ पासून जवळपास दर दिवशी एक या वेगाने सतत चार महिने विविध भागात ट्रान्समीटर्स बसवण्यात आले. यामुळे देशभरामधे दूरदर्शनचे एक घट्ट जाळे उभारले गेले. अर्थात या सर्व घडामोडींअधे दूरदर्शन हे केवळ “सामाजिक परिवर्तनाचे माध्यम” न राहता प्रामुख्याने करमणुकीचे माध्यम बनत गेले. मात्र, तरीदेखील दूरदर्शनवरील करमणुकीच्या कार्यक्रमांमधून सामाजिक संदेश देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आले.

१९८४ साली आलेल्या हम लोग या मालिकेने एक वेगळेच दालन उघडले. कनिष्ठ मध्यम वर्गीय जनतेला भावणारे कथानक तरीही कुटुंब नियोजन, लैंगिक विषमता, स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण, व्यसनाधीनता यांसारख्या विविध प्रश्नांचे चित्रीकरण यामधून केले गेले. ही मालिका सामान्य लोकांची होती, त्यांच्य दैनंदिन आयुष्यामधे येणारे प्रसंग, प्रश्न- समस्या यांचे यथार्थ चित्रण करणारी होती यानंतर आलेल्या "यह जो है जिंदगी" "खानदान", "नुक्कड" या मालिकांनी दूरदर्शन माध्यमाला भारतीयांच्या मनात स्थान देण्यास सुरूवात केली. रमेश सिप्पीसरख्या मातब्बर चित्रपट दिग्दर्शकाने "बुनियाद" ही भारत पाक फ़ाळणीवर आधारित मालिका तयार केली. भीष्म सहानींच्या कादंबरीवर आधारित तमस ही गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली मालिका, जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित भारत एक खोज सारखा आगळा प्रयोग अथवा जगातील सर्वश्रेष्ठ लघुकथांवर आधारित दर्पण यासारख्या मालिकांनी अभिरूचिसंपन्न कार्यक्रम प्रेक्षकांना घरबसल्या मिळू लागले.

मात्र लोकप्रियतेचा उच्चांक गाठला तो रामानंद सागर यांच्या रामाय़ण आणि बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकांनी. या सर्व मालिका करमणूकप्रधान असल्या तरी त्यामागे एक सामाजिक आणि नैतिक संदेश होता, समाजाला नुसत्या करमणुकीचा चारा न देता त्यामधून प्रेक्षकांनी स्वत: विचार करणे, त्यानुसार आपल्या दैनंदिन जीवनामधे बदल घडवणे अपेक्षित होते. याचदरम्यान जाहिरातदारांना दूरचित्रवाणी या माध्यमाच्या ताकदीबद्दल खात्री पटली, आणि जास्तीत जास्त जाहिरातदार या माध्यमाकडे आकृष्ट होऊ लागले. हम लोगच्या यशाइतकेच महत्त्व त्या मालिकेचे जाहिरातदार असणार्‍या मॅगी नूडल्सनी काबीज केलेल्या बाजारपेठेला आहे.

राजधानी दिल्लीकरीता १९८४ मधे मेट्रो वाहिनी चालू करण्यात आली. नंतर तिचा विस्तार कलकत्ता, मुंबई आणी मद्रास असा करण्यात आला. नंतर याच वाहिनीला डीडी न्युजचे स्वरूप देण्यात आले. आज दूरदर्शनच्या ३१ वाहिन्या अहोरात्र प्रक्षेपित होत असतात. यापैकी राष्ट्रीय प्रक्षेपण आणि डीडी न्युज या दोन वाहिन्या उपग्रहीय आणि भूस्तरीय स्तरावर प्रक्षेपित करण्यात येतात तर डीडी स्पोर्ट्स, डीडी भारती, डीडी ज्ञानदर्शन, डीडी इंडिया, आणि इतर ११ प्रादेशिक वाहिन्या उपग्रहाद्वारे प्रक्षेपित करण्यात येतात. डीडी स्पोर्ट्सवरती कबड्डी, खोखो यांसारख्या ग्रामीण आणि अस्सल भारतीय खेळांच्या सामन्यांचे प्रक्षेपण केले जाते. त्याखेरीज जगभरात होणार्या अनेक क्रीडास्पर्धांचे लाईव्ह प्रक्षेपण देखील डीडी स्पोर्टवर केले जात असते.

भारताला समृद्ध बहुभाषिकत्त्वाचा ठेवा लाभलेला आहे. भारतामधे असलेल्या भाषांच्या या वैविध्यामुळे जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचायचे असल्यास त्यांच्या भाषेतून संवाद साधणे जास्त हितकर. त्यादृष्टीने दूरदर्शनने विविध प्रादेशिक वाहिन्या चालू केलेल्या आहेत. डीडी काश्मिर, डीडी पंजाबी, डीडी ईशान्य, डीडी बांगला, डीडी ओरिया, डीडी गुजराती, डीडी सह्याद्रि, डीडी सप्तगिरी, डीडी चंदना, डीडी पोदिगै, डीडी केरलम आणि राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, हरयाणा, झारखंड, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश या आठ क्षेत्रीय वाहिन्या इतक्या दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्या आहेत. या वाहिन्या जरी प्रादेशिक असल्या तरी संपूर्ण देशामधे उपग्रहाद्वारे प्रसारित केल्या जातात त्यामुळे देशामधे कुठेही बघता येऊ शकतात. परदेशातील भारतीयांकरता डीडी इंडिया ही वाहिनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्षेपित केली जाते. याखेरीज अंकीय प्रक्षेपणासाठी दूरदर्शनने डीडी डायरेक्ट प्लस ही अंकीय सेवादेखील नि:शुल्क रीत्या चालू केली आहे.

मात्र, इतक्या नवीन वाहिन्या चालू करूनदेखील दूरदर्शनच्या यशाचा आलेख ९०च्या दशकानंतर मात्र खाली येत गेलेला दिसतो. १९९१ नंतर भारतात चालू झालेल्या खाजगी वाहिन्या आणि उत्पन्नासाठी दूरदर्शनने जाहिरातींवर अवलंबून राहणे ही प्रमुख कारणे आहेत. भारतामधे खाजगी दूरचित्रवाणीचा प्रसार सुरू झाल्यानंतर दूरदर्शनने त्या वाहिन्यांशी स्पर्धा करण्याचे धोरण स्विकारले. वास्तविक पाहता, दूरदर्शन या वाहिन्यांच्या येण्याआधीपासून लोकमानसामधे रूजलेले होते. मात्र, या वाहिन्यांच्या आगमनानंतर दूरदर्शनने आपला हक्काचा ग्रामीण आणि कनिष्ठ वर्गातील प्रेक्षकवर्गाकडे पाठ फ़िरवून शहरी आणि निमशहरी वर्गातील प्रेक्षकांना रूचतील अशा कार्यक्रमाची आखणी केली. १९९४ नंतरच्या बजेट कपातीमुळे दूरदर्शनला अधिकाधिकरीत्या व्यावसायिक होण्यास भाग पाडले. उत्पन्नासाठी सरकारी मदतीपेक्षा जाहिरातदारांवर अवलंबून राहिल्याने दूरदर्शन् अधिकाधिक करमणूकप्रधान कार्यक्रम दाखवू लागला आहे. हा केवळ भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील अनुभव आहे, जेव्हा जाहिरातदार कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यामधे सहभागी असतात, तेव्हा ठरविक पठडीतील आणि ठराविक लोकांना भावतील असेच कार्यक्रम बनवण्यात येतात. दूरदर्शनदेखील त्याला अपवाद ठरले नाही. वास्तविक, ग्रामीण वर्गाला आजही दूरदर्शन या माध्यमाची आणि त्याच्या सकारात्मक बदलांची नितांत आवश्यकता आहे, हे दूरदर्शनने अद्याप लक्षात घेतलेले नाही. दूरदर्शनचा आजही असलेला सर्वात मोठा महत्त्वाचा प्लस पॊन्ट म्हणजे त्याची संपूर्ण भारतभर असणारे पदचिन्ह (फ़ूट प्रिंट) भारतातल्या कित्येक दुर्गम भागामधे दूरदर्शन पोचलेला आहे, आणि जिथे पोचलेला नाही तिथे पोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा वेळेला या बहुसंख्य प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.

दूरदर्शनवरील अगदी सुरूवातीच्या काळापासून चालत आलेला आणि आजही तितकाच लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे कृषीदर्शन. या कार्यक्रमाद्वारे भारतातील सर्व शेतकर्‍यांना शेतीविषयक, फळ्बाग, फुलबाग , कुक्कुटपालन अशा संबंधित विषयांवर गरजेनुसार माहिती दिली जाते. शेतीमधले विविध प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या जातात, बदलत्या तंत्रज्ञानाची, जागतिक बाजारपेठेची माहिती या कार्यक्रमामधून दिली जाते. दूरदर्शनच्या विविध प्रादेशिक वाहिन्यांवर देखील थोड्याफार प्रमाणातयाच स्वरूपाचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. यामधील एक आगळावेगळा आणि अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम “ग्रीन केरळ एक्स्प्रेस” हा दूरदर्शनच्या डीडी केरलम वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. केरळमधील विविध ग्रामपंचायती या अनोख्या रीअ‍ॅलिटी शोमधे सहभागी झाल्या होत्या, व त्या ग्रामपंचायतींचे विकासात्मक धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात आली हे या कार्यक्रमामधे डॉक्युमेंट केले गेले. करमणूकप्रधान तरीही सामाजिक आशय असलेला हा कार्यक्रम केरळी जनतेमधे प्रचंड लोकप्रिय झाला. अजून एक असाच दुसरा कार्यक्रम डीडीच्या हैद्राबाद रीजनल केंद्राकडून प्रसारित करण्यात आला- मुख्यमंत्र्यांशी फोन-इन कार्यक्रम. यामधे मुख्यमंत्री स्वत: फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असत. अशा पद्धतीचे कार्यक्रम दूरदर्शनच्या इतर वाहिन्यांवरून देखील प्रसारित केले जात आहेत. डीडी सह्याद्रिवरील हॅलो सखी हा मराठी कार्यक्रमांमधील लोकप्रिय कार्यक्रम आहे. यामधे विविध क्षेत्रातील मान्यवर येऊन प्रेक्ष़कांच्या फोन्-इन प्रश्नांना उत्तरे देतात.

दूरदर्शनने भारताचे वैविध्य जपणार्‍या गायन, नृत्य, नाटके, लोककला असशा विविध परफॉर्मिंग आर्ट्स यांना कायम उत्तेजन दिले आहे. इतर खाजगी वाहिन्या जेव्हा टीआरपीसाठी झगडत असतात, तेव्हा दूरदर्शन कोणार्क फ़ेस्टीव्हल, हंपी फ़ेस्टीव्हल, विविध लोककलांचे कार्यक्रम, भारतातील प्रमुख यात्रा यांचे लाईव्ह प्रक्षेपण करत असते. याखेरीज, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण देखील दूरदर्शनमार्फ़त भारताच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात दिसू शकतात. या दिवसांच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांचे राष्ट्राला उद्देशून असणारे भाषण देखील दूरदर्शनवरून प्रसारित केले जाते. संपूर्ण भारताला ज्याचा अभिमान वाटावा असे कार्यक्रम उदा: उपग्रहांचे प्रक्षेपण यांसारखे कार्यक्रम देखील दूरदर्शनवरून प्रसारित केले जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमधे होणारे संचलन प्रत्येक भारतीयाच्या मनामधे देशाविषयी अभिमान निर्माण करते.

आपल्या देशामधे संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येक नागरिकाला संसदेमधे नक्की काय घडत आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही या दोन वाहिन्या प्रसारित केल्या जातात. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या लाईव्ह प्रसारणाव्यतिरीक्त या वाहिन्यांवरून विविध खात्यांशी संबंधित मंत्र्यांच्या मुलाखती, खासदारांची ओळख वगैरे राजकीय तसेच इतर सामाजिक कार्यक्रम दाखवण्यात येतात.

दूरदर्शनच्या सुरू होण्यामागील एक प्रमुख उद्दीष्ट होते शिक्षणप्रसार. शिक्षणक्षेत्रामधे धडाडीने कितीही बदल होत असले तरी भारतासारख्या खंडप्राय देशामधे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि त्यासाठी आवश्यक साधनसामग्री सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही. यासाठी दूरचित्रवाणीसारखे दृक श्राव्य माध्यम उत्तम पद्धतीने मदत करू शकते. ज्ञानप्रसाराकरता जनमाध्यमांचा वापर करून तरूण पिढीला अधिकाधिक सुजाण बनवण्यासाठी २६ जानेवारी २००२ दूरदर्शनमार्फ़त ज्ञानदर्शन ही स्वतंत्र चोवीस तास चालणारी शैक्षणिक वाहिनी सुरू केली. या वाहिनीवर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण संस्थान, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थान अशा नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांकडून विविध कार्यक्रम सादर केले जातात. देशभरातील अभियांत्रीकीं, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, भाषा अशा विविध क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना फोन इन सुविधेमुळे आपले प्रश्न्-शंका स्टुडिओमधील मान्यवरांना तसेच त्या विषयातील निष्णात प्राध्यापकांना विचारून त्याचे निरसन तसेच इतर मार्गदर्शन घेता येऊ शकते. या ज्ञानदर्शन वाहिनीमुळे नियमितपणे कॉलेजला जाऊ शकत नसलेले विद्यार्थी त्यांचे शिक्षण चालू ठेवू शकतात.

दूरदर्शनशी निगडीत नव्वदच्या दशकाआधीची एक महत्त्वाची आठवण म्हणजे लोक सेवा संचार परिषदेमार्फ़त बनवलेले गेले अनेक व्हीडीओ. या व्हीडीओंमधे त्याकाळचे प्रसिद्ध खेळाडू, कलाकार, सिनेनट, संगीतकार, गायक-गायिका यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडवले. यापैकी टॉर्च ऑफ़ फ़्रीडम -यामधे बहुतांश खेळाडू स्वातंत्रज्योत घेऊन धावताना दिसले होते. "मिले सुर मेरा तुम्हारा" सारखा विविधतेतून एकतेचा संदेश देणारा सांगितीक नजराणा अथवा एक और अनेक यांसारखे अ‍ॅनिमेटेड व्हीडीओ - यांनी एका पिढीला भारतीयत्वाची, भारतातील विविध संस्कृतीची आगळी ओळख करून दिली. “आपण सारे एक आहोत” ही भावना रूजवायला मदत केली. आजही हे व्हीडीओ जेव्हा कधी दूरदर्शनवर लागलेले असतात तेव्हा हातातला रिमोट नक्कीच थबकतो. रामायण महाभारत यासारख्या मालिकांनी जनमानसाची नाळ त्याच्या पुराणकथांशी आणि मिथकांशी किती घट्ट जुळलेली आहे हेच दाखवून दिले. आजही जवळजवळ तीस वर्षानंतर या महाकाव्यांचे मालिकारूपांतर विविध खाजगी वाहिन्यांवरून येत असतानादेखील प्रेक्षकवर्ग दूरदर्शनवरील मालिकांच्या स्मृतीरंजनामधे मग्न असताना दिसतो.

दुर्दैवाने, दूरदर्शनदेखील प्रेक्षकांसारखाच नॉस्टॅल्जियामधे रममाण झालेले आहे, कारण आता असे वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या विषयांचे कार्यक्रम दूरदर्शनवरून जवळजवळ गायब झालेले आहेत.
आज खेदाने असे म्हणावेसे वाटते की, स्वातंत्र्याला एवढी वर्षे होऊनदेखील सरकारी यंत्रणेने दूरदर्शन या माध्यमाची व्याप्ती आणि प्रसार याचा पुरेपूर फायदा करून घेतलेला नाही. खाजगी वाहिन्यांच्या जंजाळामधे दूरदर्शन स्वत:चे अस्तित्व हरवून बसत आहे. वास्तविक लोकांपर्यंत पोचण्याचे, त्यामधून सकारात्मक कार्य घडवून आणण्याची प्रचंड मोठे सामर्थ दूरदर्शनकडे आहे. मात्र, सरकारी लाल फ़ितीतल्या कारभाराने, योग्य दिशा आणि दृष्टी नसल्याने सध्या दूरदर्शन निव्वळ एक “करमणूक प्रधान वाहिनी” बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर महिन्यातून एकदा भारतीय भाषांमधले विविध सुंदर सिनेमे दाखवले जातात, मात्र याची पुरेशी जाहिरात न केल्याने प्रेक्षकांना कुठला सिनेमा कधी आहे ते समजतच नाही. यासाठी दूरदर्शनने अधिकाधिक प्रेक्षकाभिमुख होणे गरजेचे आहे, त्यासाठी केवळ लोकांना रूचतील असेच कार्यक्रम प्रसारित न करता त्यांच्या विचारांना चालना देणारे, त्यांच्या जीवनामधे बदल घडवून आणणारे, त्यांना सुजाण बनवणारे कार्यक्रम लोकांना देणे आवश्यक ठरेल, ही आशा.

================================================

संदर्भ:
जनसंवाद सिद्धांत आणि व्यवहारः रमा गोळवलकर.
पत्रकारिता विद्या किरण गोखले. मॅजेस्टिक प्रकाशन
http://planningcommission.nic.in/reports/peoreport/cmpdmpeo/volume2/eros...
विकिपीडीया: दूरदर्शन
विकीपीडेया: विल्बर श्रॅम
विकीपीडीया: डेव्हलपमेंट कम्युनिकेशन
विकीपीडीया: साईट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषय जितका सुंदर तितकीच त्याची व्याप्ती किती दीर्घ होऊ शकेल याचा अंदाज या वाचनावरून सदस्यांना येऊ शकेल. नंदिनी यानी "दूरदर्शन" या जादूला अत्यंत योग्यरितीने न्याय दिला आहे. ही गोष्ट त्यानाच पटेल ज्यानी दूरदर्शनला "कृष्णधवल" काळापासून पाहिले आहे. आज चॅनेल्सच्या भाऊगर्दीत दूरदर्शन काहीसे दुर्लक्षित झाले आहे हे सत्य जरी असले तरी ग्रामीण भागात आजही डीडीला पर्याय नाही.

१ एप्रिल १९७६ रोजी इंदिरा गांधी यानी दूरदर्शनवरून राष्ट्राला उद्देश्यून केलेले भाषण मला स्मरते. त्यानी आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन संस्था अलग अस्तित्वाच्या करण्याची कारणे तर दिलीच होती शिवाय त्या दिवसापासून दूरदर्शन संघ नव्याने स्वतंत्रपणे आपली रोजची कार्यक्रम रेखा आखणार होता ही बाब विशेष होती. "एशियाड" पासून रंग जरूर आले; पण १९७६ पासून दूरदर्शनने मेट्रो शहरांत पाळेमुळे घट्ट रोवली होती त्याची आठवण आली. १९८४ पासून देशभरातील घराघरात दूरदर्शन पोचले आणि वरील लेखात उल्लेख केलेल्या वाहिन्यांनी प्रेक्षकांना खर्‍या अर्थाने वेड लावले होते.....त्यातही हमलोग आणि बुनियाद याना तोडच नव्हती.

लेखात बातम्या आणि त्या देणार्‍या व्यक्तींविषयी एखादा पॅराग्राफ असणे गरजेचे होते असे मला वाटते. खूप लोकप्रियता मिळविली होती त्या चेहर्‍यांनी....अगदी चित्रपटातील कलाकारांपेक्षाही जास्त. सलमा सुलतान, प्रतिमा पुरी, मिनू तलवार, ज्योत्स्ना राय, गीतांजली अय्यर, शोभना जगदिश, सरला महेश्वरी आदी काही नावे राष्ट्रीय पातळीवरील बातम्यासाठी तर भक्ती बर्वे, स्मिता पाटील इत्यादी ठळक नावे मुंबई दूरदर्शनमुळे लोकप्रिय झाली होती.

नंदिनी यांच्या लेखातील "....वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या विषयांचे कार्यक्रम दूरदर्शनवरून जवळजवळ गायब झालेले आहेत...." हे वाक्य दूरदर्शनप्रेमीच्या मनाला खिन्न करणारे आहे....पण ते सत्यही तितकेच आहे.

अशोक पाटील

माझा जिव्हाळ्याचा विषय. सुंदर लिहिलेय पण सगळे दूरदर्शन एका लेखात मावणे कठीण >>>>+१

मराठीत हमलोगच्या काही वर्ष आधी "चिमणराव"ची सिरीयल झाली होती आणि ती लोकाना खुपच आवडली होती. तेव्हापासून चिमण = दामुअण्णा मालवणकर हे सूत्र जाऊन चिमण = प्रभावळकर हे तयार झाले.

चांगले लिहीले आहे. (केवळ शब्दमर्यादेमुळे, नाहीतर तेही आवश्यक आहेच) तांत्रिक तपशील कमी करून अशोक. लिहीतात तसे दूरदर्शनमुळे मोठे नाव मिळवलेल्या कलाकारांबद्दल वाचायला आवडले असते. Happy

अर्र , शब्दमर्यादेमुळे अपुरा वाटतोय आढावा.
दणदणीत निवड आहे विषयाची नंदिनी.

पुलंनी सादर केला होता ना पहिला कार्यक्रम दूरदर्शनवर ? की नाही?

@ रैना....

पु.ल.देशपांडे यानी नवी दिल्ली प्रसार भारती मार्गदर्शनाखाली दूरदर्शनचे काम १९५८ मध्ये जरूर सुरू केले होते पण त्यामागील श्रेय दिले गेले पाहिजे ते पुण्याच्या श्री.वसंतराव मुळे यांच्या उत्साह आणि प्रेरणेला. १९५५ पासून मुळेसर फिलिप्स टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने त्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्यावेळी दूरदर्शन आणि पंडित नेहरू यांच्यातील दुवा बनले होते. श्री.मुळे यांच्याच पुढाकाराने पु.लं. यानी पंडित नेहरू यांची १९५८ मध्ये पहिली दूरदर्शन मुलाखात घेतली होती [आज ही मुलाखात दिल्लीच्याच स्टुडिओ लायब्ररीत आहे; पण मुंबईकडे आणण्याचा प्रयत्न झालेला नाही.]

अर्थात टीव्हीमुळे पु.ल. दिल्लीत चांगलेच लोकप्रिय झाले आणि दूरदर्शनच्या अभ्यासासाठी त्याना लंडन, पॅरिस आणि बॉन इथे जाण्यासाठी केन्द्राची शिष्यवृत्तीही मिळाली.

मला वाटते नंदिनी यांच्या वाचनात हे मुद्दे आले असतीलच पण वर आशूडी म्हणतात त्याप्रमाणे शब्दमर्यादेचे बंधन पडले असणारच.

अशोक पाटील

छान विषय.. मस्त लिहीलयसं!
आजही हे व्हीडीओ जेव्हा कधी दूरदर्शनवर लागलेले असतात तेव्हा हातातला रिमोट नक्कीच थबकतो >> +१००
अगदी अगदी.. मी तर ही गाणी टीव्ही सोबतच म्हणते .. नॉस्टॉलजिक Happy

दणदणीत विषय >> +१

त्याची व्याप्ती किती दीर्घ होऊ शकेल याचा अंदाज या वाचनावरून सदस्यांना येऊ शकेल. नंदिनी यानी "दूरदर्शन" या जादूला अत्यंत योग्यरितीने न्याय दिला आहे. ही गोष्ट त्यानाच पटेल ज्यानी दूरदर्शनला "कृष्णधवल" काळापासून पाहिले आहे. >> +१

फक्त थोडा क्लिष्ट वाटतो वाचताना.

सुंदर लिहिलेस नंदिनी अन अभ्यासपूर्णही. गतकालरंजन नकळत जागवले गेलेच.
जुन्या जीवनशैलीसारखेच काहीतरी साधे सकस सुंदर असे दूरदर्शनच्या मालिकांच्या संहितेत होते.

अशोकजींचे प्रतिसादही अत्यंत आनंददायी. >>श्री.मुळे यांच्याच पुढाकाराने पु.लं. यानी पंडित नेहरू यांची १९५८ मध्ये पहिली दूरदर्शन मुलाखात घेतली होती [आज ही मुलाखात दिल्लीच्याच स्टुडिओ लायब्ररीत आहे; पण मुंबईकडे आणण्याचा प्रयत्न झालेला नाही>>>> ही माहिती तर अनमोल.

हिंदी मालिकांची चर्चा वर तपशीलात झालीच आहे त्यात 'चरित्रहीन' 'श्रीकांत' , 'मालगुडी डेज',नेहरूंची 'डिस्कव्हरी' मराठी गोट्या सारख्या अप्रतिम मालिकांचीही भर टाकावीशी वाटते.
मराठीत पु.ल.,बा.भ. बोरकर, सुरेश भट , गोनीदा व अन्य अनेक दिग्गजांच्या अविस्मरणीय मैफिली सजल्या,त्यांच्या लेखनावरच्या मालिका रंगल्या.
तत्कालीन सेलेब्रिटीज तबस्सूम,सुहासिनी मुळगांवकर, डोली ठाकोर यांच्या वागण्यातला गोडवा व व्यक्तित्वाचा,संस्कृतीचा वेगवेगळा पोत असलेला त्यांचा डौल मनावर कोरला गेलाय. वृत्तनिवेदिकांच्या मांदियाळीतून रंगशारदेला भक्ती बर्वे, स्मिता पाटील यांच्यासारखी रत्ने मिळाली.

विषयाची व्याप्ती खूपच मोठी, नंदिनी, छानच पेलली आहेस.

लेख त्याच्या विषयाप्रमाणेच दर्जेदार आणि माहितीपूर्ण Happy
पब्लीक डिमांड किंवा टीआरपीला महत्व न देता दूरदर्शनच्या सवयीप्रमाणे सर्व पैलूंना स्पर्श करण्यारा... सर्वसमावेशक!

गतकालरंजन नकळत जागवले गेलेच.>>>+१

मराठीत पु.ल.,बा.भ. बोरकर, सुरेश भट , गोनीदा व अन्य अनेक दिग्गजांच्या अविस्मरणीय मैफिली सजल्या,त्यांच्या लेखनावरच्या मालिका रंगल्या.
तत्कालीन सेलेब्रिटीज तबस्सूम,सुहासिनी मुळगांवकर, डोली ठाकोर यांच्या वागण्यातला गोडवा व व्यक्तित्वाचा,संस्कृतीचा वेगवेगळा पोत असलेला त्यांचा डौल मनावर कोरला गेलाय. वृत्तनिवेदिकांच्या मांदियाळीतून रंगशारदेला भक्ती बर्वे, स्मिता पाटील यांच्यासारखी रत्ने मिळाली.>>> खरच आहे. सुहासिनी मुळगावकरांचा प्रतिभा प्रतिमा कार्यक्रम अप्रतीम रंगायचा आणि सेलिब्रिटीजच्या मुलाखतींचा तबस्सूमचा फूल खिले है गुलशन गुलशन पण छान होता.
भक्ती बर्वे, स्मिता पाटील बरोबर स्मिता तळवलकर ही त्यातूनच आलेल्या आहेत.

मस्स्त विषय निवडलायस... आढावाही उत्तम Happy

किती काय-काय आठवणी जाग्या झाल्या. आमच्या घराजवळच्या नगरपालिकेच्या एका छोट्या उद्यानात एक टी.व्ही. बसवलेला होता. (हो, आम्ही तेव्हा 'टी.व्ही. बसवलाय' असंच म्हणायचो :हाहा:) तिथे दर गुरूवारी रात्री छायागीत आणि दर रविवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा पहायला जाणे म्हणजे पर्वणी असायची. छोटी चौकोनी बस्करं घेऊन पुढची जागा पकडायला आम्ही धूम ठोकायचो. रविवारच्या सिनेमाच्या साधारण मध्यात मराठी बातम्या लागायच्या. त्या सुरू झाल्या की आई आम्हाला तिथून बाहेर काढायची. तेव्हा पावले जशी जड व्हायची, तशी नंतर सासरी जाताना झालेलीही मला आठवत नाहीत Wink

एका शनिवार-रविवारी लागून 'वार्‍यावरची वरात' दाखवणार असल्याचं कळलं होतं. तेव्हा मात्र बाबा आम्हाला कुणाच्या तरी ओळखीच्या घरी घेऊन गेले होते. आत्याच्या नणंदेच्या जावेची अमुकतमुक - असं काहीतरी नातं होतं त्या घराशी आमचं. Biggrin पण तेव्हा इतक्या ओळखीवर घरी टी.व्ही. असलेली मंडळी घरी टी.व्ही. नसलेल्या मंडळींना प्रेमानं एखादा कार्यक्रम पहायला बोलवायची. तर ते दोन भागातलं 'वार्‍यावरची वरात' बाबांनी तेव्हा टी.व्ही.संचाच्या शेजारी टेप-रेकॉर्डर ठेवून ऑडिओ-रेकॉर्ड करून घेतलं होतं. पायरसी Wink ती कॅसेट नंतर आमच्या घरी किती वर्षं आणि किती वेळा वाजवली गेली याला गणतीच नाही. तेव्हा जो तो ऑडिओ तोंडपाठ झाला, तो आजतागायत लक्षात राहिलेला आहे. नंतर तरंग कंपनीतर्फे 'वार्‍यावरची वरात'च्या ध्वनिफिती बाजारात आल्या. त्यातल्या ऑडिओ आणि तो बाबांनी रेकॉर्ड करून घेतलेला ऑडिओ यात फारसा फरक नव्हता. Wink

दूरदर्शनबद्दल अजून वाचायला आवडलं असतं, पण अर्थात शब्दमर्यादा पाळायला हवीच. (अन शिवाय मग ते रसग्रहण टाईप काहीतरी झालं असतं, असं वाटलं.)

खरच अभ्यासपूर्ण लेख... खुपच आवड्ला..
मन भुतकाळात रमल... आपल्यापेकि बरेच जणाचा तो बालपणिचा काळ असावा...

स्वतःला खुप भाग्यवान समजतो ... कि लहानपणीच अश्या दर्जेदार मालिका पाहणयाचा योग आला...
माध्यम जगताचा सुवर्णकाळ खरतर...

मला लहानणी पाहिलेली 'रानजाई' खुप आवडायची... त्यात २ कवईत्रि, शान्ता शेळ्के आणि आठ्वत नाहि पण सरोजिनी बाबर यान्चा गप्पान्चा कार्यक्रम असायचा... त्या ज्या दुसर्या कवईत्री होत्या त्या माझ्या आज्जि सारख्याच दिसायच्या... हे हि एक कारण होते Happy

नंदिनी, मस्त आढावा घेतला आहेस. सहा वाजता कुणाच्याही घरातून टीई ई ई ई असा आवाज पडतोय का असा कानोसा घेतला जाई. मग ती वर्तुळातली जाड्या स्वल्पविरामांच्या जोडीचा लोगो बघायलाही मजा वाटायची. रोज तेवढ्याच उत्सुकतेने बघायचा Proud

आवडलं. विषयाचा आवाकाच प्रचंड आहे.
केबलचा जमाना सुरु व्हायच्या थोडं आधी भारत सोडला होता. त्यामुळे हे वाचताना खरंच खूप नॉस्टॅल्जिक झाले आहे.

एका शनिवार-रविवारी लागून 'वार्‍यावरची वरात' दाखवणार असल्याचं कळलं होतं>>> अगदी माझ्या आजही डोळ्या समोर आहे. तेव्हा खुपच लहान होतो. पण तेव्हा पासूनच पुलंच्या लेखनाकडे ओढला गेलो

मस्त आढावा घेतलायस . शब्दमर्यादेचं बंधन जाणवलं Happy

एच एम व्हीच्या भाषेत गतकाळाच्या अनेक सुखद स्मृतींना उजाळा मिळाला .