मुंबईचा पाऊस (जुलै, १९९७)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नेहमीप्रमाणे बरोब्बर ५ वा. ७ मिनीटांनी आमची बस एल्. अँड टी. च्या ७ नंबरच्या गेट वरुन सुटली. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. एव्हाना लोकल बंद झाल्या असतील की नाही यावर आमच्या बसमध्ये चर्चासत्र सुरु झालं होतं. लोकं कुठल्या स्थानकावर किती पाणी साचलं असेल याचे आडाखे बांधत होते. आमची बस दर संध्याकाळी एका वेगळ्या, आतल्या मार्गाने अंधेरी स्थानकास जात असल्याने मेन रोडवर काय परीस्थिती होती याची आम्हाला माहीती नव्हती. परंतु एकंदरीत पावसाचं स्वरुप पाहता ट्रॅफिक जाम असणार हे सांगायला 'बातम्यां' ची गरज नव्हती. एरवी मोकळा असणारा हा आतला रस्ताही आज बऱ्यापैकी वाहनांनी भरला होता. सरासरी वेगही नेहमीपेक्षा बराच कमी होता. एकंदरीत पुढे काय वाढून ठेवलाय याची हळूहळू कल्पना येत होती.

खुरडत रडत खडत बस कशी बशी अंधेरी स्थानकावर पोचली तेव्हा सात वाजून गेले होते. रस्तावर सर्वत्र पाणी साचले होते. जसजसं अंधेरी स्थानकावर जायला लागलो, तसतशी साचलेल्या पाण्याची पातळी वाढत जात होती. एकंदरीत लोकल ठप्प झाल्या असणार याचा अंदाज येऊनही प्रत्यक्ष स्थानकात जाऊन खात्री करावी म्हणून फलाटावर गेलो. फलाट माणसांनी तुडुंब भरला होता. ६ पैकी एकाही फलाटाला गाडी लागलेली नव्हती. सर्व इंडीकेटर ०:० दाखवत होते. मुंबई सेंट्रल, माटुंगा रोड अाणि सांताक्रूझ स्थानकावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाल्याच्या घोषणा होत होत्या. फलाटावर भयंकर गर्दीत थांबण्यापेक्षा काही पर्यायी व्यवस्था बघण्यासाठी म्हणून रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्थानकावर आलो. तिथेही परीस्थिती फारशी वेगळी नव्हती. आगारत एकही बस उभी नव्हती लोकाचे थवेच्या थवे बसची वाट बघत उभे होते. बऱ्याच ठिकाणी बस कर्मचाऱ्यांना लोकं घेरुन परीस्थिचा अंदाज घेत होते. शेवटी अशाच एका गर्दीत घुसून मी एका बस कर्मचाऱ्याला परीस्थिती विचारली. त्याने अंधेरी ते वांद्रे दरम्यान एस्. व्ही. रोडवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने बसेस बंद आहेत अशी उपयुक्त माहिती पुरवली. एकंदरीत दक्षिण मुंबईत जाण्याचे खुष्कीचे सर्व मार्ग बंद झाल्याचा साक्षात्कार अस्मादिकांना झाला. घड्याळ्यात ८ वाजून गेले होते आणि पोटातल्या कावळ्यांनी काव काव करायला सुरुवात केली होती. खिशात चाचपणी केल्यावर दोन रुपये हाती अाले. बाकिचे पैसे पाकिटात असतील असं समजून पाकिट उघडलं. पाकिटात एकही छदाम नव्हता. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना! पाकिट पुन्हा पुन्हा तपासूनही जेव्हा एकही पैसा हाताला लागला नाही तेव्हा परीस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं. त्या वेळी आजकालसारखी क्रेडीट कार्डे व ए. टी. एम्. तेवढी प्रचलित नव्हती. माझ्याकडे यातलं काहीही नसल्याने खिशातल्या दोन रुपयात रात्र बाहेर काढायची मी मानसिक तयारी करायला सुरवात केली. पाऊस धो धो पडतच होता. अंग संपूर्ण भिजलं होतं. समोरची चहाची टपरी मला खुणावत होती. हाती असलेल्या दोन रुपयांचा सदुपयोग करणं आवश्यक होतं. डोक्यात भरभर चक्र फिरायला लागली. अंधेरी पश्चिमेस राहणाऱ्या एका मित्राचा घरचा फोन नंबर आठवला. तो घरी पोचला असेल कि नाही याची शाश्वती नव्हती. एक रुपयाचा जुगार खेळायचं ठरवलं आणि त्याच्या घरी फोन लावला. तो घरी पोचला नव्हता आणि त्याच्या आईवडीलांशी माझी फारशी अोळख नसल्याने त्यांना परीस्थिती सांगण्यात अर्थ नव्हता. उरलेल्या एक रुपयाचा योग्य विनीयोग करणं आवश्यक होतं. टपरीवरचा चहा मला खुणवत होता. अखेर मोठ्या निश्चयाने मी तो मोह टाळून उरलेल्या १ रुपयात घरी फोन करुन आईची चिंता दूर करण्याचा निर्णय घेतला. तिला अर्थातच माझ्याकडे पैसे नाहीत हे सांगितलं नाही, नाहीतर ती उगाच काळजीत पडली असती.

काय करायचं याचा विचार करत मी बाहेर, स्वामी विवेकानंद मार्गावर आलो. रस्त्यावर अनेक लोकांचे जत्थेच्या जत्थे वांद्र्याच्या दिशेने चालत जाताना दिसत नव्हते. रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि गाड्या जवजवळ नव्हताच. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. बऱ्याच लोकांनी आपआपल्या विजारी दुमडल्या होत्या. काही लोकांनी आपले चामड्याचे बूट हातात घेतले होते. बरेचसे लोक दुकानांचा आडेसा घेऊन पादचारी पथावर उभे होते. रस्त्यावरची उपहारगृहे दुथडी भरुन वहात होती. रात्रीचे ९ वाजल्याने लोकांना भुका लागल्या होत्या. या सर्व लोकांचा मला विलक्षण हेवा वाटत होता. अर्थातच स्वत:ला दोष देऊन फारसा फरक पडणार नव्हता पण कर्तव्य म्हणून स्वत:लाच शिव्या देत होतो. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. त्या नादात मी स्वत: वांद्र्याच्या दिशेने कधी चालायला लागलो ते माझं मलाच कळलं नाही.

बहुतेकशी लोकं गटागटाने चालत होती. एरवी एकमेकांकडे बघून चेहऱ्यावरची रेषही न हलवणारी लोकं जणूकाही वर्षांची अोळख अाहे अशा थाटात गप्पा मारत चालत होती. वांद्र्यापर्यंतचं सुमारे १५ ते १७ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी त्यांना एकमेकांच्या आधाराची - गप्पांची गरज होती. अशाच एका राजकारणावर चर्चा करणाऱ्या गटात मीही सामिल झालो. मला पोटातल्या कावळ्यांकडे दुर्लक्ष करायचे असल्याने मला त्यांची जास्त गरज होती. बाकि राजकारण हा विषयच असा आहे की राजकारण्याबद्दल तुमचं मत काहीही असो, त्याच्यावर तहान भूक विसरुन गप्पा मारता येतात. कदाचित लोकांचा त्यांच्यावरचा प्रक्षोभच बाहेर पडत असेल. शेवटी राजकारणावर गप्पा म्हणजे राजकारण्यांना शिव्या देऊन मन थोडं मोकळं करणं होय. कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्यामुळेच मला वांद्र्यापर्यंत पोचता आलं हे संपूर्ण सत्य आहे. वांद्रे स्थानकाचं दर्श झाल्यावर चालून चालून दमलेल्या पायांमध्ये अचानक त्राण झालं. लोकं गट वगैरे विसरुन स्थानकाकडे जवळ जवळ धावत सुटले. पावसाचा जोर एव्हाना कमी झाल्याने लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. धावतच वांद्रे रेल्वे स्थानकात पोचलो. तिथलं दृश्य बघून मात्र धडकी भरली. गाड्या अजूनही सुरु झाल्या नव्हत्या आणि सर्व फलाट माणसांनी भरलेले होते. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि १७ किलोमीटरची पायपीट करुनही बूड टेकायलाही त्या फलाटावर जागा शिल्लक नव्हती.

स्थानकाबाहेर आल्यावर बऱ्याच ठिकाणी लोकं गटागटाने उभे असलेले दिसले. बहुतेक ते टॅक्सी पकडण्याकरीता तयार झालेले गट असावेत. रस्तावर गाड्यांची रहदारी जवळ जवळ नव्हतीच. बसेस पूर्णपणे बंद होत्या. एखादी टॅक्सी १५-२० मिनीटांनी येत होती आणि त्यावर अनेक लोकांच्या उड्या पडत होत्या. टॅक्सीवाले ३००/४०० असे काय अव्वाच्या सव्वा भाव लावून लोकांना घेऊन निघत होते. टॅक्सीशिवाय कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्याने लोकांनी टॅक्सी ड्रायव्हरचे पाय धरण्यासारशिवाय पर्यायच नव्हता. दुर्दैवाने माझ्या घराच्या बाजूने जाणारा एकही गट नसल्याने आता मला एकट्याच्या बळावर टॅक्सी पकडणे भाग होते. त्यातही टॅक्सीवाल्याला घरी गेल्यावरच पैसे देईन असे सांगणेही आवश्यक होते. न जाणे त्याने मला मध्येच सोडलं तर? अखेर बऱ्याच वेळाने बऱ्याचशा गटांशी झुंजून एका टॅक्सीवाल्याला मी २५० रुपयाच्या बोलीवर तयार केला आणि टॅक्सीत जाऊन बसलो.

आता कष्ट संपल्यागत होते. दक्षिण मुंबईकडे जाणारे रस्ते मोकळे होते. झोप अनावर होत होती. "साहब कहाँसे लेलू?" या टॅक्सीवाल्याच्या प्रश्नावर जेव्हा डोळे उघडले तेव्हा गिरगावचे दर्शन झाले. त्याला गिरगावातील आमच्या गल्लीचा रस्ता सांगितला आणि एक मोठा सुस्कारा टाकला.

बहुतेक लोकांच्या पावसाच्या आठवणी तलम, नाजूक असतात. त्यांना श्रावणमासीचा ऊन पावसाचा खेळ दिसतो. ना. धो. महानोरांच्या कविता आठवतात. पण आम्हा मुंबईकरांना मात्र आठवतं ते पावसाचं असं रौद्र रुप. हे तांडव दरवर्षी किमान एकदा अनुभवायला लागतं. आणि कधी कधी हे तांडव इतकं भयंकर रुप घेतं कि त्यात शेकडो गुरांचा/माणसांचा बळी जातो. विदर्भामध्ये दुष्काळामध्ये आत्महत्या केल्याच्या बातम्या कानावर येतात आणि सृष्टीच्या या अजब चमत्कारावर आश्चर्य व्यक्त करण्याखेरीज आपण काहीच करु शकत नाही.

विषय: 
प्रकार: 

छान लिहिलय! Happy
मी पहिल्यान्दी साल चुकलय की काय याची खात्री करू लागलो!
आमच्या आपल्या डोक्यात २००५ (की सहा?) चेच तान्डव! Happy
बायदिवे, टॅक्सिवाल्याचे अडिचशे रुपये द्यायला घरात तरी तेवढी रोख रक्कम उपलब्ध होती ना? (आमची तर ती देखिल बोम्ब असल्याने उत्सुकतेपोटी विचारल हो!)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

पुराणिक, इतका जुना, १९९७ चा प्रसंग असूनही तू असे लिहिलेस की जणू काल परवाच इतका पाऊस तिथे झाला. बहुतेक पावसाळा मुंबईकरांच्या स्मरणशक्तीच्या आवडीचा विषय Happy

पावसाबद्दल नाही.. पण एक पैशाबद्दल माझी आठवण सांगतो. मी १९९५ साली पहिल्यांदा पुण्यात गेलो. २५० रुपये महिना या प्रमाणे सोमवार पेठेत एका लॉजमधे दाखल झाला. ऑफीसमधे माझा पहिलाच दिवस. घरी आलो तर बघतो माझ्या सुटकेशीतले सर्व पैसे चोरीला गेलेले. माझ्याकडे फक्त १०० रुपयाची एक नोट उरली होती. ती नोट मला सोमवार पेठ ते कोंढवा पर्यंत बस प्रवासासाठी हवी होती. मग खायचे काय हा प्रश्न भेडसावू लागला. लॉजबाजेर अळूवड्या विकणारी एक मावशी होती. तिला मी माझी व्यथा सांगितले तिने मला रोज २ अळू वडया देऊ केल्यात. काही दिवस मी फक्त दोन अळू वड्यांवर जगलो. माझ्या लॉजमधे माझी ओळख आणखी एका माणसाशी झाली. त्यानी मला एक खानावळ दाखवली. तिथे गेलो. तिथल्या मावशी माझा पगार होईपर्यंत मला जेऊ घालतील अशा म्हणाल्यात. एके दिवशी ऑफीसमधे साहेब त्यांच्या कॅबीन मधे नव्हते. मी आत शिरलो आणि बहिणीच्या ऑफीसमधे फोने केला. म्हंटल मला लगेच पैसे पाठवं. तिला भित भित, फोन करतो आहे म्हणून कुणी पाहीन म्हणून, पत्ता सांगितला. काही दिवसातच तिने पैसे पाठविले. एकूनच माझ्यावर त्यावेळी खूपच कठिण परिस्थिती आली होती.

पुराणिक, छान अनुभवकथन.

लिंबुटींबु - घरी पैसे असतील की नाही ही धाकधुक होतीच. पण मी चाळीत राहत असल्याने शेजाऱ्यांकडून उसने घेण्याचा पर्यय उपलब्ध होता.

पुराणिक छान लिहिलत. मुंबईचा पाऊस म्हणजे तोंडचे पाणी पळते!

पुराणिक,
तुम्ही खरचं छान लिहीले आहे...थ्रीलिंग...

अश्यावेळी १-१ पैसा महत्वाचा असतो...असाच मला एकदा अनुभव आला...

आम्ही बी.ई. झाल्यावर ३-४ मैत्रिणी मिळून पुण्यात job search करत होतो.एके दिवशी मी व माझी मैत्रीण एका कन्सलंट कडे गेलो .आणि त्या उत्साहात पैसे देउन नाव ही रजिस्टर केले.बस मध्ये बसतो नि बघतो तर बस ति़कीटाला पुरेसे पैसे नव्हते..१ च रुपय्या कमी पडत होता.पण कुठल्या तरी कप्प्यात १ रुपया सापडून जाईल हि (वेडी) आशा! सगळी पर्स धुंडाळली पण निराशाच पदरात पडली.माझ्या मैत्रिणी ने लाज सोडून शेजारी बसलेल्या मुलिकडे पैसे मागितले पण तिने मदत नाही .शेवढी कंडक्टर ला कसतरी सांगुन मी कनव्हीन्स केल तेव्हा कुठे तो नन्तर पैसे द्या म्हणून मानला नि मग एकदाच तिकीट हातात पडलं.कोथरूड ला बस थांबली नि आम्ही उतरलो, बस पुढे वारजे ला निघुन गेली. आम्ही पळत पळत रूम वर आलो नी पैसे शोधु लागलो, त्यावेळी जेमतेम च पैसे होते आमच्याजवळ. १ रूपया घेऊन आम्ही तसेच बस स्टाप ला आलो.बस यायला खुप च अवकाश होता.बस आली, कंडक्टर ला आम्ही राहिलेला १ रुपया दिलो नि मागे फिरलो.

ही गोष्ट खुप काही शिकवून गेली...