विषय क्र. १: वाट इथे स्वप्नांची संपली जणू..... क्रिकेट विश्वविजय: १९८३

Submitted by लाल टोपी on 20 August, 2013 - 04:41

२५ जून १९८३ ची संध्याकाळ. भारत विश्वकरंडकाच्या अंतीम सामन्यापर्यंत पोहोचला होता. ६० षटकांच्या त्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करीत १८३ धावा धावफलकावर लावल्या होत्या. डेस्मंड हेन्स, गॉर्डन ग्रीनिच, क्लाईव्ह लॉईड, सर व्हिव रिचर्डस, गस लोगी, जेफ्री दुजॉ यांच्यासारख्या दिग्गज फलंजांसमोर धावांची ही छोटीशी टेकडी ६० षटकांपर्यंत लढवणे अशक्यप्राय होते. इथपर्यंत पोहोचणे हीच जमेची बाजू मानून विजेतेपदाच्या दुधाची तहान उप विजेतेपदाच्या ताकावर भागवायला भारतीय समर्थक मनाची तयारी करू लागले होते. त्यावेळी वेस्ट इंडिज अजिंक्य मानला गेलेला संघ होता. आधीच्या दोन विश्वकरंड्कांमध्ये म्हणजेच १९७५ आणि १९७९ मध्ये एकाही सामन्यात त्यांनी हार पत्करली नव्हती. पांच जबरदस्त फलंदाज, तुफानी वेगाने आग ओकणारे पांच गोलंदाज आणि चांगल्या प्रकारे फलंदाजी करणारा यष्टीरक्षक या समिकरणाला उत्तर देणे कोणालाच जमत नव्हते आधीच्या दोन स्पर्धा रुबाबात जिंकून सलग तिस-यांदा विश्वविजेतेपदावर दावा सांगण्यास हा संघ तयार झाला होता. भारताची मात्र नेमकी उलटी परीस्थिती होती. आधीच्या दोन्ही स्पर्धांमध्ये एक दुबळ्या पूर्व आफ्रिकेशिवाय सर्वांकडून पराभूत झालेला संघ. अगदी त्यावेळी कच्चं लिंबू असलेल्या आणि कसोटीचा दर्जाही न मिळालेल्या श्रीलंकेनेही भारताला हरवले होते. भारताकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे भारतीय खेळाडुंवर अपेक्षांचे ओझे नव्हते.

परंतु त्या दिवशी अंतिम सामन्याच्या उत्तरार्धात विंडिजचीही सुरुवात डळमळीत झाली. संघाच्या केवळ पांच धावा झालेल्या असतांना बलबिंदर संधूने ग्रिनिजचा त्रिफाळा उडवला. त्याच्याजागी आलेल्या व्हिवियन रिचर्ड्सने मात्र भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले २८ चेंडूत सात चौकारांसह ३३ धांवा कुटल्या बघता बघता १८३ मधून ५० धांवा निघून गेल्या. सामना लवकरात लवकर संपवायचा चंगच त्याने बांधला असावा. पण मदनलालच्या चेंडूला उंच फटका मारायचा त्याचा प्रयत्न चुकला उलटे पळत जाऊन कपिल देवने एक अप्रतीम आणि अविश्वसनीय झेल घेतला आणि ही जीवघेणी खेळी संपवली. विंडीज दोन बाद ५०. मदनलालच्याच एका सुरेख चेंडूवर हेन्सही चकला आणि भारताला तिसरं यश विंडिजच्या ५७ धांवा झालेल्या असतांना मिळाले. चाचपडत खेळणारा गोम्स मदनलालची पुढची शिकार ठरला त्यावेळी संघाच्या केवळ ६६ धावा झाल्या होत्या. पुढच्याच षटकांत तुफानी क्लाईव्ह लॉईड त्याच धांवसंख्येवर परतला. पांच बाद ६६ विंडिजचे महारथी तंबूत परतले होते. आता भारताची १८३ धावांची टेकडी हिमालया सारखी वाटू लागली होती. तमाम भारतीयांचे डोळे आणि कान दूरदर्शन आणि आकाशवाणीकडे लागले होते. हृदयाचे ठोके जलद पडू लागले होते. संधूने भारताला आणखी एक यश मिळून दिले आणि सहा बाद ७६ अशा स्थितीत विंडीज पोहोचले. आता भारतीय अधीर झाले होते डोळ्यांसमोर एक इतिहास साकार होतांना त्यांना पहायला मिळणार होता. पण यष्टीरक्षक दुजॉ आणि वेगवान गोलंदाज मार्शलची जोडी जमली. धावसंख्या हळुहळू वाढू लागली बघता बघता शंभरी ओलांडून पुढे गेली. विंडिजचे खेळाडू पूर्ण ६० षटके खेळण्यात यशस्वी झाले तर आरामात सामना आणि विश्वकरंडक जिंकू शकले असते. कोट्यावधी श्वास अडखळू लागले आतापर्यंत कधी न जाणवलेली अस्वस्थता तीव्र होऊ लागली होती. या जोडीने ३३ धांवा जोडल्यानंतर मोहिंदर अमरनाथने चिवट प्रतीकार करणा-या दूजॉचा त्रिफाळा उध्वस्त केला. आता सात बाद ११९ भारतीयांचा जीव भांड्यात पडला . मोहिंदर अमरनाथच्या पुढच्या षटकांत मार्शलही परतला आणि विंडिज आठ बाद १२४. दुरचित्रवाणीचा त्यावेळचा लोकप्रिय समालोचक आणि विंडिजचा कटटर समर्थक, टोनी कोझीयरची रसाळ वाणी आता अडखळू लागली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि दूरचित्रवाणी समालोचक शब्दप्रभू रिची बेनॉला चपखल शब्द सुचेनासे झाले. भारतीयांना मात्र यावेळेपर्यंत विश्व विजयाचे वेध लागले होते.संपूर्ण वातावरण भारून गेले होते. एक अभूतपूर्व घटना डोळ्यांसमोर साकार होत होती. कान, डोळे दूरदर्शन आकाशवाणीकडे लागले होते. संपूर्ण भारत हातातली कामे सोडून या सामन्यात गुंग झाला होता आता बस दोन खेळाडू बाद आणि विश्वकरंडक भारताकडे.. कपिल देवने रॉबर्ट्सला पायचित केले नववी विकेट पडली धांवा १२६. आता पडणारा प्रत्येक चेंडू हृदयाचे ठोके चुकवणारा ठरत होता. सामन्याचे ५२ वे षटक; शेवटचा चेंडू; गोलंदाज मोहिंदर अमरनाथ; फलंदाज मायकेल होल्डींग, विंडीज ९ बाद १४० आणि पायचीतचे जोरदार अपील पंचाचे बोट वर. जल्लोष..जल्लोष आणि केवळ जल्लोष. क्रिकेटच्या जगतात एका नव्या महासत्तेचा जन्म झाला होता. 'Cricket is game of glorious uncertainties' ही क्रिकेटची बिरुदावली सार्थ ठरवणारा हा क्षण जगणा-या आणि त्याचे भागीदार होणाचे भाग्य लाभलेल्या माझ्यासारख्या कोट्यावधी भारतियांना त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक रोमहर्षक क्षण कोणता? या प्रश्नाचे उत्तर 'हाच तो क्षण' हेच असेल असे मला नेहमीच वाटत आले आहे.

भारताने या स्पर्धेपूर्वी एक दिवसीय सामन्यात फारशी चमक दाखवलेलीच नव्हती मात्र या स्पर्धेत भारताने नेत्रदिपक कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यापासून अंतीम सामान्यापर्यंत एक स्वप्न वाटावा असा तो प्रवास होता. ९ -१० (पावसामुळे हा सामना राखीव दिवशी पुढे खेळवण्यात आला) जूनला पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडीजला ३४ धावांनी हरवून धक्कादायक निकालाची नोंद केली. हा विश्व करंडक सामान्यातला विंडिजचा पहिला पराभव होता. पुढच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला सहज हरवले. या आधीच्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. पुढच्या सामन्यात मात्र भारताला ऑस्ट्रेलियाच्या ३२० आव्हानाचा सामना करता आला नाही आणि १६२ धावांनी पराभूत झाला. नंतच्या सामन्यातही भारत विंडिज कडून ६६ धवांनी पराभूत झाला. साखळी सामन्यातील पुढचा सामना भारतीय क्रिकेटच्या वाटचालीतला इतिहास घडवणारा सामना होता. दुबळ्या (?) झिम्बाब्वे ने धक्कादायक सुरुवात करत भारताची अवस्था ५ बाद १७ अशी केली होती. सहावी विकेट ७७ आणि सातवी विकेट ७८ वर पडल्यानंतर भारत शंभरी तरी गाठेल की नाही अशी परिस्थिती होती. संघाची पाच बाद १७ अशी धावसंख्या असतांना कर्णधार कपिल देव मैदानात आला, सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि सामन्याचा रंगच पालटून टाकायला सुरुवात केली. १६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावा तडकावल्या. नवव्या विकेटसाठी यष्टी रक्षक सय्यद किरमाणी बरोबर १६६ धावांची नाबाद भागीदारी केली (त्यात किरमाणीच्या धावा होत्या नाबाद २४) आणि आठ बाद २६६ पर्यंत भारताला पोहोचवले. मात्र फलंदाजीतही चिवट झुंज देत झिम्बाब्वेने २३५ पर्यंत मजल मारली तरीही भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकला. आधीच्या सलग दोन पराभवांमुळे हा सामना जिंकणे भारताला आपले आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने आवश्यक होते. नंतरच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगीरी करत ५६ षटकांत सर्वबाद २४७ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १२९ धावांत गुंडाळून ११८ धावांनी हा सामना जिंकला. रॉजर बिन्नीच्या २७ धावतील ४ विकेट निर्णायक ठरल्या.

साखळी सामने आता संपले होते. 'ब' गटांत २० गुणांसह वेस्ट इंडीज अव्वल स्थानी तर १६ गुणांसह भारत द्वितीय स्थानी होता. ऑस्ट्रेलियाचे ८ च गुण होते. त्यामुळे विंडीज आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचले होते 'अ' गटातून २० आणि १२ गुणांसह इंग्लंड आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचले होते. भारताचा सामना इंग्लंड बरोबर होणार होता. त्यामुळे इंग्लिश वृत्तपत्रांना आनंदाचे भरते आले होते.परंतु इंग्रज क्रिडा पत्रकार मात्र भाराताचे उपांत्य फेरीपर्यंतचे विजय योगायोगाने मिळालेले मानत होते आणि इंग्लंडचा संघ उपांत्य सामना जिंकून अंतीम फेरीत धडक मारण्याची स्वप्नेही ते पहात होते. दुबळ्या भारताला सहज हरवून आपला अंतीम फेरीतला प्रवेश नक्की झाला असेच ते मानत होते. 'भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश, इंग्लंडला अंतिम सामन्याचे तिकीट' असे मथळे त्या दिवशी इंग्रजी वर्तमानपत्रात झळकले होते.

मला आजही ते मंतरलेले दिवस आठवतात. भारतीय संघाचे समर्थक प्रत्येक सामना जिंकल्यानंतर भारत इथपर्यंत पोहोचला हेच फार झाले म्हणून खूष होत होते. पहिल्यांदा विंडिजला हरवले म्हणून; तर नंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवले म्हणून. झिम्बाब्वे बरोबरचा दुसरा सामना तर अंगावर सरसरून काटा आणणारा होता. खरंतर झिम्बाब्वे त्यावेळी कसोटी दर्जा प्राप्त झालेला संघही नव्हता. परंतु सनसनाटी निकाल त्यांनी पहिल्याच साखळी सामन्यात नोंदवला होता १९७५ च्या उप विजेत्या आणि या स्पर्ध्रेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत असणा-या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला भाग पाडले होते. कपिल देवच्या ऐतिहासिक खेळीने भारताला तारले. भारताच्या सर्वकालीन थरारक विजयांमध्ये हा सामना नक्कीच वरच्या क्रमांकावर राहील. त्यामुळेच भारत उपांत्य फेरीत पोहोचला हेच अप्रूप होते. भारताने १० जूनला पाहिला आणि २० जूनला शेवटचा साखळी सामना जिंकला या दहा दिवसांत भारताच्या एक दिवसीय क्रिकेट्चा जणू कायापालट झाला होता.

उपांत्य सामन्याचा दिवस; २२ जून, १९८३. इंग्लंडने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी घेतली. आधीच्या स्पर्धेत (दुसरी विश्वकरंडक स्पर्धा, १९७९) उपविजेता असलेला यजमान इंग्लंड भारतीय गोलंदाजीला फारशा आत्मविश्वासाने तोंड देऊ शकला नाही. ६० षटकांत सर्व बाद २१३ पर्यंतच पोहचण्यात त्यांना यश आले होते. यशपाल शर्मा आणि संदिप पाटिल यांच्या अर्धशतकाच्या आणि मोहिंदर अमरनाथच्या ४६ धावांच्या जोरावर भारताने सहा विकेट राखून ५५ व्या षटकातचं हा सामाना खिशात टाकला आणि दिमाखात अंतिम सामन्यात प्रवेश केला. १२ षटकांत २७ धांवा देऊन दोन विकेट आणि फलंदाजीत ४६ धांवा करणा-या मोहिंदर अमरनाथला सामन्याचा मानकरी घोषित करणात आले. अंतीम सामन्यातही ७ षटकांत १२ धावांत ३ विकेट आणि २१ धांवा करणा-या मोहिंदरलाच सामन्याचा मानकरी होण्याचे भाग्य लाभले होते. त्याच दिवशी झालेलेल्या दुस-या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा आठ विकेट राखून ४८ व्या षटकांतच सामना जिंकला होता.

एवढ्या विस्ताराने या स्पर्धेबाबत लिहिण्यामाचे कारण म्हणजे त्यात मिळालेल्या विजयामुळे भारत एक मजबूत संघ आहे हे स्वीकारले गेले. पहिल्या दोन विश्वकरंडक स्पर्धेत कोणी गांभीर्याने विचार करावा असा हा संघच नव्हता. या स्पर्धेपूर्वी भारत एक दिवसाचे सामने फारसे खेळलाही नव्हता आणि जेवढे काही सामने खेळले होते त्यात अपवादानेच एखाद दुस-या सामन्यात विजय मिळाला होता. १९७४ ते १९८३ या काळात २७ सामने खेळून त्यापैकी ५ सामने भारताला जिंकता आले होते. यामध्ये दोन्ही विश्वकरंड्क स्पर्धा, ऑस्ट्रेलियातील बेन्सन आणि हेजेस स्पर्धा (१९८०) यांचाही समावेश आहे. या नऊ वर्षांत दोन सामने न्यूझिलंड, पूर्व आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी १ सामना भारताला जिंकता आला होता. त्यामुळे आपला संघ कधीतरी विश्वकरंडकासारख्या स्पर्धेचा विजेता होऊ शकेल हे स्पप्न पहाणे देखील अतिरंजकता वाटली असती. मात्र जून १९८३ नंतर चित्र पूर्णत: पालटले. भारत खेळत असलेल्या प्रत्येक मालिकेत एक दिवसीय सामन्यांची संख्या वाढू लागली १९८३ चा विश्वविजय योगायोगाने मिळला होता अशी टिका करणा-यांची तोंडे १९८५ चा बेन्सन आणि हेजेस करंडक जिंकून बंद केली. या स्पर्धेतही विश्वकरंडक स्पर्धेसारखेच (सध्याच्या काळात खेळल्या जाणा-या चाम्पीयन ट्रॉफी प्रमाणे) सर्व संघ सहभागी झाले होते. आता कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेपूर्वी भारताला संभाव्य विजेत्यांच्या यादीत गणले जाऊ लागले.

त्यानंतर खेळल्या गेलेल्या प्रतिस्पर्धी संघाविरुध्दच्या मालिका असोत अथवा विविध स्पर्धा असोत भारताची कामगिरी एखाद दुसरा अपवाद (२००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेसारखे) वगळता लक्षवेधकच ठरली आहे. सर्वच स्पर्धा किंवा मालिका नेहमीच जिंकणे कोणत्याही संघाला शक्य नाही. खेळ म्हंटला की त्यात हार-जीत आलीच, स्थळ काळानुसार उतार चढावही खेळाचाच भाग समजले गेले पाहिजेत. परंतु भारतीय संघाने भारतात, श्रीलंकेत, पाकिस्तानात, शाराजाहात, उपखंडा बाहेर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या परक्या खेळपट्यांवरही आपले नाणे खणखणीत आहे हे दाखऊन दिले.

भारतात क्रिकेट जेवढे लोकप्रिय आहे तेवढीच टिका या खेळावर होत आली आहे. या खेळाचे फाजील लाड होतात त्यामुळे बाकीचे खेळ झाकोळून जातात, त्यांना पुरेसे महत्व दिले जात नाही त्यामुळे बाकीच्या खेळांचा किंवा अस्सल भारतीय मातीतल्या खेळांचा म्हणावा तसा विकास होत नाही अशी टिका या खेळावर नेहमीच होत आली आहे. काही प्रमाणात हे खरे जरी असले तरी लोकप्रियता नेहमीच विजेत्याच्या बाजूने असते जेव्हा हॉकी मध्ये आपला संघ बलवान होता तेव्हा कित्येक लोक वेगवेगळ्या देशातील सामन्याचे समालोचन आकाशवाणीवरुन ऐकण्यासाठी रात्री उशीरा पर्यंत जागे रहात किंवा भल्या पहाटे गजर लावून उठत असतं परंतु केवळ अतिशय वाईट पद्धतीने होणारे पराभव पहाण्यासाठी कोण आपला वेळ खर्च करेल. जसजशी लोकप्रियता घटत गेली तसे या संघांचे वलयही नष्ट होत गेले याला क्रिकेट्पेक्षाही त्या त्या खेळातील अधोगतीच कारणीभूत नाही का? आजही ऑलिंपिक मधले नेमबाजी किंवा ज्यात पदक मिळण्याची शक्यता आहे असे सामने लोक आवर्जून पहातातच. अनेक खेळांच्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन होत नाही त्यामुळे क्रिकेटच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा या खेळांच्या पदाधिका-यांनी आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे आहे.

क्रिकेटला अवास्तव प्रसिद्धी मिळते हे काही प्रमाणात खरेही आहे. इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटचे जग फारच लहान आहे क्रिकेट खेळणारे देश हाताच्या बोटांवर मोजण्या एवढेच आहेत म्हणून त्यात मिळवलेल्या यशाने हुरुळून जाण्यात काय अर्थ आहे? देशासमोर गरीबी, बेकारी, निरक्षरता यांसारख्या कितीतरी भीषण समस्या आहेत त्यावर लक्ष द्यायचं सोडून या परकीय खेळावर वेळ वाया घालवण्यात काय फायदा? हे अगदी सामान्यपणे क्रिकेट बाबत घेतले जाणारे आक्षेप आहेत. आपले काम सोडून पांच पांच दिवस कसोटी क्रिकेट मध्ये गुंग होणे चुकीचे असले तरी आपापली कामे संभाळून आपली आवड जोपासणात वावगे काहीच नाही. फारच कमी देश क्रिकेट खेळतांत हे वास्तव असले तरी या खेळातील वर्चस्वामुळे आपली अस्मिता सुखावते हेही खरेच आहे. समस्या तर प्रत्येक देशासमोर आहेत योग्य त्या व्यासपीठावर त्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्नही झाले पाहिजेत पण म्हणून त्यांचा बाऊ करून सामिजिक, सांस्कृतिक आयुष्य जगूच नये असे नाही. प्रत्येक देशात त्यांच्या लोकांना संमोहीत करणारे खेळ आहेत. त्या खेळंसाठी त्या- त्या देशांचे चाहते जीव टाकतात तसाच खेळ भारतीयांसाठी क्रिकेट आहे. मला तर असे वाटते की भारता सारख्या खंड्प्राय देशात जेथे धर्म, जाती, भाषा, प्रांत यांच्या सारख्या विविधता आहेत ज्यामुळे आम्हाला एकत्र आणणारे समान सूत्र अभावानेच आढळते तेथे क्रिकेट सर्व धर्म, सामाजिक उच्च कनिष्ठता, प्रांतिक भेद या सर्वांवर मात करून एका सूत्रात गुंफते ते क्रिकेट टाकाऊ नक्कीच नाही. या लेखात उल्लेखलेला अंतीम सामना जुहूच्या उच्चभ्रू बंगल्यात किंवा धारावीच्या झोपडीत, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वांनीच तितक्याच समरसतेने अनुभवला आपल्या सर्व समस्या तेवढ्यापुरत्या विसरून फक्त एक भारतीय म्हणून अनुभवले हेच क्रिकेटचे यश आहे.

आजचे क्रिकेट बदलले आहे. अनेक वादांनी ग्रस्त आहे सध्या या खेळाची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. अती क्रिकेटमुळे १५-२० वर्षांपूर्वी जो थरार होता तो आता जाणवत नाही. व्यवस्थित नियोजन केले, आहेत त्या कायद्यांचे प्रामाणिकपणे पालन केले तर आलेली ही मरगळ दूर होईल आणि क्रिकेट यातून तावून सुलाखून बाहेर पडेल असा विश्वास आहे.

तीन दशके उलटली १९८३ च्या विश्वविजायाला. पुलाखालून बरेच पाणीही गेले. तेव्हाचे खेळाडू गेले, नवे आले तेही गेले मात्र या खेळात निर्माण झालेला दबदबा आजही कायम आहे. अनेक स्पर्धा जिंकल्या, आणखी एकदा विश्वकरंड्क जिंकला, २०-२० चा विश्व करंडक जिंकला. भारत कसोटीत बराच काळ क्र. १ चा संघ होता. भारताचे युवा खेळाडूही प्रतिभावान आहेत त्यांचा आजचा खेळ पाहता भविष्यातही उज्वल परंपरा टिकून राहणार आहे. या सर्वाची पायाभरणी करणारा आणि पहिले वाहिले विजेतेपद देणारा तो क्षण सुवर्णक्षणच होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"संघाची पाच बाद १७ अशी धावसंख्या असतांना कर्णधार कपिल देव मैदानात आला" - कपिल खेळायला आला तेव्हा स्कोर ४/९ होता. मग पाचवी विकेट पडली आणि ५/१७ अशी अवस्था झाली.

अरेच्चा, खरंच की, संदिप पाटील चवथा बाद झाला त्यानंतर कपिल देव आला, पांचवा बाद झालेला खेळाडू यशपाल शर्मा होता. राहून गेली ही चूक पण संपादन करीत नाही. कॉपी करुन पास होण्यात मजा नाही.
फेरफटकाजी धन्यवाद.

लाल टोपी: अहो, हा प्रश्न बरेच वेळा क्वीझ मधे विचारल्यामुळे (मला आणि मी सुद्धा) ते माहीत झालय. Happy

तुम्ही छान लिहिलयत. शुभेच्छा!

छान लिहिलंय. ह्या विश्वविजयानंतर गिरगाव चौपाटीवरुन आपल्या टीमची बस गेली होती तेव्हा आम्ही वाडीतली पोरं बघायला गेलो होतो. रस्त्याच्या दुतर्फा माणसं जमली होती त्यांच्या स्वागतासाठी. रवी शास्त्री आणि कपिलदेव अंधुकसे आठवतायत. रवी शास्त्री तेव्हा कसल्ला हिरो दिसायचा तेव्हा! Lol

एक सुचवू का? संयोजकांना सांगून तुमच्या लेखात दोन परिच्छेदांमध्ये स्पेस द्या.

मस्त लेख. यातले बरेच सामने टी व्ही वर रात्री अपरात्री जागून पाहिले होते. शेवटच्या सामन्यात अडखळलेल्या श्वासांपैकी काही आमच्या टीव्हीसमोर देखील होते. एरवी क्रिकेटमधे फारसा इंटरेस्ट न घेणारे घरचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा पूर्णवेळ अंतिम सामना पाहत होते .

@ अश्विनीजी, मेधाजी धन्यवाद..
अश्विनीजी परिच्छेदात अंतर वाढवण्यासाठी विचारतो.

संयोजक,
या लेखात परीच्छेदामध्ये केवळ अंतर वाढवले आहे. अन्य कोणतीही सुधारणा लेखात केलेली नाही.

लाल टोपी,

मला अंतिम सामना आठवतोय. भिक्कार दूरदर्शन 'बाते फिल्मोंकी' दाखवत बसलं होतं. रिचर्ड्सचा झेल पाहता आला नाही. रेडियोवर ऐकावा लागला. गदारोळ झाल्याबरोबर मी मोठ्या भावाला म्हंटलं की रिचर्ड्स गेलेला दिसतोय. पंधराएक सेकंदांनी शिक्कामोर्तब झालं.

नंतर दूरदर्शनवर सामना दाखवणं सुरू केलं. घरी मी वडील आणि मोठा भाऊ होतो. पुढे वेस्टिंडीजचे एकेक मोहरे गळत गेले आणि आम्ही सगळे छानपैकी सरसावून बसलो. मग मार्शल दुजाँची जोडी जमली. तरी आवश्यक धावगती मिळत नव्हती. आमची आकडेमोड चालू असे. या षटकात इतक्या इतक्या निघाल्या वगैरे. सुरवातीला जोडीने छान धावा फटकावल्या. ३.५ ची धावगती खाली आणली. पण तेव्हढ्यात मोहिंदर अमरनाथच्या पहिल्याच चेंडूवर दुजाँचा त्रिफळा उडाला. पहिल्यांदा आम्हाला कळलंच नाही काय झालं ते. यष्ट्या उध्वस्त झाल्याचं दिसलंच नाही. चारपाच सेकंदांनी समजलं की दुजाँ त्रिफळाचीत झालाय ते. आमच्या ओरडाआरड्याला पारावार राहिला नाही.

मग मात्र वेस्टिंडीज या धक्क्यातनं सावरू शकले नाहीत. पुढे लक्ष्य धावगतीही वाढत गेली. वीसेक धावांत उरलेले तीन मोहोरे गळाले. शेवटला गडी होल्डिंग बाद झाल्यावर अभूतपूर्व जनसागर मैदानात धावत सुटला.

वेस्टिंडीजपैकी एकाला रडू कोसळलं. तो मार्शल होता असं दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात वाचलं.

आ.न.,
-गा.पै.

हो, मलाही ते दिवस आठवतात सुरुवातीला तर फक्त काही निवड्क साखळी सामन्यांचे प्रक्षेपण होणार होते. भारत उपांत्य फेरीत पोहोचल्या नंतर दुरदर्शनने त्या सामन्याची सोय केली. त्यावेळी घरी दुरदर्शन संच नव्हता. त्यामुळे रेडीओवरचं मॅच ऐकत होतो.

अगदी आकाशवाणीवरील धावत्या वर्णनासारखाच वेगवान आढावा त्या ऐतिहासिक विजयाचा. आमच्या कोल्हापूरात त्या साली टेलिव्हिजन नव्हते म्हणून झाडून सारा समाज रेडिओला कान चिकटवून नाक्यानाक्यावर बसला होता....आणि बसला होता म्हणजे अक्षरशः त्या काळात जी काही ट्रॅफिक असेल तीही थांबलीच होती. एकतर अगोदरच्या दोन वर्ल्ड कपमध्ये चारीमुंड्या चीत झालेले आपले पहिलवान आणि या कपमध्ये तरी असा काय दिवा लावतील हीच भूमिका. इतक्या निगेटिव्हली आपल्या करामतीकडे पाहिले गेले होते की आपण दोनवेळच्या जेत्याच्या विरुद्ध खेळणार हाच जणू एकप्रकारे सामना सुरु होण्यापूर्वीचा विजयच मानला गेला होता. त्यामुळे १८३ पर्यंत गाडा रेटला हेच खूप झाले होते. त्यातही मला स्मरते चक्क ३५ षटकात आपल्या १०० धावा लागल्या होत्या. आज २० षटकात २०० धावा निघताना आपण पाहतो.

सारे काही स्वप्नवत घडत गेले ते बलविंदर सिंधूने घेतलेल्या ग्रीनिजच्या विकेटपासून. पुढे व्हिव रिचर्डसने घाम काढला पण कपिल झिंदाबाद.

छान लेख.

अशोक पाटील

वा मस्तच, nostalgic झाले, तेव्हा आम्ही लहान होतो, पण आठवतेय बरचसं, लाल टोपी छान लिहिलंय तुम्ही.

त्यावेळेची आठवण म्हणजे आम्ही सगळे म्हणत होतो भारत हारणार (सगळी चाळ आमच्याकडे match बघायला आली होती), पण माझे बाबाच फक्त सतत म्हणत होते आपणच जिंकणार, हि आठवण त्यानिमित्ताने ताजी झाली. रवी शास्त्री माझा आवडता खेळाडू (चिकना दिसायचा) पण तो ह्या सामन्यात राखीव होता आणि सुनील गावस्करपण खूप आवडायचा (आदर्श खेळाडू म्हणून).

लाल टोपी धन्यवाद ह्या लेखासाठी.