पुन्हा बहरली

Submitted by निशिकांत on 19 August, 2013 - 02:24

इतिहासाच्या पानांवरची धूळ झटकली
जुनी आपुली प्रीत अंतरी पुन्हा बहरली

आठवणींचा एक कवडसा मनात येता
भळभळणारी जुनी वेदना हळूच हसली

ज्यांच्यांसाठी उरात होती कपार ओली
त्या आपुल्यांची मना वाळवी सदैव डसली

स्पष्ट बोलण्या, तोंडपुजेपण झुगारल्याने
आयुष्याची घडी एवढी का विसकटली?

गावाकडची वाट जरी काटेरी आहे
तुडवुन जाता कळतिल तिथले भाव मखमली

गंगेकाठी पाप कधी का धुतले जाते?
मनी नांदतो भ्रम मोक्षाची वाट गवसली

गैर वाटते? शिवू नका ना, मर्जी तुमची
टिका कशाला, मदिरा कोणी किती रिचवली?

दिवसाकाठी रोज लढाई जगण्यासाठी
ऐपत नसुनी स्वप्नांसोबत रात्र सजवली

जगास नाही, विठूस दिसता भाव मनीचा
"निशिकांता"वर ईशकृपेची धार बरसली

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसाकाठी रोज लढाई जगण्यासाठी
ऐपत नसुनी स्वप्नांसोबत रात्र सजवली<<< व्वा

आठवणींचा एक कवडसा मनात येता
भळभळणारी जुनी वेदना हळूच हसली ,,<< सुंदर >>

ज्यांच्यांसाठी उरात होती कपार ओली
त्या आपुल्यांची मना वाळवी सदैव डसली << छान >>

दिवसाकाठी रोज लढाई जगण्यासाठी
ऐपत नसुनी स्वप्नांसोबत रात्र सजवली<<< व्वा >>>

--- सुंदर गझल

दिवसाकाठी रोज लढाई जगण्यासाठी
ऐपत नसुनी स्वप्नांसोबत रात्र सजवली

जगास नाही, विठूस दिसता भाव मनीचा
"निशिकांता"वर ईशकृपेची धार बरसली

वा! सुरेख शेर!!