पाठमोरे पाहिले गर्दीत त्याला

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 August, 2013 - 16:15

प्रश्न अडतो नेहमी हा उत्तराशी
काय बोलावे कुणी केव्हा कुणाशी ?

पाठमोरे पाहिले गर्दीत त्याला
सामना होतो कुठे हल्ली सुखाशी

हद्द मी ओलांडली केव्हाच माझी
बोलले होते खरे जेव्हा तुझ्याशी

गाठले नाही क्षितीजाला कधीही
सोबतीने चालले होते जराशी

अंतरावर राहुनी अद्वैत आहे
कोणते नाते धरेचे या नभाशी

जीवना तू ऐक ना माझे जरासे
बोलले नाही कधी कोणाचपाशी

छाटल्यावरती नव्याने जोम धरते
घाव घालावेत दु:खाच्या मुळाशी

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

५,६ आवडले.
हद्द मी ओलांडली केव्हाच माझी
बोलले होते खरे जेव्हा तुझ्याशी

केव्हाच ऐवजी तेव्हाच कसे वाटेल?

अव्दैत की अद्वैत?

<<<<केव्हाच ऐवजी तेव्हाच कसे वाटेल?>>>>

'केव्हाच' मधे 'खुप पूर्वीच' अभिप्रेत आहे म्हणून 'तेव्हाच' घेणे टाळले

'अद्वैत' बरोबर आहे पण टायपता येत नव्हते आता हेच कॉपी-पेस्ट करते

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !

अंतरावर राहुनी अद्वैत आहे
कोणते नाते धरेचे या नभाशी

पाठमोरे पाहिले गर्दीत त्याला
सामना होतो कुठे हल्ली सुखाशी

हे जास्त आवडले ,
बाकीही छान Happy

अंतरावर राहुनी अद्वैत आहे
कोणते नाते धरेचे या नभाशी

छाटल्यावरती नव्याने जोम धरते
घाव घालावेत दु:खाच्या मुळाशी>>> वा ..व्वा!!

<<<<तो मी नव्हतोच.>>>>

अर्थात ! नसणारच आपण, मी सुखाबद्दल बोलत होते साळसूद्या Happy

नविन प्रतिसादकर्त्यांचे आभार !

-सुप्रिया.