जाहिरात

Submitted by Barcelona on 17 August, 2013 - 12:20

जाहीरात

“मेरेडिथ, २० डॉलर लागतील फक्त!” जिमचे बोलणे ऐकून मेरेडिथ मात्र थिजून गेली होती. आपल्या लांब स्कर्टवरची तिची पकड नकळत घट्ट झाली. तिने तरी विचारले “जिम, लग्नानंतर नाही का चालणार? २० डॉलर म्हणजे खाऊ आहे का? महीना-दोन महिन्याचा पगार आहे तो.” पण जिमचे लक्ष कुठे होते तिच्याकडे. सकाळी जिम पोस्टात गेला होता. गेली पंधरा वर्षे जिम पोस्टाभोवतीची बाग सांभाळायचा. १० वर्षाचा असतांना ‘तेवढेच जमेल’ म्हणून वडिलांनी पोस्टाच्या बागेत कामाला लावला. पोस्टमास्तरीण बाईना जिमचा लळा लागला. बाई इंग्लंडमधून आपल्या ४ मुलांसोबत आल्या कारण मास्तरांनी ओहायोत पोस्ट उघडले. पण ओहायोची हवा मुलांना मानवली नाही. हिवाळ्यात, साथीमध्ये एकापाठोपाठ एक मुले काळाने ओढून नेली. बाईंनी मन हळूहळू शिवणकामात रमवले. एलीरीया गावातील सगळ्या बायका हाताने शिवणकाम करीत. पण मास्तरीणबाईंकडे युरोपात बनवलेले शिवण यंत्र होते. काळानुसार बदल स्वीकारण्याची हुशारी त्यांच्यात होती. पोस्टमास्तर कडक होते. शाळेत जाऊ शकला नाही तरी त्यांनी जिमला अक्षरओळख करून दिली होती. जिमला त्या दोघांचा आधार वाटे. आता जिम छापखान्यात कामाला लागला होता. पण तरी त्याने बागेचे काम सोडले नव्ह्ते. सकाळी त्याने पोस्टात एक जाहिरात पहिली. त्या पोस्टर वर शांत निळे आकाश, उंच डोंगर, त्या डोंगरावर साठलेल्या थोड्याश्या बर्फातून निघालेला एक झरा. डावीकडे एक वेगाने येणारी, धूर ओकणारी आगगाडी आणि पाऊण पोस्टर व्यापणारे मोकळे मैदान. खाली ठळक काळी अक्षरे - ‘आयोवाला या! कसेल त्याची जमीन.’
जिम कोबी ठेवायला सैपाकघरात गेला आणि तिथेच जरासा रेंगाळला. मास्तरीणबाईंचे लक्ष गेले, त्यांनी विचारले “चांगले आलेत की कोबी. चहा घेशील? का ताजा ब्रेड खातोस” जिम त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून म्हणाला “मॅम, ती जाहिरात" त्या गोंधळून म्हणाल्या “काय तिच? फाटली काय? अरे, काँग्रेसने नवा कायदा केलाय - होम्स्टेड. १० डॉलर भरायचे आणि आयोवात १६० एकर जमीन मिळेल. ५ वर्ष तिथच रहायचं की जमीन आपली. काहीतरी उगीच आपल, न रस्ते न नद्या न विहिरी. कोण जाणार त्या पश्चिमेकडे!” जिमने चाचरत विचारले “मॅम, १६० एकर म्हणजे म्हाताऱ्या जॉर्जच्या मळ्याएवढी?” हातातील किटली खाली ठेवून मास्तरीणबाईंनी भुवई उंचावली. “मॅम, म्हणजे तस रेल्वेने फार तर एक-दीड दिवस लागेल. खूप दूर नाही आयोवा ओहायोपासून नाही?” जिमच्या डोक्यात काय चालले आहे हे आतापर्यंत मास्तरीणबाईंना उमजले होत. जरा जरबेने त्यांनी विचारले “लग्नासाठीचे कपडे आले शिवून? मेरीडीथचे मामा काल भेटले होते. आई-बापावेगळी पोर. शाळेत शिकवते, मायेने तिघ भावंड सांभाळते, घरचं बघते. मामा काळजी करतात तिचे. वय वाढतय तिचही. समर मध्ये तेवीसची होईल ती. स्प्रिंगमधेच उरकलंस तर सगळ्यांना बर वाटेल, कस?” जिम त्याकडे साफ दुर्लक्ष करून म्हणाला “मॅम, ५ वर्ष कोबी उगवले तर ते आपले की ते सरकारला द्यावे लागतील?” आता मात्र मास्तरीण बाई चिडल्या “जा पाहू तिकडे मास्तरांना पोते उचलू लाग”. जिम मास्तरांच्या पोत्याला हात देऊ लागला आणि त्याने विचारलं “मास्टर, ते होम्स्टेड कोण करू शकत हो?” मास्तर हसून म्हणाले ”अरे उठसूठ कुणीही करतय. कायद्यानुसार बाई-बुवा, गोरा-काळा असा कुठलाही भेद होम्स्टेड करीत नाही. कुणीही जावं आणि त्या पश्चिमेत मरावं.”
पोस्टातून आल्यावर जिमने मेरीडीथला म्हणाला “मी होम्स्टेडची जाहिरात पहिली. आयोवाला येशील?” मेरीडीथने भाबडेपणाने विचारले “शाळा आहेत तिथे?” जिमने मान हलवली “बहुतेक नसाव्या. पण तू शिक्षिका म्हणून नको येवूस. कुटुंबप्रमुख म्हणून ये.” मेरीडीथ नुसतीच बघत राहिली. जिम म्हणाला “१६० एकर, आपण ५ जण. बहुतेक नाही पुरणार. पण मेरेडिथ तू आलीस तर दोन बाजू-बाजूच्या जमिनी घेऊ. अस गळक्या घरात नाही रहावं लागणार, पक्कं घर बांधू. २० डॉलर द्यावे लागतील.” मेरीडीथ मात्र पार गांगरून गेली “मग लग्न?” जिम झटकन म्हणाला “जमीन आपली होऊ दे मग करू की” “मग पाच वर्ष अशीच तुझ्या शेजारी राहू?” जिम पटकन म्हणाला “अग आत्ता पण तर दोन गल्ल्या सोडून राहतेसच नं?” मेरीडीथ न बोलता उदासवाणी बसून राहिली. मेरीडीथने मामाच्या कानावर गोष्ट घातली. त्यांना काय बोलाव सुचेना. शेजारच्या गावातील मार्जी नवऱ्याबरोबर नेब्रास्काला गेली होती. पण त्यांचं काही चांगलं ऐकलं नव्हत. तिचा नवरा शेतकरी नव्हता आणि आता अचानक जमीन कसायची. वर्षभर प्रयत्न केला मग त्यांनी हार मानली होती. आपल्या गावातली मीठ-भाकरी बरी असा विचार करून परतले ते दोघे. मेरीडीथला तर लग्न न करता जाव लागणार होत. मामा उगीच चिडचिडे झाले. शेवटी त्यांनी शांत होवून मेरेडिथला सांगितल “जिम चांगला मुलगा आहे. त्याच्याविना राहणे तुला शक्य नाही. त्याच्या बरोबर लग्न करून राहणे लांबतंय. जायचं असेल तर जा पण अयशस्वी होऊ नकोस. तिथेच काही काम बघ.”
पोस्टमास्तरीण बाईंना सुरुवातीचे काही महिने जिमशिवाय जड गेलं. आपण का त्याला जायला शेवटी पैसे दिले हे त्यांनाच समजत नव्हते. पण मग हळूहळू सवय झाली. बागेची काहीशी अबाळ होत होती. तेव्हा दुसरा माळी नेमला. ८-९ महिन्यानंतर एक दिवस जिमचे पत्र आले. जिमने एक झोपडे बांधले होते. मेरेडिथ आणि तिच्या भावंडांसाठी लाकडी घर बांधले होते. बाईंना जिमचे कौतुक वाटले, तिथे सपाट मैदानं कुठून लाकडे मिळवली असतील? मेरिडिथला नोकरी शक्य नव्हती मग तिने काही कोंबड्या पाळल्या आणि बाग लावली. कधी ५ मैल तुडवून बाजारात अंडी विकली तर कधी घराला नवीन ओटा केला अशी जिमची आणि मेरेडिथची पत्रे अधून मधून मास्तरीणबाईंना येत. ओसाड माळरानावर कष्ट करतात म्हणून काळजी वाटे . विशेषतः मेरेडिथबद्दल. ३ भावंडांचे करायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही. जेसन आणि मार्था तसे मोठे होते पण ५-६ वर्षाची लिझी मुळात अशक्त. तिला हवा मानवेल का नाही ह्याची काळजी. पण तिच्याबद्दल काही विशेष लिहिले नाही म्हणजे सार काही ठाकठीक आहे अस त्या समजून घेत. वर्षे गेली आणि एक दिवस अचानक जिमचे पत्र आले “बाई, एलीरीयाला येणार आहोत. जमीन आमची झाली. कायदयानुसार तिला तिच्या वाट्यावर राहणे जरुरी आहे. दोन जमिनीच्या बांधावर मध्यभागी आता ३ खोल्यांचं घर बांधतोय. आता महिन्याभरात लग्नाचं बघू. इथे चांगले चर्च अजूनही नाही त्यामुळे एलीरीयातील फादरनी आमचे लग्न लावावे अशी आमची इच्छा आहे.” बाईंना बरे वाटले!
मेरेडिथला बाईंनी ओळखलेच नाही. कृश पण तरी वयाने फार मोठी वाटू लागली होती. मेरेडिथ बसली आणि बाईंनी चहा ओतला. मेरेडिथने बाईंना फोटो दाखवला आणि बाईंना किती अप्रूप वाटले. कोणीसा वार्ताहर आला होता आणि त्याने अर्धवटसे घर, मेरेडिथ जेसन लिझीचा चांगला फोटो काढला. जिमचा एक वेगळा फोटो. बाईंना अभिमान वाटला. थोड इकडच तिकडच बोलून झाल्यावर बाईंनी सहज विचारलं “मार्था आता लग्नाची आहे ना? तिथे माळरानावर कोण भेटणार तिला आणि कशी ती प्रेमात पडणार? पुढच्या शनिवारी तिला घेऊन ये, मी एक दोन मैत्रीणीना पण बोलवते. तुझ्या लग्नापर्यंत तिचंपण कुठे काही जुळतंय का बघता येईल. गावतली होतकरू मुल ह्या बायकांना नक्की माहित असतील” मेरेडिथचे डोळे पाणावले “मार्था गेली.” बाई एकदम स्तब्ध झाल्या. मेरेडिथ सांगत राहिली “एका रात्री गव्याने हल्ला केला. बायसन प्राणी तसा शांत असतो पण चिडल्यावर अनावर होतो. बायसन बागेत शिरेल म्हणून मार्था त्याला हुसकावायला गेली. मी नको म्हणायच्या आधी काय होतय ते समजायच्या आत ती रक्तबंबाळ होवून पडली. जमिनीच्या एका कोपऱ्यात तिचं थडग आहे पण काही नीट फ्युनरल नाही झाल.” मेरेडिथच्या डोळ्यातून आसवं गाळत राहिली. विटलेला फडफडणारा “आयोवाला या” जाहिरातीचा कागद, दारावरची पितळी चमकणारी ‘मुख्य पोस्टमास्तर, एलीरीया’ पाटी आणि बाईंचा रिकामा कप…मेरेडिथच्या वेदनेला मूक साक्षीदार ठरले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी मराठी मासिकातून अश्या कथा येत संदर्भ माहीत नसल्याने खूप एक्सॉटिक वाटत. दैव जाणिले कुणी
अश्या टायपाचे शीर्षक जास्त शोभेल किंवा स्त्री जन्मा हीच तुझी कहाणी.

आवडली, पण शेवटी थोडी गडबडीत संपल्यासारखी वाटली. मार्थाचं पात्र आधीच्या निवेदनामधून एकदा येऊन गेलं असतं तर अजून व्यवस्थित झालं असतं.

सिमंतिनी, पॅरेग्राफ्स थोडे छोटे पाडत जा. वाचायला सोपं पडतं. Happy