GRACE: MAKING SENSE WITH NONSENSE

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 17 August, 2013 - 02:29

मला वाटतं की, 'ग्रेस हा अब्सर्ड कवी आहे.' आता हे विधान वाचताना वाचकाच्या मनात या वाक्याबद्दल अनेक प्रश्न उभे रहात असतील. म्हणून मी आधी अब्सर्ड या शब्दाची नीट व्याख्या करतो(?!?). आल्बेर काम्युच्या अब्सर्डिस्ट तत्वज्ञानानुसार, अस्तित्वाचा अर्थ शोधणारं मन आणि कोणताच ठाम अर्थ नसलेलं निरर्थक जग यांच्यातल्या मुलभूत भेदामुळे अब्सर्ड मानसिकता तयार होते. संपुर्ण वास्तव हे एकमेकांशी जोडलेलं,एकमेकांवर आधारीत,सहसंबंधित किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या तर्कशात्रीय मांडणीत असतं का? याचं नक्की उत्तर अजुन देता आलेलं नाही. आपल्याला संपुर्ण वास्तवाचे ज्ञान आहे का? मानवीय दॄष्ट्या ते अशक्य आहे. कारण आपल्या जाणीवांच्या टप्प्यात येणार्‍या विश्वाला आपण वास्तव म्हणुन संबोधतो आणि त्याला एका ठराविक तर्कशात्रीय मांडणीत बसवू पहातो.त्याद्वारे एक ठराविक अर्थ असलेली संदर्भ चौकट आपण बनवू पहातो (आपल्याला लांबी मोजायला फूटपट्टी लागते ना, तशीच.) आणि त्या संदर्भचौकटीचा वापर करुन आपण इतर गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. ग्रेस यांच्या कविता वाचताना मला जाणवले की, त्यांना एका ठराविक अर्थाकडेच पोहोचायचे आहे असे वाटत नाही. आपली कविता अंतिम वाक्य नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. हे मी का म्हणतोय, हे त्यांच्या पुढच्या काही विधानांवरुन स्पष्ट होते.
'माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती व तिचा आस्वाद या त्रिवेणीसंबंधी महत्वाचे प्रश्न निर्माण केलेत.'
मुळात असं की मी प्रश्न निर्माण केलेत, कशाची उत्तरे दिलेली नाहीत वा द्यायचा प्रयत्न केलेला नाही हे मान्य करणंच महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीची जडणघडण कशी आणि कुठल्या टप्प्यात होते आणि त्यात आपले स्वतःचे स्थान नक्की काय व कोणते याची व्यापक जाणीव असलेला हा कवी आहे. ग्रेस यांनी कुठेही संदिग्धतेला (कन्फ्युजन) नाकारलेलं नाहीये.
'पळवाट नकोच आहे मला, हवीये फक्त दु:ख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता'
हे समजून घेताना आधी 'something -genesis-something' म्हणजे काय ते ही समजून घेतले पाहीजे. माझ्या आधी ही अर्थहीन जग होतं(something), आता मी आहे. मी माझ्या अमर्याद स्वातंत्र्याच्या बळावर, माझ्या अस्तित्वाला आणि त्याच्या जाणीवांना माझ्या आकलनात असणार्‍या संदर्भांतुन तौलनिकरित्या अर्थ देईन, देत राहीन.(genesis) यापुढे माझ्यानंतर ही अर्थहीन जग कायम राहील.(something) संपुर्ण अर्थ किंवा पुरेपूर निरर्थकता यापैंकी मी काहीच अनुभवू शकणार नाही. ग्रेसच्या कवितेत येणारी संदिग्धता आणि आपला प्रवास हा संदिग्धतेकडून संदिग्धतेकडेच आहे हे दर्शवणं मला नेहमी जाणवतं. तोच प्रकार त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जगताना घेतलेल्या भुमिकेमध्ये ही जाणवतो.
'माझी कविता हे एक बेट आहे. मी ही एक बेटच आहे. या बेटावरुन परतवण्याची हमी मी वाचकाला देत नाही. त्याने स्वतः होडी होऊन गेले पाहीजे.'
स्वतःला आणि मुख्यतः स्वतःच्या निर्मितीला एका बेटाची उपमा देऊन त्यांनी आपल्या अस्तित्वाचा स्थायीभाव दर्शवला आहे. मी कुठेही जात नाहिये आणि कुठुनही येत नाहीये. मला काही विशेष उद्दिष्ट साध्य करायचं नाहीये. मी केवळ आहे आणि स्वतंत्र जगतोय. स्वतःच्याच आयुष्य जगण्याच्या पद्धतीतुनसुद्धा त्यांनी हाच दॄष्टिकोन दिलेला आहे. त्यांच्यावर दुर्बोधतेचे कितीही आरोप झाले तरी, स्वतःच्या कविता वाचकांना समजावुन सांगाव्यात असे त्यांना वाटले नाही. त्यांनी कुठलाही अजेंडा राबवला नाही. नाहीतरी लोकप्रियता हे एकप्रकारचे मास सेन्सिबिलिटी मिथ आहे.
शेवटी अब्सर्ड व्यक्तीसाठी कोणतीही गोष्ट समजावुन सांगणे किंवा सोडवणे महत्वाचे नसते तर ती स्वतः अनुभवणे आणि स्वतःच्या अनुभवांचे वर्णन करणे हे महत्वाचे असते. ग्रेस यांच्या काव्यात हा गुणधर्म विशेष आढळून येतो. त्यांच्या कवितेचे 'इझम' बनवता येत नाही.ग्रेस यांच्या कवितेला स्वतंत्र अस्तित्व आहे, ते आढळुन येतं जेव्हा ते स्वतः द्वैती असल्याचं कबूल करतात.
(वरील लेख ही केवळ एक मोठी प्रतिक्रिया आहे.मी कुठेही ग्रेस यांच्या कवितांचा परामर्श घेऊन त्यांचा अब्सर्डिटीशी संबंध जोडलेला नाहीये. जी वाक्ये घेतलीयेत ती केवळ त्यांच्या ललितलेखनातुन घेतली आहेत.पण ग्रेसांचं लिखाण अब्सर्ड अंगाने
समजावुन घ्यायचा प्रयत्न करता येईल आणि त्यातुन मिळणारा आस्वाद फार वेगळा असेल असे माझे मत. ग्रेसांच्या बेटावरुन परतताना स्वतः जहाज बनण्याचा हा माझा प्रयत्न. वेगळ्या अंगानेही सेन्स देउन ग्रेस समजावता येऊ शकतात आणि इथले बरेच जण ही कविता आपल्या अंगाने समजावून घेऊन त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत आहेत, after all 'we have art in order not to die of the truth'- Nietzsche) - हरवलेल्या जहाजाचा कप्तान

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'माझी कविता हे एक बेट आहे. मी ही एक बेटच आहे. या बेटावरुन परतवण्याची हमी मी वाचकाला देत नाही. त्याने स्वतः होडी होऊन गेले पाहीजे.'
स्वतःला आणि मुख्यतः स्वतःच्या निर्मितीला एका बेटाची उपमा देऊन त्यांनी आपल्या अस्तित्वाचा स्थायीभाव दर्शवला आहे. मी कुठेही जात नाहिये आणि कुठुनही येत नाहीये.

धन्यवाद.

ग्रेसच्या कवितेत निसर्ग-
प्रस्तुती -श्रीनिवास हवालदार
[ माझ्या ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे - पूर्वार्ध या पुस्तकातून]
ग्रेस मराठीतले एक अलौकिक प्रतिभेचे कवी असूनही त्यांची कविता दुर्बोध आहे,ते आत्मलुब्ध आणि गूढ कवी आहेत असा आरोप त्यांच्या जीवनकाळात नेहमीच झाला.
दुर्बोधतेच्या टीके बद्दल त्यांनी अनेकदा त्याची स्वतःची प्रतिक्रिया निरनिराळ्या स्वरूपात व्यक्त केली परंतु त्यांची ही प्रतिक्रिया अधिक भावते. ते म्हणतात "माझी स्वत:च्या कवितेविषयी एक धारणा आहे, हाकेची कविता ज्या वेळेला रसिकाला हाक देईल त्याच वेळेला रसिक आपणहून कवितेकडे जातो. रसिक आणि कवी यांच्यातला अनुबंध फक्त रसिक आणि कवी ह्यांनाच ठाऊक असतो. कविताही रसिकाला पाहून कुठेतरी थबकत असते असे मला वाटते.पण या निर्मितीच्या मुहूर्ताची कुंडली मांडता येत नाही. “
ग्रेस च्या कवितात अनेक लपलेले पैलू आहेत परंतु त्यांच्या कवितांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाची पृष्ठभूमी आहे रसिकांना हाक देणाऱ्या या अशा कविता आहेत ज्यात ग्रेसच्या भावना आणि निसर्ग दोन्ही एकरूप झाले आहेत:
'भय इथले संपत नाही' कवितेत लहानपणी आईसोबत घालवलेल्या दिवसाची आठवण पुनर्जन्माच्या कल्पनेत आणि वृक्षांच्या छायेत खालील ओळीत साकार झाली आहे :
"भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया "
"घर थकलेले संन्यासी " या कवितेत तर संपूर्ण निसर्ग ग्रेस च्या भावनांशी एकरूप झाला आहे :
घर थकलेले सन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते
आई निघून गेली त्यादिवशीचीची संध्याकाळ नेहमी हवीहवीशी संध्याकाळ नव्हती त्या विपरीत असहनीय उन जसे पीडादायक असते तसे वाटत होते .आकाशातील ढगांचे आच्छादन हे लोप पावले होते निसर्गातून कोठूनही कवीच्या मनास शांती देणारा संदेश येत नव्हता व असीम दुख्खाचे आभाळ त्यावर कोसळले होते.
पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झर्याचे पाणी
पक्षांचे निवार्याचे एकमात्र आधार असलेल्या झाडास कोणा दुष्ट व्यक्तीने तोडून टाकले आहे.परिवाराचे पालन करणाऱ्या एकमात्र व्यक्तीस हिरावून घेऊन जाऊन जणू झर्याच्या पाण्याचा स्त्रोतच शोषून टाकला आहे.
मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई
हळू हळू संध्याकाळ संपून रात्र सुरु झाली.त्या रात्रीच्या अंधारातील भयदायक वातावरणाने कवी इतका घाबरला कि आपण अंधारा कडून उजेडाकडे जावे हे भान न राहून तो घरातल्या अडगळीच्या खोलीत तो लपून बसला. रात्रीच्या काळोखाची भयाणता दरीतल्या जंगलातील वातावरणा मुळे वाढतच गेली.
'मंदिरे सुनी सुनी' या कवितेत कवीच्या दुक्खाशी निसर्ग कसा समरस झाला आहे हे बघा :
मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
या संध्याकाळच्या वेळी सर्व वस्तीत सुनसान वातावरण आहे. कुठे काहीही हालचाल नाही. दिव्याचा प्रकाश किवा काजव्यांचा उजेड ही दिसत नाही. श्रावणच्या या ऋतूत केवळ सुगंधित थंड वारा शरीरास झोंबतो आहे.
रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गाण्यातील सूर जसे हळू हळू सुरु होऊन नंतर द्रुत होऊ लागतात तसीच रात्रही वाढू लागली आहे. समोरच्या वस्तीतील घरेही दाट धुक्यामुळे दिसेनाशी झाली आहेत.
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?
थंडीमुळे गळ्यातून शब्दही निघत नाहीत. आकाशातील ढगात माझ्या मनाप्रमाणेच चंचलता आली असून ते सर्व एकत्रित होउन माझ्या असीम दुक्खाचे आकाश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत..पण असे केल्याने आकाश झाकले जाऊन माझे दुखः जाईल का?
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..
माझे दुक्ख दूर होण्याचा एकच मार्ग आहे . मी शोधात असलेल्या व्यक्तीने जर मला अत्यंत व्याकूळ होऊन अशी हाक दिली की त्याचा प्रतिध्वनी ही ऐकू येईल तर मी समोरच्या नदीत उडी टाकूनजेथून हाक आली तेथे शोधण्या करता जाईन.
"ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता" या कवितेत ही आई च्या जाण्याच्या वेळी कवीच्या मनस्थितीत व निसर्गाच्या त्या वेळच्या वातावरणात किती साम्य होते हे दिसून येते :
ती गेली तेव्हा रिमझिम
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ...
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता
रिमझिम पडणारा पाऊस कवीच्या मनातली अस्थिरता व्यक्त करतो तर ढगांमुळे अडकलेली किरणे सोडविण्याचा सूर्याचा प्रयत्न म्हणजे कवि पुढे अचानक उभा राहिलेला पेच प्रसंग व त्यास कसे सोडवणार हा प्रश्न ! कवीने 'हा सूर्य' या शब्दांचा प्रयोग जाणीव पूर्वक केलेला वाटतो .हा आजचा सूर्य सध्या मेघांनी आछ्यादित नसल्यामुळे त्या वेळच्या चिंताग्रस्त सूर्याची स्थिती कशी बिकट होती हे त्यालाच माहित.
संध्याकाळ ही कवीच्या घरी अचानक थांबल्या सारखी वाटली.ज्या प्रमाणे काही प्रसंगी अर्थहीन शब्दातूनही काही अर्थाचा बोध होतो त्याच प्रमाणे घरात घडलेल्या अप्रिय घटनेची कल्पना संध्येस तेथील भकास वातावरण मुळे आली व इथे काही तरी झालंय बरंका असे समजूनच ती पुद्धे गेली असावी .
'शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता'' हे वाचताना संत ज्ञानेश्वरांच्या 'शब्दे विना संवादू' दुजे विना अनुवादू ' या ओळीही आठवितात .
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता
... आईच्या ठिकाणी जर इतर कोणी असते तर कवीला इतके दुक्ख झाले नसते .
ढगात साठवलेल्या पावसाप्रमाणे मनात साठवलेली व्याकुळता अविरत अश्रूंच्या स्वरूपात बाहेर पडली . कदाचित त्या वेळी वाऱ्यालाही कवीच्या दुख्खाची जाणीव झाल्या मुले त्याच्या वाहण्यात तीव्रता नसून तो अत्यंत संथपणे घाटातील पाचोळा उडवत होता.
ती गेल्यानंतर मुलास उमगले कि आपले बालपण आता संपले व आपण एकाकी झालो .घरातील खिडकीवरील च्या कंदिलाच्या काचावर लागलेल्या काजळी प्रमाणे
कवीच्या जीवनात ही दुक्खाची काजळी पसरली होती.
ग्रेसच्या कवितेचा अभ्यास केल्याने कळते की त्यांना फुले, वेली आणि फुलपाखरांचे खूप आकर्षण होते आणि त्यामुळेच त्यांच्या कविता फुले ,वेली आणि फुलपाखरा सारख्या नाजुक आणि सौंदर्यपूर्ण आहेत:
"मी महाकवी दुःखाचा
मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल..."
परंतु त्यांनी आपल्या दुक्खाची ...
झळ या फुलांना लागू नये याची काळजी घेतली आहे.
निसर्गाच्या या देणग्या अत्यंत हळुवार पणे त्यांच्या कवितेत व्यक्त होतात :
"शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ
आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग"
'निष्पर्ण तरुंची राई'कवितेत नाजूक वेली भोळ्या वाऱ्याला हसवुन [आणि फसवून] पळून जातात
"त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती"
त्याच वेली 'हले काचपात्रातली वेल साधी' कवितेत सहिष्णुता आणि प्रेमाचा संदेश घेऊन अवतरल्या आहेत. काचपात्रातली साधी वेल सहिष्णू आणि प्रतिसाद देणारी असते पण धर्मांध ,दुष्ट आणि भावनाहीन माणसे जन्मानेच आंधळी असतात :
"हले काचपात्रातली वेल साधी,
निनादून घंटा जरा वाकल्या.
खिळ्याना दिसेना कुठे क्रूस दया वा,
.प्रभूने अश्या पापण्या झाकल्या.'.
हीच वेल 'मी सांजफुलांची वेळ' कवितेत संध्याकाळी पाण्यावरची चंद्रखूण होऊन आली आहे
'शब्दांनी हरवुन जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
वृक्षांच्या कलत्या छाया
.पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल"
ग्रेस च्या कवितेत निरनिराळी फुले निरनिराळ्या वातावरणात आढळतात.'निष्पर्ण तरुंची राई'कवितेत ती शृंगाराने नटवितात:
"संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने"
' निनाद' कवितेत रुख्मिणीला स्वतःच्याच अंगणात झरणार्या पारिजातकाच्या झाडाची भिती यामुळे आहे की त्याची फुले आवाजानेच गळू लागतात. सत्यभामा श्रीकृष्णाच्या गाण्याच्या वेडाने परिचित असल्यामुळे रात्री मुद्दाम गात असते आणि त्यास आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असते.
"तुझी भीति वाटावी तसें पारिजातकाचे झाड
निनादानें फ़ुलें सोडून जाणारें
मनाच्या भिंतीआडून कुणीतरी गाणारें
जवळ येऊ नये म्हणून रात्रीचा प्रपंच.."
'कंठात दिशांचे हार' कवितेत मोराच्या निळ्या अभिसाराच्या वर्णनात चाफ्याच्या अंधारकृष्ण रंगाच्या फुलांच्या सुंदर बहरासाठी मातीसच वेडे ठरवून टाकले आहे !
"कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.
लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.
गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.
मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे."
'ओळखीच्या वार्या तुझे घर कुठे सांग?' कवितेत जाई च्या वेलास जाब विचारत आहेत की की तुझ्या कळ्यांची फुले आपोआप होण्यामागे काही वाईट हेतू तर नाही तू त्याचं बालपण का हिरावून घेतेस ?:
"जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप?"
वरील कवितेतच पूजेसाठी सुगन्धित पण काट्याने भरलेले केवड्याचे पाते चिखलाने भरलेल्या आणि सापाने वेढलेल्या तळ्यातून आईने आणल्यानंतर ती तिला झालेल्या त्रासांच्या आठवणीने कशी रडली याचे मर्मस्पर्शी वर्णन ग्रेसने केले आहे :
"संध्याकाळी आई
देवघरात रडते
तिच्या पदराच्या मागे
केवड्याचे पाते"
'फ़ुलपाखरे' कवितेत मंदिरातील कीर्तनकारांच्या कथांची तुलना जाई फुलांशी केलेली अप्रतिम तुलना :
"गवतावरची ओंजळभर फ़ुलपाखरे
इकडून तिकडे टाकता येतात.
क्वचित सुखावणारी वारयाची डोंगरशीळ
आली तर नक्की संध्याकाळ झालेली असते.
समोरच्या पितळी खांबात कशाचेही
प्रतिबिंब पडते;
आता सनई सोडूनच्या देवळाचे.
कथेची एक आठवण माझ्या फ़ार जिव्हारी
लागून राहिलीय.
कथाही किती मोकळ्या असतात! नाही?
पाणी शिंपडलेली खूपखूपशी जाईची फ़ुलें
अलगद उचलून ठेवावीत उशीवर;
थोडी उरली तर वेशीवर
कथेतील पात्र संकटात सापडले म्हणून
धारांनी रडणारी बाई आठवते मला."
आणि या रंगी बिरंगी पोपटाची तर शोभाच निराळी!
" बदाम झाडे रिमझिम झेलित
हिरव्या पानांवरचे पाणी;
हिरवे पोपट त्यात मिसळले
चोच तेवढी लाल विराणी ?
झाडांच्या पानांतुन एकट
लाल पान चोचीला धरते ;
भेद तेवढा मिटवित जाता
आतिल पिवळे पान थबकते !
भेदांच्या रंगातून झरती
रंगांधांची भिरभिर गावे ;
बदाम हिरवे चोचीत घेऊन
भुssर्र उडाले हिरवे रावे ...
सुन्न बदामी चेहर्यावरती
चित्रव्यथेचि उरते धून;
साउल म्हणजे धम्मक पिवळे
उधळण ..उधळित हळदी उन ...”
कविवर्य ग्रेस यांच्या अधिकांश कवितात आकाश, तारे , चंद्र फुले , पक्षी ,वनराई ,नदी ,समुद्र यांच्या इतक्या प्रतिमा आहेत की की निसर्ग पूर्णपणे त्यांच्या कवितेत सामावला वाटतो.

ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई >> मला ह्या वाक्याचा अर्थ कळला नाही. इथे 'ये' असं म्हणून कोण कुणाला बोलावत आहे? आणि ये म्हणजे कुठे ये? अडगळीत? जिथे मी लपून राहिलो आहे तिथे? कशासाठी ये? आणि पुढे 'त्या दरीतली वनराई' हे वाक्य अर्धवट वाटत आहे. त्या वनराईचं काय? सॉरी, मला त्यांच्या कविता नीट कळत नाहीत हा माझा दोष आहे. कृपया समजावून सांगा.