''माझा भारत'' :परमहंस योगानंद : एक पद्यानुवाद

Submitted by भारती.. on 15 August, 2013 - 06:37

परमहंस योगानंद : ''माझा भारत'': एक पद्यानुवाद
( ‘’My India ‘’ या दीर्घकाव्यातील काही भाग :''Whispers from Eternity '' मधून )
माझा भारत
झुळुका आणती वाहून सवे सुगंध सुख-कस्तुरीचा
तमसा नाही पदरव नाही ज्या भूमीत भयाचा
घराघरातून नित्य उमटते तृप्त स्मिताची रेष
स्वर्गासम ते प्रांत आणखी सुजलसुफलसे देश

-नाकारीन मी जन्म तेथ पण !
हिंदुस्तानच माझे तनमन !

पुनः यायचे जन्मा येथे जडदेहा पांघरूनी
हजार दुष्काळांत पिचे जो भीषण आघातांनी
झडे मांस ते सारे, पडेल उलथून उद्ध्वस्तीत
अशी प्राक्तने जरी लाभली, येईन या भूमीत !

चोर होऊनी लाख लुटारूंसम प्राणांतिक रोग
हरती जे कायेतील सत्त्वे; अन नियतीचे मेघ
वर्षतील नित काळीज फाटत नेणार्‍या दु:खांना
तरी मान्य मज! जन्म घ्यायचा भारतामध्ये पुन्हा !!

या प्रेमाला अंधभावना म्हणती म्हणोत कोणी
तर्काचे ना अधिष्ठान मुरडतील नाके म्हणुनी
चुकता तुम्ही ! या देशाने प्रथम शिकवली प्रीती
प्रभूपदांवर आणिक सर्वच सुंदर गोष्टींवरती

थेंब दवाचा होऊन जीवन क्षणात हे ओघळते
कमलपत्र काळाचे जेव्हा किंचितही थरथरते
शिकविती कोणी कसे सुरक्षित राखावे हे जगणे
देत घोषणा '' जगा आज! मग आहेच पुढे मरणे !!''

इतरही काही चिवट वाहती आरोग्याची आशा
भारतभूमी मला शिकवते आद्य प्रीतीची भाषा
''क्षीण मानवी कुडीत राही अजरामर सुंदरता
श्रेष्ठ तिचे अस्तित्व-तत्त्व '' सांगे ही भारतमाता

हिचे संत सांगती शोधावे आत्मरूप एकांती
होतील शरीरे राखढिगारे - उरेल आत्मा अंती
नश्वर चंचल जन्मांतून वाहे जो वारंवार
आम्ही सजवून पुढे मांडतो अज्ञानी भांडार

त्या शास्त्रांच्या, समृद्धींच्या,सत्तांच्या राष्ट्रांत
माझा आत्मा आशियाई वा युरोपीय शरीरात
फिरतच राहील, झुरतच राहील शोध स्वतःचा घेत
स्थिरावेल मग अंती गवसता श्रेय भरतभूमीत ..

पद्यानुवाद - भारती बिर्जे डिग्गीकर
_______________________________________________________________________
My India
Not where the musk of happiness blows ,
Not in lands where darkness and fears never tread,
Not in homes where unceasing smiles reign,
Would I be born.
If once more I must assume a mortal garb,
A thousand famines may wrack my body,
Waste my flesh, and leave me prostrate,
Yet would I be born again in Hindustan.
A million thieves of disease
May steal my flesh,
And clouds of fate
Send scalding showers of searing sorrow –
Yet would I prefer in India I reappear !
Is this love of mine a blind sentiment
Spurning reason’s guidance ?
Far from it ! I love India
Because it was there I first learned
To love God, and all things beautiful.

Some people counsel all to seize the fickle dewdrop of life
As it slips down the lotus leaf of time ;
They cry ‘’live well today : tomorrow we die !’’
Some others base their stubborn hopes
On keeping their bodies always well.
India, however, taught me to love above all
The soul of deathless beauty within man’s fragile form.
That serves a high purpose, India taught me,
Which lasts after everything dies .
Her sages taught that one should seek the self
Beyond the ash heaps of discarded bodies ,
Beyond the brief ephemeral incarnations we live
Decked out in panoplies of ignorance!
Through many a land ,
Secure in power and plenty, efficiently sustained by science,
My soul, whether garbed in Oriental or Occidental body,
Traveled far and wide o’er the earth.
Ever stumblingly it sought itself.
At last in India was its quest fulfilled..

-Paramahansa Yogaanand ( ‘’Whispers from Eternity’’)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परमहंस योगानंद यांचे 'योगीकथामृत' खूप सुंदर पुस्तक आहे, मूळ इंग्रजी 'ऑटोबायोग्राफी ऑफ योगी' ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे.

वरचा तुम्ही केलेला अनुवाद मस्त आहे भारती. मला परमहंस योगानंद यांचे नाव घेतले कि योगीकथामृत डोळ्यासमोर उभे राहते, पण तुम्ही वरच्या कवितेचा केलेला अनुवाद मला खूप मनापासून भावला.

वैभवजींशी सहमत.

या प्रेमाला अंधभावना म्हणती म्हणोत
कोणी
तर्काचे ना अधिष्ठान मुरडतील नाके
म्हणुनी >>>या ओळी स्वतंत्ररित्या सुद्धा आवडल्या ..

नेहमीप्रमाणेच उत्कट शब्दकळांनी सजलेला अनुवाद !

सुन्दर भावानुवाद.. शहराच आला वाचून भारती ताई.
'गर्जा जयजयकार' ची आठवण झाली. अभिनंदन आणि स्वातंत्र्यदीनाच्या शुभेच्छा !!

आभार सर्वांचे, अनुवाद चांगला झाला आहे खरा,पण स्वामीजींच्या मुक्तःछंद कविता खरोखरच थरारक आहेत आणि त्यांच्यासारख्या जीवन्मुक्ताला मुक्तःछंद खर्‍या अर्थाने शोभतो. मी कित्येकदा त्या कविता वाचताना निश्चल झाले आहे.
होय अंजू, त्या अनुवादाचे नाव ''योगीकथामृत ' असे काहीसे जुन्या वळणाचे असले तरी तो अमृतमधुर असाच अनुवाद आहे.

वाहवा! वाहवा! अतिशय सुंदर! मूळ काव्य आणि त्याचा भावानुवाद दोन्ही! मला भारताबद्दल जे वाटतं ते ह्या कवितेत अचूकपणे मांडलं आहे! हे काव्य सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

भावानुवाद छानच झालाय.
"थेंब दवाचा होऊन जीवन क्षणात हे ओघळते
कमलपत्र काळाचे जेव्हा किंचितही थरथरते" >>> हे सर्वात विशेष.

प्रत्येक देशप्रेमीच्या दृष्टीने पवित्र असलेल्या दिनीच हा उत्कृष्ट अनुवाद वाचायला मिळावा हे इथल्या सदस्यांचे भाग्यच म्हणावे लागेल. भावानुवाद किती उच्च पातळीवरील आहे हे शब्दरचनेचे सादरीकरण सांगतेच शिवाय स्वामी परमहंस योगानंद याना इंग्रजीतून जे अभिप्रेत होते तेच भारतीनी मराठीतून अत्यंत सुयोग्यरित्या मांडले आहे. मी मूळ कविता वाचलेली नाही, पण आता मराठी भावना मनी पोचल्यावर ती वाचायची इच्छा झाली आहे.

गद्यानुवादापेक्षा पद्यानुवाद कठीण कार्य मानले जाते. गद्यामध्ये विविध शब्दांच्या प्रयोजनाचे वा तत्सम पर्यायी शब्दांचे स्वातंत्र्य घेण्याचे स्वातंत्र्य असते; मात्र पद्यानुवादकाला ठराविक मीटरमध्येच बसणारा, त्यातही अचूक, शब्द त्या त्या ठिकाणी योजावा लागतो आणि ते कर्म दुष्कर असते. उदा. भारती यानी सादर केलेल्या ह्या ओळी....

"..झडे मांस ते सारे, पडेल उलथून उद्ध्वस्तीत
अशी प्राक्तने जरी लाभली, येईन या भूमीत !...."

~ मूळ Waste my flesh चा उघडउघड अर्थ झाला असता "वाया जाईल माझे मांस..." असे काहीसे रुक्ष होऊ शकते, पण भारतीच्या प्रतिभेने तिथे "...झडे मांस ते सारे..." उपयोगात आणून ओळीला जो प्रखर भारदस्तपणा दिला आहे तो लक्षणीय आहे.

या निमित्ताने एक किरकोळ सूचनाही सुचवू इच्छितो [आता तितका अधिकार मला लेखिकेने दिला असल्याने त्याचा फायदा घेत आहे....]. शेवटच्या कडव्यात स्वामी म्हणतात "...My soul, whether garbed in Oriental or Occidental body,..." : इथल्या Oriental or Occidental साठी भारतीनी अनुवादात "आशियाई वा युरोपीय शरीरात...." अशा इंग्रजी रुपांचा जो देवनागरीत वापर केला आहे त्याऐवजी "पूर्वी वा पश्चिमी देहात"...असा असता तर वाचकाने पृथ्वीचे सरळ दोन भाग केले असते..... असो. ही किरकोळ सूचना फक्त वाचनासाठी असून त्यानुसार आता काव्यात बदल करू नये.

अशोक पाटील

भारतीताई,

काय सुंदर लिहिता हो तुम्ही! हो, हे लिहिणंच आहे. भले पद्यानुवाद असला तरी आमच्यासाठी नवं लेखनंच आहे. तुम्हाला साष्टांग दंडवत! आणि परमहंस योगानंदांनाही!!

आ.न.,
-गा.पै.

अशोक. आणि भारतीताई,

'आशियाई वा युरोपीय शरीरात' याच्या ऐवजी 'प्राच्य वा प्रतीच्य शरीरात' असं चाललं असतं का?

आ.न.,
-गा.पै.

आभार सर्वांचे पुनश्च माझा हा आनंद शेअर करण्यासाठी ! उत्स्फूर्तपणे अन घाईघाईतच लिहिलेली ही रचना, एक अत्यंत वेगळी भावना राष्ट्रगीताच्या माध्यमातून मायबोलीच्या वाचकांपर्यंत आणण्याचा हा प्रयत्न.
सहसा राष्ट्रभक्तीपर गीतात देशाचा उज्ज्वल भूतकाळ, भविष्यकाळाबद्दलच्या आशा, हुतात्म्यांच्या बलिदानाबद्दलचा राष्ट्रवासीयांचा आवेश, क्वचित वर्तमानकाळात चाललेल्या अनिष्ट घडामोडींबद्दल निराशा हे सारे आपण नेहमी वाचतो.हे राष्ट्रभक्तीपर गीत एका योग्याचे असल्याने परिप्रेक्ष्य वेगळा आहे.

परमहंस योगानंदांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी आपल्या आत्मवृत्ताद्वारे प्रथमच योग्यांची रहस्यमय चरित्रे अगदी कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मधुर शैलीत रहस्यभेद करून आपल्यापर्यंत आणली. त्यांच्या समकालीन अशा सर्वच क्षेत्रातल्या श्रेष्ठ भारतीयांशी त्यांचा जागता संवाद होता ज्यात सर जगदीशचंद्र बोस. सी.व्ही.रामन,रवींद्रनाथ आणि गांधीजींचाही समावेश होता. त्यांची धर्माची व्याख्या विशाल ,मनुष्यमात्राला सामावून घेणारी होती.

या राष्ट्रगीतात त्यांनी आक्रमकपणे अतिसामान्य भारतीयाच्या आयुष्यातल्या दुर्दशेसही-दारिद्र्य,दुष्काळ्,रोगराई- जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीच्या वास्तवात ( प्रथम प्रकाशन १९२९- ७४ वर्षांपूर्वी )अधिकच दाहकतेने उपस्थित असलेल्या - स्वीकारले आहे. Offence is the best defence हा पवित्रा घेऊन '' होय होय या अशाच दारिद्र्यातही मी पुनःपुनः जन्मेन कारण मानवी आयुष्याचा अन अस्तित्वाचा इत्यर्थ इथल्या संतांनाच कळला आहे, हे आत्मज्ञान हेच विश्वातले अंतिमार्थाने एकमेव श्रेयस आहे '' असे आक्रमकपणे सांगणार्‍या या महायोग्याला चिवटपणे युगारंभ युगांत पहात श्वसत रहाणार्‍या भारताची खरी महत्ता कुठे आहे ते सांगायचे आहे.
अशोकजी, धन्यवाद पद्यानुवादातल्या जोखमीचे जाणीवपूर्वक केलेल्या कौतुकासाठी.खरेच टाइट रोप वॉक असतो तो.फक्त जिथे मन उचंबळून येते अन प्रवाही होऊन कवितारूपाने वाहू लागते, तिथेच असले दु:साह्स मी करते. Labour of love !
तुम्ही व गा.पै. यांनीही दिलेले पर्यायही (''पूर्वी वा पश्चिमी देहात'' व 'प्राच्य वा प्रतीच्य शरीरात' कवितेच्या मीटरमध्ये थोड्या अधिक विचारांती बसवता येतील, एखादी मात्रा अडकल्यासारखे वाटते आहे, अर्थाच्या दृष्टीने मात्र हे पर्यायी शब्द अधिक व्यापक आहेत- मी शब्दकोशगत अर्थ घेतले होते )

पूर्वेचे व पश्चिमेचे शरीर हे मराठीत कसे तरी वाटते
आशियाइ व युरोपीय हेच चटकन समजते तेच सुलभ आहे अगदीच करायचे झाल्यास असे सुचते आहे

>> माझा आत्मा पूर्वेच्या वा पाश्चिमात्य शरिरात (देहात )<<<<

अर्थात् विषय निघाला म्हणून बोललो Happy

@ गा.पै. ~ मी सुचविलेल्या पर्यायापेक्षा तुमचा पर्याय जास्त न्याय त्या ओळीना देऊ शकतो. अर्थात भारतीना मी अगोदरच सांगितले आहे की, ती फक्त एक सूचना आहे, तिचा बदलासाठी वापर करू नये. होते असे की एखाद्या ललित कलाकृतीचा अनुवाद जालावर केला की त्या अनुषंगाने चर्चा करताना असे बदल सुचवावे लागतात, ते अशासाठी की त्या व्यक्तीची-लेखकाची अभ्यासाची वृत्ती अजून रुंदावत जाते.

@ वैभव कुलकर्णी ~ धन्यवाद. तसे पाहिले तर मलाही 'पूर्वेचे वा पश्चिमेचे...." हा बदल तितकासा परिणामकारक वाटत नव्हता. पण मूळ इंग्रजी शब्दांसाठी अनुवादात परत इंग्रजीचे देवनागरीकरण योजने ठीकही नाही.

वास्तविक Oriental चा थेट अर्थ होतो 'पूर्वेकडील' तर Occidental चा पश्चिमेकडील. भारती यानी Oriental साठी 'आशियाई' चे जे योजन केले आहे त्यामध्ये आफ्रिकन राष्ट्रांचा समावेश होत नाही. सबब स्वामीजीना "ओरिएंटल" च्या वापरातून जे सुचवायचे आहे त्याचा प्रभाव "आशियाई" तून उमटत नाही.

इतकेच..... [चर्चेच्या अनुषंगाने हे लिहिले आहे, याचा अनुवादाच्या भावार्थाशी कसलाही संबंध नाही.]

अशोक पाटील

वैभव, अशोकजी, गा पै
कवितेत येणारे शब्द जणू वितळलेला एकरस लाव्हा असतो म्हणून कवितेच्या जैविक एकसंधतेत ते अभिन्नपणे सामावले असतात. वैभव कवी असल्याने मात्रा-लयीची गडबड झाली तरच ते पर्यायांचा विचार करतील, इथे ती नव्हती म्हणून त्यांना शब्दांना ढळ पोचवणे आवश्यक वाटले नाही.

अशोकजी व गा. पै, यांना स्वामींना अभिप्रेत असलेला विचार अनुलक्ष्य करायचा आहे, आशियाई व युरोपीय या शब्दात इतरही सर्व मानववंश यावेत असे त्यांना वाटले. त्यांचे शब्द जसेच्या तसे न स्वीकारता त्यावर कवीची विचारप्रक्रिया करून ते मात्रांच्या आकृतीबंधात बसवता येतीलही, असे मी वरच्या प्रतिसादात मान्य केले होते, पण तसा बदल प्रत्यक्षात मीही केला मात्र नाही कारण ,पुनः, असा बदल मला कवितेच्या जैविक साच्यात कित्येकदा परिणामकारकतेने बसवता येत नाही, माझा मलाच पटत नाही, असा माझा व्यक्तिगत अनुभव..
रच्याकने गा. पै. , तुमचा शब्द प्रतीच्य मला नवीन व सुंदर वाटला..

सर्वांच्याच भूमिका आपापल्या जागी अत्यंत प्रामाणिक असल्याने हा फक्त कवितेचे, त्यातून पद्यानुवाद प्रक्रियेचे आकलन व आनंद वाढवणारा संवादच, वादाचा प्रश्नच नाही Happy

ग्रेट ! प.योगानंद यांचे आत्मचरित्र योगीकथामृत हे पुस्तक बरेच वेळा वाचले आहे .त्या कवितेत भावना या कवितेत अप्रतिम उमटल्या आहेत .