कलाप्रयाग - सई परांजपे आणि झाकीर हुसैन

Submitted by आशयगुणे on 10 August, 2013 - 13:55

मला आठवतंय १९९८ साली जेव्हा दूरदर्शन वर सुपरहिट मुकाबला लागायचं तेव्हा एक गाणं नेहमी १७ व्या किंवा १८ व्या नंबर वर असायचं. सुपरहिट मुकाबला हा काय प्रकार आहे हे माझ्या पिढीतल्या दूरदर्शन पाहणाऱ्या मुलांना लगेच लक्षात आलं असेल. तर हे गाणं होतं 'साज' ह्या पिक्चर मधलं. हिरोईन शबाना आझमी आणि हिरो उस्ताद झाकीर हुसैन. ' क्या… तुमने ये केह दिया' हे त्याचे शब्द. मला त्या वेळेस ह्या दोन्ही दिग्गज कलाकारांबद्दल काही विशेष माहिती नव्हती.' ही शबाना आझमी' एवढीच माहिती होती. ( मला वाटतंय दूरदर्शन वर शुक्रवारी रात्री ९ ला पिक्चर लागायचे त्यामुळे. विशेषतः 'अमर, अकबर एन्थोनी' मुळे) आणि झाकीरभाई आणि माझा संबंध फक्त 'ताज महल चाय' पुरताच संबंधित होता. ( पुन्हा नव्वदचे दशक - आठवा! )

नंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या ह्या 'ओळखीत' बराच फरक पडला. आता माझ्यासाठी शबाना आझमी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री होती. आणि झाकीरभाई? त्याच्यामुळे चालण्यात सुद्धा आता एक 'लय' आली होती एवढंच मी म्हणीन. असो, कॉलेज मध्ये असताना 'ताज महल चाय' ह्यांनी एक ऑफर आणली होती. चहा विकत घेतल्यावर एक सी. डी मिळायची. ह्या सीडीत झाकीरभाईंनी निवडलेली गाणी होती. आणि माझे नशीब थोर की मी ह्या मोहात पडून घरच्यांना जवळ जवळ महिना दीड महिना 'ताज महल' चहा प्यायला लावला! कारण ह्या सीडीत मला एक गाणं सापडलं - ' फिर भोर भयी ... जागा मधुबन'. काय सुंदर चाल होती. थोडे संशोधन केल्यास समजले की हे गाणं त्या साज पिक्चर मधलं आहे आणि ह्याचे संगीत स्वतः झाकीर हुसैन ने दिले आहे. अर्थात माझी ह्या गाण्याबद्दलची आणि एकूणच ह्या पिक्चर बद्दलची उत्सुकता वाढली. ह्या गाण्यात पहिल्या कडव्यात भारतीय वाद्यांचा उपयोग केला आहे आणि दुसऱ्या कडव्यात पाश्चात्य 'टच' दिला आहे असे माझे त्यावेळेस ह्या गाण्याबद्दलचे विश्लेषण होते! परंतु काही वर्षांनी हा पिक्चर बघितला तेव्हा थक्कच झालो! ह्या पिक्चर मध्ये गाणे एका महत्वाच्या टप्प्यावर येते.

मानसी आणि बन्सी ह्या दोन बहिणी एका प्रसिद्ध गायकाच्या मुली. आई-वडील गेल्यावर धाकट्या बहिणीला सांभाळायची जबाबदारी मोठ्या मानसी वर येते. ( ही कथा लता-आशा ह्यांच्या संबंधांवर आधारित आहे!) दोघी मुंबईला येतात. मानसी इकडे तिकडे गाणी म्हणत पैसे मिळवत असते आणि अचानक तिला एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शका कडून 'ब्रेक' मिळतो. आणि इथून ह्या गाण्याला सुरुवात होते.

गाण्याची सुरुवात होते रेकोर्डिंग स्टुडियो मध्ये. मानसी हे गाणे त्या संगीत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शना खाली गात असते. " फिर भोर भयी … जागा मधुबन…" केहरवा च्या ठेक्यात गाणे ताल धरते आणि इतर वाद्यांच्या बरोबर पुढे जाऊ लागते. सई परांजपे ह्यांनी हा प्रसंग 'रेकोर्डिंग स्टुडियो' वाटलाच पाहिजे ह्याची दाखल घेतली आहे. अगदी तबला वाजवणाऱ्याची बोटं गाण्यातल्या तालाप्रमाणेच तबल्यावर पडतात. ( जुनी हिंदी गाणी आणि त्यात तबला वाजवणाऱ्याचा अभिनय बघितलात तर लगेच लक्षात येईल!) आणि तो दाद देखील नैसर्गिकच देतो! आणि शेवटी अरुणा इराणी ( मानसी) 'मी कसं गायलं' हे विचारणाऱ्या नजरेने संगीत दिग्दर्शकाकडे पाहते तेव्हा आपल्याला जाणवतं की दिग्दर्शन हे देखील किती सूक्ष्म असायला हवं! आणि मग गाण्याचे पहिले कडवे सुरु होते.

सतारीचा सुंदर वापर करून झाकीर आपल्यासमोर सिनेमा शूटिंगच्या प्रसंगाचे कॅनवास उभे करतो! आता गाणं रेकोर्ड झालेलं असतं आणि त्यावरच्या अभिनयाचे शुटींग बघायला मानसी आणि बन्सी आलेल्या असतात. आणि इथून सुरुवात होते सई परांजपे आणि झाकीर हुसैन ह्यांच्या कला एकमेकांना पूरक ठरायला! ह्या शुटींगच्या प्रसंगात एक नृत्याचा प्रसंग असतो. झाकीर ने सतारीचे सूर थांबवून लगेच नृत्याचा ठेका वापरला आहे आणि तो त्या प्रसंगाला अर्थात अनुरूप ठरतो! इथे देखील सई परांजपे कशा लेजंड आहेत हेच वारंवार जाणवतं! शुटींग चालू असताना इतर कलाकार शुटींग बघतातच असं नाही. त्यामुळे हे शुटींग सुरु असताना मागे दोन कलाकार बिडी फुकतानाचा जो शॉट घेतलाय तो निव्वळ अप्रतिम! शिवाय दूर मागे कुणीतरी कलाकारांच्या कपड्यांना इस्त्री करतंय हे देखील आपल्याला दिसतं. आणि मग इकडे अरुणा इराणी ( मानसी) आपण गायलेलं गाणं शुटींग करताना लावलेलं असतं ते स्वतःच्या धुंदीत गुणगुणत असते. ह्या प्रसंगात देखील अरुणा इराणी ( मानसी) आणि शबाना आझमी ( बन्सी) ह्यांचा निरागस अभिनय स्तुत्य ठरतो! आणि गाणं दुसऱ्या कडव्याकडे कूच करतं.

हा प्रसंग माझ्यामते सर्वात अवघड प्रसंग आहे आणि दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक ह्या दोघांची इकडे मोठी कसोटी आहे. हा प्रसंग असा की ज्या पिक्चरसाठी हे गाणं रेकॉर्ड केलेलं असतं तो पिक्चर रिलीज झालेला असतो आणि ह्या दोन्ही बहिणी तो बघायला थेटरात आलेल्या असतात. आणि थेटरात black and white पिक्चर सुरु होतो! पिक्चर मधली हिरोइन आपल्या हिरोची वाट बघत असते. तिचा राजकुमार घोड्यावरून बसून येतो ( जुन्या पिक्चर मधल्या संकल्पना!) आणि ती त्याच्याकडे अपेक्षेने बघते. तो घोड्यावरून येताना झाकीरने 'सिंथेसायझर' चा काय सुंदर उपयोग केलाय! आणि… आणि … अचानक घोडा आपल्या दोन पायांवर उभा राहतो आणि तो हिरो घोड्यावरून खाली पडतो आणि एका खडकावर जाऊन आपटतो. हा प्रसंग त्या 'सिंथेसायझर' च्या सुरात अचूक आणि अप्रतिम बसवलाय. आणि तो खाली पडल्यावर ती त्याच्याकडे धावत जाते आणि इकडे लगेच 'सिंथेसायझर' वरून गाण्यात सारंगी वाजते! हा सारंगीचा 'पीस' इतका जबरदस्त आहे की पिक्चर बघताना माझ्या तोंडून 'वाह उस्ताद' निघालं होतं! पिक्चर बघायच्या आधी गाण्यात सारंगी का आहे ह्याबद्दल मला उत्सुकता होतीच… त्याचे उत्तर तेव्हा सापडले! ह्या कडव्यात पिक्चर बघायला आलेल्या मानसी आणि बन्सी चे भाव उत्कृष्ट रित्या रेखाटले गेले आहेत. इतकेच नव्हे तर, दिग्दर्शन सूक्ष्म ठेवत सई ने मागे बसलेल्या लोकांचे भाव देखील पिक्चरच्या प्रसंगाला अनुरूप ठेवले आहेत.

एकूण काय, तर दिग्दर्शन हे किती व्यापक असू शकतं हे ह्या गाण्यातच नव्हे तर संपूर्ण सिनेमात सई परांजपे ह्यांनी दाखवून दिले आहे. आणि ह्या गाण्यात ह्या सूक्ष्म आणि तितक्याच व्यापक दिग्दर्शनाला पूरक असे संगीत दिग्दर्शन झाकीर ने दिले आहे. झाकीर हा एक संगीतकार आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. परंतु १९९६ च्या Atlanta Olympics च्या Opening Ceremony ची ट्यून त्याने 'co -compose ' केलेली आहे. शिवाय बऱ्याच पाश्चात्य सिनेमांना ( पाश्चात्य शैलीने!) संगीत देखील दिले आहे. पण प्रश्न असा पडतो की तो बॉलीवूडला संगीत का देत नाही? उत्तर एकाच आहे - नदी सागराकडे जाते; सागर नदीकडे येत नाही.

ह्या दोन्ही दिगाज कलाकारांना साष्टांग नमस्कार! हे गाणे youtube वर इकडे पाहता येईल आणि त्याने हा लेख वाचताना नक्कीच मदत होईल - http://www.youtube.com/watch?v=k6SyW2PZDp8

- आशय गुणे Happy

माझे इतर लेखन: http://relatingtheunrelated.blogspot.in/

माझे फेसबुक पान - https://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा.. खूप छान लेख. हे गाणं नूसतच ऐकलं होतं. तुम्ही एक वेगळ्याच आयामची माहिती करून दीलीत त्याबद्दल धन्यवाद.

श्री.आशय....

शीर्षक सुचविते की लेखातील आशय हा मुख्यत्वे झाकीर यांचे संगीत असा असून 'साझ' चित्रपटाविषयी खोलवर भाष्य करणे लेखकाने टाळले आहे. त्याचे कारण काहीही असले तरी ज्या साली चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे सर्वत्रच फार थंडे स्वागत झाले होते. मी आणि माझे मित्र वयाच्या ३०-३५ मध्ये होतो; पण सई परांजपे यांच्यासारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शकाने लता-आशा यांच्या कलागुणांना नजरेसमोर न आणता 'बिहाईंड द वॉल' घटना प्राधान्याने पडद्यावर आणण्याचे प्रयोजन काय ते समजले नव्हते.....किंबहुना कलाकारांच्या अशा खाजगी आयुष्याला चौकाचे रुप देण्यात काही अर्थ नसतो. एका अनौपचारिक मुलाखतीत आशाताईंने तीव्र शब्दात अशा प्रकारच्या भूमिका मांडण्याच्या पद्धतीवर टीका केली होती.

पण असो.... तुमचा मुद्दा झाकीर हुसेन यांच्या संगीताबद्दल विशेष असा असून त्याची मांडणी तुम्ही अगदी 'संगीतमय' केली आहे. या क्षणी मला देवकी पंडित यांची काही गाणी स्मरतात पण त्याचे संगीत यशवंत देव यानी त्या चित्रपटासाठी दिले होते. वास्तविक "साझ" ला झाकीर यांच्याशिवाय यशवंत देव, भूपेन हजारिका आणि राजकमल या चौघांनी एकत्रित संगीत दिले होते. ज्या वाद्यांचा तुम्ही लेखात उल्लेख केला आहे त्या मागील कलाकारी झाकीर हुसेन यांचीच असेल तर ते निश्चित्तच प्रशंसनीय आहे.

गाण्यांविषयी मायबोलीवर अगदी हरेक दिनी चर्चा होत असताना दिसतात पण पार्श्वसंगीतावर तुम्हाला लिहावेसे वाटले ही बाब दिलासादायक आहे. इनॉक डॅनियल नामक म्युझिक अरेंजर यांचे हेच म्हणणे होते की तुम्ही ज्यावेळी चित्रपट पाहता त्यावेळी प्रसंगसमयी पार्श्वसंगीताकडेही आपले लक्ष द्या आणि पाहा की त्या प्रसंगाला पावलेले संगीत किती परिणामकारक ठरत आहे.

या निमित्ताने मला डेव्हिट लीन यांचा 'डॉ.झिवागो' चित्रपट आठवतो. या चित्रपटात मॉरिस यारे यानी बांधलेली 'लाराज् ट्यून'... जी 'समव्हेअर माय लव्ह' नावाने सुप्रसिद्ध झाली आहे, तिचाच वापर जवळपास तीन तासाच्या चित्रपटासाठी अत्यंत प्रभावीपणे केला होता. पार्श्वसंगीतामुळेही डॉ.झिवागो कायमपणे स्मरणात राहिला आहे.

अशोक पाटील

आशय,

छान लेख. मी सिनेमा पाहिला तेव्हा इतके डिटेल बघितलेच नाही. परत पाहिला तर हा लेख नक्कि आठ्वेल.

अशोक साहेब,
माझे थोडे चुकले. मला आधी स्पष्ट करायला हवे होते की मी अख्ख्या चित्रपटाबद्दल न लिहिता फक्त ह्या गाण्याबद्दल लिहितोय! ह्या गाण्याचे संगीत झाकीर हुसैन ह्यांचेच आहे. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! शेवटी तुम्ही सांगितलेल्या कलाकरांना देखील ऐकीन! Happy

सर्वश्री आशय, श्रीयू, कंसराज, विजय...

चित्रपटांचे तांत्रिक अंग या विषयावर अभ्यासाच्या दृष्टीने खूप काही लिहिले तसेच चर्चिले गेले पाहिजे. अन्यथा वर ज्या चित्रपटाचे उदाहरण रसग्रहणासाठी घेतले गेले आहे त्यातील नायिकेंची कामे एवढ्याबाबीवरच लेखन मर्यादित राहिले असते तर मग ते एकसूरी आणि कंटाळवाणे झाले असते. श्री.गुणे यानी "संगीत"... अन् त्यातही पार्श्वसंगीत हा घटक कथानकाच्या प्रखरतेसाठी किती प्रभावी ठरू शकतो ते सुयोग्य भाषेत सादर केल्यामुळे त्यांच्या लिखाणाला उंची लाभली आहे.

इंग्रजी चित्रपट अशाबाबतीत फार जागरूक असतात. उदा. "लॉरेन्स ऑफ अरेबिया" सारखा ऐतिहासिक सत्य घटनेवरील चित्रपट असो वा 'वेट अंटील डार्क' सारखा एकाच खोलीत कथानक घडणारा काल्पनिक चित्रपट असो, हे चित्रपट जगभर गाजतात ते त्यातील अभिनयामुळेच नव्हे तर त्या त्या चित्रपटांच्या संगीतकारांनी पार्श्वसंगीताचा कथानकाच्या वेगासाठी केलेला अचूक वापर होय.

चित्रिकरण आणि त्यासाठी उपयोगात आणले जाणारे अ‍ॅन्गल्स तसेच रंगसंगती यावरही रसिकाने लक्ष केन्द्रीत केले तर मग त्या चित्रपटाचा आनंद द्विगुणीत करता येतो. उदा. 'रायन्स डॉटर'.

अशोक पाटील

अशोक,
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पार्श्वसंगीतासाठी पुरस्कार हिंदी मराठी चित्रपटात मिळतात ते त्यातील गाण्यांसाठी, असा माझा कित्येक वर्ष गैरसमज होता. आणि इंग्रजी चित्रपटात गाणी नसुनही हे पुरस्कार का मिळतात हे कळत नसे. Happy

याच सोबत दिग्दर्शन, कला-दिग्दर्शन, नेपथ्य, संकलन, कॅमेरा, ध्वनीमुद्रण, इ. वर चर्चा व्हायला हवी. कोणी जाणकार यावर एखादा लेख लिहु शकेल का?

Examination हा एकाच खोलित घडणारा चित्रपट केवळ कॅमेराच्या वापराने मला प्रचंड आवडला.