'चोखेर बाली ' - स्नेह-प्रेमाचे रवींद्र-संगीत

Submitted by भारती.. on 7 August, 2013 - 06:53

'चोखेर बाली ' - स्नेह-प्रेमाचे रवींद्र-संगीत

१९०३ मध्ये लिहिलेल्या रवींद्रनाथ ठाकुरांच्या 'चोखेर बाली' या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘चक्षुशल्य’ ( श्री शंकर बाळाजी शास्त्री यांनी केलेला व साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ) कालच्या मैत्रीदिनी योगायोगाने वाचनात आला. स्नेहाचे, प्रेमाचे मधुर आणि रौद्र स्वर गुंफलेले हे रवींद्रसंगीत वाचताना मन मोहून गेले. मूळ कलाकृतीच्या आशयगर्भापर्यंत रसिकाला नेणे, भाषेची ,संस्कृतीभिन्नतेची कुठूनही बाधा होऊ न देणे, आपल्याच शैलीची महत्ता न मांडणे हे भाषांतरकाराचे काम, ते शास्त्रीजींनी चोख केले आहे. कथानकात आपण अलगद हरवत जातो.

हे भारताच्या महाकवीने कादंबरीचा आकृतीबंध स्वीकारून लिहिलेलं गद्य. का कोण जाणे , कवींनी लिहिलेलं गद्य मला अतिशय प्रिय आहे अन एरवी इतरांच्याही गद्यात उतरून येणारी सूक्ष्म काव्यात्मता ललित लेखनाला अजरामर अशी काही झळाळी देते यावर माझा विश्वास आहे.

चोखेर बाली, चार तरुण स्त्री-पुरुषांच्या कौटुंबिक भावविश्वाच्या चतु:सीमांमध्ये उसळणारा विकार- विचारांचा महासागर.

महेंद्र, डॉक्टरीचा अभ्यास करणारा ,आई राजलक्ष्मी अन काकी संतानहीन विधवा अन्नपूर्णा यांच्या लाडात वाढणारा लहरी मुलगा.
बिहारी, त्याचा परम मित्र, तोही त्याच्या त्या तसल्या लाडाकोडात भरच घालणारा.स्वतःला लोपवण्यात आनंद मानता-मानता कथानकाच्या क्रमात हळुहळू, दु:खी होत गेलेला. छोट्या मनाच्या स्वयंकेंद्रित महेंद्रचा हा मोठ्या मनाचा अनुचर, मित्र.
विनोदिनी , महेंद्रला आईच्या-राजलक्ष्मीच्या-मैत्रिणीची सांगून आलेली ,तुलनेने सामान्य परिस्थितीतील पण सुशिक्षित मुलगी, हे स्थळ महेंद्रने उडवूनच लावले.मग तो नाहीतर हा म्हणून बिहारीलाही विचारणा झाली, त्यानेही ही 'महेंद्राने टाकून दिलेली मिठाई खाणे' नाकारलेय.
आशा, ही अन्नपूर्णाकाकीने विवाहप्रस्तावात आणलेली मुलगी , अन्नपूर्णेने आपल्या मुलाला प्रस्ताव आणणे राजलक्ष्मीची मुलाबद्दलची स्वामित्वभावना दुखावणारे, तसे ती टाकून बोलतेही विधवा जावेला.
या दोन जावांचेही एक उपकथानक पडद्यामागे धुमसते आहे. व्यथित होणारी, स्वतःला बिहारीसारखीच लपवणारी, लोपवणारी अन्नपूर्णा मागेमागे रहाते. गृहकलह नको म्हणून दोघीही आळीपाळीने देशांतराला जातात, तरीही दोन्ही जावांमध्ये अनाकलनीय असे प्रेम आहे, एकमेकींची काळजी आहे.

उगीच आईला दुखावणे नको,काकीला व आपल्यालाही त्याचा त्रास होईल हे जाणून महेंद्र बिहारीसाठी म्हणून आशाला थाटमाटात पहायला जातो. इथे बिहारीला गृहित धरण्याची हद्द आहे.पुढे आशाला पहाताच तिच्या रूपाच्या असीम मोहात पडून महेंद्र तिला पसंत करतो हा त्यावरचा कळस.या लाडावलेल्या पुत्राचे तिच्याशी लग्नही होते अन अपार आसक्तीने भरलेल्या त्यांच्या दांपत्यजीवनाला सुरुवातही.

या चौघांच्या आयुष्यांचे, भावनांचे, व्यक्तित्वांचे,परस्परसंबंधांचे आणि त्यातल्या विरोधविकासी परिवर्तनांचे हे कथानक.

विनोदिनी अन्यत्र विवाह होऊन विधवा होते अन राजलक्ष्मी तिच्या निराधार अवस्थेची दया येऊन तिला घरी आणते.

विधवा विनोदिनी आणि नवविवाहिता आशा दोन्ही स्त्रिया अशाप्रकारे महेंद्र आणि बिहारी यांना दोघांनाही सांगून आलेल्या, हा पूर्वेतिहास प्रत्येकाच्या मनात निरनिराळ्या स्वरूपात नांदतो आहे. यातच परस्पराकर्षणांचा एक अनोखा गोफ अव्यक्त स्वरूपात चौघांच्याही मनात आहे, जो पृष्ठस्तरावर ही माणसे आणणार आहेत की काळ, रवींद्रच ठरवतील.आणि त्यांनी हे काम किती नितळतेने केलेय.एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या कुशलतेने आणि कवीच्या अंगभूत सूक्ष्मसंवेदनेने.

विनोदिनी आशासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवते. ज्या घरात ती आश्रयार्थ आली आहे त्याच घरातील समवयस्क नववधूशी मैत्री करावीशी वाटणे नैसर्गिकच. पण याच निसर्गात भावी संघर्षाचीही बीजे आहेत हे सूज्ञ विनोदिनीला जाणवते आहे. आधीच सावध करावे अन तो संघर्ष टाळावा जणू अशा शुद्ध हेतूने ती नर्मविनोदाने एकमेकींचे टोपणनाव एकमेकींसाठी 'चोखेर बाली ' ( म्हणजेच चक्षुशल्य, शब्दशः डोळ्यात गेलेला, तेथे खुपणारा वाळूचा कण' ) ठेवते, बंगाली जनजीवनात टोपणनावे प्रचलित असतातच.

इथे सुरू होतो एक अजब उंदरामांजराचा खेळ.फक्त उंदीर कोण अन मांजर कोण हे शेवटपर्यंत कळत नाही, कदाचित मानवी विकारवशता, कदाचित घराच्या कोंडलेल्या सीमित अवकाशातील नियतीची शक्ती.. जगण्यातले इंद्रधनुष्यी रंग अन काळोखे कोपरे शब्दात उतरवणे हे रवींद्रांचे यश, मानवी स्वभावाचा, आयुष्याच्या रहस्यमयतेचा त्यांचा अभ्यास.

रात्रंदिवस उत्शृंखल प्रणयाचा अतिरेक होऊन महेंद्र अन आशाचे दांपत्यजीवन काळवंडते आहे, त्याचे रंग उतरत आहेत. विनोदिनी त्यांच्या परिघात एक नवी मिती, नवी ऊर्जा घेऊन आली आहे. या हुशार, सुशिक्षित, कलासंपन्न मैत्रिणीकडे ते ते आहे जे साध्याभोळ्या आशाकडे नाही.ती त्यांच्या दांपत्यजीवनात रंग भरते आहे, त्यांचा रोजचा आहारविहार ,शृंगार नव्या कल्पकतेने सजवते आहे यातच आशा मश्गुल,खूष आहे. एका विचित्र उत्साहाने घरातलीच ही माजघरात लपणारी आश्रित मैत्रीण नवर्‍यासमोर आणावी, त्यांचा स्नेह जोडावा असे तिला या मैत्रीच्या भरात वाटते आहे .सरळ मनाच्या माणसांच्या बाबतीत अनेकदा घडते.

इकडे अन्नपूर्णेच्या प्रस्तावातून घरात आलेली, सुंदर भोळी पण गृहकृत्यकौशल्यविहीन सून आणि तिच्या मोहात आईला, आपल्या मेडिकलच्या अभ्यासालाही पार विसरणारा मुलगा राजलक्ष्मीला सलतो आहे. अशात विनोदिनी- जी मूलतः तिला स्वतःला सून म्हणून हवीच होती ती घरात एका विपरित परिस्थितीत का होई ना आली आहे, घरातली सर्व कामे निगुतीने, अभिरुचीसंपन्नतेने करते आहे.महेंद्रलाही आशाच्या गावंढळपणाची विनोदिनीमुळे नवी जाणीव होते आहे, विनोदिनीच आपल्याला खरे तर सुयोग्य होती हे आता त्याला कळले आहे. एकूण, विनोदिनीचे चोहीकडून लाड अन तिची आशाशी प्रच्छन्न तुलना घरात सुरू झाली आहे.

आणि विनोदिनी ? तिचे अकालवैधव्याने, परिस्थितीने कोळपलेले तल्लख तेजस्वी व्यक्तित्व या दांपत्याचा शृंगार सजवताना , पहाताना पालवते आहे. नको नको म्हणत ती आणि महेंद्र एकमेकांच्या आसक्तीत गुरफटत जात आहेत, एकमेकांसाठी एकांतक्षण चोरून त्यांची माधुरी चाखत आहेत . एक आग तिच्या अतृप्तीतून तिने बिनदिक्कतपणे जागवली आहे. भोळ्या मैत्रिणीवर जिवापाड प्रेम करतानाच तिच्या संसाररसाचा थोडासा आस्वाद आपण घेतला तर काय बिघडते असा पवित्रा तिच्या धीट, पर्युत्सुक मनात जागला आहे.

चौकोनाचा चौथा कोन बिहारी! तो सारे पाहतो आहे,खिन्न झाला आहे. विनोदिनीबद्दल उघडपणे त्याने महेंद्रला धोक्याची सूचना दिल्यावर महेंद्रची प्रतिक्रिया भेकडपणाची आहे. तो बिहारीवरच आशेवर आधीपासूनच अनुरक्त असण्याचा आरोप करून त्याला घायाळ करून टाकतो. आशाही या न केलेल्या अमर्यादेचे ओझे उगीचच दीर्घकाळ वागवत रहाते.

विनोदिनी एकूण घटनांचे गर्भितार्थ जाणून जायला उठते तर तिच्या म्लान निराधारतेची दया येऊन तिला पुनः सर्वजण थांबवतात, तिला तरी कुठे मनोमन जायचे असते ? मात्र या शल्यक्रियेत तिचे अधिक लक्ष बिहारीच्या सेवाशील, नि:स्वार्थ अन स्पष्ट्वक्त्याही व्यक्तित्वाकडे वेधले जाते, बिहारीलाही अधिक परिचयातून (जो एका सुंदर रंगवलेल्या वनभोजन प्रसंगी होतो ) विनोदिनीच्या व्यक्तित्वातल्या बाह्यतः विलासी वाटणार्‍या पण अंतर्यामी उपाशीपोटी तपश्चर्या करत बसलेल्या तापसीचा परिचय होतो.उभयतांमध्ये एक नवेच आणि खरे प्रेम जागते पण बिहारी विनोदिनीच्या संशयातून बाहेर येत नाही. भरकटलेल्या महेंद्रच्या हाती विनोदिनीच्या नावेचे निरुपाय सुकाणू जाते.

पुन; विनोदिनी आणि महेंद्र.
दैनंदिन जीवन. असंख्य घटना. एकमेकांपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात आकर्षणाचा वाढता आवेग.महेंद्रचे वस्तीगृहावर रहायला निघून जाणे.आशेच्या हस्ताक्षरात त्याला विनोदिनीची भाषा असलेली विरहव्याप्त पत्रे येणे. एकीकडे पत्नी आशाच्या निरागसतेमुळेही महेंद्रचे कासावीस होणे.शेवटी होतोच बोभाटा असल्या चोरट्या प्रेमाचा,मग बदनामी. आशाचे या दुहेरी विश्वासघाताने -नवरा आणि जिवलग मैत्रीणीवरील अमर्याद विश्वासाचा झालेला चुथडा- उद्ध्वस्त होणे. अभिमान अन अपमान दोन्ही भावनांत जळत रहाणे. विनोदिनीने घर सोडून आपल्या जीर्ण घरी मूळ गावी जाणे अन आता तिच्यासाठी लाजलज्जा सोडलेल्या महेंद्रने तिच्यामागोमाग तिथेही येऊन तिची बदनामी करणे.पुनः सर्वदिश निरुपाय होऊन त्याच्याबरोबर तिने गावोगाव फिरत रहाणे, मनात चढत्या श्रेणीने बिहारीच्या पवित्र, अविचल प्रेमाचे स्मरण करत.

शरदचंद्रांपेक्षा आटोपशीर अवकाशात अन कमी पात्रयोजनेत रवींद्रांनी आपला कथासंसार उभा केला आहे. त्याचे अक्षुण्ण सौंदर्य त्यातील मोजक्या व्यक्तींच्या ठाशीव चित्रणात आहे. स्वतः निर्माण केलेल्या नियतीशी झगडत यातले प्रत्येक व्यक्तिमत्व अधिक खुलत जाते आहे, जगण्याच्या अग्निपरीक्षेत तपःपूत होते आहे.

बिहारी.. सुरुवातीला उपेक्षित वाटलेला , स्वतःला इतरांच्या सेवेत लोपवून टाकणारा , एका अनाथ बालकाचे पालकत्व घेऊन त्यातच मन रमवणारा, लोकसेवेसाठी आपली मालमत्ता लोकार्पण करणारा बिहारी. हा बिहारी कादंबरीचे कथानक आणि विनोदिनी व आशा या दोन्ही टोकाच्या प्रवृत्तींच्या स्त्रियांचे मन वेगवेगळ्या प्रकारे व्यापत जातो, अंती कथेचा खरा नायक ठरतो.उगीचच एक तुलना मनात येते.. एमिली ब्राँटेच्या वुदरिंग हाइट्स मधला हीथक्लिफ या अशाच सर्वांगीण उपेक्षेतून अंगभूत खलप्रवृत्तींच्या आहारी जाऊन प्रेमाच्या शक्तीचे सूडनाट्यात रुपांतर करतो.इथे उलट घडते.बिहारीच्या या संतप्रवृत्तीमध्ये बाधा एकच, त्याला सतत येत असलेला विनोदिनीच्या प्रेमाचा संशय.हे क्रमप्राप्तही आहे कारण त्याच्या नजरेला तर ती महेंद्रबरोबर गावोगाव वहावत जाताना दिसते आहे.

या पूर्ण कथानकात पत्रे, त्यांचे न मिळणे किंवा मुद्दाम हाती पडू न देणे किंवा ज्याला ती लिहिली आहेत त्याच्याऐवजी दुसर्‍यानेच ती वाचणे इत्यादि माणसांमधील संवादात बाधा आणणारे विक्षेप पुष्कळ आहेत पण कुठेही ते कृत्रिम वाटत नाहीत. फक्त बिहारीच्या अलाहाबादमधील घराच्या पत्त्याचा महेंद्रसहित गावोगाव भरकटणार्‍या विनोदिनीला लागलेला शोध मात्र काहीसा फिल्मी योगायोग वाटतो. असले योगायोगही आयुष्याचा एक फार महत्त्वाचा भाग असतातच हेही तितकेच खरे ! विनोदिनी तिच्याबरोबर प्रवासात असलेल्या महेंद्रला तिथे खेचत नेते अन बिहारीची प्रतीक्षा करत बसते तो कथाभाग या सार्‍या विपर्यस्त प्रेमकथेचा परमोच्च बिंदू आहे.

शेवटी बिहारी विनोदिनीला लग्नाची मागणी घालून कथानकाची परिपूर्ती करतो, आणि ती मात्र ते प्रेम स्वीकारून पण तो प्रस्ताव अव्हेरून विरागी अन्नपूर्णेबरोबर काशीला निघून जाते. राजलक्ष्मीची विनोदिनी अन्नपूर्णेजवळ, अन्नपूर्णेची आशा भरल्या घरसंसारात राजलक्ष्मीजवळ.

अनेक अर्थांनी सूक्ष्म सूक्ष्म काव्यात्म न्याय साधत,एका-एका व्यक्तीचे दु:खदाहातून झालेले विकसन दाखवत कवीचे कथानक पूर्ण होते तेव्हा आपल्या सौंदर्यजाणिवेत भर पडलेली असते ,दु:खाची छटा काळीज व्यापून रहाते तरीही.

स्वतः रवींद्रांनी 'चोखेर बाली'चा शेवट असा असायला नको होता ही खंत नंतर व्यक्त केलेली आहे.

रवींद्रांनी जाणिवेच्या पातळीवर रचलेले हे कथानक मला नेणिवेतील एक चिरंतन व्यूह स्पष्ट करताना दिसते. स्नेह-प्रेमाचा या कथानकातील चौकोन आपल्या आत एखाद्या बहुभुजाकृतीसारखा बहुविध शक्यता वागवतो. तो एकीकडे अतिअर्वाचीन आणि दुसरीकडे अतिप्राचीन साहित्यातील मुक्त विचारांनी भरलेला आहे, भले आचरणावर संस्कारांचे दडपण असो.

भारतीय स्त्रीजीवनातले सुखदु:ख, पराकोटीचे परावलंबित्व,रुढीग्रस्ततेतले भयंकर अन्याय,त्यातून येणारी अतृप्ती, बळावणारी धिटाई व शेवटी पुनः परिस्थितीशरणतेचेच उन्नयन करणारा समाज त्यांनी शंभर वर्षांपूर्वी असा चितारला आहे की हे कथानक आजचेच वाटावे.त्यातल्या मैत्रीभावनेच्या चित्रणातील व्यामिश्रता तर कालातीत आहे.म्हणून तर शंभर वर्षांनी रितुपर्णो घोष सारख्या संवेदनशील दिग्दर्शकाला २००३ मध्ये त्यावर चित्रपट काढावासा वाटला..म्हणून तर आजही या पुस्तकाचे वाचन हा एक समकालीन संवेदनांचा उत्सव वाटतो आहे..

-भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय सुंदर लिहल आहे.. Happy
पुस्तक नक्की वाचेन
एअ‍ॅश- रायमा दोघी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.. काय माहित रायमा च जास्त आवडली होती चित्रपटामधे Happy

किती सुरेख लिहीलंय! फारच छान. मी पुस्तक नक्की वाचेन. मला एकूणच बंगाली वातावरणातल्या कादंबऱ्या आवडतात. ही इतकी तरल प्रेमकथा तर वाचायलाच हवी.

योगायोग आहे. मी आत्ता हेच पुस्तक वाचते आहे. सिनेमा पाहिला आहे आधी, पण त्यापेक्षा हे पुस्तक कितीतरी इंटरेस्टींग वाटते आहे वाचताना.

ग्रेट लेख
वाचीन मिळाले तर पुस्तक

पण अशी अभिजात पुस्तके बंगालीतूनच वाचता आली तर मजा ये ईल पण बंगाली शिकावे लागेल

शिकावे म्हणतो ...

धन्स लेखासाठी

भारती, सुरेख लिहिलंय.
मी हा चित्रपट बर्‍याच वर्षांपुर्वी पाहिलाय, तुम्ही लिहिलेलं परिक्षण वाचून जितका समजला तितक तेव्हा समजला नव्हता, लक्षात राहिलं होतं ते फक्त त्याचं कलात्मक सादरीकरण.
आणि तुमचं परिक्षणही त्यापेक्षा तसूभरसुद्धा कमी नाही.
पुन्हा एकदा तो सिनेमा तरळून गेला डोळ्यासमोरून. पुन्हा एकदा पहायला हवा.
ऐश्वर्या राय चे काम उत्तम.

तुम्ही रेनकोट पाहिला असेल तर त्यावरही जरूर लिहा.. Happy

पुलेशु!

पुस्तक वाचलेले नाही. चित्रपट पाहिलाय, आवडलाच होता, पण या सुंदर लेखामुळे पुस्तक वाचून मिळणारी अनुभूती अधिक तरल असेल असे वाटू लागले आहे.
हॅट्स ऑफ भारतीताई. Happy

वैवकु : रवीन्द्रनाथ, शरच्चंद्र, ब्योमकेश बक्षी, फेलू दा वाचण्यासाठी बंगाली शिकावे असे मलाही वाटते. बोलता येते, बरीचशी कळतेही पण लिपी वाचायला शिकायची माझीही इच्छा आहे. ह्या लेखकांना मूळ भाषेत वाचणे हा काही वेगळाच आनंद असेल. Happy

आभार सर्वांचेच! हे पुस्तक सर्व रसिकांनी तरलतेने वाचावे हाच उद्देश. असे लेखन नेहमी वाचनात येत नाही ! रवींद्र महाकवी का हे कदाचित गीतांजलीच्या वाचनातून कळणार नाही असे म्हणण्याचे धाडस करते कारण त्या भक्तीरसप्रधान कविता आहेत, हिमालयाच्या उंचीवर आहेत. ही कादंबरी मात्र त्यांनी अक्षरशः एका सुखवस्तू घराच्या चार भिंतीत रंगवली आहे. भारताचे अन जगाचे राजकारण वर्ज्य नसलेला, शांतीनिकेतन सारख्या वटवृक्षाचे बीजारोपण करणारा कवी इथे अत्यंत अंतर्मुखतेने हा सामाजिक गलबला व आध्यात्मिक प्रेरणा दोन्ही बाजूला सारून एक वेगळा पवित्रा घेतो आहे. घरसंसारातल्या अंतःप्रेरणा, खाचखळगे,विरोधविकास. अन हेही काम त्याने आपल्या विश्वविजयी लेखणीने चोख केले आहे.
चित्रपट मी यू ट्यूबवर तुकड्यातुकड्यात पाहिलाय, चांगला वाटला . कादंबरीतले विनोदिनी-महेंद्रचे प्रेम पूर्णतः शारिरीक पातळीवर कधीच येत नाही.चित्रपटात काय दाखवले आहे पहावे लागेल.
वैभव, खरेच बंगाली अन उर्दू, दोन भाषा मुळातूनच यायला हव्यात..

भारतीताईंनी पुस्तकाचे (अनुवाद) परीक्षण लिहीले आहे.
पुस्तक (अनुवाद) नक्की वाचणार. चित्रपट जमल्यास बघणार! Happy

होय वत्सला, अनुवादावरून पुस्तकाचे परीक्षण लिहिले आहे.. रामायण महाभारत आदि संस्कृत महाकाव्ये तसेच रशियन साहित्य आपल्यापर्यंत प्रथमतः तरी कुठल्या ना कुठल्या अनुवादातूनच पोचतात, अनुवादकारांचे अस्तित्व लोपते, साहित्याचे परिणाम मात्र अजरामर होतात.
हा अनुवाद 'चक्षुशल्य ' अनुवादक श्री शंकर बाळाजी शास्त्री , साहित्य अकादमीने १९६० मध्ये प्रकाशित केलाय, द्वितिय आवृत्ती २००२.

लेखाचे शीर्षक आणि लेखिकेचे नाव वाचल्याक्षणीच मनी खात्री पटली होती की सर्वांगसुंदर असे लेखन आज वाचायला मिळणार. अगदी झालेही तसेच. 'चोखेर बाली' जितकी देखणी कलाकृती तितकेच कादंबरीचे तुम्ही केलेले परीक्षणही. लेखात वापरलेल्या शब्दयोजनेची विशेष अशी दाद देणे क्रमप्राप्त आहे इतकी ती तुम्ही सजवली आहे; एकप्रकारे रविन्द्रनाथ टागोरांच्या प्रतिभेला शोभेल अशीच.

वास्तविक साहित्य अकादमीची ही अनुवादित कादंबरी १९६० मध्ये प्रकाशित होऊनसुद्धा केवळे मोठ्या शहरातच राहिली की काय अशी शंका येते कारण मी जाणीवपुर्वक अकादमी प्रकाशित अनुवादित कादंबर्‍यांचा मागोवा घेत असतो पण चोखेर बाली हुकलीच. आज समजले की याची दुसरी आवृत्तीही निघाली आहे. मात्र ऋतुपर्ण घोष यांचा चित्रपट मी मागेच पाहिल्याने आजच्या या तुमच्या परीक्षणाच्यानिमित्ताने ती कादंबरी, ते दशक, सामाजिक बंधने, विधवेचे आयुष्य, तिच्या अतृप्त इच्छा, बंडखोरी दाखवितानाही राजलक्ष्मीला खडे बोल सुनावण्याची हिंमत, महेन्द्र लाडक्या मैत्रिणीचा पती आहे हे माहीत असूनही त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्यामागील तिची भूमिका, बिहारीला प्रथम लग्नाविषयी मागणी घालणे आणि त्याच्या समाजसुधारक भूमिकेला एकप्रकारे आव्हान देणे, आदी अनेक छटातून उलगडत जाणारी विनोदिनी.... खर्‍या अर्थाने 'बाली' शोभते...छानपणे नजरेसमोर आली.

'चोखेर बाली' आधुनिक काळाची महती सांगणारी ठरेल असे रविंद्रनाथांना १९०३ मध्येच वाटत असल्याने त्यानी कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहिले होते The Literature of the new age seeks not to narrate a sequence of events , but to reveal the secrets of the heart. त्यांचे हे बोल जरी दोन्ही बालींच्या व्यक्तिरेखांना समान दर्जाने लागू होत नसले तरी विनोदिनीने त्याचा प्रत्यय आपल्या वर्तनाने आणून दिला आहे. बिहारी 'मी लग्नाची तयारी करायला आता जातो व सकाळी येतो, तू तयार राहा...!" असे आश्वासन देऊन घाटावरून निघून जातो त्यावेळी आपल्याला वाटते 'चला, किमान आता तरी ही विधवा बाली इथून पुढे आपले आयुष्य सुखासमाधानाने घालवील...' पण सकाळ उजाडते आणि लग्नाची तयारी घेऊन आलेल्या बिहारीला घाटावरील नावेच्या खोलीत सापडते ती विनोदिनीचे निरोपाचे पत्र.....तोही सुन्न, इकडे महेन्द्रचीही तीच अवस्था.

या कादंबरीत तसेच चित्रपटातही दोन्ही मैत्रिणीनी झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर स्वतंत्ररित्या बसून झोके घेण्याचे छान वर्णन आहे....म्हणजे सुरुवातीला विनोदिनी बसते व आशा झोपाळ्याला उंच हवेत ढकलते तर नंतर उलटा प्रकार. एका सधवेने विधवेला समाजात मानाचे स्थान देण्यासाठी सदैव प्रफुल्लित ठेवणे गरजेचे आहे असा संदेश त्या कृतीतून दिला गेला होता. रविंद्रनाथांच्या विचारसरणीच्या दृष्टीचा विचार करता ते रुपक फार योग्य मानले गेले होते. विशेष म्हणजे असेच झोपाळ्याचे रुपक सत्यजित रे यानी 'चारुलता' मध्येही वापरले होते. त्यांच्या चारुलतेचीही अशीच कुचंबणा दर्शविली गेली आहे.

'बोल्ड नॉव्हेल" म्हणून गणल्या गेलेल्या या 'मास्टरपीस' चे परीक्षण तुम्ही इतक्या सुंदररितीने करून दिल्याबद्दल तुमचेही खास आभार, भारती.

अशोक पाटील

भारतीताई, अफाट सुंदर रसग्रहण केलय. मी पुस्तकही वाचले नाहीये आणि सिनेमा पण पाहिला नाहीये. पण तुमच्या लेखाने एक धुसर चित्र तयार झालय मनात. पुस्तक वाचून त्या धूसरतेत रंग भरेन की नाही ते नाही सांगता येत. पण ते धुसर चित्रच खूप सुंदर आहे.

भरकटलेल्या महेंद्रच्या हाती विनोदिनीच्या नावेचे निरुपाय सुकाणू जाते. >>> खूप आवडली ही शब्दरचना.

सर्व सुहृदांचे अत्यंत आभार.. कित्येकदा आपण कालबाह्य हे लेबल लावून अजरामर कलाकृती उपेक्षेच्या अडगळीत ढकलतो. त्यांचे कालातीत रंग मात्र तितकेच ताजे असतात,जगण्याची समज अन आनंद वाढवण्याची शक्ती त्यांमध्ये असते.
अणुबाँबच्या निर्मितीने व्यथित होऊन पुढच्या घटनांची चाहूल लागून आइन्स्टाईनशी चर्चा करणारे ठाकुरजी हे एक असेच वैश्विक परिमाणाचे महाव्यक्तिमत्व ! खूप निंदा अन स्तुती त्यांनी आपल्या आयुष्यात साहिली.त्यांच्या या एका कलाकृतीवर, ती वाचतावाचताच लिहायची प्रचंड आस मला लागली होती. तुम्ही सर्वांनी हे वाचून मूळ पुस्तकापर्यंत जाण्याची इच्छा दर्शवली आहे. मी आनंदित आहे. मूळ पुस्तक कोणत्याही अभिजात ललितकृतीसारखेच, वाचणार्‍यासाठी एक मोठे आव्हान आहे.
माधव, ते वाचाच, धूसरतेच्या सौंदर्यात बाधा येणार नाही. भर पडेल.
अशोकजी,ललिता-प्रीतीही म्हणते तसे -नेहमीप्रमाणे Happy - तुमचा हा अभ्यास अन आत्मीयतापूर्ण प्रतिसाद कलाकृतीच्या आकलनात भर घालतो.''The Literature of the new age seeks not to narrate a sequence of events , but to reveal the secrets of the heart'' रवींद्रांचे हे वाक्य खरोखरच प्रत्येक साहित्यप्रेमीने हृदयावर कोरून ठेवण्यासारखे आहे..तुम्ही उल्लेखिलेले दोन्ही प्रसंगही (वनभोजनवेळेचा झोपाळ्याचा अन शेवटचा ) खरेच अविस्मरणीय आहेत. काही प्रसंग अतुलनीय असतात, ती कलाकृती चंदेरी पडद्यावर जाते तेव्हा ते प्रतिभाशाली शब्द दृष्य होऊन आपली नजरबंदी करतात!

सुरेख परिचय... मूळ पुस्तक वाचायला पाहिजे.. पिक्चर तर बघितलेला नाहीये.. तो पण मिळाला तर बघायला पाहिजे.

अफाट लिहिलंय. पुन्हा एअक्दा निवांत वाचायला हवंय. सिनेमा पाहिला होता, पण पुस्तक अद्याप वाचले नाही. आता तेदेखील वाचायला हवे./

आज काय भाग्यदिन म्ह्णावा का माझा ???
लायब्ररीत गेले..पुस्तक मागितल.. आनि एकच कॉपी जी होती...ती लगेच घेऊन आले Happy सिंपली वॉव Happy

Pages