वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी..

Submitted by रसप on 7 August, 2013 - 00:20

बोल तू माझ्या घराशी एकटी असशील तर
सावली शोधायला मी सोडले केव्हाच घर

जो गुन्हा केलाच नाही डाग तो देऊ नका
दोष द्या दुसरा मला मी खूप चुकलो आजवर

माणसांची वेगळीशी चालली शर्यत इथे
जिंकले कोणीच नाही, जिंकले आहे शहर

ईश्वरा, दगडातही मी पाहिले होते तुला
पाहिले ना तू मला जीतेपणी आयुष्यभर

वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी
आपल्या अस्तास रोजच पाहुनी जगला ज़फ़र

------------------------------------------------------

हात हाती घेतला अन् थेट सारे बोललो
ऐकण्याआधीच उत्तर वाजला होता गजर

....रसप....
५ ऑगस्ट २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/blog-post_7.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली शोधायला मी सोडले केव्हाच घर

वास्तवाच्या विस्तवाची राख असते शायरी

हे मिसरे आवडले.

वृत्तहाताळणी चांगलीच असते आपली.

मिसर्‍यांतील परस्परसंबंध जो कवीच्या मनात आहे/असतो तो वाचकापर्यंत जास्तीत जास्त पोहचवण्यावर विचार व्हावा.

शुभेच्छा.

'वेगळीशी' शब्द खटकला. वृत्तपूर्ती साठी वापरल्यासारखा वाटतोय. ( कदाचित तुझ्यासारख्याने वापरला म्हणून खटकला असेल)

हात हाती घेतला अन् थेट सारे बोललो
ऐकण्याआधीच उत्तर वाजला होता गजर

मस्त… वेगळा असला तरी तोच जास्त आवडला.

'शहर' ही उत्तम.

'सावली शोधायला मी सोडले केव्हाच घर' हा सुटा मिसरा खूप मस्त आहे.

बाकी शेरात विशेष प्रभाव वाटला नाही ( वै. मत )

पुलेशु.

छान.

सर्वांची मते पटली (बाकी शेरात विशेष प्रभाव वाटला नाही ( वै. मत )<<< हे सोडून )
शहर सर्वोत्तम !!!! तुझ्या मनातली मुंबई दिसते आहे
वेगळीशी तू वापरलास हे मला तरी खटकले नाही पण फाटक साहेबांचे निरीक्षण अचूक

अनेक मिसरे उत्तमच आहेत

बहुतेक सानी मिसरे सुंदर...

वास्तवाच्या विस्तवाची आग असते शायरी...असा वाचला हा मिसरा
--खूप सुंदर आहे तो

अरविंद काका,

'विस्तवाची आग' हे मला 'भिजलेले पाणी' सारखं वाटतंय. Wink

फर्दर, 'राख' म्हटल्यावर त्यातून एक अर्क उतरल्याचा फील येतो आहे. एक उदाहरण देतो.. कदाचित चपखल नसेल तरी देतो. 'अ‍ॅशेस मालिका'... जी इंग्लंड-ऑस्ट्रेलियात खेळली जाते. ह्या 'अ‍ॅशेज' म्हणजेच ही राख एका 'बेल'ची राख आहे. पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत हरवलं, त्या पराजयाची आठवण म्हणून स्टम्पवरच्या बेलला जाळून त्याची राख इंग्लंडच्या कर्णधारास एका 'ट्रॉफी'त भरून देण्यात आली. धुळीस मिळालेल्या प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून जाळून राख केलेली बेलच देणं योग्य होतं, खरीखुरी बेल दिली असती; तर तो 'फील' आला नसता बहुतेक.
वास्तवाच्या विस्तवाची राख म्हणताना.... धगधगणार्‍या वास्तवात राख झालेली स्वप्नं वगैरे कल्पता येईल. 'आग' म्हटलं तर 'विद्रोह' दिसेल.... वैयक्तिक पातळीवर मला ह्या शब्दाचाही उबग आला आहे!! Happy

'आग' म्हटलं तर 'विद्रोह' दिसेल....<<<<<<<<<,

बरोबरच पण् त्यापेक्षा मला वाटते आग असे म्हटल्यावर घटना दिसते राख मध्ये परिणाम !!!
त्याहीपेक्षा आग म्हटल्याने वेदनेत येतो आहोत आपण व राख म्हटले की संवेदना जाणवते आहे

वेदना बाहेरून येते संवेदना आतून !!! संवेदना जास्त "आपली:" असते गझलेत ती असावी असे वैयक्तिक मत

राख मध्ये ती आहे !!
म्हणून मला राखच चपखल वाटला !!!

शहर शेर फार आवडला! (मुंबई, न्यू यॉर्क मधे कित्येक वर्षं घालवल्याने हा व्यक्तिशः शेर अगदी भिडतोय.)