काळजी

Submitted by vaiju.jd on 5 August, 2013 - 13:58

||श्री||

२६/७ च्या पावसाने सगळीकडे हाहा:कार माजवला. पानिपतच्या युद्धाचे जसे वर्णन केले आहे, चवल्या, पावल्या, अधेल्या, खुर्दा, बंदा रुपया किती काय सांडले, गळाले वैगेरे तसेच या पावसातल्या नुकसानाचे झाले. मोजमापच नाही. अंदाजेच आकडे सांगायचे. रस्ते खराब झाले, पूल वाहून गेले, रेल्वेरूळ वाकले, गावे नष्ट झाली, कुठून कुठे संपर्क तुटला, माणसे बेपत्ता झाली, वाहने निकामी झाली आणि कितीतरी काही!

डोंबिवलीलाही ह्या पावसाने अगदीच वाताहत केली, अगदी परिचितातल्यांची सुद्धा ह्या प्रलायामुळे आयुष्ये बदलली. हे समोरासमोर पहिले, दिसले. पण होता होता सगळे परत स्थिरस्थावर मार्गी लागले, लागतेच! कारण काळ कोणासाठी थांबत नाही आणि उद्याची आशा, प्रगतीची दिशा हा मानवी जीवनाचा ‘आधारकणा’ आहे.

या ‘पाऊसकाळा’ नंतर किंवा ‘काळपावसानंतर’ म्हणूया आपण एके दिवशी मी गावातून घराकडे जाण्यासाठी शेअर रिक्षाची वाट पाहत थांबले होते. वेळ सायंकाळची सात साडेसातची! मधून मधून किंचीत पाऊस पडत होता. जनजीवन सुरळीत झाले होते. पण अजून व्यवस्था लागलेली नव्हती. त्यातल्या त्यात रस्ते फारच वाईट, उखाणलेले होते. ठिकठिकाणी खडड्यांमध्ये पाणी साचलेले! खडडा किती खोल अंदाज येत नव्हता. बर्‍याच वेळानंतर एक रिक्षा आली. आम्ही तीन माणसे बसलो पण ‘चवथ्या सीट’ शिवाय रिक्षा जाणार नव्हती. तेवढ्यात एक साधारण ओळखीची कॉलेजकन्यका आली पण पैसे सांगितल्यावर तिला विश्वास वाटेना. तिने मला विचारले. मी तिला म्हटले,’ सध्या वाढलेच आहेत रिक्षाचे पैसे! पंधरा दिवस होऊन गेले!’

‘ काकू, पण फारच जास्त आहेत नां? एकदम काय वाढवतात नां!’

‘अग चल! कुठे पावसाची थांबतेस एकटीच? चल, आम्हाला पण बरे, अंधारही पडलाय!’

ती माझ्या आणि आजोबांच्या मध्ये बसली. वाटेत आम्ही ‘पावसाचे परिणाम, ट्रेनची गैरसोय, सगळीकडे पसरलेली अस्वच्छता’ वैगेरे विषयावर चर्चा केली. इतरही बोललो. मी सगळ्यात शेवटी उतरणार होते.

रिक्षा अर्ध्या रस्त्यात आली अन् पाऊस रिपरिप पडायला लागला. म्हणून बाहेर पाहिले तर एक मोटरसायकल शेजारून चालली होती. त्यावर नवराबायको , दोघांच्या मध्ये पांच एक वर्षाचा मुलगा बसलेला आणि जेमतेम सव्वादिड वर्षाची मुलगी पुढे पेट्रोलच्या टाकीवर बसवलेली असावी. ‘असावी’ म्हणजे आत्ता ते बाळ आडवे होऊन टाकीला घट्ट पालीसारखे चिकटून बसले होते. किंचीत पडत असलेल्या पावसामुळे तिचे डोळे मिटले होते. सगळेच भिजत होते. खडबडीत रस्त्यावरून गाडी हादरत खड्डे चुकवत चालली होती. शेजारून आमची रिक्षा! मी शेजारच्या मुलीला ते दाखवत म्हटले,’

‘बघ, एवढ्या लहान वर्षा दिड वर्षाच्या लेकराला अक्कल आहे की आपल्याला इथे असे बसवलेय तर आपण हालायचे नाही बसून राहायचेय, पण एवढ्या मोठ्या वयाच्या बापाला अक्कल आहे का की एवढ्या लहान लेकराला अशावेळी ‘असे’ नेऊ नये. काय माणसे असतात?’

असे म्हटल्यावर त्या मुलीने आणि नंतर शेजारच्या आजोबांनी सुद्धा पुढे वाकून त्या मोटारसाइकल कडे पाहिले. ती ‘हो नां!’ असे म्हणाली आजोबांनी ‘धन्य!’ असे उद्गार काढून ते आवडले नसल्याचे दर्शवत हात उडवला. रिक्षावाल्याने आणि त्याच्या शेजारच्या चौथी सीटवाल्यानेही वळून पाहिले.’ काय आहे ना माणसांना काही नियमांचा विधीनिषेधच राहिलेला नाहीये!’ चवथी सीट म्हणाली.

आमची रिक्षा पुढे आली. मोटार साइकल मागे राहिली. एक एक करत सगळे उतरले.

शेवटी माझ्या घराशी रिक्षा आली. मी सुटे काढून ठेवलेले रिक्षाचे पैसे दिले आणि वळून निघणार एवढ्यात रिक्षावाला म्हणाला, ‘ ताई, तुम्ही एकदम बरोबर बोलला बघा!तो बाइकवरुन चालला होता नां तो माझा गाववाला आहे. माझ्या ओळखीचा आहे, आता भेटला की सांगतोच त्याला की, तुला काय अक्कल नाही असे ताई म्हणत होत्या. कसापण घेऊन जातो फॅमिलीला गाडीवरुन पावसापाण्याचे! तुझी पोरगीच जास्त शहाणी आहे तुझ्यापेक्षा. बरोबर आहे तुमचं! चालतो हां अच्छा!’ तो निघून गेला.

मी किंचीत हबकून जागेवरच उभी राहिले.

‘अरे देवा! माझे ऐकून तो ‘त्याच्या फॅमिलीला’ नीट घेऊन जाईल खरा,पण चिडून रागावून मला ठोकले तर ‘माझ्या फॅमिलीचे काय?’

Group content visibility: 
Public - accessible to all site users