इथे असेच चालते

Submitted by रसप on 1 August, 2013 - 01:56

आयत्या बिळावरी मजेत नाग डोलतो
लाज सोडुनी खुशाल मस्तवाल बोलतो
करे कुणी भरे कुणी हिशेब कोण मागते
इथे असेच चालते, इथे असेच चालते

पाय दे शिरावरी शिडी पुढे चढून जा
गोत तोडण्यास तू कुऱ्हाडही बनून जा
उरेल जो, तरेल तो, अशीच वेळ वाहते
इथे असेच चालते, इथे असेच चालते

बैल जाहला पसार दोर तोडुनी जरी
घे कवाड दांडगे उगाच बांधुनी तरी
नको बघूस तू सुजाण गाव काय सांगते
इथे असेच चालते, इथे असेच चालते

निंदका समीप ठेवुनी रहा, ’उदो’ म्हणा
सर्व घाव झेलुनी उरावरी, जपा कणा
कुणी खरेच सांगते, कुणी उगाच बोलते
इथे असेच चालते, इथे असेच चालते

भूतकाळ सांगुनी इथे कितीक माजले
"आज" त्यांस झेपला नसे म्हणून पांगले
शिळ्या कढीस ऊत आणणेच त्यांस भावते
इथे असेच चालते, इथे असेच चालते

....रसप....
२१ फेब्रुवारी २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'फ्लो'सहित आशयही अभिनव.
पु.लं.नी मला वाटतं 'वंगचित्रे'मध्ये एक बंगाली कॅचफ्रेज आपल्यापर्यंत आणलीय- 'एई रॉकॉम चॉलबे '-
'इथे असेच चालायचे'' - भारतीयांचे अनेक नकोशा गोष्टींना दिलेले असहाय उत्तर ! कवितेत ते अत्यंत चांगल्या व उपहासगर्भ रीतीने आले आहे.

छान...... विषय प्रभावीपणे विषद केला गेलाय.
मी इथे याचा 'या देशात', 'जगात' असा व्यापक अर्थ ध्यानात घेऊन कविता वाचली.... अर्थाशी रिलेट होता आले.

'चामर' वृत्त आहे का ?

>>'चामर' वृत्त आहे का ?<<

नाही उ.काका..

हे अर्धसमवृत्त आहे. नाव मला माहित नाही.
गण -
गालगाल गालगाल गालगाल गालगा = २३ मात्रा
गालगाल गालगाल गालगाल गालगा = २३ मात्रा
लगालगा लगालगा लगालगा लगालगा = २४ मात्रा
लगालगा लगालगा लगालगा लगालगा = २४ मात्रा