दी वॉर - भैया, ये दीवार टूटती क्यूं नही है ?

Submitted by उद्दाम हसेन on 31 July, 2013 - 16:00

( दीवार या सलीम जावेद लिखित अप्रतिम चित्रकृतीशी संबंधित सर्वांचीच माफी मागून Happy )

विष्णूच्या शापाने कायम अवतार घ्याव्या लागणा-या दोन द्वारपालांनी भूतलावर काहीच काम न उरल्याने आणि स्पष्ट आदेश नसल्याने पक्षांतर करून अवतार घेतला आणि या अवतारात ते लेखक झाले. आपल्या उचापतींनी ते बॉलीवूड क्षेत्री आपला जम बसवून सलीम जावेद नावाने प्रसिद्ध झाले. कलियुग नुकतेच येत असल्याने त्यांच्या लिखाणाला प्रचंड मागणी आली आणि देवतास्वरूप राजेंद्रकुमार, राजेश खन्ना यांचं प्रेमळ युग संपून रागीट तरुणांचं युग सुरू झालं.

तर सत्येन कप्पू या नावाचा माणूस या जगात असू शकतो हे एकदा मान्य केलं कि माणूस काहीही मान्य करतो. कप्पूला निरुपाय बायको असते. कायम सूज असल्यासारख्या चेह-यावर ममता विलसणा-या या भारतमातेस दोन मुलं असतात. त्यातल्या एका मुलाचं नाव विजय असतं. हे द्वारपालांनी ठरवलेलंच असतं. दुस-या मुलास जय या नावातून सूट देऊन रवी हे नाव दिलं जातं. पडती भूमिका घेण्याची तयारी असणारा कुणीही या भूमिकेसाठी चालेल असे सजा यांनी सांगितलेले असते.

कप्पू युनियन लिडर असतो आणि भाबड्या काळाला जागत अत्यंत इमानदार असतो. इतरांच्या हितासाठी मुलांना दोन घास नाही मिळाले तरी चालतील अशा विचारांचा तो असतो. त्या काळी अतिशय प्रॅक्टीकल विचार असलेले कंपनीचे मालक सप्रू त्याला हातोहात बनवतात. ईमोशनल फूल कप्पू बदनाम होतात आणि मनाला लावून घेतात. त्यातच विजयच्या हातावर कुणीतरी गोंदवून ठेवतं "मेरा बाप चोर है" ! गोंदवणं हातावर नाही तर मनावर उमटतं. इथे दिग्दर्शक दिसतो वगैरे काही नाही. सजाच्या पटकथेत दिग्दर्शकाचं काम अ‍ॅक्शन, कॅमेरा, टेक १,२ , कट, ओके इतकंच असावं. तर बदनामीला कंटाळून कप्पू विमनस्क अवस्थेत नाहीसा होतो आणि निरुपायाने भारतमातेला मुंबई गाठावी लागते.

पडद्यावर व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशन दाखवले कि आपण मनाने मुंबईला जाउन पोहोचतो. त्या काळी संधी मिळूनही मुंबईला न जाता चंपारण्यात राहीलेला लटपटराव कडकडे या सीनला जरा सावरून बसतो. तर मुलं भारतमातेला जेवायला मागतात. भारतमाता गळ्यात आवंढा आणायचा प्रयत्न करत पडदाभर आपला सिनेमास्कोप चेहरा वेडावाकडा करते. मग कुठूनसे चुरमुरे आणून वात्सल्याने डोळे फडफड करत मुलांना खाउ घालते. खरच, मराठी माणूस मागे का हे सजांनी किती सूचकतेने सांगितलंय ना ? या सीनमध्ये मराठी आई इमॅजून पहा.

"मेल्यांनो, एक पैसा नाही जवळ आणि सारखं भूक भूक करताय. आताच्याला हे गिळा आणि पडा नाहीतर मलाच खा " असा डायलॉग कानात वाजू लागला ना ? कशी पोरं पुढं जायची ?

निरुपायाला आता आपली स्पेशालिटी आठवते आणि ती बांधकामावर डोक्यावर मुंडासं न घेता विटा वाहू लागते. इथं तिला वाईट नजरेने पाहणारे मुकादम भेटतात. ती चक्कर येऊन पडते, घरी शिलाईयंत्र आणून कपडे शिवते हे सगळे सोपस्कार इमाने इतबारे पार पाडत असताना ती देवळातही जात असते. विजय देखील कष्ट करू लागतो आणि रवीला शिकवू म्हणतो. पोराला शाळेचा कंटाळा असेल असा संशयदेखील न येता भामा कौतुकाने विजयकडे पाहते. देवळात भामा आणि रवी जातात, विजय मात्र बाहेर कट्ट्यावर बसतो. आपली आई आताच बाहेर येईल, मगच येईल याची वाट बघत बसलेला विजय मुळीसुद्धा जागा सोडून जात नाही. नास्तिक असल्याने आत जाऊन काय चाललंय हे पाहण्याची त्यास बंदी असते. भामा पण गरीबी, कष्ट आणि मुलांचा त्रास याला वैतागलेली असल्याने रवीला थेट मोठा करूनच बाहेर येते. बाहेर येऊन बघते तो काय, विजय देखील मोठा होऊन कट्ट्यावरून न हलता हेअरष्टाईल करून बसलेला असतो. त्याच्याबरोबर त्याचे कपडेही लांबीला वाढलेले असतात. रवी आता गोरा पान झालेला असतो आणि कायमखुष चूर्ण खाल्ल्यासारखा आणि शरीरात स्प्रिंगा बसवल्यासारखा मानेला आणि कंबरेला हेलकावे देऊन बोलतचालत असतो.

रवी शिकला हे आपण त्याच्या रंगावरून ओळखतो, तर उन्हाने विजय काळवंडला हे आपल्या ध्यानात येतं. विजय आता एक हमाल झालेला असतो. त्याने अण्णांच्या आंदोलनातून स्फूर्ती घेतलेली असल्याने तो एक दिवस गुंडांना हप्ता देत नाही. हप्ता न दिल्याने पीटर नावाचा गुंड रागाने लालेलाल होऊन त्याला शोधू लागतो. पण काखेत कळसा या न्यायाप्रमाणे विजय तर त्याच्याच गोदामात सापडतो. इथे त्यांच्यात गहन चर्चा होऊन असं ठरतं कि गोदामाचं दार आतून बंद केल्यास ते ज्याने बंद केलं त्यानेच उघडावं. या प्रस्तावास सारेच अनुमोदन देतात आणि एक क्लिष्ट विषय निकालात निघाल्याने मोठमोठे लोक विजयकडे नोकरीचे प्रस्ताव घेऊन येऊ लागतात. विजय देखील आयआयएम मधून टॉपर केलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे एम्लॉयरला अटी घालत असतो.

इंटरव्ह्यूमधे इफ्तेकार टेबलावर नोटांचं पुडकं फेकतो. यावर विजय उत्तरतो, आज भी मै फेके हुए पैसे नही उठाता. इफ्तेकार त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, विजय तू माझ्या परीक्षेत पास झालास. इफ्तेकार हा कष्टाळू मनुष्य असून संपत्ती वाढवत न्यावी असा त्याचा विचार असतो. त्याला काही समविचारी माणसंही भेटतात. पण पोलिसांना हे विचार पसंत नसतात. मदनपुरीचे विचारही इफ्तेकारसारखेच असतात, पण माबोवरच्या काही आयड्यांप्रमाणे या दोघांचं अजिबात जमत नसतं. या मदनपुरीचा त्रास संपवण्यासाठी विजय त्याच्या गोटात एक ड्युआय पाठवतो. हा ड्युआय नाही हे पटवण्यासाठी स्वतःच्या जिवाची बाजीही लावतो. असेही लोक असतात. पण इथे त्याचा ७८६ क्रचा बिल्ला ऐनवेळी त्याला वाचवतो. हा बिल्लाही त्याला सुजलेल्या चेह-याच्या युनुस परवेझ या कुलीने दिलेला असतो. ड्युआयची योजना प्रमाणाबेर यशस्वी होऊन विजय आता सिंडीकेटचा चेअरमन बनतो. काळ्या धंद्यातला महत्वाचा व्यक्ती होतो.

कप्पूचा मुलगा आणि काळे धंदे ?
मग सजा खिडकीतून व्हिडीओ दाखवतात. रिवाइंड बटण दाबून समोरच्या रस्त्यावर एक मजबूर मां.. दो लाचार बच्चे वगैरे. अरेरे ! काय केलं असतं बिचा-याने. आपण सुस्कारा टाकत म्हणतो.

इकडे शशीकपूर नीतूसिंगबरोबर गाणी म्हणत असतो. आपण लव्हसीन्स करत असताना तिकडे विजयने पिक्चर खाऊन टाकला आहे याची गंधवार्ताही त्याला नसते. जुन्या जमान्याप्रमाणे ज्याच्याबरोबर टॉपची होरॉईन तो मेनहिरो या गैरसमजामुळे त्याचा घात होऊन तो कायमचा साईडहिरो बनण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते.

इकडे विजय मोठा होत असतानाच शशी पोलीस इन्स्पेक्टर बनतो. ट्रेनिंग संपल्या संपल्या नीतूसिंग त्याला जादूची झप्पी द्यायला येते. आपलं ट्रेनिंग असं का बरं नाही या विचाराने पडद्यावरचं आणि बाहेरचंही पोलीसखातं हळहळत असतानाच रवी जीपमधून नीतूसिंगबरोबर गाणं म्हणायला बाहेरदेखील पडतो. त्यानंतर त्याला मोठ्या साहेबांचं बोलावणं येतं.

मोठे साहेब विचारतात " गाणी म्हणून झाली कि बाकि आहेत अजून ?"
शशी उर्फ रवी गोंधळून म्हणतो " नाही सर "
" आता थोडं काम करणार का ? साईनिंग अमाउंटचा प्रश्न आहे "
" करीन ना सर "
" हे बघ, एक अतिशय गुप्त आणि अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणाची फाईल तुला देतोय मी "
" हा माझा सत्कार समजेन सर"
" डोंबल्याचा सत्कार ! एकही विश्वासू अधिकारी नाही. सगळे हप्ते घेतात. तूच तेव्हढा प्रामाणिक आहेस"
" सर आताच लागलोय कामाला"
" म्हणूनच तुला काम देतोय. काम नीट कर"

रवी फाईल बघतो आणि विजयचं नाव पाहून पहिल्याच दिवशी मी काम करणार नाही किंवा राजीनामा देतो असं सुनावतो. कप्पूप्रमाणेच प्रामाणिक असल्याने विजय माझा भाऊ आहे हे सांगतो. साहेब म्हणतात माझ्याकडचे बाकिचे सगळेच गयेगुजरे असल्याने तू जसा असशील तसा मला चालशील. एक दिवस विचार कर पाहीजे तर.

इथे सजा थोडा विचार करतात आणि रवीला एक मुलगा चोरी करून पळताना दिसतो. रवीच्या बंदुकीतून गोळी उडते आणि मुलगा जखमी होतो. रवी मुलाच्या घरी जातो. लहानपणापासून वृद्ध असलेले ए के हंगल त्याचे वडील असताता. निवृत्त असतात. या वयात लहान मुलं पदरी असतात. खाजगी शाळेत कमी पगारावर काम करून पेन्शन घेणार नाही असं लिहून दिलेल्या शिक्षकासारखं घर असतं. पेन्शनर शिक्षकाचा मुलगा डबल रोटीची चोरी करून पळत होता हे रवीच्या लक्षात येतं. मास्तर त्याची शिकवणी घेतात. त्यावर निवॄत शिक्षकाचं उत्पन्न नेमकं किती हा विचार करत असल्यासारखे भाव चेह-यावर दाखवत रवी बाहेर पडतो आणि एक टीचर के घर से ही मुझे ये सीख मिल सकती थी असे खटकेबाज संवाद म्हणून साहेबापुढे हात पुढे करतो.

इथे खटकेबाज संवादाबरोबर जबरदस्त फुललेल्या नाट्यामुळे चंपारण्यकर नेचर्सकॉललाही न जाता अजूनच सावरून बसतात.

आता विजय एका गगनचुंबी इमारतीचा सौदा करतानाच साठ पिढ्या बिझनेसमध्ये गेलेल्या एका व्यापा-याला धंद्याच्या काही टीप्स देताना दिसतो. या बांधकामासाठी माझ्या आईने विटा वाहील्यात... धंदा करना तो आपको नही आता... असं शिकवून जातो. त्यावर हा लहानाचा मोठा झाला तरी या इमारतीचं बांधकाम चालूच होतं म्हणजे हे व्यास कन्स्ट्रक्शन तर नाही असे भाव त्याच्या चेह-यावर तरळून जातात. त्याला मंदीरातली जम्माडीजम्मत माहीतच नसते. नोबीता डॉरेमॉनच्या ट्रीक्ससारखं देवळातून बाहेर आलं कि मोठ्ठं ! सजा कसे बरं चुकतील ? साक्षात व्यासमुनी आणि वाल्मीकीच कि हो ते बॉलिवूडचे !

तर विजय आईला इमारतीची भेट देतो तोपर्यंत नणंदेने भावजयीबद्दल आईचे कान फुंकावेत तसे रवीने भारतमातेचे कान फुंकलेले असतात. भारतमाता चिडू कि गिफ्ट घेऊ या विचारात असते. एकाएकी चंपारण्यकरांचं स्मरण होऊन ती रवीसोबत जाण्याचा निर्णय घेते. इथे खटकेबाज संवांदांची धुंवाधार धुमश्चक्री होते. सिंघम, राउडी राठोड, दबंग च्या फाइटसीन्सने जो फील येणार नाही तो या प्रसंगातल्या नाट्य आणि संवादाने येतो.
जाओ उस आदमी का साईन ले के आओ, जिसने मेरे हाथ पे ये लिखा था...
मै साईन करुंगा.. लेकिन सबसे पहले साईन नही करुंगा !!

चंपारण्यकर शिट्या मारत असतानाच भारतमाता निश्चयाने उत्तरते
मां जायेगी.. वो आदमी तुम्हारा कौन था... जिसने तुम्हारे हाथ पे ये लिखा था ? लेकिन तुम तो मेरे अपने थे ! फिर तुम चोर कैसे निकले ?

आता रवी झालेल्या शशीकपूरच्या लक्षात येतं, आपण वेड्यात निघालोय. या सीनमध्येही विजयने आपल्याला कच्चं खाल्लंय. मग तो सजाशी वाद घालू लागतो. त्याच्या लकड्याला कंटाळून सजांचं गोदामप्रेम उफाळून येतं आणि सजा त्याला एका गोदामात एकट्याने पाठवतात. आतापर्यंत कुठल्याही सिनेमात हा प्रसंग न आल्याने गुंड रवीच्या एका ट्रीकला फसतात आणि एखाद्या वर्गशिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांकडून खेळण्यातल्या बंदुका जप्त कराव्यात तद्वत रवी गुंडांकडून बंदुका काढून घेतो. आपण फसलोय हे त्यांच्या लक्षात येतं आणि आपण म्हणतो .. आहे आहे.. याच्यात पण दम आहे. भाऊ शोभतो खरा !

मग शशी आणखी वाद घालतो आणि विजयला हरवायचं म्हणतो. मग सजा त्या दोघांना पुलाखाली पाठवतात. आता पुलाखालून बरंच पानी वाहून गेलेलं असतं.?
"आज मेरे पास बिल्डिंगे है..गाडियां है... नोकर चाकर है.. सुपरहीट फिल्मे है.. क्या है तुम्हारें पास ?"
विजयच्या या डायलॉगवर शशी स्प्रिंगा सावरत उत्तरतो..
"मेरे पास मां है !"
स्टेशनात ट्रेनला इंजिनचा धक्का बसतो आणि गाडीला पॉवर मिळते. दिग्दर्शक मी आहे... मी आहे असं सांगतो.

आता विजयला मानसिक आणि शारीरीक आधार द्यायच्या बाबी परवीन पार पाडते. मायबोलीवर एखाद्या नजरेत भरणा-या आयडीला असावेत इतके शत्र््ऊ त्याला असल्याने मदनपुरीचे गुंड त्याच्या पाळतीवर असतात. इकडे परवीन देहप्रदर्शनाचे जास्तीचे पैसे मागू लागल्याने दिग्दर्शक सजाला खूण करतो त्याबरोबर ते मटनपुरीकरवी तिचा खून करतात. भारतातल्या न्यायाप्रमाणे सूत्रधार कधीच पकडले जात नसल्याने विजयदेखील मटनपुरीला गगनचुंबी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून खाली फेकून देतो आणि पुरावे नष्ट करतो. मटनपुरी पडता पडता कपडे तरी खाली टाक असे विनवत असतो पण त्याच्याकडे ( आणि तशाच अवस्थेतल्या ललनेकडे) कटाक्षही न टाकता विजय ताड ताड पावले टाकत निघून जातो.

आता भारतमाता इस्पितळात दाखल होते. विजय आता देवळात जातो. लहानाचं मोठं करणारं गॅझेट कुठेय यासाठी तो थेट देवाशी भांडण करतो. ते गॅझेट मिळालं तर सगळं सुरळीत होईल असा त्याचा हिशेब. पुन्हा लहान होऊन आता झालेल्या चुका टाळाव्यात असं त्याला खूप वाटत असतं. देवाशी बोलताना मनातल्या मनात तो युसुफभाईंच्या पाया पडतो आणि.. खूष तो बहोत होंगे तुम.. कल तक जो तुम्हारी मंदीर की सीढीयां तक नही चढता था वो आज तुम्हारी शरण मे आया है..

याला म्हणतात जीत भी मेरी ..पट भी मेरी ! या सीननंतर आपले सगळेच भक्त याच आवेशात नवस बोलतील कि काय अशी शंका देवाच्या मनात आली असावी. कसला भारी आहे, मागायचं तर खरं, पण ते ही उपकार देवावरच केल्यासारखं... मग मर आता. देव मनात म्हणतो.

त्याक्षणी रवी विजयच्या मागे धावतो. मग व्हीटी ते ताज या रस्त्यावरचे केरळी उठून गेलेल्या मोकळ्या फूटपाथवरून दोघे पळापळी खेळतात. अचानक रवीला कर्तव्याची जाणीव होते आणि तो गोळी झाडायची वॉर्निंग देतो. आता नेमका ७८६ चा बिल्ला हाताला येत नसतो. इथे हिंदुत्ववादी खूष होतात. देवळात नको जायला आणि ७८६ चा बिल्ला चालतो का रे ! स्युडो सेक्युलर कुठचा !

अशा प्रकारे शिव्याशाप लागल्याने रवीच्या बंदुकीतून सुं सुं करत सुटलेली गोळी विजयचा वेध घेते आणि विजय शेवटची रीळ धावू लागतो. देवळात आई बसलेली असते. विजय तोंडाचा आ वासून आईच्या मांडीवर कोसळतो.. मां मुझे नींद आ रही है.. मग भारतमाता रडू लागते आणि आपल्याला कळतं अरे हिचं पोरावर प्रेम होतं बरंका ! उगाच पिक्चरभर शिव्या घातल्या. इकडे हा देवळातला भावखाऊ सीन करून आल्याचं लक्षात आल्याप्रमाणे रवीचा चेहरा उतरतो आणि मरायची हातखंडा अ‍ॅक्टींग करून विजय चेहरा वेडावाकडा करत , रीळं खात खात मरतो. तीळ तीळ मरणे म्हणजे काय हे रीळ रीळ मरणाकडे पाहून लक्षात येतं. कर्तव्यासाठी भावावर गोळी चालवायचा रोल करूनही आपल्या पदरात काय पडलं हे विचारायला रवी निघून जातो आणि आपल्याला हा रोल नसता मिळाला तर खरंच शिलाईयंत्रं घ्यावं लागलं असतं काय... या विचारात निरुपाय विजयच्या शरीरावर आपलं अवजड डोकं ठेवते. सजा आपल्याला कर्तव्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणा-या त्या कुटुंबाची कहाणी सांगताना कप्पूच्या शिकवणुकीला विसरा आता असं शिकवून जातात.

चंपारण्यकर अजूनही दीवार कधी दाखवणार म्हणून बसून असतात. प्रेक्षक उठून जाऊ लागले तरी त्यांना बसलेले पाहून डोअरकीपर पिक्चर संपला हे सांगतो. त्यावर माझी फसवणूक झाली, माझे पैसे परत करा म्हणून ते वाद घालू लागतात. मॅनेजर, त्यांची वेळ झालेली आहे...हे नेहमीचंच आहे, नका लक्ष देऊ या अर्थाची खूण करतो आणि पडदा पडतो.

पिक्चर सुपरहीट झालेला असतो.

- Kiran

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला भारी आहे, मागायचं तर खरं, पण ते ही उपकार देवावरच केल्यासारखं... मग मर आता. देव मनात म्हणतो. >> ह्या वाक्याला तर कसली जोरात हसलीये...

प्रथम श्रेणी....

जाओ उस आदमी का साईन ले के आओ, जिसने मेरे हाथ पे ये लिखा था...
मै साईन करुंगा.. लेकिन सबसे पहले साईन नही करुंगा !!
हे वाचुन का कुणास ठाऊक उगाच सीटीबीटीची आठवण आली.

अवघड आहे..... दीवार.....
हहपुवा झाली रे...!!!!

लहानपणापासून वृद्ध असलेले ए के हंगल..
आता नेमका ७८६ चा बिल्ला हाताला येत नसतो. इथे हिंदुत्ववादी खूष होतात. देवळात नको जायला आणि ७८६ चा बिल्ला चालतो का रे !......

मस्त लिहिलंय.... Lol

जबरी. Rofl

त्या काळी संधी मिळूनही मुंबईला न जाता चंपारण्यात राहीलेला लटपटराव कडकडे या सीनला जरा सावरून बसतो. >>> हे सगळ्यात जास्ती आवडलं बुवा!!! Wink
लटपटराव कडकडे >> लटपटराव गळाकाढूनरडे असं कर ना!

विजय मात्र बाहेर कट्ट्यावर बसतो. आपली आई आताच बाहेर येईल, मगच येईल याची वाट बघत बसलेला विजय मुळीसुद्धा जागा सोडून जात नाही. >>> आला कि! Lol

आता नेमका ७८६ चा बिल्ला हाताला येत नसतो. इथे हिंदुत्ववादी खूष होतात. देवळात नको जायला आणि ७८६ चा बिल्ला चालतो का रे ! स्युडो सेक्युलर कुठचा ! >>> जीयो!

तीळ तीळ मरणे म्हणजे काय हे रीळ रीळ मरणाकडे पाहून लक्षात येतं. असं सजा आपल्यालाकर्तव्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणा-या त्या कुटुंबाची कहाणी सांगताना कप्पूच्या शिकवणुकीला विसरा आता शिकवून जातात. कर्तव्यासाठी भावावर गोळी चालवायचा रोल करूनही आपल्या पदरात काय पडलं हे विचारायला रवी निघून जातो आणि आपल्याला हा रोल नसता मिळाला तर काय खरंच शिलाईयंत्रं घ्यावं लागलं असतं या विचारात निरुपाय विजयच्या शरीरावर डोकं ठेवते.

Proud

दीवारचा रिमेक येणार आहे.

भारी लिहिलंय. दीवार आवडचा पिक्चर आहे खरंतर.... म्हनून हे जास्त आवडलं. काही पंचेस सॉल्लीड बसलेत.

Pages