अलिबाबा चाळीस चोर लेटेस्ट व्हर्जन

Submitted by कवठीचाफा on 19 July, 2013 - 16:49

( फार पुढे कधीतरी भविष्यात मुलं आपल्या जुन्या इसापनीती, सिंदबादच्या सफरी, अरेबीयन नाइट्स चुकून कधी वाचतील तर त्यातून ते त्यांच्या मनासारखा अर्थ लावत जातील आणि मग काहीसं असं होईल )

कालच एक गोष्ट वाचली ओल्डेस्ट स्टोरी डॉट कॉम वर 'आलिबाबा आणि चाळीस चोर'

एका गावात एक अलीबाबा राहत असतो खूपच गरीब असतो तो साधा नोकिया सी फाईव्ह नसतो त्याच्याकडे. तो रोज गाढवं घेऊन बाहेर जायचा, गाढव हा शब्द मी आजोबांकडून खूप वेळा ऐकलाय पण त्याचा फोटो काल पाहिला सेम आयशर गाडीवर लोगो असतो ना! तसा दिसतो

तर हा अलीबाबा एक दिवस असाच बाहेर पायी जात असतो, काय करणार गरीब असतो ना तो! त्याच्याकडे कुठून येणार एखादी मर्स?

तर तो जात असताना त्याला घोड्याच्या थापांचा आवाज येतो, घोडे थापा का मारत असतात हे काही त्या पुस्तकात दिलं नव्हतं. घोडे थापा मारताना ऐकतो म्हणून तो लपून पाहतो तर समोर काय? तर चाळीस चोर म्हणजे थीव्ह्ज असतात ते थीव्ह्ज पण बहुतेक गरीब असतात कारण त्यांना लोकांकडे जाऊन चोरी करायला लागते नुसता पासवर्ड क्रॅक करून चोरी करायला त्यांच्याकडे लॅपटॉपच नसतात.

त्यांचा एक हेड असतो, तो एका डोंगरासमोर उभा राहून म्हणतो 'तिळा तिळा दार उघड' त्यानं व्हाईसकमांड दिलेली असते त्यामुळे दरवाजा उघडतो आणि चोर आत जातात. इकडे अलीबाबानं नेमका तो पासवर्ड हॅक केलेला असतो, जसे चोर बाहेर जातात तसा तो त्या डोंगरासमोर उभं राहून म्हणतो 'तिळा तिळा दार उघड' आणि दार उघडतं बहुतेक एक्सक्युझीव्ह व्हाईस पासवर्ड नसतो तो.

अलीबाबा आत जातो आणि पाहतो तर काय? आत सगळीकडे सोनं चांदी असते, बहुतेक त्या चोरांची मायक्रोचीप बनवायची कंपनी असावी हिरे असतात.

अलीबाबा त्यातलं जमेल तितकं घेतो आणि घरी जातो.

घरी आल्यावर त्याला ते सोनं मोजायचं असतं पण तो पडला गरीब त्याच्याकडे काउंटींग मशीन कुठे असणार? मग तो आपल्या भावाकडे ते मागतो त्याला ते लोक माप असंच काहीसं म्हणतात. त्याचा भाऊही फारसा श्रीमंत नसतो कारण त्याच्याकडेही मोबाईल नसतोच पण तो ते मशीन देतो पण काहीतरी चलाखी करून तो अलीबाबाकडे खूप सोनं असल्याची माहिती मिळवतो, बहुतेक त्या माप नावाच्या मशीन मध्ये हिडन कॅमेरा असावा.

तर तो भाऊ अलीबाबाला सोनं मिळवायची जागा विचारतो आणि तिकडे जातो. आत जाताना पासवर्ड बरोबर देतो पण बाहेर येताना नेमका विसरतो आणि चुकीचा पासवर्ड दिल्यानं बहुतेक तिथला अलार्म ट्रिगर होतो.

अलीबाबाचा हा भाऊ रोबोट असल्याचं आधी लिहिलेलं नाही पण मग सगळे चोर येतात आणि त्याला डिसमेंटल करतात तेव्हा ते लक्षात येतं.

मग अलीबाबा येतो आणि दोन्ही वेळेस बरोब्बर पासवर्ड देऊन त्याचे सगळे पार्ट घरी नेऊन जोडतो पण बहुतेक त्याच्या भावाची हार्डडीस्क खराब झालेली असते म्हणून तो त्याला लगेच स्क्रॅप करून टाकतो.

हे सगळं त्या चोरांना कळतं आणि मग त्यांचा सरदार आपल्या चाळीस चोरांना अलीबाबाला शोधायला पाठवतो, ते त्याला शोधतात आणि त्याच्या घरावर मार्किंग करून येतात पण नेमकं त्याच्या घरावरच्या सिक्युरिटी कॅमेऱ्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यांनी केलेलं मार्किंग अलीबाबाच्या मेडला मर्जिनाला दिसतं. मर्जिना सगळ्याच घरांवर सेम मार्किंग करते. तिच्याकडेही बहुतेक बारकोड मार्कर असतो.

मग चोरांचा सरदार चिडतो आणि सगळ्या चोरांना झीप करून एक एक बुधले नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये अटॅच करून अलीबाबाच्या घरी पाठवतो आणि स्वतः: अरब म्हणून जातो, म्हणजे तिथे तेलाचा होलसेल डीलर लिहिलेय पण हे होलसेल ऑइल फक्त यु ए ई मध्येच मिळतं म्हणून मी सोपं करून सांगितलं.

पण अलीबाबाची मेड मर्जिना असते हुश्शार तिला या अटॅचमेंटचा संशय येतो म्हणून ती बहुतेक अँटीव्हायरसने स्कॅनिंग करते, तर तिला सरदाराने पाठवलेले सगळे चाळीस व्हायरस सापडतात. पण एक अटॅचमेंट सेफ असते म्हणून ती ओपन करून ती त्यातलं तेल आपल्या अकाउंटला ट्रान्स्फर करून घेते आणि मग उकळतं तेल नावाचा अँटीव्हायरस सगळ्या अटॅचमेंटना वापरून ती ते सगळे चाळीस व्हायरस डिलिट करून टाकते.

इकडे सरदार अलीबाबाला नुकसान करणार असं दिसताच ती त्या सरदाराचंही अकाउंट कायमचं डिलीट करून टाकते.

मग अलीबाबा आणि मर्जिना कायम रिलेशनशिपमध्ये राहतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मस्त रे !

चाफ्या, लईच भारी रे Lol
>>>बहुतेक त्या चोरांची मायक्रोचीप बनवायची कंपनी असावी हिरे असतात......पण बहुतेक त्याच्या भावाची हार्डडीस्क खराब झालेली असते म्हणून तो त्याला लगेच स्क्रॅप करून टाकतो.... सगळ्या चोरांना झीप करून एक एक बुधले नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये अटॅच करून अलीबाबाच्या घरी पाठवतो...एक अटॅचमेंट सेफ असते म्हणून ... वापरून ती ते सगळे चाळीस व्हायरस डिलिट करून टाकते....मग अलीबाबा आणि मर्जिना कायम रिलेशनशिपमध्ये राहतात.<<< सगळेच अफलातून ! जिओ Happy

झकास Happy

Pages