''फक्त तुझी जर दगडी भिवई'' : मर्ढेकर आणि ईश्वर

Submitted by भारती.. on 18 July, 2013 - 06:21

''फक्त तुझी जर दगडी भिवई'': मर्ढेकर आणि ईश्वर

हासडल्या तुज शिव्या तरीही
तुझ्याच पायी आलो लोळत
मुठीत धरुनी नाक लाविले
तव डोळ्यांशी डोळे पोळत..

कवी बा.सी. मर्ढेकर आपल्या भूतकाळातून व मराठी कवितेच्या तत्कालीन वातावरणातून नेमक्या कोणत्या वळणावर मुक्त झाले हे त्या सर्वज्ञ ईश्वरालाच ठाऊक. पण तिथून मराठी कवितेतील कृतक क्षीणता संपली. बदलत्या अंतर्यामातले धीट प्रश्न स्पष्ट भाषेत अवतरले.

खंत कशाला जिरेल का रग
आकाशाची ?जगेन पोळत
फक्त तुझी जर दगडी भिवई
चळेल थोडी डोळ्यांदेखत !

फक्त तुझ्या अस्तित्वाचा एक पुरावा दे, सगळी मानवी अगतिकता आणि जन्मवैफल्य त्या अनुभूतीवर ओवाळून टाकेन असे ठणकावून ईश्वरालाच सांगणार्‍या या कवीची पाळेमुळे सनातन नासदीयसूक्तापर्यंत पोचली होती, जरी सामाजिक-औद्योगिक वास्तव नवे प्रश्न घेऊन छळत होते..

कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या
निळ्या वायुच्या लगडी सलग कधी? कधी
अन जडतेला त्या मनामनांचे आले पोत ?
तेजाच्या अन निळ्या नळीतून
जसा फुलावा निळसर चाफा
सपोत संज्ञेमधून तैसा
अनुभूतींचा फुलला वाफा
कधी? .................

पण नासदीय सूक्तकाराला तेव्हा न पडलेला प्रश्न आता निर्माण झाला होता.बकाल सामाजिक पार्श्वभूमीवर अध्यात्मासमोरचे नवे आव्हान मर्ढेकरांनी कवितेतून निसटू दिले नाही.

...........पहावे तेजांतून ह्या काय ?

कुणाला शोधावे अन ?

दळभद्र्याच्या आग लागली

पायाखाली इथे अचेतन..

' स्व' चे प्रश्न शोधताना त्यांना समष्टीच्या वैफल्याने ग्रासले होते.त्यांच्यातला पूर्वाश्रमीचा छोट्या परिघातला भावकवी जळून गेला हे बरेच झाले.तरीही पूर्वसूरींच्या प्रभावाखाली लिहिलेली त्यांची आधीची कविता पुढील शक्यतेचे बीज आपल्या आशयगर्भात वागवत होतीच.

आता अंत कशास पाहसि ? अता आभाळले अंतरी

विश्वाची घटना मला न उमगे, मानव्यता दुर्बळ

केले पाप असेल जे कधिं तरी मी जन्मजन्मांतरी

प्रायश्चित्त तदर्थ ना म्हणुनि गा पाठीवरी हे वळ ?

तुझी कार्यकारणे तू कधीच स्पष्ट करीत नाहीस. कशाचेच कधी उत्तर देत नाहीस ..

न्यायाच्या निज मंदिरात बसुनी साक्षी पुराव्याविना

किंवा काय गुन्हा असेल घडला सांगीतल्यावाचून

न्यायाधिश असेल मानव तरी शिक्षा सुनावीत ना

देवाची परि न्यायरीति असले पाळील का बंधन ?

ईश्वरी न्यायव्यवस्थेला , तिच्या एकांतिकतेला हा मानवी प्रश्न- आमच्या कर्मभोगांच्या वाळवंटात स्मृतीभ्रष्ट अनाथ करून आम्हाला सोडून देतोस. ही तुझी कुठली न्यायदानाची रीत ?

अपयश,प्रेमभंग या नेहमीच्याच घटना- अत्यंत सृजनशील व नैतिक निष्ठांचे ताण सोसणार्‍या मर्ढेकरांच्या मनावर समग्र शक्तीनिशी हे आघात झाले तेव्हा त्यांचे कवी-रसायन अंतर्बाह्य बदलत गेले. पण विपरीत अनुभवांच्या या पहिल्या सत्रातही मर्ढेकर नास्तिक होऊ शकले नाहीत. त्यांच्या प्रतिभेची मूळ भूमी संतांच्या महाराष्ट्राचीच होती म्हणून त्यांची अभिव्यक्ती धिटावत गेली , एक त्रिशंकू अवस्थाही आली पण ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलच शंका मात्र त्यांना कुठल्याही टप्प्यावर आली नाही.

हा ऋतु 'नतद्रष्ट गाथे'चा होता.तुकारामांचाच शब्दवारसा काळाने मर्ढेकरांच्या हवाली केला होता, त्याच जातकुळीचा जाणीवप्रवास.

माझा अभंग माझी ओवी | नतद्रष्ट गाथा गोवी

इंजिनावीण गाडी जेंवी | घरंगळे ||

आत्यंतिक आत्मिक संघर्ष. आधार ईश्वरापेक्षा वाटत होता तो संत कवींचा.

संत शब्दांचे नायक | संत अर्थांचे धुरंधर

एक शब्दांचा किंकर | डफ्फर मी ||

यातच वाट्याला आलेले महायुद्धाचे महावैषम्य. ईश्वराचे अस्तित्वच काय, जीवनातल्या सर्वच शिवमंगल गोष्टी कवीकल्पना वाटतील असे वातावरण.

प्रेमाचे लव्हाळे

सौंदर्य नव्हाळे

शोधू ? आसपास

मुडद्यांची रास

यंत्रातून आग

गोळ्यांचे पराग

विमानाचे हल्ले

बेचिराख जिल्हे..

नव्या आशयांचे आभाळ शब्दांच्या कवेत येत होते पण त्यांचा आनंद मानायची ती वेळ नव्हती.

नाही कोणी का कुणाचा | बाप-लेक मामा-भाचा

मग अर्थ काय बेंबीचा | विश्वचक्री ?

युद्धजन्य पोरकेपण. वैयर्थ. आयुष्याचे अवमूल्यन. हे सर्व जर ईश्वराच्या इच्छेने तर त्याची ही भयाकारी इच्छा कशी समजून घ्यायची?

आणि हो, अशाच वेळी अवतार घेण्याचे आश्वासन त्याने दिले आहे ना ? कुठे आहे तो अद्भुत देह ज्यात परमेश्वरतत्त्व अवतरले आहे अमंगलापासून सुटका करण्यासाठी ?

मग कोठे रे इमारत | जिचे शिल्पकाम अद्भुत

जींत चिरंतनाचा पूत | वावरे की ?

प्रश्नांची धग वाढत चालली होती पण समोरून कोणतेच उत्तर नव्हते. पण ईश्वर कृपावंत होत नव्हता तरी कशावरून ? अर्थश्रीमंतीने दाटलेली अशी कविता ही काय त्याचीच कृपा नाही ? या कवितेत प्रश्न उमटतात तशी उत्तरेही दाटून येतात, ती त्याच्याकडूनच आलेली असतात ना ?

शिवलिंग माझे लिंग | हेच अशांतीचे बिंग

ज्यांच्या झुंजे संज्ञारिंग | व्यापिले गा ||

ज्ञान आणि वासना याच्या खेचाखेचीत सापडलेल्या जिवाला ईश्वरी सहकार्य लाभते पण ईश्वरप्राप्ती होत नाही.स्वतःच्या मर्यादा कळतात तेव्हा ईश्वरी मौनाचा अर्थ उलगडतो.

वावडी वाह्यात माझी ! पोकळीचा पिंजरा

सोड दोरी जाउं दे या कागदाच्या पाखरा !

आता मन हळुहळू शांत होऊ लागले. मर्ढेकर अस्वस्थतेच्या गाभार्‍यातील एका स्वस्थतेचा अनुभव घेऊ लागले. इथे त्यांची प्रतिभा पुनः आसमंतातील सौंदर्यकणांजवळ रमली. मग ते न्हालेल्या गर्भवतीच्या 'सोज्ज्वळ मोहकतेने' नटलेले मुंबई बंदर असो की शुक्राच्या तोर्‍यात 'दंवात आलिस भल्या पहाटे' अशा कुण्या सुंदरीची शोभा असो.
जुन्या प्रेयसीची आठवणही स्मृतींच्या दालनातले एक तडा गेलेले चित्र बनून थांबली.

रहा तिथे तू जिथे आपल्या

हृदयामधली काच तडकली

आणि बिलोरी आशांमधुनी

काळाची बघ चीर उमटली.

विचित्र भाषिक प्रयोग, वैशिष्ट्यपूर्ण संज्ञाप्रवाही शैली या अंगाने मर्ढेकरांच्या जाणीवेचा प्रवाह रुंदावत गेला. प्रौढ समंजस खिन्नपणे मर्ढेकर कुंतीप्रमाणेच दु:खाची मागणी देवाकडे करू लागले.

या दु:खाच्या कढईची गा

अशीच देवा घडण असू दे

जळून गेल्या लोखंडातही

जळण्याची,पण पुनः,ठसूं दे

कणखर शक्ती,ताकद जळकट.

वास्तवाचा एका नव्या समजुतीने स्वीकार करणारे , जुन्या तक्रारींपासून मुक्त नाही पण अलिप्त झालेले कवी मर्ढेकर आता एका नव्या पसायदानाच्या लेखनास मानसिक दृष्ट्या सिद्ध झाले होते.ज्ञानेश्वर-तुकारामांनंतर कित्येक शतकांनी मायबोली मराठीला शांतरसात न्हायलेल्या शब्दांचा हा नवा अनमोल अलंकार लाभला..

भंगू दे काठिन्य माझे आम्ल जाउं दे मनीचे

येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे

ज्ञात हेतूंतील माझ्या दे गळू मालिन्य आणि

माझिया अज्ञात टाकी स्फूर्ती-केंद्री त्वद्बियाणी

राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा

अक्षरां आकार तूझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा..

एका कवीची आंतरयात्रा . त्याची शुद्ध होत गेलेली भक्ती भावना. एवढे सर्व झाले तरी परिपूर्ती मिळाली का ? ईश्वरप्राप्ती झाली का ? कलावंताला मानवीय मर्यादा असतात. पण अलौकिकाच्या किनार्‍यावरले काही क्षण मात्र तो अनुभवल्याशिवाय रहात नाही. गंगाकिनारी एका शांत संध्याकाळी कवीने या सनातन संघर्षमय नात्यातली स्वतःची मर्यादा आदराने स्वीकारली, शब्दबद्ध केली.

या गंगेमधि गगन वितळले

शुभाशुभाचा फिटे किनारा

असशिल जेथे तिथे रहा तू

हा इथला मज पुरे फवारा !

- भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"फक्त तुझी जर दगडी भिवई ...."

~ मर्ढेकरांची असंग्रहीत अशी कविता तुम्ही रसग्रहणासाठी निवडून मर्ढेकरांच्या रस्त्यावरून जो प्रवास केला आहे त्याबद्दल मनःपूर्वक दाद देताना असेही जाणीवपूर्वक म्हणतो की त्यासाठी तुम्हाला किती अभ्यास करावा लागला असेल याची निश्चित अशी कल्पना मी एक मर्ढेकरप्रेमी या नात्याने करू शकतो.

केवळ ४५ वर्षाचे अल्प आयुष्य लाभलेल्या या कविश्रेष्ठाने आपल्या कवितांविषयी प्रसंगी ईश्वराला साकडे घातले असेलही मात्र त्यांची प्रतिभा केवळ त्यापुरतीच मर्यादित असेल याची सुतराम शक्यता नाही, प्रसंगी "व्यर्थ कासया शिणविसि, देवा, गळ्यांत माझ्या फुटका रे मणि!" म्हणतानाची अगतिकता तुम्ही टिपलेली दिसत्येच. मर्ढेकर नि:संशय संवेदनशील आणि भावनाशील असल्याचे सारेच समीक्षक मान्य करतात. खाजगी जीवनातील आपत्ती, नोकरीतील बदल्या आणि तेथील राजकारण, आय.ए.एस.परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, विवाहभंग, कर्ज, चारित्र्यविषयक निंदानालस्ती आदी प्रकार आणि घटनांनी बा.सी.मर्ढेकर यांच्यातील कवी किती व्यथीत झाला असेल त्याचे प्रत्यंतर त्यांच्या कवितांतून दिसते. खचलेल्या मनस्थितीतील साहित्य आत्माविष्कारी भावकाव्य बनते असा इतिहास आहे. तुम्ही लेखात म्हटलेच आहे की, 'कलावंताला मानवीय मर्यादा असतात', त्याच न्यायाने पुढे असेही मी म्हणेन की कदाचित त्या मर्यादेमुळेच त्यांच्यातील कलावंताने आपले शब्द रक्तबंबाळ केले नाहीत तर त्याच शब्दांना जादुमय बांधणी दिली आणि आज कवितांना ६०-७० वर्षे होत आली तरी मर्ढेकरप्रेमी ती अभिव्यक्ती विसरण्यास तयार नाहीत.

मर्ढेकरांची आंतरयात्रा, भक्ती भावना आणि त्याची परिपूर्ती त्याना मिळाली का ? असा एक उल्लेख लेखात आहे. व्यक्तिशः मला असेच वाटत राहील की अखेरच्या फैजापूर येथील जन्म आणि नवी दिल्ली येथील त्यांचा मृत्यू या दरम्यान त्यांच्या वाट्याला 'सुख' कधी आले असेल का ? लौकिकार्थाने उत्तर नकारार्थीच येते. तरीही तुम्ही दिलेल्या कवितांच्या उदाहरणांची श्रीमंती दुरून जरी न्याहाळली तरी शब्दलक्ष्मी त्यांच्या घरी जणू पाणी भरत होती असे वाटल्याशिवाय राहत नाही.

खूप लिहिण्याजोगे आहे अजुनी तुमच्या या सुंदर लेखावर..... पण मी इथल्या रसिक सदस्यांच्या प्रतिक्रियाही वाचण्यास तितकाच उत्सुक असल्याने थांबतो.

अशोक पाटील

अश्विनी, रैना, अशोकजी.
खूप आनंद मिळतो हे लिहिताना अन समानव्यसनी लोकांच्या डोळ्यातून ते पुनः वाचतानाही.
अशोकजी, ''फक्त तुझी जर दगडी भिवई''.. शीर्षकात हेच असायला हवे होते अशी एक भावना अंतर्मनात होती, ती दुरुस्ती आता करतेय. धन्यवाद.
दुर्दैव हात धुवून कसे मागे लागते प्रतिभावंताच्या याचा वस्तुपाठच मर्ढेकरांचे जीवन म्हणजे, बरोबरच लिहिले आहे तुम्ही तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादात. त्यांच्या 'नतद्रष्ट गाथे' चे जतन करणारे मनस्वी व्यासंगी 'अभिरुची' चे संपादक कै. पु.आ. चित्रे यांच्याही मागे तशाच उपाधी होत्या. अशा विपरीत परिस्थितीत हे शब्द लिहिले गेले, सांभाळले गेले , काळाच्या पटलावर कोरले गेले म्हणून आज आपण श्रीमंत आहोत.

सटीक मानवतेची टिपणी
पुन्हा वाचली, अर्थ तोच तरि
आभाळाच्या पल्याड स्पंदन
टिपरी त्याची या मडक्यांवरी!!

कवीला सूत्रात बांधणं अवघडच, तरीही हा धावता आढावा आवडला. Happy

>> अशा विपरीत परिस्थितीत हे शब्द लिहिले गेले, सांभाळले गेले , काळाच्या पटलावर कोरले गेले
कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला....

अवघ्या सव्वाशे-एक पानांच्या निर्मितीत आजपर्यंतच्या कवींचा स्फूर्तिस्रोत झालेल्या कविश्रेष्ठाबद्दल लिहून भारतीताई तुम्ही मनाचा एक हळवा कोपरा पुन्हा सुगंधित केला आहे. मर्ढेकर कितीही वेळा वाचले तरी 'दवांत आलिस भल्या पहाटीं' वाचतानाची हुरहुर किंवा 'व्यर्थ नव्हे का ओंजळ जेथे, शरीर म्हणते सारे पाज' वाचताना मनात रुतणारा सल कमी होत नाही.
अशोकजींनी उत्कट प्रतिसादात त्यांच्या जीवनाविषयी लिहिलेच आहे. त्यादृष्टीने मी जितका विचार करतो तितके 'He deserved more' असे नेहेमी वाटते. याबाबतीत का कुणास ठाऊक सदैव व्हॅन गॉघशी साधर्म्य जाणवते. तशीच काळाच्या पुढची अफाट प्रतिभा, बेहोष प्रपातासारखी निर्मिती, वेदनामय अल्पायुष्य आणि मृत्युनंतर मिळालेली लोकोत्तर प्रसिद्धी!
सुंदर लिखाणाबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा 'हॅट्स ऑफ' .

लि़खाण आवडले...

खरे सांगू का? मी मर्ढेकरांची कविता वाचायाला घेतली असेल विशीच्या आसपास; पण तेंव्हा अजिबात आवडली नव्हती. म्हणून परत कधीच वाचली नाही आणि नंतर वेळच मिळाला नाही. तुमचा लेख वाचून आता परत वाचायला घ्यावी म्हणतो. बघू योग आहे का ते.

अत्यंत सुंदर..
मला मर्ढेकर प्रत्येकवेळी कळतातच असं नाही. अर्थाची वलयं उठत रहातात. तरीही काठाकाठानेच फिरतेय असं कुठेतरी वाटत रहातं.
कधीतरी झोकून देऊन तळ गाठावा अशी असोशी होईल तेव्हा भारती, तुझे पाय धरेन म्हणते. तोवर इथेतरी अशीच लिहिती रहा.

"....आषाढीच्या पूर्वसंध्येला या शापित भागवताचा जागर करावासा वाटला....."

~ कमालीची देखणी प्रतिमा ! त्यातही 'शापित' चे प्रयोजन खूप भावले, भारती.

"रविकिरण" कालावधी असो वा केशवसुतकालीन कवी असोत, ते सारेच कवी अशक्त सादरीकरणाचे होते असे नव्हे. पण पाश्चिमात्य साहित्यसंकृतीचा पगडा विलक्षण होता आणि त्यामुळे भारतीय संस्कृती दुटप्पी होत चालली होती असे असले तरी ज्यावेळी केशवसुत चेतनेच्या गोष्टी करत होते त्यावेळी बालकवी निसर्गातील चैतन्याकडे धाव घेत होते. या दोघांच्या प्रभावापासून स्वतःची विलक्षण अशी ओळख करून देणारे स्वयंभू कविमन म्हणजे बा.सी.मर्ढेकर. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार झाले असले तरी अंतर्मनी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या 'शापित भागवता' ने भारतीय संस्कृतीचे खरेखुरे रुप वा द्विधा स्थिती आपल्या कवितेतून अशा काही ताकदीने उभी केली की ते आजही 'एकमेव' ठरले आहे.

शरच्चंद्र मुक्तिबोध यांचा "नवी मळवाट" हा १९४९ चा काव्यसंग्रह तुमच्या वाचनात आला असेल अशी कल्पना मी करतो. त्यावेळीच्या प्रस्तावनेत मुक्तिबोधांनी "मर्ढेकरांच्या काव्यातील नैतिक निराशा व्यक्तिवादी मानवतावादामधून जन्माला आलेली आहे व त्यांचे काव्य र्‍हासशील काव्यपरंपरेत बसणारे आहे" असे विधान केले होते. ४०-५० च्या दशकांत या विधानाचे साहित्यिकांत कितपत स्वागत झाले होते याचा विदा जरी उपलब्ध नसला तरी मर्ढेकरांनंतर त्यांच्या परंपरेतील काव्याचे स्वरुप बदलले असे मानण्यास जागा आहे. दिलीप चित्रे, कोलटकर आदी काही ठळक अपवाद वगळता मर्ढेकरांइतका अस्तित्ववादाची जाणिव किती कवींनी दाखविली हा तुमच्यासारख्या विदुषीसाठी संशोधनाचा विषय ठरू शकेल.

अशोक पाटील

कितीवेळा वाचले तरी समाधान होत नव्हते इतका अप्रतिम लेख ...

"पिपात मेले ओले उंदीर..." या ओळींपाशीच मर्ढेकरांना संपवणारे आम्ही - त्यांच्या या अफाट प्रतिभेची ओळख अशा प्रकारे करुन दिल्याबद्दल भारतीजी -तुम्हाला शतशः धन्यवाद....

भारतीजी, अशोकजी, अमेय -
तुम्ही मंडळी तुमच्याकडच्या खजिन्यातले काहीबाही का होईना इथे देत जा - हे असे वाचून, त्यावरील विशेष प्रतिसादातून खूप काही नवे गवसल्यासारखे होते -काहीतरी लखलखीत अनुभवल्यासारखे वाटते...
तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती...

भारतीजी:

मर्ढेकरांच्या अनेक कवितांचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

नाही कोणी का कुणाचा | बाप-लेक मामा-भाचा
मग अर्थ काय बेंबीचा | विश्वचक्री ?

सोइरे-धाइरे दिल्याघेतल्याचे ह्याच्या फार पुढे जाणारा हा विचार.
मर्ढेकरांना खरेतर तुकारामांचा वारसदार म्हणायला हवे.

एकूणच आपले भाष्य फार भावले.

समीर

सर्वांचे प्रतिसाद वाचून फार आनंद झाला. मर्ढेकरांचे या निमित्ताने सर्वांनी पुन; स्मरण करावे, आप-आपल्याजवळचे सर्वांनी काही शेअर करावे,भावना अन विचारांची देवाण घेवाण व्हावी हाच हेतू होता.
वैभव, अमेय, समीर साऱख्या तरुण कवींना आपल्या वारशाचे पुन; स्मरण झाले, त्यांच्या संवेदनशील मनात प्रतिक्रियांचे तरंग उमटले म्हणजे माझा हा हेतू साध्य झाला. अमेय,सुंदर मनस्वी प्रतिसाद,होय, व्हॅन गॉघ एका अर्थी आठवतो, पण अर्थातच भेदस्थळेही आहेत. मर्ढेकरांचे परिशिलीत उच्च विद्याविभूषित साहेबी बाह्यरूप अन आतला देशी संतपरंपरेत घडलेला बदलत गेलेला कवी हे दुभंगत्व काही वेगळेच होते.
दाद,जेव्हा झोकून देशील तेव्हा नक्कीच आमच्या कानामनाचे पारणे फिटेल असे काही ऐकायला वाचायला मिळेल.
स्वाती,काल राहून गेले,
सटीक मानवतेची टिपणी
पुन्हा वाचली, अर्थ तोच तरि
आभाळाच्या पल्याड स्पंदन
टिपरी त्याची या मडक्यांवरी!!
या ओळी तुझ्याच का ? -------/\-------
सुसुकु, जाई,साती, शशांकजी..
मर्ढेकर हे एका अत्यंत वेगळ्या संदर्भात पण तुकारामांसारखेच गांजलेले उमदे व्यक्तिमत्व आहे, त्यांना वाचताना सगळीकडून कोंडी झालेल्या मराठी शब्द्सृष्टीच्या महानायकाची प्रतिमा डोळ्यांसमोर येते. अशा लेखनात आल्हाददायकत्व कमी असले तरी अलौकिक सौंदर्य अन वेदनाविरेचनाची ऊर्जा त्यातून निथळत असते.
अशोकजी, तुमच्या दुसर्‍या अन साक्षेपी प्रतिसादातून एवढेच जाणवले की या विषयावर सांगण्यासारखे, आम्ही ज्यातून काही नवे अभ्यासावे असे तुमच्याकडे बरेच आहे. तुम्ही प्रतिसादातून नेहमीच अत्यंत जिव्हाळ्याने तपशीलाने व्यक्त होता, खरे तर तुमचे स्वतंत्र लेखनच वाचायला हवे निरनिराळ्या विषयांवर, तसे प्रकृतीस्वास्थ्य तुम्हाला लवकर लाभो.'नवी मळवाट ' माझ्या वाचनात आलेले नाही, पण त्याप्रकारचे आक्षेप मी वाचले अन ऐकले आहेत.मर्ढेकरांचे आत्मीय सुहृद कै. पु.आ. चित्रे , 'अभिरुची' मासिकाचे संपादक, ज्यांच्याकडे मर्ढेकरांनी हस्तलिखिते सोपवली होती त्या महाराष्ट्रशारदेच्या महान पण विपन्न संपादकांचे मला खूप प्रेम लाभले होते हा माझा भाग्ययोग.

रैना, ट्यागोने खूप मनापासून लिहिले आहे त्या वादग्रस्त कवितेवर.मला प्रतापवारांचे इंटरप्रिटेशन जास्त पटते ट्यागो किंवा ज्यूंच्या संदर्भापेक्षा.
अर्थात माझ्या लेखाचा विषय अन निमित्त वेगळे आहे. मला भावणारे मर्ढेकर 'पिपात मेले' , 'मी एक मुंगी ' 'जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा' च्या पुढे निघून आलेले आहेत. या कविता धक्कादायक, प्रामाणिक आहेत, तंत्रावर पूर्णपणे नवे प्रयोग करणार्‍या आहेत.म्हणून अनाकलनीय झाल्या आहेत. कवी नवे सूर , नवी परिभाषा शोधतो आहे .व्यवस्थेशी बंड करण्याचा आवेग सुरुवातीला नेहमीच जास्त भडकपणे व्यक्त होतो.
अगदी सुरुवातीची' शिशिरागम' मधली पारंपारिकता, नव्याने गवसलेली ही क्रांतीकारी शैली व नंतरची समावेशक सौम्यता ..कवीचीच निरनिराळ्या काळातली छायाचित्रे , वाढीचे आलेख.

(फेसबुक वरील मित्रांच्या कृपेने हा लेख वाचायला मिळाला … नाहीतर एका मोठ्या संधीला मुकलो असतो.)
वा! मूळ लेख तर उत्कृष्ट आहेच … पण श्री. अशोक पाटील यांनी अल्प शब्दांत जो आढावा घेतला तो देखील अत्यंत वाचनीय झाला आहे. तो काळच मला वाटतं दुःखातून कलेला जन्म देणारा ठरला.

मर्ढेकर आणि ईश्वर हा विषय निघताच मला नेहमी त्यांची अजून एक कविता आठवते … मला अतिशय आवडणारी …

सांदीला पण सोवळ्यात जो
आजवरी हा देव ठेवला
धरावयाच्या मुळ्या फांदिने
ओवळ्यात तर प्रभूस ढकला …

… आणि माझ्या अंदाजाने साधारणतः त्याच काळात लिहिलेल्या कुसुमाग्रजांच्या …

भित्या भावनेला । शोधायासी धीर
पाषाणास थोर । मीच केले ॥

दुर्बलता माझी । दडवाया गेलो
अधिक जाहलो । दुर्बल मी ॥

या ओळींशी मर्ढेकरांच्या कवितेचं साम्य जाणवतं. ( मर्ढेकरांनी अल्पायुष्यात दोन महायुद्धं पाहिली. त्या महायुद्धांनी दृढ केलेल्या भावना तर नव्हेत या? कुसुमाग्रजांच्या या ओळी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्याच .... मला वाटतं.)

धन्यवाद निलेश,
>>मर्ढेकरांनी अल्पायुष्यात दोन महायुद्धं पाहिली. त्या महायुद्धांनी दृढ केलेल्या भावना तर नव्हेत या >>
होय, तसेच तसेच आहे. या महायुद्धांचा मानवी संवेदनशीलतेवर जो प्रहार झाला त्याचे पडसाद आजही आपल्या मनाच्या तळघरातून आपल्याला ऐकू येतात, मग त्या काळात प्रत्यक्ष जगलेल्या कवी-लेखक-चित्र-शिल्पकारांवर , त्यांच्या कलाभिव्यक्तीवर चिरंतन परिणाम होणे अगदी अटळ होते.
महाभारत हे सर्वनाशी युद्धाची कारणे, परिणाम, तत्वज्ञान , अध्यात्म याचे प्रत्ययकारी महाकाव्य.

विनाशातून येणारी ही सृजनाची स्पंदने ..

निलेश_पंडित,

>> ( मर्ढेकरांनी अल्पायुष्यात दोन महायुद्धं पाहिली. त्या महायुद्धांनी दृढ केलेल्या भावना तर नव्हेत या?
>> कुसुमाग्रजांच्या या ओळी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्याच .... मला वाटतं.)

होयशा वाटतात. सोबत भारताची फाळणी पण झाली होती. नक्की तारीख बघायला हवी. हा माझा अंदाज बरंका! मला साहित्यात फारशी गती नाही.

आ.न.,
-गा.पै.

गा पै ...
आपण म्हणता ते बरोबर आहे ... अर्थात मलाही पूर्णपणे खात्री नाही ...
कुसुमाग्रजांची ही कविता १९३९ सालची आहे पण मर्ढेकरांच्या अशा अनेक कविता फाळणी नंतर लिहिलेल्या असाव्यात. फाळणीचा प्रभाव असणारच.

गा पै,निलेश,तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,
'मर्ढेकरांची कविता ' मध्ये कवितांचा लेखनकाल सूचित केलेला नाही.सैलसर कालक्रम असावा असे शैलीतल्या बदलांवरून कळते.
कवितांच्या संहितेत काही ठिकाणी स्पष्टतेने महायुद्धांचे उल्लेख आले आहेत , जसे
'' पावसाळे आले गेले
दोन युद्धे जमा झाली
रस्ताकडां वीजबत्ती
कितीकदा आली गेली ''
तुलनेने
''प्रेमाचे लव्हाळे ,
सौंदर्य नव्हाळे
शोधू ?
-आसपास
मुडद्यांची रास
यंत्रातून आग
गोळ्यांचे पराग '' ही प्रख्यात कविता दोन्ही रक्तलांच्छित परिस्थितींना लागू पडत असली तरी महायुद्धावरचे भाष्य त्यात प्रकर्षाने जाणवते आहे.
त्यांनी फाळणीच्या महादु:खावर स्वतंत्रपणे लिहिलेलीही कविता आहे.
'' कां हो माजविता दुही | माखता स्वातंत्र्याची वही
स्वजनरक्ताने प्रत्यही | लळथळा '' ही संपूर्ण कविता फाळणीकालीन मानसिकतेवर आहे.