प्राण

Submitted by बेफ़िकीर on 13 July, 2013 - 02:47

"जबतक बैठनेको कहां न जाये, शराफतसे खडे रहो! ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बापका घर नही"

"आपने हमेशा मुझसे... एक बिझिनेसमनकी हैसियतसेही बात की है डॅड"

================

स्वतःमधील कलागुणांच्या बळावर स्वतः महान आहोत हे सिद्ध करून दाखवणे व अधिकाधिक लोकप्रियता, जनाश्रय, पुरस्कार, आव्हानात्मक कलानिर्मीतीच्या संधी आणि एकमेवाद्वितीयता मिळवत जाणे, हे करणार्‍यांची शेकडो उदाहरणे भारतीय रसिकांनी आजवर पाहिली.

मोतीलाल, सोहराब मोदी, बलराज सहानी, अशोक कुमार पासून ते रणबीर कपूर आणि फरहान अख्तर! विनू मांकडपासून शिखर धवन! सेहगलपासून सोनू निगमपर्यंत! वगैरे वगैरे!

मात्र अशी फार कमी उदाहरणे असावीत की आपल्या कलागुणांच्या प्रकटनामार्फत इतरांना त्यांच्यातील कलागुण अधिक प्रभावीपणे व अधिक दर्जेदारपणे प्रकट करता यावेत अशी क्षमता बाळगणारा कलाकार सापडणे!

कपिलदेवच्या झिंबाब्वेविरुद्ध केलेल्या १७५ धावांच्या खेळीचे अनेक प्रकारे महत्व होते, हारलेला सामना फिरवण्यात आला होता हे त्यातील पहिले! ज्या काळात एक दिवसीय सामन्यात इतक्या धावा एखादा खेळाडू करू शकतो हेच लोकांना नीटसे ज्ञात नव्हते त्या काळात ती खेळी अस्तित्वात आलेली होती. नंतरची अनेक वर्षे तो एक अबाधित विक्रम राहिलेला होता. मात्र एक सुप्त महत्व असे होते की ती खेळी इतकी प्रोत्साहीत करणारी होती की नंतर आपल्या संघाने ते स्पिरिट पकडून लाजवाब विजय साकार केले.

कपिलदेवकडे गाडी वळवण्याचे कारण इतकेच की प्राणच्या अभिनयात आणि त्या खेळीत काहीसे साम्य होते. प्राणने केलेल्या कित्येक भूमिका अश्या होत्या की त्या समोर इतर भूमिका करणारे नेहमीपेक्षा अधिक उठून दिसायचे. तोच अमिताभ बच्चन शक्तीमधील पोलिस अधिकारी दिलीपकुमार या आपल्या बापासमोर (आणि अभिनय क्षेत्रातीलही जवळपास बापासमोरच) समर्थपणे उभा राहिलेला पाहताना नव्या पिढीला कोण कौतुक वाटले होते. पण तोच अमिताभ शराबीमधील बापासमोर दारू पीत उभा राहिला तेव्हा त्याच्यावर जीव उधळावासा वाटला, यामागे प्राणने स्वतःच्या भूमिकेपलीकडे जाऊन दुसर्‍याला त्याची भूमिका अधिक जस्टिफाय करता येईल असा काहीतरी अभिनय केल्याचे आठवते. नुसताच 'मी किती महान आहे हे बघच' असा पावित्रा न बाळगता 'चल तुझ्यामधून खराखुरा अभिनेता बाहेर काढतोच की नाही बघ' असा काहीसा 'न ठरवलेला व आपोआप आलेला' पावित्रा प्राणच्या भूमिका पाहून जाणवायचा. बॉबीमधील टिपीकल खानदानकी इज्जत वगैरे जपणारा श्रीमंत बाप जर नीट साकारला गेला नसता तर अख्ख्या चित्रपटाचे कथानक उभे कशावर राहिले असते हाच प्रश्न पडतो.

प्राणने एखाद्या संस्थेप्रमाणे सर्व प्रकारच्या भूमिका समर्थपणे हाताळल्या. हा एकच माणूस आहे की अनेक माणसे आहेत असे वाटावे इतपत समर्थपणे! बाकी त्या महतीनुसारे प्राणला आर्थिक लाभही भरपूर मिळाल्याचे आजच पेपरमध्ये वाचायला मिळाले. पण वरील 'प्रोत्साहीत करणारा अभिनेता' यानंतर प्राणच्याबाबत ठळकपणे जाणवणारी महान बाब म्हणजे सहा दशके अधिराज्य गाजवण्याची क्षमता! जेथे नायकप्रधान चित्रपटांची गंगा वाहात असूनही नायकांनाही इतकी वर्षे टिकता आले नाही तेथे हा माणूस साठ वर्षे टिकून राहिला व अधिकच समृद्ध होत गेला.

डिग्निटी ही प्राणमधील तिसरी अत्यंत महत्वाची बाब असल्याचे जाणवेल. भूमिकेला नेहमीच एक किमान दर्जा प्राणने प्रदान केला. स्वतःची वेशभूषा, संवादांची भाषा, संवादफेकीची लकब, अभिनय, मुद्राभिनय यात कोठेही 'स्वस्तपणा' येऊ दिला नाही. कित्येकदा प्रेम चोप्राही स्वस्त झालेला पाहिला, प्रेमनाथ तर एकदोनदा फारच स्वस्त भूमिका करून बसला, नंतरच्या खलनायकांनी तर अनेकदा दिवे लावले. पण प्राणचा खलनायक हा - वाचायला विनोदी विरोधाभास वाटेल पण - उच्च दर्जाचा खलनायक होता.

प्राण!

व्हील चेअरवर बसलेली ती मूर्ती पाहवतच नाही आहे. काळा कुळकुळीत उंची सूट घालून पाईप ओढत एक भुवई वर करून आणि एक गाल उडवून 'इनिशिअल पोझिशनिंग'मध्येच समोरच्याची 'हवा टाईट' करणारा लाजवाब अभिनेता!

आदरांजली!

=========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राण यांचे "... आणि प्राण!" हे आत्मचरित्र मी वाचले आहे. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार आणि त्यांचे यश.. वाचक गुंतून पडतो. Happy
या परिपूर्ण अभिनेत्याला माझी आदरांजली.

नुसताच 'मी किती महान आहे हे बघच' असा पावित्रा न बाळगता 'चल तुझ्यामधून खराखुरा अभिनेता बाहेर काढतोच की नाही बघ' असा काहीसा 'न ठरवलेला व आपोआप आलेला' पावित्रा प्राणच्या भूमिका पाहून जाणवायचा.>> सहमत
सुंदर लिहीलाय हा लेख.
अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे लोकांसमोर रहाण्यासाठी, नाव टिकवण्यासाठी पडद्या बाहेर कोणताही शो बिझनेस करताना तो दिसला नाही. त्याची लेव्हलच उच्च होती की अशा कशाची गरज नव्हती.
विनम्र श्रद्धांजली

पाण यांना आदरांजली.

यामागे प्राणने स्वतःच्या भूमिकेपलीकडे जाऊन दुसर्‍याला त्याची भूमिका अधिक जस्टिफाय करता येईल असा काहीतरी अभिनय केल्याचे आठवते. नुसताच 'मी किती महान आहे हे बघच' असा पावित्रा न बाळगता 'चल तुझ्यामधून खराखुरा अभिनेता बाहेर काढतोच की नाही बघ' असा काहीसा 'न ठरवलेला व आपोआप आलेला' पावित्रा >>> अत्यंत बावळट विधानांनी भरलेला लेख. दुर्दैव प्राणसाहेबांचं !

अटल बिहारी वाजपेयींबरोबर देव आनंद बस मधे बसून पाकिस्तानात गेला पण प्राण गेला नाही. कारण तो म्हणत असे, "ज्या लोकांनी आम्हाला आमच्याच घरातून हुसकावून लावले तिथे मी परत जाणार नाही."

And Pran या त्यांच्या चरित्रात हे वाचून प्राणसाहेबांविषयी आदर प्रचंड वाढला होता.

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो ही प्रार्थना.

विनम्र श्रद्धांजली

<<यामागे प्राणने स्वतःच्या भूमिकेपलीकडे जाऊन दुसर्‍याला त्याची भूमिका अधिक जस्टिफाय करता येईल असा काहीतरी अभिनय केल्याचे आठवते. नुसताच 'मी किती महान आहे हे बघच' असा पावित्रा न बाळगता 'चल तुझ्यामधून खराखुरा अभिनेता बाहेर काढतोच की नाही बघ' असा काहीसा 'न ठरवलेला व आपोआप आलेला' पावित्रा प्राणच्या भूमिका पाहून जाणवायचा >>
खरच पटलं.. सुन्दर लेख !!

छान लेख.
प्राण साहब यांना श्रध्दांजली!

कॅमेरा समोर निवळ ऊभे राहून फक्त 'देहबोली' मधून देखिल सहज अभिनय साकारणारा कलाकार म्हणजे प्राण!
क्रिकेट च्या भाषेत सुनिल गावसकर चा "स्टांस"..
पुढील संवाद, रूबाब, भूमिका, अदाकारी ई. वगैरे म्हणजे सुनिल च्या बॅट मधून निघालेले ड्राईवज! flawless, free flowing, attractive, captive, and simply a"TREAT"!!!!
अभिनयातला तो "प्राण" गेला...........!

बेफिकीर,

"प्राणने केलेल्या कित्येक भूमिका अश्या होत्या की त्या समोर इतर भूमिका करणारे नेहमीपेक्षा अधिक उठून दिसायचे. "

पूर्णपणे सहमत. हे वैशिष्ट्य जाणवणे पण कठीण. धन्यवाद.

माझीपण प्राण यांना आदरांजली.

फेसबुकावर आधी वाचला हा लेख! मोबाईलवरून विशेष प्रतिक्रीया देता आली नाही.

अत्यंत क्रीस्प वाटला हा लेख.

मराठीत निळू फुले आणि हिंदीत प्राण ह्यांना पडद्यावर नुसते पाहिले तरी स्त्रिया शिव्यांची लाखोली वहात. ह्यातच त्यांच्या भूमिका जगण्याला जनमानसात किती दाद होती हे दिसून येते.